नव्वदच्या दशकातले कार्टून्स!

।।श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष, 

         लहान आणि मोठ्यांचं पटकन लक्ष जावं आणि त्यांनी ते बघतच बसावं अशी एक गोष्ट म्हणजे कार्टून्स. अगदी प्रत्येकाने ऍनिमेटेड फिल्म्स पहिल्या आहेत. ह्या फिल्म्सची सगळ्यात खास गोष्ट मला अशी वाटते की ह्या मध्ये एक मेसेज, मॉरल, तात्पर्य दडलेलं असत. जे लहान मुलांना समजतं आणि त्यांच्या मनात कायमचं रहातं. 
        तर आजच्या भागात मी तुम्हाला कार्टून्सचं माझ्या सोबत असलेलं नातं सांगणार आहे आणि जो कोणी हा लेखं पूर्ण वाचेल त्याला शेवटी एक गिफ्ट सुद्धा आहे. कार्टून्स कडून मी खूप काही शिकलो आहे. इंग्लिश कोणी बोलतं असेल आणि ते मला समजणं ह्याची सुरवात कार्टून्स पासून झाली. आपण मांडलेल्या गोष्टीच्या शेवटी एक तात्पर्य देणं हा प्रकार मला खूप आवडतो कार्टून्स मधला. 


Captain Planet and the Planeteers. 
Moral: The Power is yours.
हिंदी: शक्ति तुम्हारे बस में हे. 
         तुम्हाला जर हे कार्टून आठवत असेल तर तुम्ही फार नशीबवान आहात. पृथ्वीला वाचवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे ही शिकवण देणारं जर कुठलं लहान मुलांसाठीच कार्टून तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा. 
---------------------------


रोड रनर हे कार्टून मी अजूनही बघत बसतो आणि हसत बसतो. वाईल ई कोयोटे हा एक प्रकारचा प्राणी आहे ज्याला सतत भूक लागलेली असते आणि तो खाण्यासाठी फक्त आणि फक्त रोड रनर च्या मागे लागलेला असतो. मी कोणालाही रोड रनर चा फोटो दाखवला ना की पहिली रीऍक्शन काय येते माहिती का? "बीप बीप" 
       मला एक गोष्ट ह्या कार्टून मधली न समजलेली आहे तुम्हाला माहिती असेल तर सांगा. हा कोयोटे नेहिमी ऍकमे कंपनीचे प्रॉडक्ट्स का वापरतं असतो जे नेहिमी फेल होतं असतात? माहिती असेल तर नक्की कळवा. 
---------------------------


आता टॉम अँड जेरी बद्दल काय बोलावं! मला कोणी जर मांजर उंदीर खाते असं म्हणलं तर पहिले डोक्यात येतं ह्यांनी टॉम अँड जेरी पाहिलं नसावं. कार्टून काय असतं ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे टॉम अँड जेरी.
---------------------------


 पोपाय मी नुकताच काही दिवसांपूर्वी माझ्या भाच्या आणि भाच्ची सोबत YouTube वर बघत होतो. आम्ही सकाळचा नाश्ता करता करता हे कार्टून लावलं. ते दोघे नाश्त्याच्या प्लेट्स बाजूला ठेवून हसत बसले होते. 
        पुढच्या मिनिटाला माझा भाच्चा ओजस आज्जी ला म्हणाला आज पालकच काहीतरी बनव ना मला बघायचं आहे अशी कशी पॉवर येती पालक म्हणजे स्पिनॅच खाऊन.
---------------------------

        
तुम्हाला स्कुबीडू माहित नाही? आताच्या आता हा ब्लॉगवाचून झाला की स्कुबीडू चे जे कुठले जुने एपिसोड्स मिळतील ते बघा. अंधश्रद्धा निर्मूलनाचे हे निर्माते आहेत. 
---------------------------

           कॅप्टन प्लॅनेट हे कार्टून मला खुपचं आवडत होत. कसे ते सगळे मित्र मिळवून पृथ्वी वरच्या प्रदूषणाला थांबवत असतात. कशी त्यांची धडपड असते हे मस्त मांडल होतं लेखकांनी. पॉपाई द सेलर मॅन हे एक कार्टून होतं ज्यांनी आमच्या पिढीला पालक खाण्याचं महत्व पटवून दिलं. टॉम अँड जेरी तर भांडण आणि मैत्री ह्या कश्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सांगितलं. 
        स्कुबीडू ने तर भूत नावाचा प्रकार नसतो हेच पटवून दिल. हिम्मत करून आपल्या आयुष्यातल्या भुताच्या भीतीला कसं पळवायचं हे शिकवलं. रोड रनर मध्ये तर कसं आपण कोणाचं वाईट करण्याचे कितीही प्लॅन केले तर ते उलटे आपल्यावरच येतात हे सांगितलं. 
       असे एक नाही माझ्याकडे एक हजार उदाहरणं आहेत. पण आज मी एका कार्टून बद्दलची आठवण तुम्हाला सांगतो आहे जी आजही माझ्या लक्षात आहे आणि ह्याच आठवणीने मला आयुष्याचा सगळ्यात मोठा धडा दिला.
         नवीन वर्ष सुरु होण्याच्या जवळपासची वेळ होती. मला वर्ष तर आठवत नाही पण असाच डिसेंबरचा शेवटचा आठवडा होता. ह्याच वेळेस क्रिसमस येतो ना तर ह्या विषयाचे खूप सारे कार्टून्स चालू असतात. मला बरं नव्हतं आणि मी घरात झोपून होतो. आई-बाबा दोघेही आपल्या आपल्या कामाला गेले होते. मी लेट उठलो काही तरी खाल्लं आणि टीव्ही समोर कार्टून बघत बसलो. 
       एक कुठलं तरी कार्टून होत मला जे आजची आठवत नाही पण त्या कार्टून मुळे मिळालेली शिकवण आजही लक्षात आहे. ह्या कार्टून मध्ये एक छोटा मुलगा असतो. ख्रिसमसच्या दिवशी तो सकाळी आनंदात उठतो आणि दर वर्षी प्रमाणे रात्री लावून ठेवलेल्या सॉक्स कडे पळतो. तुम्हाला माहित असेल ख्रिसमसच्या रात्री सॉक्स मध्ये गिफ्ट मिळतं ते. 
        तर त्याला मिळणाऱ्या गिफ्टसाठी हा लहान मुलगा पळत जातो. पण गिफ्ट बघून तो खूप नाराज होतो कारण जे पाहिजे ते हे गिफ्ट नसतं. छोटंसं काहीतरी एक चॉकलेट आणि खेळणं त्याला मिळतं. त्याचा मूड खराब होतो आणि तो बाकी आवरा आवरी करायला जातो. 
         दिवस भर तो आपल्याला किती छोटं गिफ्ट मिळालं ह्याच विचारत असतो आणि बाहेर फिरत असताना त्याला एक कुटुंब दिसत जे गरीब असत आणि त्यांचा कडे फक्त लोकांनी दिलेला ख्रिसमसचा उरलेला केक असतो. 
        पण त्या केक मध्ये सुद्धा आई वडील लहान मुलं सगळे खुश असतात आणि एक मेकांना वाटून वाटून खात असतात. ह्याला जाणीव होते हा घरी पळतो आणि आपल्या आई बाबांना कडकडून मिठी मारतो अणि त्याचं ते छोटंस गिफ्ट घेऊन खेळत बसतो. 



