। । श्री । ।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की माझे मागचे पत्र प्रत्येकाला फारच आवडले आहे. आपण प्रत्येकाने केलेला रिप्लाय आणि हे पत्र स्टेटस ला ठेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावं ह्या साठी केलेले प्रत्येक प्रयत्न मला फार आवडले. वाचक असावे तर असे. क्या बात हें, असा एकच विचार माझ्या मनात आला. मागच्या रविवारचं पत्र वाचायचं राहिलं असेल तर ही आहे लिंक What's in it for me?
मला वाटलं इतके छान रिप्लाय आले आहेत तर आता समर्थांनी लिहिलेल्या एकूण एक ओवी, पत्र, ग्रंथ, चारोळ्या, स्फुट काव्य, श्लोक सगळ्यांचा चांगलाच अभ्यास करावा लागेल. मी अजून नवीन आहे ह्या क्षेत्रात. आत्ता आत्ता कुठे अभ्यास सुरु केला आहे मी. पण तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून एक नवीन उत्साह माझ्यात आला आहे लवकरचं अजून समर्थांचे विचार मी आवडतील अश्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतं राहील.
मी जेंव्हा असे पत्र (लेख,ब्लॉग) लिहूया असं ठरवलं तेंव्हा मी माझ्या आवडीचे विषय निवडले. चित्रपट, पुस्तकं, गोष्टी, अनुभव, प्रवास, डॉक्युमेंटरी फिल्म्स, माझ्या काही चुका ज्या मधून मी शिकलो. असे मी विषय ठरवले होते पण ह्या सगळ्या विषयांमधे समर्थ रामदास स्वामी हा विषय माझ्या इतक्या आवडीचा बनेल आणि तो माझ्या लिखाणाच्या विषयांपैकी एक असेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. पण म्हणतात ना ती वरती एक आपल्या सगळ्यांपेक्षा मोठी शक्ती आहे जी सगळं करून घेते, त्याचं शक्ती ने जे करायला सांगितलं ते मी आंनदाने केलं आणि नेहमीचं करतो. आजचा विषय पण समर्थ रामदासांनी मला काय शिकवलं ह्या बद्दलचाच आहे. पुढचा विषय वेगळा असेल.
आपण सगळ्यांनी ऐकलेली एक जुनी गोष्ट
माझे शाळेत एक सर होते. असल्या स्टोरी सांगायचे ना, की त्या सरांच्या स्टोरीची सर इंस्टाग्राम स्टोरी ला पण येणारं नाही. असला स्टॉक असायचा त्यांच्या कडे. रोज नवीन गोष्ट तयारच. त्यांनी एकदा मला एका राजाची गोष्ट सांगितली होती जी आजही मला आठवते.
एक राजा असतो तो खूप शूर, वीर होता. त्याने एकदा छान उपासना करून देवांना प्रसन्न केलं आणि देवाने त्याला विचारलं काय पाहिजे तुला? त्या राजाला सोनं खूप आवडतं होतं. अगदी दिवसा, रात्री, झोपेत त्याला फक्त सोनं दिसायचं. त्याने मागितलं, "मी ज्या गोष्टीला हात लावेल ती सोन्याची झाली पाहिजे असा मला आशीर्वाद द्या". देव म्हणाले तथास्तु. तो घरी आला खुर्चीला हात लावला खुर्ची सोन्याची झाली, पेला हातात घेतला पेला सोन्याचा झाला, रथ सोन्याचा, तलवार सोन्याची त्याने हे थोडा वेळ एन्जॉय केलं आणि राजाची मुलगी पळत तिच्या बाबांकडे आली. राजाने खुश होऊन जसा तिला हात लावला ती सोन्याची झाली. आता राजाला त्याने केलेल्या चुकीचा अंदाजा आला. राज्यात सगळे घाबरले, अगदी नोकर पण जवळ न येता दूर पळून चालले होते.
काही दिवसांनी राजा एकटा पडला आणि त्याला खरं सोनं मागण्या पेक्षा, आपण आपले असलेले नाते आणि नवीन होणारे सर्व नाते सोन्यासारखी व्हावे हा वर मागितला असता तर आज ही एकटं पडण्याची वेळ आली नसती असं वाटू लागलं. आता तात्पर्य भरपूर निघू शकतात पण देवाला प्रसन्न करून घेतलं पण काय मागावं हे काही राजाला समजलं नाही. ह्या वर आज विचार करूया.
काय करतो बरं आपण मंदिरात गेल्यावर?
(हा एक पॅराग्राफ मी जे पुढे लिहितो आहे ते मी समीर दादा लिमये ह्यांचं ऐकलेलं लिहितो आहे.) अगदी सोप्प आहे. ठरलेलं रुटीन. मंदिरात जायचं, चप्पल काढायची, मंदिराची घंटा दाणंकन वाजवायची, बाहेरून येताना फुल किंवा जे काही घेतलं असेल ते पुजारी जे कोणी आहेत त्यांना द्यायचं आणि रडणं सुरु. मनातल्या मनात. पण फक्त तक्रारी, मला हे दे, मला ते दे, हे मिळालं तर मी हे करेल, ते करेल. बस्स. मी पण हेच करायचो.
मग काय करू काय मी? मंदिरात जाऊन आपलं रडगाणं देवाला सांगणं हे चुकीचं आहे मला जेंव्हा समजलं मी लगेच प्रश्न केला, "बरोबर पद्धत आहे तरी काय?" तर मला समर्थ रामदासांनी लिहिलेली ही चौपदी सापडली. ही एकदा तुम्ही सगळ्यांनी वाचा आणि विचार करा आपण जर देवाकडे काही मागायला बसलो तर ती यादी काय असेल? काय मागणार मागून मागून? घर, गाडी, पैसा बस्स संपले आपले विचार इथेचं. संतांचे विचार आपल्या फार पुढचे आहेत. तीच यादी घेऊ की आपण.
आपल्या वर्गात नाही का एक हुशार मुलगा असतो त्याच्या नोट्स वापरल्या की पेपर एकदम सोप्पा जातो. का तसं होतं कारण त्याचा त्या विषयाचा अभ्यास जास्त असतो. तसे आपले संत हे खूप पुढचा विचार करतात. आपण त्या विचारांच्या खूप दूर आहोत. माझं म्हणणं इतकंच आहे आपण आयुष्याच्या परीक्षेत संतांच्या नोट्स वापरू आणि छान मार्क्स मिळवू.
ती पूर्ण चौपदी मी इथे खाली देतो आणि त्या मधले काही काही मला आवडणारे वाक्य सांगतो.
मला या चौपदी मधले आवडलेले काही शद्ब आणि ओळी.
बहुजन मैत्री दे रे राम - तुम्ही हे कधी ना कधी ऐकलं असेल "Your Network is your Net-Worth" आणि हे नेटवर्क कश्या मधून बनतं? मैत्री मधून. मैत्री करता आली पाहिजे आपल्या वयाच्या आणि आपल्या पेक्षा लहान मोठ्या सगळ्या वयाच्या व्यक्तिंसोबत.
अंतरपारखी दे रे राम - आपण दिवसभरात किती तरी जणांना भेटतो. प्रत्येकाच्या मनात नेमकं काय आहे समजतं का? कोण खरंच खरं बोलतो आहे आणि कोण खरंच खोटं बोलतो आहे पकडता येतं का पटकन? नाही ना! तेच तर समर्थ रामाकडे मागत आहेत. अंतरपारखी दे रे मला ज्या मुळे मी प्रत्येकाला ओळखू शकेल, पारखू शकेल.
