होश में हें असली जोश! भाग - १




ही कथा ऐकायची असल्यास इथे क्लिक करा.


जोश! जोश मूवी नाही ओ “अब जोश से नही होश से काम लेना पडेगा” म्हणतात ना तो वाला जोश. असंच जोश मध्ये येऊन लोकं गोंधळ करतात आणि मग माती खातात. जाऊद्या. आता तुम्ही म्हणाल आज एकदम एवढं जोश वगैरे काय? जोशात येऊन काही केलंस का? नाही. नाही… काही झालेलं नाहीये. आणि मुळात जोश यायला कारण कुठे लागतं? जोश असा आपोआप येतो. 

‘भाग मिल्खा भाग’ , ‘धोनी’ , ‘मेरी कोम’ हे पिक्चर पाहिले की आपल्याला आतमधून असं एकदम जगंच जिंकून टाकावं वाटतं. असं का वाटतं? कारण परत तेच ‘जोश’. पण पिक्चर संपला की काय होतं? पुन्हा आयुष्य जैसे थे. सगळं मोटिवेशन, इन्स्पिरेशन खल्लास. जितक्या लवकर जोश अंगात संचारतो कदाचित तितक्याच लवकर तो उतरतही असावा. 

जोश थोड्या वेळासाठी चांगला असला तरी त्यात राहून कुठलंच काम कधीच पूर्ण होत नाही. कारण कुठलंही काम जर चांगल्या रीतीनं पूर्ण करायचं असेल तर लागते ती मेहनत, चिकाटी, सातत्य. 

आता मी ‘भाग मिल्खा भाग’, ‘धोनी’, ‘मेरी कोम’ ह्या तीन पिक्चरचं उदाहरण दिलं कारण हे तिन्ही पिक्चर्स वेगवेगळ्या स्पोर्ट्स चे आहेत. जर आपल्याला कोणी विचारलं की ह्या तीन पिक्चर मधलं नेमकं काय आवडलं तर आपण काय सांगू? अ…. ऍक्टिंग. हा ऍक्टिंग भारी केली सगळ्यांनी, अजून? अजून… अ… स्टोरी. हा स्टोरी पण मस्त होती. अजून?… अजून काही नाही भारी वाटतं हे पिक्चर बघून. असा एकदम जोश येतो.



ह्या अश्या उत्तरांशिवाय आपल्याकडे दुसरं सांगण्यासारखं काहीच नसतं. पण ह्या पिक्चर्स मध्ये एवढंच होतं का? नाही. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण मिस करतो ती म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी आपलं काहीतरी एक ध्येय ठरवलं आणि मग ते ध्येय गाठण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. फक्त जोशात येऊन चार दिवस जिम ला गेले आणि मग वर्षभर परत तिकडे ढुंकूनसुद्धा पाहिलं नाही असं नाही केलं त्यांनी. हारले. पण मग नंतर असा कमबॅक केला की लोकं बघतच राहिले. 

असंच एका जोश मध्ये येऊन काहीतरी काम करताना चूक केलेल्या आणि मग होश मध्ये येऊन ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आर्यनची आजची ही कथा आहे. 

           आर्यनच्या घरात त्याच्या घरच्यांनी स्पोर्ट्सचे चॅनेल्स फक्त त्याच्यासाठीच घेतले होते. त्याला सगळे खेळ आवडायचे पण बॅडमिंटन त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त. सकाळ, दुपार, संध्याकाळ काहीही असो कुठलीही मॅच त्यानं कधी मिस केलेली नव्हती. 

आपल्या देशात लोकांना सहसा क्रिकेट सोडून कुठल्याच दुसऱ्या खेळातल्या खेळाडूंची नावं माहित नसतात पण आर्यन वेगळाच होता. त्याला सगळ्या स्पोर्ट्स मधल्या सगळ्या प्लेयर्स ची नावं माहित होती. तो सगळे खेळ खेळायचा पण बॅडमिंटनची विशेष आवड असल्याने त्याला क्लास लावायचा होता.

पण खेळाचा क्लास लावायचा म्हणजे आई बाबांची परवानगी लागणार होती. अभ्यासासाठी क्लास लावण्याबद्दल विचारलं असतं तर घरचे ख़ुशी ख़ुशी तयार झाले असते. आता काय करावं ह्या विचारात तो पडला. शाळेत येता जाता त्याला कोर्ट दिसायचं. त्यात खेळणारे प्लेयर्स दिसायचे. त्यांचे कोच दिसायचे.


आई, बाबा आणि आर्यन डाईनिंग टेबलवर शांत जेवण करत बसले होते. एक दिवस न राहवून त्यानं घरच्यांना विचारलं.

