कोणाला बनायचं आहे इंफ्लुएन्सर भाग २

। ।  श्री । । 

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

        आजचं पत्र आहे माझ्या मागच्या पत्राचा भाग २. म्हणजे तुम्ही मागचं पत्र वाचलं नसेल तर ते आधी वाचावं लागेल म्हणजे इथे लिंक लागेल आणि ती लिंक लागावी म्हणून मी इथे मागच्या पत्राची लिंक देतो आहे. कोणाला बनायचं आहे इंफ्लुएन्सर भाग १  

        आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार कारण आपण वेळ काढून मी लिहिलेले पत्र वाचत आहात. सोशल मीडिया वर मिनिटा मिनिटाला डोळे, कान आणि मन ह्यांना काहीतरी छान वाटेल असं सतत दाखवतं रहायची सवय लागली असेल तर मग अवघड आहे "वाचायला आवडतं" ही सवय लागायला. 

ज्यांना वाचायची सवय नसते त्यांनी पुस्तक हातात घेतलं की असं होतं.

        पण माझे पत्र छोटे छोटे असतात, मजेशीर असतात आणि थोडेशे काहीतरी शिकवणारे असतात. मुद्दा हा आहे की माझे पत्र वाचत वाचत वाचण्याची सवय पुन्हा लागू शकते. प्रयत्न करून बघा. तर मागच्या पत्राच्या शेवटी मी विचारलं होतं की "तुमच्या साठी इंफ्लुएन्सर कोण आहे?" मला काही जणांनी उत्तरं दिले. पण आज मी माझं उत्तर देणारं आहे. 

माझ्या आयुष्यातला पहिला इंफ्लुएन्सर 

    मी तुम्हाला अनुभव सांगतो आहे मी चौथी किंवा पाचवी मधे असेल तेंव्हाचा. मला इतक्या लहानपणी इंफ्लुएन्सर हा शब्द माहित नव्हता आणि कळतही नव्हता. पण चित्रपटांमधे काही काही ढिशूम ढिशूम मारामारी बघून ह्याच्या सारखं आपण बनू असं वाटतं होतं. त्याला काय म्हणतात हे नव्हतं माहिती. एकदा मी माझ्या आत्ते भावा कडे मी गेलो होतो आणि गप्पा मारतांना मी त्याला सांगितलं मला हा हिरो आवडतो, तो अशी फायटिंग करतो मग अशी उडी मारतो आणि काही तरी करून दाखवलं.

    माझा भाऊ मला म्हणाला, "अरे हे चित्रपटा मधे सगळं खोटं दाखवतात. कोणाला पण इतकी उंच उडी मारता येतं नसते. फक्त एकच आहे जो खरो खर फायटिंग करतो. त्याचं नाव आहे ब्रूस ली." तेंव्हा गुगल नव्हतं ना यु ट्यूब. ब्रूस ली कसा दिसतं असेल हे फक्त मला माझ्या भावाच्या सांगण्यावरून आणि माझ्या कल्पना करण्यावरून कोणीतरी आहे असं समजलं होतं. 

    मग कधीतरी एकदा मला ब्रूस ली चा "फिस्टस ऑफ फ्यूरी" नावाचा पिक्चर बघायला मिळाला. त्याची बॉडी, ते ननचक्स फिरवणं, किक मारणं, पंच मारणं मी पाहिलं आणि त्या दिवशी मी जे मला समजतही नव्हतं ते मी झालो. म्हणजे इंफ्लुएन्स झालो. माझ्यावर इतका प्रभाव पडला ब्रूस ली चा की मी त्याचे सगळे चित्रपट पाहिले. जे ब्रूस ली बद्दल सापडलं ते वाचलं. 

        मला आवडणाऱ्या लोकांची ही यादी एक एक करत वाढत गेली जॅकी चॅन, ही मॅन, शक्तिमान, अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर असे काही ऍक्टर आणि मग शिवाजी महाराज, संभाजी महाराज, श्री राम हे सगळे मला सगळे आवडायला लागले आणि ह्यांच्या सारखं आपण बनायचं हे ठरवून मी माझं माझं काम करायचो. 

