तुंबाडची मंजुळा!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

            सर्वप्रथम पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. मागच्या आठवड्यात वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्ताने संगीताबद्दल लिहिलेलं एक जुनं पत्र मी पाठवलं होतं. रविवारच्या पत्राच्या निमित्ताने वाचणाऱ्यांचे मनापासून आभार. पोस्टमनची भूमिका घेऊन पत्र पुढे पाठवणाऱ्यांचे विशेष आभार. आणि रिप्लाय करून आपले विचार कळवणारे तर माझे खासच आहेत; त्यांचेही मनापासून आभार.

आज मी मागच्या आठवड्यात पाहिलेल्या एका चित्रपटाबद्दल बोलणार आहे. Let's Go! 

मराठी चित्रपट आणि विनोदाची जोडी कमाल असते 

मागच्या आठवड्यात मी एक मराठी चित्रपट पाहिला – "तुंबाडची मंजुळा".

काही वर्षांपूर्वी "तुंबाड" नावाचा एक वेगळ्याच धाटणीचा, भीतीदायक चित्रपट आला होता. नावातलं साधर्म्य पाहून मला वाटलं की हा देखील तसाच काहीसा असेल. पण हा तर अगदी उलट निघाला – एक सुंदर विनोदी आणि कौटुंबिक चित्रपट.

माझं एक स्पष्ट मत आहे की मराठीत ज्या सहजतेने आणि नैसर्गिकपणे विनोद करता येतात, ते इतर भाषांतील चित्रपटांमध्ये क्वचितच पाहायला मिळतात. हा चित्रपट त्याचं उत्तम उदाहरण आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून आनंद घेता येईल असा हा चित्रपट आहे.

भूत दिसेल असे काही प्रसंग आहेत पण गावं, गावातले लोकं, त्यांच्या मजा या सगळ्यांमध्ये आपण गावातलेच एक जण होऊन जातो. 

चित्रपट आणि संगीत दोन्हीही ५ स्टार 

पण मी या चित्रपटाच्या सर्वाधिक प्रेमात पडलो ते त्याच्या संगीतामुळे.

प्रत्येक गाणं इतकं सुंदर लिहिलं गेलं आहे, इतकं छान संगीतबद्ध केलं गेलं आहे, की संगीताची आवड असणारेच नव्हे तर ज्यांना संगीताची विशेष आवड नाही, तेही त्या गाण्यांमध्ये गुंतून जातील.

खूप वर्षांनी असं झालं की चित्रपट संपल्यानंतर थिएटरमधून बाहेर पडल्यावर घरी येईपर्यंत मी त्या चित्रपटातील गाणी युट्युबवर ऐकत होतो. मी स्वतः संगीत शिकलेलो नाही, पण कधी कधी एखादं गाणं ऐकताना वाटतं ना – "यापेक्षा योग्य गायक या गाण्यासाठी असूच शकत नाही." तसंच मला या चित्रपटातील जवळजवळ प्रत्येक गाण्याबद्दल वाटलं.

तुम्ही इथे क्लिक करून सगळे गाणे ऐकू शकता.

काय अप्रतिम गायक निवडले आहेत!

बाकी चित्रपटाची कथा, संवाद, चित्रीकरण, अभिनय, पात्रांची उभारणी, विनोद आणि शेवटी नकळत मिळणारी छोटीशी शिकवण — हे सगळं इतक्या सुंदर पद्धतीने मांडलं आहे की चित्रपट संपल्यानंतरही तो मनात राहतो.

अजूनही थिएटरमध्ये सुरू असेल तर नक्की जाऊन बघा. आणि घरी आल्यावर पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल, अशा प्रकारचा हा चित्रपट आहे.

चांगला चित्रपट संपल्यावर आपण थिएटरमधून बाहेर पडतो; पण उत्कृष्ट चित्रपट आपल्या मनातून बाहेर पडत नाही. 'तुंबाडची मंजुळा' माझ्यासाठी तसाच ठरला.

टीमला सलाम

दिग्दर्शक विविध कोरेगावकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. प्रेक्षकांना चित्रपट आवडला म्हणजे दिग्दर्शकाने संपूर्ण टीमवर्कचं गणित अचूक बसवलं आहे, असा माझा समज आहे. एक नंबर काम केलं आहे!

त्याचबरोबर लेखक ऋषिकेश तुराई आणि योगेश शिरसाट यांचं लिखाणही कमाल आहे. चित्रपट पाहताना मी मनापासून हसत होतो आणि प्रत्येक क्षण एन्जॉय करत होतो.

मराठी चित्रपटसृष्टीत हेमंत ढोमे हे असे नाव आहे की त्यांचा चित्रपट आला की मी वेळ काढून थिएटरमध्ये जाऊन बघतो. आता त्या यादीत विविध कोरेगावकर यांचं नावही आनंदाने जोडत आहे.

याचसोबत कलाकारांच्या अभिनयाचाही विशेष उल्लेख करावाच लागेल.

