घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

स्वागत आहे अजिंक्यच्या पत्रांमध्ये! आणि आज या पत्रांचा सुरू होतो आहे—ड्रम वाजले पाहिजेत… तड तड तड तड तड… ठीश्श्श!

सिझन २!

टाळ्या, टाळ्या… धन्यवाद! धन्यवाद!

मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार. तुम्ही वेळात वेळ काढून माझं पत्र वाचत आहात म्हणून धन्यवाद. वाचून मला प्रतिक्रिया देता म्हणून वेगळा नमस्कार आणि आवडलं तर आपल्या ओळखीच्यांना पाठवता म्हणून पुन्हा एकदा धन्यवाद.

मला आज भरपूर बोलायचं आहे. Let's Go!

संगीत शिकण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या प्रयत्नांचं एक छोटंसं रोप म्हणून एक व्हिडिओ या पत्रामध्ये आहे. तो बघा. मी मेलोडिका नावाच्या वाद्यावर एक गाणं वाजवलं आहे. सांगा, कसं वाटतं ते.

आज एक सुभाषित बघूया आणि आपल्या सण-उत्सवांबद्दल मला काय वाटतं, ते सांगतो.


घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्!

सध्या जरा जास्तच फेमस झालेलं सुभाषित बघूया.

घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्।
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्॥

मराठी अर्थ : भांडी फोडून, कपडे फाडून किंवा गाढवावर बसून, माणूस (किंवा स्त्री) कोणत्याही मार्गाने प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतो.

सध्याचं Instagram, Reels, Trends, चित्रपट हे सगळं बघता, त्याला अगदी साजेसं असं हे सुभाषित आहे ना?

वाट्टेल ते करून प्रसिद्धी मिळवण्याचे प्रयत्न प्रत्येकाचे सुरू आहेत.

मी जेव्हा लिहिणं बंद केलं, तेव्हा जो रिकामा वेळ मिळाला, त्या वेळात विचार करताना मला जाणवलं—मी लिहिणं का सुरू केलं होतं?

मला एक गोष्ट माहिती होती.

जे वेडेचाळे करून Reels, चित्रपट किंवा उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून प्रसिद्धी आणि पैसा मिळवणारे लोक आहेत, त्यांना वाईट बोलून, नावं ठेवून त्यांचं काम, प्रसिद्धी कमी होणार नाही. कदाचित वाढेलही.

दुसऱ्यांची रेषा पुसणाऱ्यांमधला मी नाही. मला आपली रेषा मोठी करणे हाच मार्ग समजतो.

त्यामुळे भांडी फोडून, कपडे फाडून किंवा कुठलाही चीप मार्ग स्वीकारणं मला तर शक्य नाही.

म्हणून मी लिखाणातून वेगवेगळे विचार माझ्या ओळखीच्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केला.

बरीच वर्षं पत्रं लिहिली आणि मग मी थोडा ब्रेक घेतला. आणि गंमत अशी की, ब्रेक घेतल्यावर मला जे काही जाणवलं, ते कदाचित लिहिता लिहिता जाणवलंच नसतं.

(पुढे बोलण्याआधी एक छोटा प्रश्न. मी जर उद्या एखादं पुस्तकं लिहिलं तर तुम्ही ते विकत घेऊन, वाचून मला कसं वाटलं सांगणार का? मला रिप्लाय करून नक्की कळवा.) 

आता बोलूया उत्सवाबद्दल!

उत्सवाला नाही कोणीच म्हणत नाहीये!

पण गोंगाट आणि उत्सवामुळे दुसऱ्यांना होणारा त्रास आपण विचारातच घेतला नाही, तर उत्सव साजरा न करणाऱ्यांसाठी तो त्रासदायक वाटायला लागतो.

उदाहरण म्हणून घ्या—civic sense.

हा शब्द खूप जणांनी पहिल्यांदा ऐकला असेल. मीसुद्धा पहिल्यांदा काही वर्षांपूर्वी ऐकला.