माणूस म्हणलं की चुका होतंच असतात 

        मी ह्यांच्या कडे बघून मोठा होतं होतो आणि त्यांच्या बद्दल शक्य तितकी माहिती मी काढत होतो. कधी कुठे लेख कधी interview हे सगळे माझे ठिकाणं होते जिथून मला माहिती मिळायला लागली. मी जशी जशी माहिती घेत गेलो मी त्या व्यक्तीच्या कलेला सोडून तो खरा कसा आहे हे जाणून त्याच्या बद्दल माझं मत ठरवायला लागलो. 

    म्हणजे जर कोणी एक व्यक्ती मला खूप व्यायाम करणारा, फिट वाटला आणि नंतर माहिती मिळवताना मला समजलं की, "अरे हा तर आपल्याला वाटतो तितका फिट नाही. ह्याला काही चुकीच्या सवयी सुद्धा आहेत." इथून परत माझी मला इंफ्लुएन्स करणाऱ्या व्यक्तींची आवड बदलायला लागली. 


    मी काही वर्षांनी धडा घेतला की कोणाच्याही पर्सनल आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घ्यायला जायचं नाही. कारण ती एकअशी सुरवात असते, जिथून आपण त्या व्यक्तीच्या कलेला सोडून अजून कश्यासाठी तरी चांगला का वाईट हे ठरवायला लागतो. आणि हे फक्त कुठल्या मोठ्या लोकांबद्दल नाही, माझ्या घरातले, मित्रांमधले मला काही जण असे दिसले ज्यांना मी "आपण मोठे झाल्यावर ह्याच्या सारखे बनू" म्हणून बघायचो आणि तेच असं काही तरी करून ठेवायचे की नको "ह्यांच्या सारखं, आपण हे आहोत ते बरे आहोत" असं वाटायला लागलं. 

मग ह्यावर मार्ग काय? 

    पहिला मार्ग मला सापडला तो म्हणजे, कोणाला ही जज न करणे. त्या व्यक्तीची कला, त्या व्यक्तीचं मॅनेजमेंट ,त्या व्यक्तीचं बोलणं, त्या व्यक्तीचं गाडी चालवणं, काहीही असेल. तो व्यक्ती जवळचा असेल किंवा दूरचा असेल. त्याचा चांगला गुण घ्यायचा बाकी सगळं आपण पाहिलंच नाही म्हणायचं आणि आपल्या आपल्या कामाला निघायचं.

    ह्या मुळे मला चांगली सवय लागली मी प्रत्येकातले उत्तम गुण घ्यायला शिकलो. पण पुढे अजून एक गडबड झाली. उत्तम गुण मिळाले पण अगदी सारखे उत्तम गुण असणारे दोघं जण भेटले मग कोणता घ्यावा आणि कोणता सोडावा? म्हणजे एका स्केल वर दोन सारख्या गुणांपैकी कोणता गुण आधी आणि कोणता नंतर हे मला समजेना.

    असे एक नाही किती तरी उदाहरणं सापडतील. काय चांगलं, काय वाईट ठरवता येतं नाही. त्याला बरेचदा आपण ग्रे एरिया म्हणतो. सोशल मीडिया चांगलं का वाईट. थोडक्यात ग्रे एरिया मधे येतं हे उत्तर.  

मग मला उत्तर सापडलं 

    शोधलं की सापडतं म्हणतात ना तसं मला उत्तर मिळालं. मी ग्रंथ वाचायला घेतले आणि मला काह एकही गोष्टी समजल्या. मी म्हणत नाही संपूर्ण समजल्या. पण मोजमाप करणारी पट्टी सापडली असं समजा. एक उदाहरणं सांगतो. आपल्या घरातलं उदाहरणं असू शकतं. माझ्या मुलाला, मुलीला, सुनेला किंवा जावयाला इतकं काम असतं की झोपायला उशीर होतो. त्यांच्या कडे इतक्या इतक्या देशातल्या कामाची जबाबदारी आहे. मग कॉल्स रात्री असतात म्हणून ते ३ ला झोपतात आणि सकाळी १० ला उठतात. 


    बघा आला आता ग्रे एरिया. मी ह्याला काय म्हणू? सकाळी १० ला उठतात म्हणजे बरोबर संस्कार नाही, आरोग्यासाठी बरोबर नाही, सवयी चुकीच्या आहेत असं म्हणू का कमी वयात इतक्या कामाची सवय आहे, ऑफिस ची जबाबदारी घेत आहेत, भारतात नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा जबाबदारीने काम करत आहेत ह्याला चांगलं म्हणावं? वेगवेगळ्या देशातल्या कामाची जबाबदारी सांभाळणं भल्या भल्यांना जमत नाही. 

