।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
अजून एक रविवार आणि पुन्हा एकदा रविवारी पत्राद्वारे आपली भेट होतं आहे. प्रत्येक वाचकाचे आणि पोस्टमन बनून पत्र पुढे पाठवणाऱ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद.
आज रामायणातली सुग्रीवाची गोष्ट बघूया. Let's Go!
गोष्टच का?
कोणी थेट सांगितलं, "असं वागू नकोस", तर ते आपल्याला आवडत नाही.
पण तीच गोष्ट कथेतून आली, तर ऐकणाऱ्याच्या मनात आपोआप येतं—
"मला रावण नाही, राम व्हायचंय."
माणसाचा हा स्वभाव आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वीच ओळखला होता. म्हणूनच वेद-शास्त्रांचं ज्ञान त्यांनी आपल्यासमोर गोष्टींच्या रूपात ठेवलं. (हे मी आधी सुद्धा बरेचदा सांगितलं आहे पण तरीही लक्षात रहावं म्हणून परत सांगतो आहे.)
रामायण हा असाच एक महाग्रंथ. आज त्यातली एक कमी सांगितली जाणारी गोष्ट बघूया. सुग्रीवाची.
सुग्रीवाची गोष्ट
तुम्हाला माहिती नसेल तर थोडा अंदाज यावा म्हणून वर वर सांगतो. वालीने सुग्रीवाला राज्यातून हाकलून दिलं होतं. तेव्हा राम आणि सुग्रीवाची मैत्री झाली.
राम वालीपासून सुटका करणार आणि सुग्रीव सीतेचा शोध घेणार, असं ठरलं.
रामाने वचन पाळलं. सुग्रीव राजा झाला.
पण राजा होताच सुग्रीव सुखात रमला. पावसाळा संपला, तरी वचनाची आठवणच नाही!
शेवटी रामाने लक्ष्मणाला पाठवलं. लक्ष्मण संतापून किष्किंधेत पोहोचला आणि सुग्रीवाला खडे बोल सुनावले.
आपल्याही आयुष्यात असं होतं ना? गरज असते तेव्हा रोज फोन, आणि काम झालं की गायब.
रामायणातले श्लोक
शतमश्वानृते हन्ति सहस्रं तु गवानृते ।
आत्मानं स्वजनं हन्ति पुरुषः पुरुषानृते ॥
(किष्किंधा कांड, सर्ग ३४, श्लोक ९)
मराठी अर्थ
अश्व देईन असे म्हणून न देणाऱ्याला शंभर अश्व मारल्याचे पाप लागते. गाय देईन असे म्हणून न देणाऱ्याला सहस्र गोहत्या केल्याचे पातक लागते. जो मनुष्य दुसऱ्या मनुष्याशी कार्य करणाऱ्याची प्रतिज्ञा करतो व ती पुरी करत नाही, तो स्वतःच्या बांधवांसह आत्महत्या करणारा ठरतो.
पुढे लक्ष्मण असेही म्हणतो की "सुग्रीवा, जो आपल्या मित्राकडून आपले काम साधून घेतो व त्याचे काम मात्र करीत नाही, त्याला कृतघ्न म्हणतात आणि त्याचा वध करण्यासही हरकत नाही.
आजच्या कमीत कमी भाषेत सांगायचं तर विश्वास गेला की नुकसान आपलंच.
ह्याच्या पुढे लक्ष्मण जे सांगतात ते मला फारच आवडलं. ते म्हणतात "हा श्लोक कृतघ्न माणसाला पाहून लोकशिक्षणासाठी साक्षात ब्रह्मदेवाने रचला आहे. तो ऐक. आणि लक्ष्मण हा पुढचा श्लोक सांगतात.
गोघ्ने चैव सुरापे च चौरे भग्नव्रते तथा ।
निष्कृतिर्विहिता सद्भिः कृतघ्ने नास्ति निष्कृतिः ॥
(किष्किंधा कांड, सर्ग ३४, श्लोक ११)
मराठी अर्थ
गोहत्या करणाऱ्या माणसाला, दारुड्याला, चोराला व व्रतभंग करणाऱ्याला प्रायश्चिते आहेत पण कृतघ्नाला प्रायश्चित्त नाही.
आजच्या भाषेत: ज्याने मदत केली, त्याला विसरू नका. हाच खरा संस्कार.
पुढे काय झालं?
सुग्रीवाची राणी तारा पुढे आली आणि तिने शांत शब्दांत लक्ष्मणाचा राग निवळवला.
सुग्रीवाने चूक मान्य केली, माफी मागितली, आणि लाखो वानर सीतेच्या शोधासाठी निघाले.
एकाच गोष्टीत किती गोष्टी शिकवल्या, हे बघा!
१. दिलेलं वचन पाळा.
२. केलेले उपकार विसरू नका.
३. सुखात जबाबदारी विसरू नका.
४. खरा मित्र चूक दाखवतो.
५. राग शांत शब्दांनी जिंकता येतो.
६. चूक मान्य केल्याने नातं वाचतं.
कोणीही "असं कर" असं सांगितलं नाही. तरी गोष्ट संपल्यावर मन स्वतःच ठरवतं काय केलं पाहिजे आणि कोणा सारखं वागलं पाहिजे.
हीच रामायणाची ताकद आहे.
हजारो वर्षं झाली, पण या महाग्रंथातले धडे आजही तितकेच खरे आहेत. मला रामायण किंवा कुठल्याही ग्रंथाचा अर्थ समजून न घेता नुसतं ते वाचायला नाही आवडतं. प्रत्येक गोष्टीतला धडा शोधण्यात जी मज्जा आहे ना. एकदा करूनच बघा तुम्ही ही मज्जा.
कशी वाटली आजची गोष्ट, मला नक्की कळवा.
आणि हो, आज घटस्थापना!
योगायोग बघा, सुग्रीवाची ही गोष्ट घडली तीही शरद ऋतूतच. आणि आज त्याच शरद ