What's in it for me?

। । श्री । ।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

        स्वागत आहे आपले माझ्या नवीन पत्रात. माझे काही मित्र मागच्या महिन्यात माझ्या व्हाट्सएप्पच्या ग्रुप मधे सहभागी झाले, त्यांना मनापासून धन्यवाद. कारण मी फोन किंवा मेसेज वर सांगितलं आणि ते लगेच आनंदाने माझे पत्र वाचण्यासाठी आले. तुम्हाला रविवार ते रविवार एक पत्र मिळणार ह्याची खात्री. आणि जे कोणी अगदी पहिल्या दिवसापासून माझे पत्र वाचत आहेत त्यांचे सुद्धा विशेष आभार.

    मी वेगवेगळे विषय माझ्या पत्रात मांडत असतो. पण मी ही धडपड का करतो? आठवड्यात वेळ काढून, काहीतरी विचार करून, त्या वर लिहिणे, मग चित्र वगैरे टाकून ते वाचावं वाटेल असं बनवणे, आणि ठरलेल्या वेळेत पोस्ट करणे. ह्याचा काही फायदा आहे का? अशी एखादी गोष्ट ठरवून नियमित करण्याचे एक नाही, एक हजार फायदे आहेत. ते मी तुम्हाला एखाद्या पत्रात सांगेल.  

    आज चा विषय आहे खास कारण मी एका ग्रंथाबद्दल माझं मत मांडणार आहे. हा तोच ग्रंथ आहे जो वाचून मला आपण लिहावं असं वाटलं. पण रोज शक्य नाही म्हणून मी आठवड्याला लिहितो आणि भरपूर वाचतो. मी एक त्या ग्रंथातली ओवी इथे लिहितो आहे. तुम्ही त्या एका ओवी वरून ग्रंथ ओळखू शकतात का बघा. 

सुंदर अक्षर ल्याहावें । पष्ट नेमस्त वाचावे । 

विवरविवरो जाणावे । अर्थांतर ।। श्रीराम  दशक १२: समास ९: ओवी १४ 

    प्रत्येकाने जवळपास ओळखला असेलच, पण नसेल ओळखला तर मला जास्त आनंद होईल. कारण मला तुम्हाला इतक्या छान ग्रंथाची ओळख करून देता येईल ना! इतका छान, आपल्याला जगायला शिकवणारा ग्रंथ माहिती नाही बऱ्याच जणांना हे दुःख नक्कीच आहे मला. पण दुःख करून काय करणार. आज माझ्या पत्राच्या निमित्ताने माहिती होणार आहे ह्याचा आनंद घेऊया.

ग्रंथा नाम दासबोध । गुरु शिष्यांचा संवाद ।।
येथ बोलिला विशद । भक्ती मार्ग । ।  ।।  श्रीराम ।। 

    तर हा ग्रंथ आहे दासबोध. समर्थ रामदासांनी आपल्या सगळ्यांना दिलेला बोध म्हणजे दासबोध. पण मी ना तुम्हाला ह्या ग्रंथाची ओळख माझ्या माझ्या पद्धतीने करून देणार आहे. कदाचित ह्या ग्रंथाबद्दल तुम्ही वाचलेलं नसेल असं काहीतरी मी बोलणार आहे.

सुरवात अशी झाली,

    २ वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे. मी जगायचं कसं आणि बिझनेस कसा करायचा हे शिकण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात असलेले सेल्फ हेल्प ह्या नावाच्या खाली येणारे भरपूर पुस्तकं वाचले. मला त्याचा फायदा पण झाला पण तरीही काहीतरी राहून गेल्यासारखं मला वाटतं होतं. काय राहिलं आहे ते काही मला समजेना. तुम्ही आठवा तुम्हाला असं कधी झालं आहे का ते. आपल्याला पाहिजे ते मिळतं पण तरी मनामधे जो आनंद होतो ना तो तितका होतंच नाही. काहीतरी राहिलं असचं वाटतं.

शक्तीची उपासना आणि उपासनेची शक्ती शिकवणारे समर्थ ह्या चित्रात तुम्हाला दिसतील. 

    हे सगळं मनामधे चालू असताना माझी भेट अनंत दादांसोबत (माझे चांगले मित्र) झाली. गप्पा-गप्पांमधे मी सांगितलं मी पुस्तकं वाचतो, मला वाचायला आवडतं सेल्फ हेल्प हा प्रकार मी जरा जास्त वाचला आहे. अनंत दादा मला म्हणाले, "तू इतके सेल्फ हेल्प चे पुस्तकं वाचले ते कुठल्या भाषेत वाचले?" मी म्हणालो ,"इंग्लिश आणि मराठी पण वाचले आहेत." अनंत दादा म्हणाले, "मग तू मराठी मधलं सगळ्यात बेस्ट असं सेल्फ हेल्प बुक वाचलं आहे का?" "कुठलं नाव तर सांगा." मी अगदी सहज म्हणालो. त्यांचं उत्तर ऐकून मला विश्वास बसलाच नाही. ते म्हणाले, "दासबोध

    माझी पहिली रिऍक्शन होती, "माझी आई मंदिरात पारायणं करते ते सेल्फ हेल्प बुक आहे?" दादा म्हणाले, "हो! वाचून बघ खोटं वाटतं असेल तर." मी कितीतरी वेळ एकच विचार करत होतो. मी आयुष्य शिकावं, बिझनेस शिकावा म्हणून जग फिरत होतो आणि मला कोणीतरी सांगत आहे की जगातलं बेस्ट सेल्फ हेल्पच पुस्तकं माझ्या देवघरात ठेवलं आहे. काल परवा नाही, माझ्या लहानपणीपासून आणि ते सुद्धा मराठीत आहे. आता हे पुस्तकं तर वाचावंच लागणार म्हणून मी हातात घेतलं. मराठी थोडी जुनी आहे त्या मधली तर थोडं सुरवातीला मला काही अर्थ समजण्यासाठी आईची मदत घ्यावी लागली पण नंतर मी ह्या पुस्तकाच्या प्रेमात पडलो. 

तुम्हाला माहिती का पुस्तक आणि ग्रंथ ह्या मधला फरक?

    मी बराच वेळ झाला पुस्तक पुस्तक म्हणतो आहे. पण हा ग्रंथ आहे, पुस्तक नाही, हा ग्रंथ वाचताना मला समजलं की ग्रंथ कशाला म्हणावं आणि पुस्तक कशाला. 

जेणे होये उपरती । अवगुण पालटती ।

जेणें चुके अधोगती । त्या नांव ग्रंथ ।। श्रीराम । ।  दशक ७ : समास ९ : ओवी ३२ 

        मी इतके पुस्तकं वाचले पण ग्रंथ कशाला म्हणावं हे कधी मला कोणी सांगितलंच नव्हतं. पण आता समजलं. जे वाचून आपली अधोगती चुकते, आपले अवगुण पालटतात त्याला ग्रंथ म्हणतात. आता आजचा, ह्या महान ग्रंथाबद्दल बोलण्याचा पॉईंट आहे तरी काय? हा ग्रंथ का इतका कमाल आहे हे मला पहिला समास वाचला की लगेच समजलं. कसं ते सांगतो.

सारांश समजला की उत्सुकता वाढते

    तुम्ही कधी पुस्तकं विकत घेताना त्याचं मागचं पान वाचलं आहे का? नेमकं पुस्तकात काय आहे हे थोडक्यात लिहिलं असतं. कुठला पण चित्रपट येण्याच्या आधी त्याचं ट्रेलर येतं मग चित्रपट येतो. का? अगदी लग्नाचा संपूर्ण व्हिडिओ ३-४ तासांचा आपल्या नातेवाईकांना दाखवण्याच्या आधी ट्रेलर दाखवतात. का? ट्रेलर किंवा सारांश आपल्याला त्या पुस्तकात, त्या चित्रपटात, त्या व्हिडिओ मधे काय आहे हे थोडक्यात सांगतो मग आपण १००% ठरवतो की हा चित्रपट किंवा हे पुस्तकं मी बघणारचं / वाचणारचं. 

    ही माणसाची सवय समर्थ रामदासांना चांगलीच माहिती होती. तर त्यांनी पहिला समास हा ग्रंथाची प्रस्तावना देणारा, ह्या ग्रंथामधे काय काय मिळेल ते सांगणारा, ह्याचे फायदे काय काय आहे हे सांगणारा लिहिला. मी इंग्लिश पुस्तकं भरपूर वाचले आहेत म्हणालो ना तर एक प्रिंसिपल मी बऱ्याच मार्केटिंग च्या पुस्तकांमधे वाचलं ते म्हणजे, "What's in it for me?" ज्याचा अर्थ पहिला तर तो असा होतो, "नेमकं त्या मधे माझ्या साठी काय आहे?" 

    कुठलीही जाहिरात बघा त्या मधे तेच दिलेलं असतं म्हणून तर सगळे तिथे जातात. आमच्या हॉटेल मधे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आहे सोबत फूड पण छान आहे. आमच्याकडे तुमच्या साठी गरम गरम आणि शेतातला ताजा हुर्डा मिळेल. आमच्याकडे तुम्हाला पाहिजे असलेले प्रत्येक ब्रँडचे मोबाईल उपलबद्ध आहेत. आमच्याकडे तुमच्या मुलाला योग्य शिक्षण देऊन जॉब लागणारच ह्याची खात्री दिली जाते. 

    पाहिलं! अजून मी किती उदाहरणं देऊ? "माझ्यासाठी ह्या मधे काय आहे?" ह्या एका प्रश्नावर जगातले सगळे बिझनेस चालू आहेत. मी सुद्धा ज्याला ज्याला काहीतरी नवीन वाचायला आवडतं त्या प्रत्येकाला तुझ्या आवडीचं वाचायला माझ्या पत्रात नक्की मिळेल हेच सांगून त्याला माझे पत्र वाचायला देतो. थोडक्यात काय WIIFM (What's in it for me?) कायम आहे. समर्थांनी ते बरोबर ओळखलं आणि काय काय मिळणार ते सगळं सांगून दिलं. 


काही जण न वाचता ह्या ग्रंथाला नाव ठेवणारं हे पण समर्थ जाणून होते, 
बघा ते पण कसं बरोबर समजवून सांगितलं आहे.  

    समर्थांनी भरपूर लक्षण दिले आहेत पण एक लक्षण असं मला वाचायला मिळालं की ज्या मुले मी संपूर्ण ग्रंथ वाचण्याचं, वाचण्याचं नाही अभ्यास करायचं ठरवलं. ती ओवी अशी आहे. 

आता श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तत्काळ । 

तुटे संशयाचें मूळ ।  येक सरां ।।  श्रीराम ।। दशक पहिला : समास १ : ओवी २८

    हा ग्रंथ जर तुम्ही ऐकला तर आपल्याला जिथून संशय निर्माण होतो कुठल्याही गोष्टीचा ते जे मूळ आहे ते तुटेल आणि आपली क्रिया तत्काळ बदलून जाईल असं समर्थ रामदास सांगत आहेत. मला ही ओवी इतकी आवडली. कारण आपण सगळेच जण किती पुस्तकं वाचतो, किती व्हिडिओ बघतो पण जर ते बघून काही आचरणात येतं नसेल, जर काही क्रिया होतचं नसेल तर ते ऐकणं आणि वाचणं सगळं व्यर्थ आहे. नुसते फिट राहण्याचे व्हिडिओ बघायचे पण व्यायाम करायचा नाही असं कसं चालेल? क्रिया करण्याला महत्व आहे ना.

माझी उत्सुकता समर्थांनी एकदम उंचीवर नेऊन ठेवली!

    असं काय आहे नेमकं ह्या ग्रंथात ज्या मधे समर्थ रामदास सांगत आहेत की तुमची क्रिया तात्काळ बदलेल? ह्या प्रश्नाने माझी उत्सुकता वाढवली आणि मग मी अभ्यास सुरु केला. कलाकार खूप आहेत पण कोण मोठे झाले एकदा विचार करून बघा. तेच मोठे झाले ज्यांना आपल्या कलेसाठी लोकांना उत्सुकतेने आकर्षित करता येतं. कधीही ग्रंथ न वाचलेला मी जेंव्हा एका दासबोध नावाच्या ग्रंथाचे पहिले २ पान वाचतो आणि त्या वरून मला ह्या ग्रंथाचा अभ्यास करूया असं वाटतं तर समजून घ्या काय ताकद ह्या ग्रंथात आहे आणि आपण काय काय ह्या मधून शिकू शकतो. 

    तुमची पण इच्छा असेल दासबोध समजून घेण्याची तर मला नक्की कळवा. सोबत शिकू आपण, इतकंच माझं म्हणणं आहे. ह्या पत्राच्या खाली दासबोधा बद्दलचे काही व्हिडिओ देतो आहे, ते वेळ काढून नक्की बघा. मी माझा अभ्यास कसा चालू आहे हे पुढच्या पत्रात कळवत राहील.

मला शेवटी म्हणायचं इतकंच आहे!

        वेळ देऊन देऊन आपण रात्रीतून वेब सिरीज, चित्रपट, अभ्यास, असाइनमेंट, सबमिशन, संपवतो, तर थोडा वेळ देऊन आपल्या ग्रंथामधे दिलेले वेगवेगळे एपिसोड्स पण प्रत्येकाने बघावे इतकंच मला वाटतं. शेवटी मी इतकंच सांगेल स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या ग्रंथांच्या अभ्यासात व्यस्त रहा. धन्यवाद.

आमचे पत्र जर नियमित पणे ई-मेल वर मिळावे असं वाटतं असेल तर Subscribe करा आमच्या Newsletter ला इथे.

आणि हे पत्र जर नियमित व्हाट्सऍप वर मिळावे असं वाटतं असेल तर ही आहे आमची व्हाट्सऍप कम्युनिटी लिंक इथे.


नोट: ह्या पत्रात वापरलेले चित्र माझे नाहीत, माझ्याकडे ते होते म्हणून मी ह्या पत्रात वापरले. दुसरं असं की दासबोध नेमका कसा वाचावा, त्याचा अर्थ काय, हे सगळं शिकता येईल असं एक शिबीर छत्रपती संभाजी नगर येथे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. समीर लिमये कॉर्पोरेट कीर्तनकार हे स्वतः हा ग्रंथ आपल्याला समजावून सांगणार आहेत. ह्या शिबिराला येण्याची इच्छा असेल तर मला कळवा. मी त्या बद्दल पण मदत करू शकतो. समीर दादांचे काही व्हिडिओ मी इथे खाली देतो आहे वेळ काढून नक्की बघा. धन्यवाद. 


समर्थांचे संघटन कसे होते ते ह्या व्हिडिओ मधून समजून घ्या.



कॉर्पोरेट काळ आणि दासबोध












Post a Comment

2 Comments

  1. अतिशय मोजक्या आणि नेमक्या शब्दांमध्ये दासबोध या ग्रंथाचे महत्व अजिंक्यने त्याच्या ओघवत्या वाणीमध्ये सांगितले

    ReplyDelete