           तुम्ही हे वाक्य ऐकलं आहे का? "मेरे पास जूते ना होने का गम मुझे तब तक था जब तक मैंने बिना पैरो वाला इंसान नहीं देखा।" 
     तसचं काही ह्या मुलासोबत झालं आणि ह्या सारखंच तुमच्या माझ्या बरोबर पण होत आहे. आपल्या कडे जे आहे त्या बद्दल आपण कृतज्ञ आहोत का? का जे दुसऱ्या कडे आहे ते बघून हे पण मला पाहिजे असं सारखं वाटतं रहात? कृतज्ञ रहाणे हे एका श्रीमंत विचारांचं लक्षण आहे आणि तुलना करणे, त्याच्या कडे आहे माझ्या कडे नाही हे विचार हे सगळे गरीब विचारांचे लक्षणं आहेत. 

      आपण आज इतकेच नशीबवान आहोत की आपल्याला ह्या भारतासारख्या देशात जन्म मिळाला आणि जिथे इतक्या प्रकारचे सण साजरे होतात. का बरं आपल्याला आनंदानी उठून रोजची कामं करण्यासाठी एखाद्या सणाची गरज पडते? 
        उठल्या वर आपले हात पाय किंवा सर्व अवयव अगदी ठणठणीत काम करत आहेत हे गिफ्ट कमी नाही का बोला? नवीन वर्ष सुरु होतं आहे आणि संकल्प केल्याशिवाय नवीन वर्षात कसे काय जाणारं बरं? मी एक छोटासा संकल्प सांगतो. सकाळी मी आनंदात आणि मला मिळालेल्या दिवसाचं मी सोनं करेन ह्याच विचारात उठेन इतकं ठरवा. बस्स..बाकी सगळं कसं बदलतं ते बघा मग. 
        आणि मी म्हणालो होतो ना शेवटी एक गिफ्ट सांगतो देतो म्हणून तर सगळ्यात आधी तुम्ही बाकी लेख पूर्ण न वाचता स्क्रोल करून डायरेक्ट खाली आला आहात का? असेल तर पुन्हा सांगतो. नो चीटिंग. सगळा ब्लॉग वाचा. दोन मिनिटं प लागणार नाहीत इतकं सोप्प आणि छोटंसं लिहिलं आहे. आता सांगतो गिफ्ट बद्दल. 
        तुम्हाला हे सगळे जुने कार्टून्स बघावे वाटतात का जसं मला पण वाटतं? एका वेबसाईट नाव सांगतो. इथे जगातले सगळे नवे जुने कार्टून्स फ्री मध्ये बघायला मिळतात आणि ऍड्स पण लागत नाहीत. Watch Cartoons Free Online 


तुम्हाला जर असे लेख वाचायला मिळावे आणि मला ह्याची आठवण राहावी असं वाटतं असेल तर तुम्ही आमच्या ई-मेलच्या ग्रुप चा भाग बनू शकतात. आणि जर तुम्ही ई-मेल चेक कारण्यापैकी नाही तर आमची व्हॅट्सऍप कॉम्युनिटी जॉईन करू शकतात. इथे तुम्हाला नवीन लेख आला की नोटिफिकेशन मिळतं रहातील.

ई-मेल लिस्ट मध्ये सहभागी होण्या साठी इथे क्लिक करा. ई-मेल द्वारे पत्र व्यवहार.  

व्हॅट्सऍप चॅनेल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार व्हाट्सऍप चॅनल.

मी लिहिलेल्या छोट्या कथा तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवा. ही कथा जर आवडली नसेल तर मला कळवा आणि छोट्या छोट्या विचारांनी प्रत्येक मनात जाण्याच्या आमच्या प्रयत्नाला बळ द्या. 

बऱ्याच वर्षांनी मराठी लिहितो आहे. लिहिण्यामध्ये जर कुठे गडबड जाणवली तर भावनेकडे लक्ष द्या इतकीच विनंती. 

कळावे लोभ असावा,

तुमचा मित्र, 

अजिंक्य 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 

Post a Comment

0 Comments