आपलं नाणं खणखणीत वाजलं पाहिजे…!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

            रविवार, सकाळचे ९ आणि माझं पत्र — ह्या सगळ्या एकत्र येणाऱ्या गोष्टी आहेत. नेहमीप्रमाणे सुरुवात प्रत्येकाला धन्यवाद देऊनच करतो. वेळ काढून माझं पत्र वाचणाऱ्या वाचक वर्गाला नमस्कार, पत्र वाचून प्रतिक्रिया देणाऱ्यांना नमस्कार, वाचून इतरांपर्यंत पोहोचवणाऱ्यांना नमस्कार, आणि माझ्या पत्रातील चुका शांतपणे सांगून मला सुधारायला मदत करणाऱ्यांना खास नमस्कार.

        मागच्या आठवड्यात खूप गोष्टी घडल्या, त्या गोष्टींमधली एक महत्त्वाची गोष्ट आज तुम्हाला सांगतो. आज बघूया — आपलं नाणं खणखणीत वाजवण्यासाठी काय करावं? Let’s go!

मागच्या आठवड्यातले अनुभव

        मागच्या आठवड्यात आमच्या कंपनीत एक ट्रेनिंग झालं. हे ट्रेनिंग घेणारे फक्त कॉर्पोरेट ट्रेनर नव्हते, तर ते एक कीर्तनकारही होते. तुम्हाला वाटेल — कीर्तन आणि कंपनीमध्ये काय संबंध? पण अध्यात्म सगळीकडे असतं; आपण ते फक्त मंदिरापुरतं मर्यादित ठेवतो, ही आपली चूक आहे.

        हे ट्रेनिंग घेणारे कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये होते. कीर्तन हा एकेकाळी मनोरंजन आणि समाजप्रबोधनाचं प्रभावी माध्यम होता — आजही आहे. पण आधुनिक मनोरंजनाच्या साधनांमुळे त्याकडे थोडं दुर्लक्ष झालं.

        कीर्तन हा फक्त वयस्कर लोकांचा विषय आहे, असा गैरसमज झाला होता. पण समीर लिमये यांनी हा विषय तरुणांपर्यंत पोहोचवला आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट जगतात अध्यात्म कसं उपयोगी पडू शकतं हेही दाखवून दिलं. त्यामुळेच त्यांना "कॉर्पोरेट कीर्तनकार" म्हणून ओळख मिळाली.

        अशा व्यक्तीचं आमच्या कंपनीत येणं ही फक्त अभिमानाची गोष्ट नाही, तर आम्ही भाग्यवान आहोत असं वाटावं असा अनुभव होता. काही गोष्टी शिकवल्या जात नाहीत, त्या अनुभवल्या जातात — आणि तो अनुभव आम्हाला त्या दिवशी मिळाला.


आपलं नाणं कसं खणखणीत असावं!

ही जुन्या काळातील गोष्ट आहे — जेंव्हा STD बूथवरून फोन केले जायचे.

एक मुलगा STD बूथवर आला आणि फोन लावला.

तो म्हणाला,
“देशपांडे साहेब, मी बाळू बोलतोय. तुमच्याकडे घरकामासाठी माणसाची गरज आहे असं ऐकलं. मला काम मिळेल का?”

समोरून उत्तर आलं,
“गरज होती, पण आता नाही.”

बाळू पुन्हा म्हणाला,
“मी घरकामासोबत बागकामही करू शकतो.”

उत्तर: “सध्या गरज नाही.”

तो पुन्हा म्हणाला,
“घरकाम, बागकाम, गाडी साफ करणं — सगळं करीन. मला कामाची खूप गरज आहे.”

देशपांडे साहेब थोडे वैतागले आणि म्हणाले,
“मी आधीच एक माणूस ठेवला आहे. तो चांगलं काम करतो. आता कोणाची गरज नाही.”

फोन ठेवला.

हे सगळं ऐकून बूथचा मालक बाळूकडे बघतो — पण बाळूच्या चेहऱ्यावर दुःख नसून आनंद होता!

मालक विचारतो,
“तुला काम हवं असेल तर माझ्याकडे आहे.”

बाळू हसून म्हणाला,
“नाही साहेब. ज्या ठिकाणी फोन केला, तिथे जो माणूस काम करतो ना — तो मीच आहे!”

मालक चकित झाला:
“मग हे सगळं का केलंस?”

बाळू म्हणाला,
“माझं नाणं किती खणखणीत आहे हे बघण्यासाठी.”

या गोष्टीला सगळ्यांच्या जोरदार टाळ्या मिळाल्या. त्यानंतर आम्हाला दासबोध आणि समर्थ रामदासांच्या शिकवणींचा कॉर्पोरेट जगतात कसा उपयोग होऊ शकतो, याबद्दलही खूप सुंदर मार्गदर्शन ऐकायला मिळालं.

त्यांच्यासोबत घेतलेले काही फोटो मी तुमच्यासाठी इथे शेअर करत आहे. आणि त्यांनी आमच्याशी काही मिनिटं केलेला संवाद — त्याचा व्हिडिओ मी पुढच्या पत्रात नक्की पाठवेन.

 




एक फोटो सह कर्मरचारी आणि काही मित्रांसोबत ज्यांनी नेहमी मला साथ दिली आहे. 
हा फोटो नेहमी माझ्या आठवणीत राहील. 


विचार करण्यासारखी गोष्ट.

आपण प्रत्येकजण आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टीमचा भाग असतो — कामाची, घराची, मित्रांची किंवा खेळाची.

त्या टीममध्ये आपलं स्थान किती मजबूत आहे, हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे.

आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतात. पण ते योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी वापरणं महत्त्वाचं आहे.

आजच्या कॉर्पोरेट जगतात — AI, नवीन स्किल्स असलेले कर्मचारी, कॉस्ट कटिंग किंवा कंपनीच्या परिस्थितीमुळे — प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न येतो, “कंपनीमध्ये पुढचा नंबर आपलाच लागणार तर नाही ना?”

पण एक गोष्ट लक्षात ठेवा —बाहेरचं जग बदलत राहणार आहे… पण आपलं नाणं खणखणीत असेल, तर आपली किंमत कमी होणार नाही.

समीर लिमये रामदासी ह्यांनी आमच्या कंपनी मधल्या छोट्या कार्यक्रमात सांगितलेली गोष्ट कशी वाटली मला नक्की कळवा. 

आपण भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा एका नवीन गोष्टीसोबत. 

तोपर्यंत—
स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपलं नाणं खणखणीत वाजेल अशी कामे करण्यात व्यस्त रहा. 

धन्यवाद 🙏

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा

👉 Email Newsletter Join करा


Post a Comment

0 Comments