।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
स्वागत आहे माझ्या एका नवीन पत्रात. सर्व वाचकांचे मनापासून आभार. पत्र वाचून प्रतिक्रिया देणाऱ्यांचे विशेष आभार आणि पोस्टमन बनून हे पत्र अजून पुढे खूप जणांपर्यंत पोहोचवण्याचे काम केल्याबद्दल विशेष विशेष आभार.
आजचं पत्र खास आहे, कारण आजचं पत्र हे शेवटचं पत्र आहे.
का शेवटचं पत्र?
कारण लिहिणे हा माझा एक आवडीचा विषय आहे. तो मी तीन वर्षे प्रयत्न करून पाहिला आणि मला त्याचे खूप छान, मला वाटले नव्हते इतके छान रिझल्ट्स मिळाले.
पण जो बदल काहीतरी निर्माण केलेलं बघण्यात झाला आहे, तो इतका मोठा झाला आहे की फक्त लिहिण्यातून माझे विचार भरपूर लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत, हे मला समजलं.
नक्कीच, लिहिण्याचं महत्त्व कमी होणार नाही. कुठलीही गोष्ट आधी कागदावर येते. मग ती चित्रपट, सिरीयल, नाटक, शॉर्ट फिल्म, ॲनिमेटेड फिल्म अशा काही स्वरूपात येते. त्यामुळे लिखाण सोडून अजून काहीही क्रिएटिव्ह करायचं ठरवलं, तरीही लिहिण्याशिवाय पर्याय नाही. आधी लिहूनच गाडी पुढे जाणार.
मग तरीही पत्र बंद का?
बंद म्हणजे मी नेहमीसाठी लिहिणं बंद करेन, असं नाही. गाडी आधी रविवार ते रविवार पळायची; ती आता कदाचित महिना ते महिना किंवा काही महिन्यांनी एकदा अशी पळेल. अधूनमधून भेट घेत राहू आपण.
मी वेळ मिळेल तेव्हा लिहितो, तुम्ही वेळ मिळेल तेव्हा वाचता आणि मला रिप्लाय करता. मागच्या काही वर्षांत माझं शंभर लोकांसोबत नक्की असंच झालं. ही पद्धत बंद नको. अधूनमधून बोलूया.
पण माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो—माणूस त्याच त्याच गोष्टीला कसा कंटाळून जातो याबद्दल.
मी लहान होतो तेव्हा आमच्या घरी पहिल्यांदा लँडलाईन नावाचा एक फोन आला. एक प्लास्टिकचा डबा, त्यावर १ ते ० आणि अजून काही आकडे, आणि कानाला लावून बोलायला माईक आणि स्पीकर असा एक फोन असायचा. तो घराच्या एका खोलीच्या कोपऱ्यात असायचा.
त्याच्यावर क्वचितच कोणाचे फोन यायचे. समोरच्याकडे फोन असेल तर तो करेल ना! नुसता एका कडे फोन असून काय करणार?
पण हळूहळू सगळीकडे हे लँडलाईन पसरले आणि अधूनमधून कोणाचा फोन आला की तो वाजायचा. मी आणि माझी मोठी बहीण, आम्ही जिथे कुठे असू तिथून हातातलं काम सोडून तो फोन उचलण्यासाठी आणि "हॅलो" म्हणण्यासाठी नुसती धडपड करायचो.
मग "तू का उचलला?", "मला उचलायचा होता!" म्हणून रडणं, "मी आता उचलेन, नंतर आला तर तू उचल." अशा सगळ्या आईशप्पथचा स्टॅम्प लावून डील होत असत.
आणि आता जर मी आणि माझी बहीण एका खोलीत असलो, तरीही त्याच खोलीत चार मोबाईल नंबर असतात. दोघांचे दोन सिमवाले फोन. आणि कोणाचाही फोन वाजला, तरीही दुसऱ्याला तो फोन पळत जाऊन उचलण्याची सोडा, बघण्याचीही इच्छा नसते.
आता याला कारणं खूप आहेत. टेक्नॉलॉजी बदलली, आम्ही मोठे झालो; पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही बोर झालो. कंटाळा आला तेच तेच करण्याचा.
असा प्रत्येक व्यक्तीला कंटाळा येत असतो. ज्यातून पटकन काहीच मिळणार नसेल, मग तर विचारूच नका—अजून कंटाळा. पण अधूनमधून थोडे बदल केले, तर तीच गोष्ट, तेच काम इंटरेस्टिंग होतं.
नवीन बदल काय?
नवीन बदल असा की आजपासून प्रत्येक रविवारी पत्र येणार नाही. रविवारीच येईल, पण कुठल्या रविवारी ते नाही माहिती. काही खास सांगण्यासारखं असेल तरच येईल.
महत्त्वाचा भाग असा की मी लिखाणाची प्रॅक्टिस करत करत आता संगीताची प्रॅक्टिस करणार आहे.
जसे माझे पत्र, मी लिहिलेले काही अनुभव, मला आवडलेले श्लोक तुम्हाला वाचायला आवडतात, कदाचित मी बनवलेलं म्युझिक, संगीतही तुम्हाला ऐकायला आवडेल.
पण ही खूप पुढची गोष्ट आहे. आत्ता तर कुठे प्रॅक्टिस सुरू केली आहे. प्रॅक्टिस करत करत एक दिवस नक्की जमेल. जसं पत्र लिहायला जमलं.
ते जमेपर्यंत आपण अधूनमधून भेटूया.
मी स्वतःला भाग्यवान समजतो की असे छान वाचक मला भेटले. हेच वाचक पुढे जाऊन मला मनापासून आशीर्वाद देतील आणि माझं संगीतही तितक्याच मनापासून ऐकतील.
मी गाणं म्हणेन, तबला वाजवेन किंवा अजून कुठलं संगीत वाद्य वाजवेन, हे मलाही माहिती नाही. पण बदलत्या जगानुसार मी लिखाणातून एका पुढच्या टप्प्यावर जात आहे, आणि तो टप्पा आहे—संगीताचा.
आपण भेटूया पुढच्या पत्रात.
तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त रहा.
धन्यवाद.
जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा.
👉 Email Newsletter Join करा.

0 Comments