ग्रंथ कुठेही मदतच करतात!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

काही आठवड्यांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा आपल्या गप्पा सुरू होत आहेत.

नेहमीप्रमाणे एकदा पुन्हा मनापासून धन्यवाद. पत्र वाचणारे, प्रतिक्रिया देणारे आणि आवडलं म्हणून इतरांपर्यंत पोहोचवणारे—तुम्ही सगळेच या प्रवासाचे सोबती आहात.

आजच्या पत्रात बघूया. ग्रंथ कसे नकळत मदत करतात.  Let's Go!



मागच्या आठवड्यातला अनुभव

    काही दिवसांपूर्वी एका बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या कंपनीला निमंत्रण आलं होतं. आठ हजार रुपयांचं कर्ज घेऊन व्यवसायाची सुरुवात करण्यापासून ते आजपर्यंतच्या प्रवासात त्या बँकेची मोठी साथ लाभली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम आमच्यासाठीही खास होता. 

कार्यक्रमाच्या शेवटी एक प्रश्न विचारण्यात आला. जो मला कधीही आवडतं नाही. 

"आमच्या बँकेबद्दल ग्राहकांपैकी कुणी काही अनुभव सांगेल का?"

हा प्रश्न ऐकताच शाळेचे दिवस आठवले. सगळ्यांसमोर उभं राहून बोलणं तेंव्हा ही कधी आवडायचं नाही. पण आयुष्य पुढे जातं तसं एक गोष्ट समजते—योग्य वेळी आपले विचार मांडता आले पाहिजेत.

म्हणून उठलो.


दोन मिनिटांचा अनुभव

समोर जाताना मनात नेहमीचेच प्रश्न सुरू होते.

काय बोलायचं?

कोणत्या भाषेत बोलायचं?

किती वेळ बोलायचं?

पण व्यासपीठापर्यंत पोहोचेपर्यंत ते सगळे विचार बाजूला ठेवले आणि मनात एकच शब्द आला...

"जय जय रघुवीर समर्थ."

मी दोन मिनिटे बोललो. दासबोधातील एक ओवी सांगितली. समर्थांनी "प्रपंची पाहिजे सुवर्ण" असा केलेला उल्लेख सांगितला आणि बँकेमुळे आम्हाला झालेल्या मदतीबद्दल काही शब्द बोललो. धन्यवाद म्हणून पुन्हा जागेवर येऊन बसलो. बस्स. परत बसताना मला टाळ्या ऐकू आल्या.



कशी गंमत होते बघा

कार्यक्रम संपल्यानंतर काही जण भेटायला आले. कुणी कंपनीबद्दल विचारलं, कुणी बोलणं आवडलं असं सांगितलं.

नंतर विचार करताना एक गोष्ट लक्षात आली. मी काही फार वेगळं बोललो नव्हतो. मी वक्ता सुद्धा नाही. पण दासबोधातील एका ओवीने त्या दोन मिनिटांच्या बोलण्याला एक वेगळीच ताकद दिली.

आवड म्हणून ग्रंथ वाचायला सुरुवात केली. अजून सखोल अभ्यास सुरू व्हायचा आहे. पण नुसतं चाळतानाही असे अनुभव येऊ लागले, हीच त्या ग्रंथाची ताकद.


सांगायचं इतकंच...

आपली काही फेव्हरेट पुस्तकं असतात, लेखक असतात, चित्रपट असतात, नट-नट्या असतात, गेम्स असतात, खायचे पदार्थ असतात. पण मी कोणालाही फेव्हरेट ग्रंथाचं नाव सांगताना पाहिलेलं नाही. आपल्या आवडीचा एखादा ग्रंथ नक्की असावा. 

सहज वाचता वाचता तो ग्रंथ योग्य वेळी विचार देतो, शब्द देतो आणि अनेकदा आपल्यालाच आपली ताकद दाखवून देतो.

मी अजून दासबोधाचा विद्यार्थी आहे. नुसतं चाळतानाही असे अनुभव येतात. मग ज्यांनी आयुष्यभर ग्रंथांचा अभ्यास केला असेल, त्यांना किती अनुभव आले असतील!

म्हणून तुमच्या आवडीच्या ग्रंथाशी मैत्री करा.

त्याचा उपयोग कधी, कुठे आणि कसा होईल, हे आधीच सांगता येत नाही.

दासबोधामधली ओवी अशी आहे.
दशक ११, समास ३, ओवी क्रमांक २९

प्रपंचीं पाहिजे सुवर्ण । परमार्थीं पंचीकर्ण ।
महावाक्याचें विवरण । करितां सुटे ।।

मराठी अर्थ : प्रपंच उत्तम प्रकारे होण्यासाठी सुवर्णाची म्हणजे पैशाची आवश्यकता असते, तर परमार्थासाठी पंचीकरण जाणून घेणे आवश्यक असते. यानंतर ‘तत्त्वमसि’ इत्यादी महावाक्यांचे मनन, निदिध्यासन म्हणजेच विवरण केले असता मोक्ष प्राप्त होतो.

आपण भेटूया पुढच्या पत्रात. तोपर्यंत तुमच्या आवडीचा, ज्याला तुम्ही मित्र म्हणता असा ग्रंथ कोणता, हे मला नक्की कळवा. नसेल कोणी ग्रंथमित्र, तर करून घ्या कोणाला तरी. मग मला नक्की कळवा.

आपण भेटूया पुढच्या पत्रात. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि ग्रंथ वाचण्यात व्यस्त रहा. धन्यवाद. 

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—

👉 WhatsApp ग्रुप Join करा.

👉 Email Newsletter Join करा.

Post a Comment

0 Comments