रामायणातले मॅनॅजमेन्ट चे धडे!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

        स्वागत आहे आपले माझ्या एका नवीन पत्रात. रविवार ते रविवार आपण पत्राद्वारे बोलत असतो आणि आठवडाभर मला तुमचे रिप्लाय येत राहतात. मनापासून धन्यवाद त्या प्रत्येक वाचकाचे, जो वेळ काढून माझे पत्र वाचतो, मला रिप्लाय करतो आणि दुसऱ्यांनाही पाठवतो. माझी अशीच मदत करत रहा.

    मागच्या आठवड्यात मी जगातल्या सगळ्यात उत्तम मॅनेजमेंटच्या पुस्तकांपैकी एक पुस्तक वाचत होतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते कोणत्याही आधुनिक लेखकाचं नव्हतं; ते होतं श्रीमद् रामायण. आज बघूया, या रामायणामधून मॅनेजमेंटचे कोणते धडे मिळतात.

सगळ्यांना माहिती असलेला प्रसंग

        रामायण या महाकाव्यातला एक प्रसंग सगळ्यांनाच माहिती आहे. श्रीराम वनवासात जातात आणि काही दिवसांनी भरत त्यांना परत घेऊन जाण्यासाठी येतो. पण नेहमीप्रमाणे, जे सगळ्यांना जवळपास माहिती आहे त्याबद्दल मी बोलणार नाही. माझा Point of View सांगतो.

        सगळ्यात आधी, हा प्रसंग छोटा नाही. भरत आले, भेटले, थोड्या गप्पा झाल्या, श्रीरामांनी त्यांना समजावून सांगितलं आणि मग श्रीरामांच्या पादुका घेऊन भरत राज्य सांभाळायला परत गेले—इतकाच हा प्रसंग नाही. एकदा ग्रंथ स्वतः हातात घेऊन हा प्रसंग वाचल्यावर समजतं की हा बराच मोठा प्रसंग आहे.

        या प्रसंगात भावांचं प्रेम तर दिसतंच; पण मला वेगळंच काही दिसलं. ते म्हणजे योग्य प्रश्न विचारण्याची पद्धत. जेव्हा भरत श्रीरामांच्या समोर आले, तेव्हा श्रीरामांनी त्यांना भरपूर प्रश्न विचारले. भरपूर म्हणजे खरोखर भरपूर! सर्ग १०० मध्ये हे सगळे प्रश्न येतात. या सर्गात ७६ श्लोक आहेत आणि जवळजवळ ५०–६० प्रश्न श्रीरामांनी भरताला विचारले आहेत.

नेमके प्रश्न कोणते?

व्यक्ती काय प्रश्न विचारते, त्यावरून तिची ओळख होत असते. ज्यांना चांगले प्रश्न पडतात, त्यांना चांगली उत्तरंही मिळतात; म्हणूनच ते मोठे होतात.

हे प्रश्न वाचताना मला वारंवार वाटत होतं की, श्रीराम भरताला प्रश्न विचारत नसून जणू आपल्यापैकी प्रत्येकालाच आरसा दाखवत आहेत.

आता इथून पुढे काही समासांमध्ये मी फक्त श्रीरामांनी विचारलेले काही प्रश्न लिहित आहे. सगळे नाही, पण त्यांपैकी काही. सगळे प्रश्न जर वाचायचे असतील तर इथे क्लिक करून तुम्ही संपूर्ण सर्ग वाचू शकता.👈

भेटल्या भेटल्या श्रीरामांनी भरताला स्वतःच्या वडिलांबद्दल, आईबद्दल आणि गुरुजींबद्दल प्रश्न विचारले. ते कसे आहेत? त्यांचा मान राखला जातो का? असे काही प्रश्न विचारले.

उत्तम विचार हेच राजाच्या विजयाचं मूलकारण आहे, असं श्रीराम सांगतात आणि लगेच विचारतात, "तू भलत्या वेळी झोपेला वश होत नाहीस ना? वेळेवर उठतोस ना? पहाटे राज्याच्या खजिन्यात पैसा कसा येईल याची योजना आखतोस ना? तू कामात दिरंगाई, म्हणजे टाळाटाळ, करत नाहीस ना?"