त्याचा मराठीत अर्थ आहे—नागरी कर्तव्य आणि शिस्त.

जी आपल्याकडे जवळपास शून्य आहे.

असणारच!

हा शाळेत शिकवण्याचा विषय जर कधी शाळेत शिकवलाच गेला नाही, तर कसं कोणाला माहिती असणार?

आणि ज्यांना माहिती असणार, ते अल्पसंख्येत असणार. म्हणून त्यांनाच वेड्यात काढलं जाणार!

आपल्याकडे उत्सव आला की जोश असतो. गप्पा होतात, नवीन ओळखी होतात, खरेदी होते, बिझनेस होतो, कला-गुण सादर करण्याची एक संधी प्रत्येकाला मिळते.

त्यामुळे वेगवेगळे उत्सव साजरे करणे हा आपल्या भारतीय परंपरेतला एक महत्त्वाचा घटक आहे. तो आधीही होता आणि नेहमी असावा.

पण ती जी लक्ष्मणरेषा असते ना, ती आपल्यालाच सांभाळावी लागणार आहे.

ही लक्ष्मणरेषा समजून, त्यानुसार वागून आणि आपल्या सोबतच्यांना योग्य पद्धतीने उत्सव काय असतो हे समजावून सांगण्याची मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे.

ही जबाबदारी तुम्हाला तुमची वाटत नाही का?

नसेल वाटत, तर काही हरकत नाही.

पण काही वर्षांनी असं म्हणू नका की, “माझ्या घरातल्या लहान मुलांना गणपती म्हणजे गाणी लावून डान्स करण्याचे दहा दिवस, इतकंच माहिती आहे.”

गणपती बाप्पा आपल्या सोबत कधी पासून आहेत माहिती का?

योग्य अर्थ बघायला गेला तर गणपती ही बुद्धीची देवता आहे. आपण “मला कळलं” किंवा “मला समजलं” म्हणतो ना? ते कळणं, ते समजणं म्हणजेच गणपती बाप्पा आहेत, असं मला वाटतं.

त्यांचा एक आकार आहे, मूर्ती आहे, आरती आहे, श्लोक आहेत—हे सगळं मान्य आहे.

पण आपल्याला "कळणं" "समजणं" किती लहानपणापासून समजतं, बघा ना!

लहान बाळाला बोलता येत नसलं, तरी आपण हात वर केला की कडेवर उचलणार आहेत हे त्याला समजतं.

म्हणजे बघा ना—गणपती बाप्पा केव्हापासून आपल्या सोबत आहेत!

हे गणपती बाप्पांचं रूप जर कोणी बोलून, लिहून, एखादी गोष्ट सांगून समजावून सांगितलं नाही, तर पुढच्या पिढीला ते कसं समजणार?

म्हणून आपल्याकडची जी गोष्ट जशी आहे, ती तशीच आणि तिचा योग्य अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न नेहमी सुरू राहिला पाहिजे.

तुमच्याकडून किंवा माझ्याकडून—कोणाकडूनही.

ही जी शक्ती आहे—तुमच्यामधली आणि माझ्यामधली—लोकांपर्यंत योग्य अर्थ योग्य पद्धतीने पोहोचवण्याची, ती नक्की वापरा. 

आणि भरपूर शक्ती असणारा एक सुपरहिरो मी लहान असताना भारतात खूपच जास्त प्रचलित होता.

त्याच्याच सिरियलचं टायटल साँग मी मेलोडिकावर वाजवलं आहे.

ते ऐका. आणि स्वतःमधली शक्ती जागी करा! कारण आपल्याला दुसऱ्यांची रेषा पुसायची नाहीये.

आपली रेषा मोठी करायची आहे. 


आता आपण असेच रविवार ते रविवार भेटत राहूया.

तो पर्यन्त स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली शक्ती योग्य विचारांच्या प्रसारात लावण्यात व्यस्थ रहा. 

धन्यवाद. 

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—

👉 WhatsApp ग्रुप Join करा.

👉 Email Newsletter Join करा.












Post a Comment

0 Comments