दोन पैशांचा धडा!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार, विनंती विशेष,

आला आहे रविवार आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसोबत गप्पा मारण्याची वेळ आली आहे. मला तर रविवार ते रविवार पत्र लिहिण्याची सवय लागलेलीच आहे. पण तुमच्यापैकी ज्यांना माझे पत्र वाचण्याची सवय लागली आहे, त्यांचे विशेष अभिनंदन! या स्क्रोलिंगच्या काळात तुम्ही वाचण्यासाठी वेळ देता आहात, हे खरंच मस्त आहे.

वाचकांचे आभार, वाचून मला रिप्लाय करणाऱ्यांचे विशेष आभार आणि वाचून, रिप्लाय करून अजून काही जणांना वाचायला देणाऱ्यांचे त्याहूनही विशेष आभार.

आज मी रामकृष्ण परमहंसांची एक मस्त गोष्ट सांगणार आहे. सध्याच्या काळातही अगदी तंतोतंत लागू पडेल अशी एक छोटीशी शिकवण या गोष्टीतून मिळते. Let's Go! 

गर्विष्ठ संन्याशाचे आव्हान

        एकदा रामकृष्ण परमहंस आपल्या आश्रमात शिष्यांसोबत आध्यात्मिक चर्चा करत होते. त्या आश्रमाजवळ एक नदी होती. दररोज सकाळी ते शिष्यांना ज्ञान देत असत.

त्याच परिसरात एक हट्टी संन्यासी राहत होता. तो नेहमी रामकृष्ण परमहंसांवर टीका करत असे. एके दिवशी तो अचानक आश्रमात आला. यावेळी मात्र तो काहीतरी वेगळ्याच उद्देशाने आला होता. अनेक वर्षांच्या कठोर साधनेनंतर त्याने पाण्यावर चालण्याची कला आत्मसात केली होती. त्या कलेचा गर्व त्याच्या मनात भरला होता.

तो रामकृष्ण परमहंसांना म्हणाला,
“तुम्ही स्वतःला ज्ञानी संत म्हणवता, पण तुम्हाला पाण्यावर चालता येते का?”

रामकृष्ण परमहंस शांतपणे हसले आणि म्हणाले,
“नाही बंधू, मला पाण्यावर चालता येत नाही. पण जमिनीवर चालता येते, आणि माझ्या दैनंदिन जीवनासाठी ते पुरेसे आहे.”

हे ऐकून संन्यासी अधिकच गर्वाने म्हणाला,
“माझी क्षमता लपवण्याचा प्रयत्न करू नका. मला पाण्यावर चालता येते!”

रामकृष्ण परमहंस म्हणाले,
“असे असेल तर आम्हाला त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.”

अद्भुत कलेचे प्रात्यक्षिक

        संन्यासी त्यांना आणि शिष्यांना नदीकिनारी घेऊन गेला. सर्वांच्या समोर तो नदीच्या पाण्यावर चालत दुसऱ्या तीरावर गेला आणि पुन्हा परत आला. शिष्य आश्चर्यचकित झाले. परंतु रामकृष्ण परमहंस मात्र शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर ना कौतुक होते ना आश्चर्य.

हे पाहून संन्यासी चिडून विचारू लागला,
“मी एवढे अद्भुत कार्य करून दाखवले, तरी तुम्ही काही बोलत का नाही?”

रामकृष्ण परमहंसांनी जवळ उभ्या असलेल्या नावाड्याला हाक मारली आणि विचारले,
“बंधू, मला नदीच्या पलीकडे नेऊन पुन्हा परत आणण्यासाठी किती पैसे लागतील?”

नावाडी म्हणाला,
“फक्त दोन पैसे.”

रामकृष्ण परमहंस नावेत बसून नदीपलीकडे गेले व परत आले. त्यांनी नावाड्याला दोन पैसे दिले. मग त्या संन्याशाकडे वळून विचारले,

“बंधू, ही कला शिकण्यासाठी तुला किती वर्षे लागली?”

संन्यासी अभिमानाने म्हणाला,
“वीस वर्षे!”

तेव्हा रामकृष्ण परमहंस हसत म्हणाले,
“म्हणजे दोन पैशांत होणाऱ्या कामासाठी तू तुझ्या आयुष्यातील वीस वर्षे खर्च केलीस?”

हे ऐकताच संन्यासी निरुत्तर झाला. त्याला स्वतःची चूक उमगली. लाजून तो तेथून निघून गेला.

वेळ आणि ऊर्जेचे खरे मूल्य

        आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्टी म्हणजे वेळ आणि ऊर्जा. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी ते आपल्या आयुष्यासाठी खरोखर उपयुक्त आहे का, याचा विचार करायला हवा. फक्त एखादं कौशल्य मिळवण्यासाठी किंवा लोकांना प्रभावित करण्यासाठी आयुष्यातील अनेक वर्षे खर्च करणं कितपत योग्य आहे, हा विचारही महत्त्वाचा आहे. ज्या गोष्टी आपल्याला आनंद, प्रगती आणि यशाकडे घेऊन जातात, त्यांच्यावरच आपला वेळ आणि ऊर्जा खर्च व्हायला हवी.

ही कथा वाचताना मला वेळेचा विचार आला. आज आपल्या सगळ्यांच्या फोनमध्ये Digital Wellbeing नावाचं एक उपयुक्त ॲप असतं. एकदा ते उघडून बघा, दिवसातला किती वेळ कोणत्या गोष्टींमध्ये जातो याचा अंदाज येतो. मला स्वतःलाही ते पाहताना कधी कधी आश्चर्य वाटतं.

या कथेच्या निमित्ताने फक्त एवढंच सुचवावंसं वाटतं की आपण आपल्या वेळेकडे थोडंसं लक्ष द्यावं. एवढाच या गोष्टीमागे आजच्या काळातला प्रयत्न आहे. आपल्या फोनमधल्या एका खूप उपयोगी, पण आपण अनेकदा दुर्लक्षित करणाऱ्या ॲपची आठवण करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न.

भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपला वेळ आणि ऊर्जा योग्य ठिकाणी लावण्यात व्यस्त रहा.

धन्यवाद.

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा

👉 Email Newsletter Join करा








Post a Comment

0 Comments