काहीही न करण्याची सवय!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

स्वागत आहे तुमच्या प्रत्येकाचं पुन्हा एका नवीन पत्रात. रविवार आला की आपल्या ५ मिनिटांच्या गप्पा ठरलेल्या असतातच. मी वेळ मिळेल तसं लिहितो, आणि तुम्ही वेळ मिळेल तसं वाचता — पण गप्पा मात्र नक्की होतात. 

    प्रत्येक वाचकाला नमस्कार. वाचून रिप्लाय करणाऱ्यांना खास नमस्कार. वाचून, रिप्लाय करून अजून लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्यांना तर स्पेशल नमस्कार. आणि जे रिप्लाय करत नाहीत पण भेटल्यावर प्रतिक्रिया देतात — त्यांना हाय-फाय, एक टाळी! सगळेच आपल्या आपल्या जागेवर मस्त आहेत. 

    आपण सगळेच सतत काही ना काही करत असतो. शरीराने नाही केलं तरी डोकं मात्र सतत चालूच असतं. विचारांची गर्दी कधीच थांबत नाही. या सगळ्या गोंधळात आज एक वेगळी गोष्ट बघूया — “काहीही न करण्याची”. 

    काहीही न करणं म्हणजे नेमकं काय? आणि त्यातून काही मिळतं का?  बघूया आजच्या पत्रात… Let’s go!


आमचे कुठलेही जुने पत्र वाचायचे असतील तर इथे क्लिक करा. पत्र व्यवहार.
मागच्या आठवड्याचं पत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करा. Win Everyday!

जपानमधली गोष्ट 

    मी ही गोष्ट मी जपानच्या शॉर्ट स्टोरीजमध्ये वाचली. जपानमध्ये एक फकीर होता. त्याचा एक सुंदर आश्रम होता. आश्रम खूप प्रसिद्ध होता. एकदा तिथला राजा स्वतः तो आश्रम पाहायला आला. 

    फकीर त्याला एकेक झोपडी दाखवत होता —  

    “इथे भिक्षु स्नान करतात, इथे भोजन करतात, इथे विश्रांती घेतात…”  

    आश्रमाच्या मधोमध एक मोठं भवन होतं. राजा वारंवार विचारत होता,  

    “या मोठ्या भवनात काय करता?”  

    पण फकीर त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत होता. 

    शेवटी राजा चिडला. म्हणाला,  

    “सगळं दाखवलंस, पण त्या भवनाबद्दल का सांगत नाहीस?”  

    फकीर शांतपणे म्हणाला,  

    “तुम्ही प्रश्नच चुकीचा विचारला. म्हणून मी उत्तर दिलं नाही.”  

    राजा आश्चर्यचकित झाला.  

    फकीर पुढे म्हणाला,  

    “त्या भवनात आम्ही काहीच करत नाही. ते आमचं ध्यान भवन आहे.”  

    राजा म्हणाला,  

    “मग सरळ सांगायचं ना — तिथे ध्यान करतो.”  

    फकीर हसला आणि म्हणाला,  

    “ध्यान केलं जात नाही. ‘काहीही न करणं’ हाच ध्यानाचा अर्थ आहे.”  

        राजाला  जाणवलं की जो पर्यन्त आपण "करण्यात" गुंतलेलो आहोत तो पर्यन्त "असण्याचं" ज्ञान होणार नाही. असण्यात विलीन होणे म्हणजे ध्यान. जे होतं आहे ते होऊ द्या. वारा वाहतोय, आकाशात तारे उगवले आहेत, कुठेतरी मूल रडतंय, कोणीतरी पाहतंय, रक्त वाहतं आहे, हृदयाची धडधड सुरु आहे, श्वास येतो आहे जातो आहे. होऊ द्या. काहीही करायचं नाही. फक्त असायचं आहे. फकिराने समजावून सांगितलेला ध्यानाचा अर्थ राजाला त्या दिवशी समजला. त्या दिवसापासून राजाने ध्यानाची सवय (म्हणजे थोडा तरी वेळ काहीही न करण्याची सवय) लावून घेतली. 

गोष्टीतला अर्थ

    आपल्याला “करण्याची” इतकी सवय लागली आहे, की “असणं” म्हणजे काय हेच आपण विसरलो आहोत. आपल्याला वाटतं ध्यान ही एक क्रिया आहे. पण खरं पाहिलं तर ध्यान म्हणजे सगळ्या क्रिया थांबवणं. 

    काहीही न करता फक्त असणं…  

    श्वास चालू आहे — चालू राहू द्या  

    विचार येत आहेत — येऊ द्या  

    आवाज येत आहेत — येऊ द्या  

    काही बदलायचं नाही, काही थांबवायचं नाही.  

    फक्त साक्षीभावाने राहायचं.  

    त्या क्षणी आपण “करणं” सोडून “असणं” शिकतो.  

काहीही न करायला शिकवणारी गोष्ट!

    ही गोष्ट वाचल्यावर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली — कदाचित ही अशी एकमेव गोष्ट असेल जिथे “काहीही करू नका” असं सांगितलं जातं. नाहीतर आपण सतत हेच ऐकत असतो — त्याने खूप मेहनत केली, खूप अभ्यास केला, तो असं लढला, म्हणून यश मिळालं. 

    पण ध्यान समजावून सांगणारी, “करणं” सोडून “असणं” शिकवणारी अशी गोष्ट मी पहिल्यांदाच वाचली… आणि लगेच वाटलं — ही आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवायलाच हवी. 

    आजच्या काळात तर या गोष्टीची फारच गरज आहे. सगळेच जण सतत काही ना काही करण्यात गुंतलेले आहेत. पण जे थोडा वेळ काढून “फक्त असण्याचा” प्रयत्न करतात, त्यांनाच कळतं — त्या एका क्षणात काय शांतता असते, काय अनुभव असतो… आणि त्या क्षणाचं स्पंदन किती खोलवर जाऊ शकतं.    

    आज एक छोटासा प्रयोग करा —  

    काही मोठं नाही.  फक्त २ मिनिटं…  मोबाईल बाजूला ठेवा. डोळे बंद करा.  

    काहीही करू नका. फक्त बसा. फक्त असा. फक्त असण्याचा अनुभव एकदा घेऊन बघा. 

आपण भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा एका नवीन गोष्टीसोबत. 

तोपर्यंत—
स्वस्थ रहा, मस्त रहा आणि रोज २ मिनिटं तरी काहीही न करण्यात व्यस्त रहा. नको, व्यस्त नको, फक्त रहा. 

धन्यवाद 🙏

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा
👉 Email Newsletter Join करा






Post a Comment

0 Comments