उपासनेला दृढ चालवावे!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

        पुन्हा एकदा रविवार आला आणि या पत्राद्वारे तुमच्याशी भेटण्याचा योग आला. सर्व वाचकांचे मनापासून आभार. वेळ काढून माझ्यासारख्या एका लेखकाचे पत्र वाचणे ही गोष्ट तुमच्या मते छोटी असली तरी माझ्यासाठी ती खूप मोठी आहे. वाचणाऱ्यांचे आभार, वाचून प्रतिसाद देणाऱ्यांचे विशेष आभार आणि वाचून अजून काही जणांना “हे वाचण्यासारखं आहे” असं सांगणाऱ्यांचे तर अजून विशेष आभार.

        आज मी तुम्हाला माझा एक आवडीचा श्लोक सांगणार आहे. आवडीची गाणी, चित्रपट, कलाकार हे आपण नेहमी सांगतो; पण आवडीचा श्लोक सांगितला तर? म्हणून वाटलं आज तोच तुमच्यासोबत शेअर करावा. Let's Go!

उपासना म्हणजे नेमकं काय?

        मला आठवतही नाही, पण अगदी लहानपणापासून हा श्लोक मला माहिती आहे. त्याचा अर्थ समजत नव्हता, तरी तो तोंडपाठ होता.

उपासनेला दृढ चालवावे ।
भूदेव संतांसी सदा नमावे ।
सत्कर्मयोगे वय घालवावे ।
सर्वामुखी मंगल बोलवावे ।।

आपली उपासना (नित्यनेम, पूजा, जप किंवा ध्यान) कधीही खंडित न होऊ देता ती निष्ठेने चालू ठेवावी.

ब्राह्मण (ज्ञानी व्यक्ती) आणि साधुसंतांना नेहमी आदरपूर्वक नमस्कार करावा.

आपले संपूर्ण आयुष्य परोपकाराची आणि सत्कर्माची (चांगली कामे) करण्यात व्यतीत करावे.

सर्वांच्या मुखातून शुभ, मंगल आणि चांगले शब्द बाहेर पडतील (सर्वांचे कल्याण होईल) असे बोलावे. 

        रोज हा श्लोक माझ्याकडून म्हटला जातो. पण आज तो सांगण्यामागचं कारण वेगळं आहे. इंटरनेटवर “टॉप ५ गाणी”, “टॉप १० चित्रपट”, “बेस्ट कलाकार” असं खूप काही दिसतं. पण “आवडते श्लोक”, “आवडत्या ओव्या” याबद्दल फार कमी बोललं जातं. म्हणून वाटलं, माझे आवडते श्लोक लिहून ठेवावेत आणि तुमच्यासोबतही शेअर करावेत.

        या श्लोकाचा अर्थ अगदी सोपा आहे. पण काही शब्द खोलवर समजून घ्यावे असे वाटतात. त्यातला पहिला शब्द म्हणजे — “उपासना”.

        “उपासना” हा शब्द “उप” आणि “आसन” या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. “उप” म्हणजे जवळ आणि “आसन” म्हणजे बसणे. म्हणजे देवाजवळ बसून श्लोक म्हणणे, पारायण करणे, जप करणे याला आपण सहसा उपासना म्हणतो.

गडबड नेमकी कुठे होते?

मला या शब्दाचा थोडा वेगळा अर्थ समजतो.

        माझ्या मते उपासना म्हणजे फक्त देवासमोर बसणे नाही. आपण पाहतो, काही लोक शक्तीची उपासना करतात, काही बुद्धीची, काही गाण्याची, काही खेळाची. माझ्या मते उपासना म्हणजे — आपण ठरवलेल्या एखाद्या गोष्टीजवळ राहून तिची सातत्याने प्रॅक्टिस करणे.