"जे अंतर्बाह्य स्वच्छ आचार-विचारांचे आहेत, अशाच अमात्यांना तू श्रेष्ठ कार्यावर नियुक्त करतोस का? मुख्य योद्धे खरोखर बलवान आहेत का? त्यांची परीक्षा घेतली आहे का? सैनिकांचे वेतन आणि भत्ते तू वेळेवर देतोस ना? वेतन आणि भत्ते देण्यास विलंब झाला तर सैनिक राजावर अत्यंत संतप्त होतात आणि त्यामुळे मोठा अनर्थ होऊ शकतो."

"नीतिशास्त्राला धरून एखाद्या संकल्पाबद्दल तू तीन किंवा चार मंत्र्यांना एकत्र किंवा प्रत्येकाला वेगवेगळं बोलावून त्यांचा सल्ला घेतोस ना? तू पक्वान्ने आणि चविष्ट पदार्थ एकट्याने खात नाहीस ना? मित्रांनाही त्यातील पदार्थ देतोस ना? मी जे काही विचारतो आहे, ते तुझ्या बुद्धीला पटले आहे का? कारण या प्रश्नांच्या उत्तरांमुळे आयुष्य, यश, धर्म, पराक्रम आणि अर्थ यांची सिद्धी होते."

आहेत का नाही कामाचे प्रश्न?

        मी वर सगळ्या प्रश्नांपैकी काही प्रश्न लिहिले आहेत. अजून एक खास गोष्ट म्हणजे, हे सगळे प्रश्न विचारताना श्रीराम "कच्चित्" या शब्दाने सुरुवात करतात. याचा अर्थ आहे, "असं होतं आहे ना?" हेही शिकण्यासारखं आहे.

        आपण एखाद्याला खूप प्रश्न विचारले तर, "किती प्रश्न विचारतो रे!" असं नक्की डोक्यात येतं. पण त्याच प्रश्नांच्या आधी "असं होतं आहे ना?" हे जोडल्यावर ते तितके "कटकटीचे" वाटत नाहीत.

        श्रीराम घरच्यांपासून ते राज्य चालवण्यापर्यंत सगळंच विचारतात. त्यातले काही प्रश्न तर आजकाल आपण विसरलो आहोत, असं म्हटलं तरी चालेल. वेळेवर झोपतो का? वेळेवर उठतो का? कामाची टाळाटाळ करत नाहीस ना? मोठ्यांना नमस्कार करतो का?

        हे साधे प्रश्न दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा आपण स्वतःलाच रोज विचारले, तर कदाचित अनेक समस्या निर्माणच होणार नाहीत.

        त्यानंतर ते विचारतात—वेळेचं नियोजन करून तू सगळ्या कामांना वेळ देतो आहेस ना? थोडक्यात, Work-Life Balance बद्दलही श्रीराम विचारत आहेत.

        निर्णय घेताना ज्ञान असलेल्या मंत्र्यांचा सल्ला घेतोस ना? राज्यात धन कसं येईल याचा विचार करतोस ना? धन योग्य व्यक्तींच्या हातात जात आहे याची खात्री करतोस ना? सेनेतील योद्धे शूरवीर असल्याची खात्री करून त्यांची परीक्षा घेतोस ना?

एक-एक प्रश्न स्वतःसाठी आणि कोणतीही टीम सांभाळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा आहे.

आज वेळ काढून श्रीमद् रामायणातील शंभरावा सर्ग नक्की वाचा. कारण ज्याला योग्य प्रश्न विचारता येतात, त्याला योग्य उत्तरं सापडतात आणि तोच योग्य मार्गावर निघतो.

असे छान आयुष्याचे आणि मॅनेजमेंटचे धडे देणारे श्रीराम आपल्या आयुष्यात आहेत, याबद्दल माझ्या मनात कृतज्ञतेचा भाव (Feeling of Gratitude) निर्माण झाला. म्हणून हे प्रश्न तुम्हालाही सांगावेसे वाटले.

तुम्हालाही माझी पत्रं आवडतात ना? तुम्हीही प्रत्येक रविवारी माझं पत्र वाचता ना?

आपण भेटूया पुढच्या पत्रात. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि स्वतःला योग्य प्रश्न विचारून त्यांची उत्तरं शोधण्यात व्यस्त रहा.

धन्यवाद.

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—

👉 WhatsApp ग्रुप Join करा.

👉 Email Newsletter Join करा.








Post a Comment

0 Comments