मज न कळे ते दे रे राम - अजून एक English Quote तुम्ही कदाचित ऐकला असेल. "You don't know what you don't know" आता आपल्या जर माहिती नाही की आपल्या काय माहिती नाही तर ते शिकणार कसं? जर तुम्हाला discipline म्हणजे शिस्त हा तुमचा एक यशश्वी न होण्याचा प्रॉब्लेम आहे आणि हे माहितीचं नसेल तर कसं काय त्याच्यावर काम करणार ना? समर्थांनी कसं सोप्प केलं ना? मज न कळे ते दे रे राम. झालं सोप्प.
बहुत पाठांतर दे रे राम - काय सांगावं आता या बद्दल. मोबाईल येण्याच्या आधी नंबर पाठ असणारे मला किती तरी जण माहिती आहेत. पण आता फार कमी दिसतातं किंवा आता काय इन्फॉर्मशन एका टच वर उपलब्ध आहे म्हणतो आपण, कशाला पाठ करायचं इतकं सोप्पं उपलबद्ध आहे तर हा विचार करतो. पण वर्षोनुवर्षे पाठांतर करणारा व्यक्ती हा वर्षोनुवर्षे व्यायाम करणाऱ्या व्यक्तीसारखा वेगळा दिसतो हे खरं. माझ्या मते कितीही वर्षाचे झालो तरी पाठांतर सोडू नये.
हे असं मी एक एक सांगत बसलो ना हे पत्र काही संपणार नाही. त्या मुळे फक्त चार मला आवडणाऱ्या ओळी लिहून थांबतो आहे. पण ही चौपदी मला खूप आवडते आणि मी रोज म्हणतो. यूट्यूब वर चारुदत्त आफळे ह्यांच्या आवाजातली ही चौपदी मला जरा जास्त आवडते. त्याच पद्धतीने म्हणण्याचा मी प्रयत्न पण करतो. मी स्वतः म्हणलेली चौपदी इथे खाली देतो आहे. ऐकून बघा कदाचित तुम्ही सुद्धा माझ्या सारखे रोज हीच चौपदी गुणगुणायला लागाल.
शेवटी मला म्हणायचं इतकचं आहे!
त्या एका शक्तीला रोज जर हे सगळं मागितलं आणि त्या शक्ती ने खरंच दिलं तर? खरंच दिलं तर म्हणजे ती शक्ती देतेचं सगळं पण सगळच्या सगळं जे काही या चौपदी मधे दिलं आहे ते सगळं दिलं तर? विचार करून बघा कोमळ वाचा, बहुजन मैत्री, उत्तम गुण, विद्यावैभव, आत्मनिवेदन, मज न कळे ते सर्व.
ही सगळी यशश्वी व्यक्तीची लक्षणं आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या कुठल्या व्यक्तीला यशश्वी व्यक्ती म्हणून बघतात एकदा त्याच्या कडे बघा आणि मग ही चौपदी बघा. तुम्हाला या चौपदी मधल्या सगळ्या qualities, सगळे गुण त्या व्यक्ती मधे दिसतील.
मागचं पत्र मी समर्थांचा विषय घेऊन लिहिण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकाला विषय खूप आवडला म्हणून पुन्हा एकदा त्यांच्याच विषयी माझे विचार पुन्हा एकदा मांडले. समर्थांनीच लिहिण्याची प्रेरणा दिली आणि त्यांनीच लिहून घेतलं. काही चुका सापडल्या असतील तर त्या माझ्या आहेत ज्या मी नक्की पुढच्या पत्रात नीट करेन. पुढचा विषय ह्या पेक्षा ही वेगळा असणार आहे. पुढच्या पत्रात पुन्हा भेटूया. शेवटी मी इतकंच सांगेल स्वस्थ रहा, मस्त रहा आणि समर्थांची चौपदी म्हणण्यात व्यस्त रहा. धन्यवाद.
2 Comments
देवाकडे काय मागाव येथे अतिशय सुंदर विवेचन या ब्लॉग मध्ये आहे
ReplyDeleteधन्यवाद 👏
Delete