।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
अजून एक रविवार आणि मी पुन्हा एकदा माझी बडबड तुमच्यासमोर मांडण्यासाठी आलेलो आहे.
खरं तर मी बडबडच करतो स्वतःसोबत आणि ती लिहून काढतो. पण तुमच्या प्रतिक्रिया आल्या की त्या बडबडीचं रूपांतर संवादात होतं. म्हणून प्रतिक्रिया देणाऱ्या प्रत्येकाचे धन्यवाद. प्रतिक्रिया देऊन फॉरवर्ड करणाऱ्यांचे विशेष धन्यवाद.
रिप्लाय न करणाऱ्यांचे पण धन्यवाद! पण करा की रिप्लाय. मला पण समजू द्या की कोण कोण वाचतंय.
आज बघूया एक मस्त सुभाषित. Let's Go!
संस्कृत सुभाषित
सुभाषित मस्तच असतं. अशा असंख्य सुभाषितांपैकी एक मस्त सुभाषित बघूया.
मराठी अर्थ
घोड्याचं भूषण म्हणजे त्याचा वेग,
हत्तीचं भूषण म्हणजे त्याचं सामर्थ्य (उन्मत्तपणा),
स्त्रीचं भूषण म्हणजे तिचं चातुर्य,
आणि पुरुषाचं भूषण म्हणजे त्याचा उद्योग.
हे सुभाषित कदाचित तुम्ही ऐकलं असेल. नसेल ऐकलं, तर आपण रिकाम्या वेळात काय केलं पाहिजे हे सांगणारं सुभाषित आहे.
आता उद्योग करणं आणि उद्योगी असणं यातला फरक बघा.
एक उद्योग करणारा आणि दुसरा उद्योगी.
एक वेलांटी आहे, पण अर्थ सगळा बदलतो.
आधीच्या काळात, जेव्हा मोबाईल नव्हते, तेव्हा लोक उद्योगी होते. नंतर मोबाईलने सगळ्यांना उद्योगाला लावलं. कोणी कन्टेन्ट बघण्याच्या उद्योगात बिझी, तर कोणी कन्टेन्ट बनवण्याच्या!
पण सगळेच्या सगळे उद्योगी.
पण या सुभाषितातला उद्योग म्हणजे नक्की काय?
भूषण म्हणजे काय?
मला वाटतं, ज्या गुणामुळे एखादी व्यक्ती उठून दिसते ते म्हणजे तिचं भूषण.
घोडा सुंदर आहे म्हणून त्याची किंमत नाही, तर तो वेगाने धावतो म्हणून त्याचं महत्त्व आहे. हत्ती मोठा आहे म्हणून तो विशेष नाही, तर त्याचं सामर्थ्य त्याची ओळख आहे.
पण माणसाचं काय?
तुम्ही हे वाक्य कधी ना कधी ऐकलं असेल—
“अरे, याच्याकडे तर काहीच नव्हतं. पण आज एवढं मोठं केलं!”
खरं पाहिलं तर त्याच्याकडे काहीच नव्हतं असं नसतं.
त्याच्याकडे उद्योग होता. प्रयत्न होता. चिकाटी होती.
खूपदा आपण उद्योग म्हणजे व्यवसाय किंवा बिझनेस अशा अर्थाने बघतो. पण उद्योग म्हणजे फक्त पैसे कमावणं नाही.
एखादं काम मन लावून करणं, अडचण आली तरी पुन्हा प्रयत्न करणं, नवीन गोष्ट शिकणं आणि कालपेक्षा आज थोडं चांगलं होण्याचा प्रयत्न करणं—हा सुद्धा उद्योगच.
संगीत विषयामधले उद्योगी
तुमच्या ओळखीचे असे कोणी आहेत का, ज्यांनी संगीत कधीच शिकलं नाही, पण एखादं गाणं ऐकलं आणि तेच स्वर पेटीवर वाजवता येतात?
माझ्या एका दादाला हे जमतं.
तो डॉक्टर आहे. पण गाणं ऐकून ते पेटीवर लगेच वाजवताना मी त्याला कितीतरी वेळा पाहिलं आहे.
मी विचारलं, “कधी शिकलास तू हे?”
तो म्हणाला, “अरे, घरी माझी बहीण गाणं शिकायची. पेटी नेहमी घरात असायची. मला अधूनमधून वेळ मिळाला की सहज पेटी वाजवत काहीतरी उद्योग करायचो. असं खेळता खेळता कधी जमलं समजलंच नाही.”
किती साधी गोष्ट आहे!
क्लास नव्हता, YouTube नव्हतं, Online Course नव्हता.
फक्त पेटी होती आणि काहीतरी करून पाहण्याचा उद्योग होता.
आज तर विचार करा.
संगीत असो, भाषा असो, व्हिडिओ एडिटिंग असो, कोडींग असो किंवा लिहिणं असो—शिकायचं ठरवलं तर पैसे देऊनही आणि फुकटही शिकता येतं.
पण शिकतो का?
वेळ कशात जातोय हेच अनेकदा समजत नाही.
समर्थ आणि संगीत
संगीत आणि गाणं शिकण्याबद्दल समर्थांनीसुद्धा सांगितलं आहे, माहिती आहे का?
तुम्ही म्हणाल, “हे शक्यच नाही!”
पण खरंच सांगतो. एक ओवी सांगतो.
समासाचं नाव आहे यत्नशिकवण.
जेथे उत्तम गुण, संगीत आणि गाणं असेल, तेथे वैभवास काय उणे पडणार आहे! आकाशात असंख्य तारे असतात, तशी अशा व्यक्तीभोवती लोकांची गर्दी होते.
म्हणून काहीतरी शिकण्याचा उद्योग सुरू ठेवावा.
आणि खरं सांगतो, AI मुळे तर काहीही शिकणं खूपच सोपं झालं आहे.
माहिती हवी, उदाहरण हवं, एखादी गोष्ट समजत नाही—विचारा.
फक्त एक गोष्ट कमी पडते— इच्छा.
आज माझ्या असंख्य उद्योगांपैकी लिहिणं हा एक उद्योग आहे, जो मी प्रत्येक रविवारी तुमच्यासमोर मांडतो.
असेच बाकीचेही उद्योग एक एक करून तुम्हाला सांगेन.
तुम्ही पण उद्योगी आहात का?
नाही असाल तर एखादा उद्योग लावून घ्या.
काहीतरी शिकण्याचा. काहीतरी करण्याचा. काहीतरी निर्माण करण्याचा.
माझा अजून एक उद्योग सांगू का?
माझ्या पत्राच्या नावाखाली वेगवेगळे विषय घेऊन मी समर्थांच्या ओव्या आणि श्लोक सांगण्याचा उद्योग करत असतो.
कसा वाटला आजचा उद्योग, मला नक्की कळवा.
तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या उद्योगात व्यस्त रहा.
धन्यवाद.
जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा.
👉 Email Newsletter Join करा.
0 Comments