आर्यन , “बाबा…” 


आर्यनच्या आवाजामुळे शांतता भंग झाली. बाबांचं लक्ष आर्यन कडे गेलं. आर्यन त्यांची नजर चुकवून जेवू लागला. बाबांनी पण मग जेवणावर लक्ष देत आर्यन ला विचारलं, “बोल.”


बाबांशी नजर न मिळवता आर्यन  म्हणाला, “मला ते बॅडमिंटन चा क्लास लावायचाय. मला आवडतं खूप बॅडमिंटन आणि माझे मित्र पण म्हणतात की तू चांगलं खेळतो. कोचिंग लावली तर अजून चांगलं खेळशील. जर आपण कोचिंग लावली ना तर मग खूप भारी होईल माझा गेम.” 


बाबांना आर्यनचं बोलणं पटत नव्हतं. पण ते तसं बोलूनही दाखवत नव्हते. आईनं मध्ये पडावं म्हणून आर्यन आईकडे बघू लागला तर बाबांकडे बघून तीही काहीच बोलू शकली नाही. पण आर्यन आज हट्टाला पेटला होता. त्याला काहीही करून आज परमिशन काढायचीच होती. आज परमिशन काढायची आणि उद्यापासूनच क्लास ला जायचं असा त्याचा प्लॅन होता. त्याला ते कोर्ट दिसत होतं, तिथे प्लेयर्स, कोच सगळं दिसत होतं.


जोश मध्ये येऊन आर्यन  बोलून गेला, “तुम्हाला किती पाहिजे तेवढे टक्के मी पाडतो. अभ्यासात काहीच दुर्लक्ष करणार नाही मी. प्लिज मला क्लास लावू द्या.”

“तुम्हाला किती पाहिजे तितके टक्के मी पाडतो” या वाक्यावर बाबा विषेश खुश झाले. पहिल्यांदा बाबांनी आर्यन ला एखाद्या गोष्टी बद्दल इतकी पटकन परवानगी दिली होती. तो खूप आनंदी होता. त्या रात्री त्याला स्वप्नात पण आपण त्या रोज पाहिलेल्या कोर्टवर आहोत आणि तिथल्या प्लेयर्स सोबत आपण खेळत आहोत, कोच आपल्याला शिकवत आहेत हेच दिसलं. 


पुढच्या दिवशी आर्यन  लवकर उठला. त्याला लवकर उठलेलं पाहून तर आई चकितच झाली. 


आई, “काय रे आज इतक्या लवकर कसकाय उठलास?” 


आर्यन , “अगं ते आजपासून बॅडमिंटन चा क्लास लावायचाय ना, तर त्यांना भेटून येतो. त्यांना सांगतो की मी आज संध्याकाळपासून येणारे.”


आई, “मग डायरेक्ट संध्याकाळीच जा ना. एवढंच सांगायचं असेल तर.”


पण आर्यन आईचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानं पटपट आवरून घेतलं आणि तो बाहेर पडला. आईशी बोलल्याप्रमाणे तो कोर्टवर गेला. त्या कोर्ट च्या आत त्यानं आज पहिल्यांदा पाऊल टाकलं होतं. त्याला खूप भारी वाटत होतं. तो तसाच ते सगळं पाहत बसला. कोणीतरी त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्याजवळ आलं. 


माणूस, “कोण पाहिजे?


आर्यन ची तंद्री तुटली. तो म्हणाला, “मला बॅडमिंटनचा क्लास लावायचाय.” 


माणूस आर्यन कडे बघतो आणि म्हणतो, “कधीपासून?


आर्यन , “आजपासून. म्हणजे आज संध्याकाळपासून. आत्ता माझी शाळा आहे. शाळा सुटली की मी येतो लगेच.”

माणूस, ”ठीके ये मग संध्याकाळी.”   



आर्यन  डोळ्यात पुन्हा एकदा सगळं काही सामावून तिथून निघाला. शाळेत त्याला दिवस खूपच मोठा वाटू लागला. एक एक तास एक एक दिवस आहे असं त्याला वाटू लागलं. कधी शाळा सुटेल. कधी मी क्लास ला जाईल असं त्याला झालं होतं. हळू हळू एक एक तास होत, इकडे तिकडे थोड्या टिंगल टवाळ्या करत शेवटी शाळा सुटली. जशी शाळेची घंटा वाजली तसं शाळेतून सगळ्यात पहिले बाहेर पडलेलं जर कोणी असेल तर तो आर्यनच होता. आर्यन  पळत पळतच क्लास ला गेला. त्यानं त्याच दप्तर एका साईडला काढून तो ऑफिस मध्ये गेला. त्यानं त्याचं नाव एनरोल केलं आणि पैसे भरून टाकले. मग तो बाहेर आला. कोच नी त्याला जवळ बोलावलं.