        खेळाडू रोज तासन्तास मैदानावर सराव करतो, गायक रियाज करतो, विद्यार्थी अभ्यास करतो, व्यायाम करणारा रोज जिममध्ये जातो — ही सगळी उपासना आहे.

        आणि म्हणूनच श्लोकात सांगितलं आहे — “उपासनेला दृढ चालवावे.”

        “दृढ” म्हणजे भक्कम. सातत्याने. दीर्घकाळ.

        मग ती उपासना श्लोकांची असो, व्यायामाची असो, अभ्यासाची असो, गाण्याची असो, चित्रकलेची असो किंवा माझ्यासारखी लिहिण्याची असो — जी काही तुमची उपासना असेल ती दृढ चालवा.

        आता जरा मागे वळून बघा. लहानपणापासून आपण किती गोष्टी आवडीने सुरू केल्या होत्या! कोणाला तिकीटं गोळा करण्याची आवड होती, कोणाला कॉइन्सची, कोणाला चित्र काढायची, कोणाला गाण्याची, कोणाला खेळाची. पण त्या पैकी किती गोष्टी आजही चालू आहेत?

        बहुतेक सगळ्या मध्येच बंद झाल्या.

        आणि कधी कधी वाटतं — “अरे, ही गोष्ट सोडली नसती तर?”

        कदाचित त्याच आवडीमुळे नवीन लोक भेटले असते. एखादा व्यवसाय उभा राहिला असता. आयुष्याला वेगळं वळण मिळालं असतं. यश मिळालं असतं. शक्यता खूप होत्या. पण गडबड एकच झाली — उपासना दृढ चालली नाही.

        म्हणून हा श्लोक मला खूप आवडतो. तो रोज आठवण करून देतो की, “जे चांगलं सुरू केलं आहे ते टिकवायचं.”

        पण होतं काय?

        आज वेळ नाही म्हणून उद्या. उद्या दुसरं काम आलं म्हणून परवा. कधी कंटाळा, कधी आळस, कधी मूड नाही. आणि हळूहळू गोष्ट थांबते.

        पण रोज जर आपण स्वतःला सांगितलं — “उपासनेला दृढ चालवावे” — तर विचार बदलायला लागतात. मग आपण कारणं शोधत नाही, आपण धृढ चालवण्याचा मार्ग शोधायला लागतो.

आजपासून पुन्हा सुरू करूया!

        आपण नकळत सतत काही ना काही गुणगुणत असतो. गाणी गुणगुणण्यात काही चुकीचं नाही. मलाही गाणी आवडतात. पण विचार करा — एक जण रोज “मैं ऐसा क्यूँ हूँ?” गुणगुणतो आहे आणि दुसरा “उपासनेला दृढ चालवावे” गुणगुणतो आहे.

        शब्द हळूहळू विचार बनतात आणि विचार कृती.

        म्हणून गाणी जरूर गुणगुणा, पण एखादा चांगला श्लोकही गुणगुणून बघा. खरंच वेगळी मजा येते.

        आता तुम्हीही आठवा — अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही मनापासून करत होता पण मध्येच सोडून दिली? गाणं, वाचन, व्यायाम, लेखन, अभ्यास, खेळ, श्लोक, पारायण… काहीही.

        आणि जर मनात “ही गोष्ट पुन्हा सुरू करायला पाहिजे” असं वाटलं असेल, तर फक्त विचार करू नका. आजपासून पुन्हा सुरुवात करा.

        नवीन एखादी उपासना सुरू करा किंवा जुनी पुन्हा हातात घ्या. पण यावेळी ती दृढ चालवा.

        मी माझी पत्र लिहिण्याची उपासना दृढ चालवेन आणि तुम्ही माझी पत्रं वाचण्याची. म्हणजे आपण असेच या पत्रांमधून भेटत राहू.

भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि उपासनेला धृढ चालवण्यात व्यस्त रहा.

धन्यवाद.

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा

👉 Email Newsletter Join करा







Post a Comment

0 Comments