जितेंद्र जोशी यांची भूमिका नेहमीप्रमाणे सहज आणि प्रभावी. पडद्यावर ते दिसले की पात्र खरे वाटायला लागते, ही त्यांची खासियत आहे.

सई ताम्हणकर यांनी त्यांच्या भूमिकेत उत्तम ऊर्जा आणि नैसर्गिकता आणली आहे. त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स प्रत्येक प्रसंग अधिक जिवंत करतो.

मकरंद अनासपुरे यांच्याबद्दल काय बोलावं! त्यांची संवादफेक, टायमिंग आणि सहज विनोद निर्माण करण्याची कला आजही तितकीच प्रभावी आहे.

शार्दूल सराफ यांनीही आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. त्यांच्या अभिनयामुळे चित्रपटातील अनेक प्रसंग अधिक रंगतदार झाले आहेत.

ओम भुतकर यांचा अभिनय अत्यंत संयत आणि विश्वासार्ह वाटतो. भूमिका साकारताना त्यांनी दाखवलेली बारकावे पकडण्याची क्षमता विशेष आवडली.

या चित्रपटात कलाकार दिसत नाहीत, पात्रं दिसतात; आणि कदाचित अभिनयाचं यश यापेक्षा वेगळं काय असू शकतं?

पुढील वाटचालीसाठी संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा!

आज चित्रपटाबद्दल का?

मी सहसा अध्यात्मिक ग्रंथ, त्यांमधल्या कथा आणि त्या कथांमधील शिकवणी आजच्या जगात कशा उपयोगी पडतात याबद्दल लिहित असतो. मग आज अचानक एका मराठी चित्रपटाबद्दल का लिहितो आहे? पहिलं कारण अगदी साधं आहे — मला चित्रपट बघायला आवडतात. मी शक्य तितक्या वेगवेगळ्या भाषांमधले चित्रपट पाहतो.

पण त्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं कारण आहे.

आपण सगळेच लहानपणापासून गोष्टी ऐकत आणि बघत मोठे होत असतो. कधी त्या आजी-आजोबांच्या असतात, कधी पुस्तकांमधल्या, कधी मालिकांमधल्या, तर कधी चित्रपटांमधल्या. ह्याच गोष्टी नकळत आपल्याला घडवत असतात.

एखाद्या कथेतलं पात्र चुकीचा निर्णय घेतं तेव्हा आपल्याला कळतं की असं वागणं योग्य नाही. एखादं पात्र संकटातही योग्य गोष्ट निवडतं तेव्हा वाटतं, "माझ्या आयुष्यात असा प्रसंग आला तर मीही असंच वागायला हवं." आपण कोण आहोत, कसं जगायचं, लोकांशी कसं वागायचं यावर गोष्टींचा खूप मोठा प्रभाव असतो.

म्हणूनच चांगल्या कथा सांगणारे लोक मोठे झाले पाहिजेत असं मला वाटतं.

आजच्या काळात प्रसिद्धी मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. काही लोक वेडेपणा करून प्रसिद्ध होतात, तर काही लोक मेहनतीने, प्रामाणिकपणे आणि लोकांना काहीतरी चांगलं देऊन प्रसिद्ध होतात. प्रेक्षक म्हणून आपण कोणाला पाठिंबा देतो हे महत्त्वाचं आहे.

जर आपण फक्त गोंधळ, दिखावा आणि क्षणिक मनोरंजन यांनाच दाद दिली, तर चांगल्या कथा सांगणारे लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार मागे पडतील. पण आपण त्यांच्या कामाचं कौतुक केलं, त्यांना पाठिंबा दिला, तर ते आणखी चांगल्या कथा घेऊन आपल्या भेटीला येतील.

एखाद्या लेखकाच्या किंवा दिग्दर्शकाच्या कामात मला प्रामाणिकपणा दिसला, त्याने माणसांना आनंद दिला, विचार करायला लावलं किंवा काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला, तर त्याचं कौतुक करावंसं वाटतं. कदाचित त्याच प्रोत्साहनातून उद्या तो आणखी एखादी उत्कृष्ट कलाकृती घडवेल.

त्यांच्या उत्तम कामामुळे ते लोकांपर्यंत पोहोचतातच. पण चांगल्या कथा सांगणाऱ्या लेखकांचं, दिग्दर्शकांचं आणि कलाकारांचं नाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, हा माझा छोटासा प्रयत्न असतो.

प्रेक्षक म्हणून आपण कोणाला टाळ्या देतो यावर उद्या कोणत्या प्रकारच्या कथा तयार होतील हे ठरत असतं.

आपण भेटूया पुढच्या पत्रात. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि मराठी चित्रपट बघण्यात व्यस्त रहा.

धन्यवाद.

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—

👉 WhatsApp ग्रुप Join करा.

👉 Email Newsletter Join करा.

Post a Comment

0 Comments