कोच प्रसाद, “काय नाव तुझं?”


आर्यन त्यांच्या समोर उभा होता, “आर्यन”


प्रसाद , “ठीके. बॅडमिंटन खेळालायेस का आधी?”


इकडे तिकडे बघत आणि कधी आपण रॅकेट हातात घेऊ आणि खेळायला लागू ह्या विचारात आर्यन ची चलबीचल होत होती. “हो खेळलोय ना. रोजच खेळतो आमच्या कॉलनीत. आणि TV वर तर सगळ्या मॅच बघतो मी.”


प्रसाद सरांनी चलबिचल करणाऱ्या आर्यन कडे बघितलं आणि म्हणाले, “जा ह्या कोर्ट चे ३ राऊंड मारून ये.” आर्यन नं एकदम प्रसाद सरकडे आपला भ्रमनिरास झाल्यासारखं बघितलं. पण त्याचा नाईलाज होता. आर्यन राऊंड मारू लागला. कसे बसे त्याने ३ राऊंड पूर्ण केले. राऊंड पूर्ण करून थोडाच वेळ झाला होता की सरांनी त्याला काही वॉर्म अप एक्सरसाइज करायला लावल्या. त्या एक्सरसाइज करून तर आर्यन इतका थकला की हातात रॅकेट घेऊन उभं राहण्याची ताकद पण आता त्याच्यात उरली नव्हती. 


पहिल्याच दिवशी आपण कोर्ट वर खेळणारं, मग सगळे आपला गेम बघून चकित होणार, मी असा मारेल, असा पॉईंट घेईल. आर्यनचे हे सगळे विचार अस्तित्वात आलेच नाहीत. वॉर्म अप मधेच हवा टाईट. कसा बसा थोडं तो कोर्ट वर खेळाला. 


घरी गेल्यावर त्याला खूप झोप येत होती पण जेवण केल्याशिवाय झोपू शकत नसल्यामुळे तो जेवायला बसला. 


आई आर्यनला जेवण वाढत वाढता म्हणाली, “कसं वाटलं आज पहिल्या दिवशी क्लासमध्ये?” 


बाबा सुद्धा आर्यन च्या उत्तराची वाट बघत होते पण आर्यन मात्र थकल्यामुळे जेवता जेवताच डुलक्या घ्यायला लागला होता. 


आई, “आर्यन?” 


आर्यन डुलकीतून उठत, “आ…. काय?”


आई, “अरे काय शिकवलं आज क्लासमध्ये?” 


आर्यन, “छान… छान…शिकवलं.”


आई बाबा दोघंपण त्याच्याकडे बघून हसायला लागले. आर्यनला झोपेमुळे काहीच कळत नव्हतं. शेवटी कसंबसं जेवण करून आर्यन  त्याच्या रूम मध्ये गेला आणि बेडवर पडल्या पडल्या झोपला. 


मग रोज आर्यन चं हेच शेड्युल सुरु झालं. सकाळी शाळेत जायचं, संध्याकाळी क्लास ला. तिथे सुरुवातीला राऊंड मारायचे, वोर्म अप एक्सरसाइज करायच्या आणि मग रोज एक एक गोष्ट शिकून त्याची प्रॅक्टिस करायची. हळू हळू आर्यन ची आता सगळ्यांशी मैत्री होऊ लागली होती. त्याचा खेळ सुधारत चालला होता. त्याला एकंदरीत क्लासच वातावरण आवडू लागलं होतं. आता तो चांगल्या चांगल्या कसलेल्या प्लेयर्स सोबत खेळू लागला होता. अश्यातच एक दिवस टूर्नामेंट अनाऊन्स झाली. आर्यन नं त्या टूर्नामेंट मध्ये भाग घ्यायचं ठरवलं. त्यानं तसं प्रसाद सरांना सुद्धा सांगितलं. सरांनी  त्याला अलाऊ केलं.


आणि तो दिवस उजाडला. आज आर्यन भलताच एक्सायटेड दिसत होता. त्याला कारणंही तसंच होतं. त्याच्या आयुष्यातली ही अशी पहिलीच मॅच होती जी तो स्वतः खेळणार होता. आजपर्यंत त्यानं त्याच्या आवडत्या आणि आदर्श मानलेल्या प्लेयर्सची एन्ट्री, त्यांचा स्टान्स, त्यांची ती फॅन फोल्लोइंग, त्यांची सर्विस, त्यांचे स्मॅशेस ह्या गोष्टी फक्त T.V वर बघितल्या होत्या. आज तो हे सगळं स्वतः अनुभवणार होता. इतर प्लेयर्स सोबत तो कोर्ट वर आला. रोजच्या फक्त प्लेयर्सनी भरलेल्या कोर्टवर आज पालक, मित्र, बरेच नातेवाईक सुद्धा आलेले होते. मग मॅचेस सुरु झाल्या. 