    अश्या वेळेला मला दासबोध ग्रंथात उत्तर सापडलं. समर्थ रामदासांनी दिनचर्याच दिली आहे. लवकर उठा, मग फळं खा,  वगैरे वगैरे बरंच आहे. ते आपण डिटेल नंतर बघू. पण मी जो ग्रे एरिया चा प्रॉब्लेम सांगितला होता त्याला उत्तर मिळालं की नाही? आता लगेच म्हणजे लेट उठणारा चुकीचा असा समज करू नका. नीट अभ्यास केला तर आपण हे समजून घेऊ शकतो की ठीक आहे सध्या जबाबदाऱ्या आहेत, माझ्या समोर काही ध्येय आहेत त्या मुळे मी समर्थ रामदासांनी सांगितलेली दिनचर्या मी follow करू शकत नाहीये, पण समर्थ सांगणार ते बरोबरचं सांगणार, आपले ग्रंथ आपल्याला बरोबरचं दिशा दाखवणार हे तर शंभर नाही हजार टक्के व्हाईट एरिया मधे येतं का नाही? जबाबदारी संपली की मी समर्थांनी सांगितलेली दिनचर्या follow करणार हे नक्की. 

मला शेवटी म्हणायचं काय आहे!

        आपल्या सतत  Competation, स्पर्धा, तुलना करणे ह्या अश्या जगात कोण व्हाईट, कोण ब्लॅक आणि कोण ग्रे काही पत्ता लागत नाही. त्या वेळेला आपले ग्रंथ आणि संत मंडळी सगळे ऐरिया पुसून आपल्याला स्वच्छ आणि पांढरा शुभ्र, यशाचा मार्ग दाखवतात. म्हणून माझ्या मते इंफ्लुएन्स व्हावं तर फक्त संत आणि ग्रंथांकडून. बाकी सगळे यशश्वी होणारे, अयशश्वी होणारे, मेहनत करणारे, हार मानणारे लोकं बघावे, नुसते बघावे नाही आदराने बघावे त्यांच्या कडून उत्तम गुण शिकावे आणि आपल्या स्वतःच्या कामात त्या सगळ्या शिकवणी वापराव्यात. बस्स. 

        माझ्या साठी इंफ्लुएन्सर कोण? एकच, समर्थ रामदास. असाच कोणासाठी कृष्ण असेल, कोणासाठी राम असतील, कोणासाठी लक्षमण, कोणासाठी ज्ञानेश्वर माउली, तर कोणासाठी गजानन महाराज, कोणासाठी अजून कोणी. पण आपल्या ग्रंथांतले, पुराणांमधले, संतांपैकी असू द्या म्हणजे ब्लॅक, ग्रे नाही फक्त पांढरा शुभ्र आणि स्वच्छ रस्ता दिसेल.

शेवटी मी इतकंच सांगेल स्वस्थ रहा, मस्त रहा आणि चांगलं कन्टेन्ट बघण्यात व्यस्त रहा. धन्यवाद.

PS:  रोस्टिंग आणि त्या बद्दल झालेला इंटरनेट वरचा गोंधळ अजूनही चालू आहे. प्रत्येकाने आपले आपले मत त्या बद्दल मांडले. पण मला ध्रुव राठी ह्यांचा व्हिडिओ अगदी बरोबर वाटला. तुम्हाला ह्या विषयाबद्दल जाणून घेण्याची आणि त्या मधून मार्ग काय हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर ध्रुव राठी चा व्हिडिओ नक्की बघा. मी इथे खाली लिंक देतो आहे. भेटूया पुढच्या पत्रात नवीन एक नवीन विषय घेऊन.



आमचे पत्र जर नियमित पणे ई-मेल वर मिळावे असं वाटतं असेल तर Subscribe करा आमच्या Newsletter ला इथे.


आणि हे पत्र जर नियमित व्हाट्सऍप वर मिळावे असं वाटतं असेल तर ही आहे आमची व्हाट्सऍप कम्युनिटी लिंक इथे.



Post a Comment

0 Comments