।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
पुन्हा एक रविवार आणि आज आपण भेटलो आहोत गणपती उत्सवातल्या एका रविवारी.
सर्वप्रथम, अजिंक्यच्या पत्रांचे वाचक असलेल्या तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. पत्र वाचून रिप्लाय करणाऱ्यांचे, प्रतिक्रिया देणाऱ्यांचे विशेष आभार आणि स्वतः पोस्टमन बनून हे पत्र वेगवेगळ्या मोबाइलच्या स्क्रीनपर्यंत पोहोचवणाऱ्यांचे अजून विशेष आभार.
आज बोलूया गणपती बाप्पांबद्दल. कारण हे १०-१२ दिवस गणपतीच्या गप्पा सोडून डोक्यात दुसरं काहीच नसतं. गणपती बाप्पांच्या इतक्या नावांपैकी आज एका नावाबद्दल बोलूया.
विघ्नहर्ता
हे गणपती बाप्पांचं माझ्या आवडीचं नाव आहे.
कारण विघ्नं आपल्या आयुष्यात येतच असतात. आपण काहीतरी करायला घेतो, ते पूर्ण करताना अडचणी येतात आणि त्या अडचणी दूर करून ठरवलेलं काम कसं पूर्ण करायचं, याचा बोध आपल्याला होतो. तो बोध म्हणजेच गणपती बाप्पा.
तुम्हीच विचार करा. आपल्या आयुष्यात विघ्नं आली आणि ती दूर करून आपण पुढे गेलो म्हणूनच आपण काहीतरी शिकलो नाही का? काहीतरी ठरवलं, करायला सुरुवात केली आणि सगळं अगदी आपल्या मनासारखं झालं, असं काही आहे?
विघ्नं आलीच पाहिजेत आणि त्या विघ्नांना दूर करण्यासाठी गणपती बाप्पा म्हणजेच विघ्नहर्ता मदतीला येतो, हेही तितकंच पक्कं असावं.
दासबोध ग्रंथात गणेश स्तवन समासातील सहावी ओवी आहे—
सर्व मंगलाचे निधान अशा गणेशाला वंदन करून कार्यारंभ केला असता त्या कार्यात सर्वप्रकारे यश प्राप्त होते. ते करताना संकटे, अडथळे इत्यादी उपाधींची बाधा होऊ शकत नाही.
हत्तीची एक गोष्ट
“जितके डोके तितके विचार” हे आपल्याला पटवून देणारी एक गोष्ट मी लहानपणापासून ऐकली आहे. तुम्हालाही ऐकवतो.
पाच व्यक्तींच्या डोळ्यांना पट्टी बांधून त्यांना एका प्राण्याच्या वेगवेगळ्या अवयवांना हात लावायला देतात आणि प्रत्येकाला विचारतात, “तुला हाताला काय जाणवतं आहे?”
पहिला म्हणतो, “माझ्यासमोर मोठ्ठा खांब आहे.”
दुसरा म्हणतो, “माझ्यासमोर एक दोरी आहे.”
तिसरा म्हणतो, “सापासारखं काहीतरी जाणवतं आहे.”
चौथा म्हणतो, “मला तर कुठलं तरी पोतं ठेवलं आहे असं वाटतं.”
आणि पाचवा म्हणतो, “मला तर टोकदार भाले हात लावायला दिले आहेत.”
जेंव्हा पट्टी उघडली, तेंव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की ते पाचही जण एकाच हत्तीला हात लावत होते. पण डोळे बंद असल्यामुळे प्रत्येकाने आपापला एक समज करून घेतला होता.
पहिल्याने हत्तीच्या पायाला हात लावून त्याला खांब समजलं होतं. दुसऱ्याने शेपटीला हात लावून दोरी समजली होती. तिसऱ्याने सोंडेला हात लावून साप समजला होता. चौथ्याने हत्तीच्या पोटाला हात लावून पोतं समजलं होतं आणि पाचव्याने हत्तीच्या दातांना भाले समजलं होतं.
आपल्या आयुष्यात जसे जसे अनुभव येतात, त्यावरून आपण आपल्या आयुष्याची एक समज तयार करत असतो.
गणपती बाप्पांचंही असंच आहे. इतकं मोठं रूप प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने समजून घेतो. या गोष्टीत पाहिलं तसं.
मला गणपती बाप्पा म्हणजे विघ्नांचा नाश करणारा आणि बोध करून देणारा इतकंच समजतं.
काहीतरी करायला घेतलं आणि त्यामध्ये अडचणी आल्या, की त्या अडचणींवर मात करून पुन्हा कसं पुढे जायचं, याचा बोध करून देणारा गणपती बाप्पा.
त्याची एक मूर्ती आहे, सोंड आहे, सगळं डोळ्यांना दिसतं. पण मला तो बोध करून देणारा असाच दिसतो.
हेही समर्थांनी दासबोधात सांगितलं आहे. गणेश स्तवनामधली पहिली ओवी—
सर्वसिद्धींचा फळदाता, अज्ञान व विपरीत ज्ञान नष्ट करणाऱ्या बोधरूप अशा गणनायकास मी वंदन करतो.
मी जसा गणपती बाप्पा माझ्यासाठी कोण आहे, हे तुम्हाला सांगितलं. त्याचप्रमाणे तुमच्यासाठी गणपती बाप्पा कोण आहे, हे तुम्हीही मला सांगू शकता.
रिप्लाय करा किंवा कॉमेंट करा. तुम्ही नेमकं गणपती बाप्पांना, मनाने कुठे स्पर्श करून काय समज करून घेतला, ते सांगा. नसेल काही अनुभव, तरी काही हरकत नाही. आजपासून प्रयत्न करा. काही अनुभव आला तर मला नक्की सांगा.
आपण भेटूया पुढच्या रविवारी, पुन्हा एका पत्रासोबत.
आणि हो, माझ्या लक्षात आहे. मी पुस्तकं लिहिली तर तुम्ही विकत घेणार का, असं तुम्हाला विचारलं होतं. तुमचे सगळ्यांचे “हो, हो” असे उत्तर आले होते.
या पुस्तकाबद्दलचं पुढचं अपडेट लवकरच देतो.
तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि गणपती बाप्पांचा शोध घेण्यात व्यस्त रहा.
धन्यवाद.
जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsAppWhatsApp ग्रुप Join करा.
👉 Email Newsletter Join करा.

0 Comments