आर्यन ची मॅच सुरु व्हायला अजून वेळ होता म्हणून तो एका जागी बसून सगळं बघत होता आणि आपण त्या समोरच्या प्लेयरच्या जागी असतो तर कसा स्मॅश मारला असता आणि मग ऑडियन्स मधून कशी रिअक्शन आली असती असं काहीतरी इमॅजिन करू लागला. थोड्याच वेळात स्मॅशेस चे जबरदस्त आवाज आणि प्रेक्षकांच्या टाळ्या आणि कॉमेंट्स नी अक्ख कोर्ट दुमदुमून गेलं. पण आर्यन च्या इमॅजिनेशन मध्ये मात्र ते सर्वजण आपल्याकडेच बघतायेत, आपल्यासाठीच टाळ्या वाजवतायेत असं त्याला वाटू लागलं. एक एक करत सगळ्या मॅचेस अगदी उत्कंठावर्धक झाल्या. मग काही वेळानंतर आर्यन च्या नावाची अनाउन्समेंट झाली. आर्यन  कोर्टवर आला. त्याला पाहायला त्याचे आई बाबा दोघंही आज आले होते.


गेम सुरु झाला. सुरुवातीला आर्यन हाय स्पिरिट मध्ये असल्याने समोरच्याला झुलवत होता. त्यानं त्याच्या ह्या स्पिरिटच्या दमावर २-३ पॉईंट्स असेच कमवले. पण नंतर नंतर समोरच्या प्लेअर नं नेमकं हेच हेरलं आणि आपला गेमच बदलला. तो अचानक डिफेन्सिव्ह झाला. आर्यन ला ही मॅच पटकन संपवायची होती त्यामुळे त्यानं स्वतःच्या गेममध्ये काहीच बदल केला नाही. तो तसाच खेळत राहिला.

परिणामी त्याला काही काळानंतर थकवा जाणवू लागला. आर्यन ला थकवा आलेला पाहून समोरच्या प्लेअर ने पुन्हा एकदा आपला गेम बदलला. आता तो अटॅकिंग साईडला आणि आर्यन डेफेन्सिंग साईड ला होता. अटॅक करणारा प्लेअर धडाधड पॉईंट्स मिळवू लागला आणि आर्यनला मात्र काहीच करता येईना. आर्यन चा सगळं स्पिरिट, त्याचा सगळा जोश आता थकव्याबरोबर उतरून गेला होता.

अटॅकर च्या प्रत्येक स्मॅशवर प्रेक्षक टाळ्या वाजवत होते. ज्या टाळ्या तो स्वतःसाठी इमॅजिन करत होता त्या आता प्रत्यक्षात दुसऱ्यासाठी ऐकताना त्याला नकोश्या वाटू लागल्या. शेवटी प्रचंड मोठ्या तफावतीनं आर्यन मॅच हरला. 



आर्यनला मॅच हरल्याचं खूपचं दुःख झालं होतं. त्याच्या क्लास मधले जवळपास सगळेच लोकं जिंकत चालले होते आणि आर्यन एकटाच होता जो त्याची पहिलीच मॅच हारला होता. आर्यन कोणाशीही न बोलता घरी आला. घरी आल्यावरही तो कोणाशीच काहीही बोलला नाही. सरळ त्याच्या रूम मध्ये गेला आणि दार लावून घेतलं. थोड्या वेळात आर्यन पुन्हा बाहेर आला. तो तसाच सरळ घराच्या बाहेर गेला आणि थेट एका स्पोर्ट्स च्या दुकानापाशी येऊन थांबला. 


आर्यन, “पायात बांधण्यासाठी वेट्स आहेत?”


दुकानदार, “हो.”


आर्यन, “२ किलो चे वेट्स द्या.


दुकानदार, “अरे वा… फुटबॉलची तयारी चालू आहे वाटतं?” 


ह्यावर आर्यन काहीच बोलला नाही. 


आर्यन ने पहिल्यांदा हरणे काय असते ह्याचा अनुभव घेतला होता. आर्यन आता पुन्हा बॅडमिंटन खेळेल का? आर्यन च्या मनात नक्की काय चाललंय? का त्याने बॅडमिंटन सोडून आता फुटबॉल खेळायचा निर्णय घेतला. हे समजून घेऊया पुढच्या भागात. 


स्पोर्ट्सची आवड असणाऱ्यांचा सुटला आहे सगळी कडे वारा. 

आणि अजिंक्यचा तुम्हाला सायोनारा. 


-----------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments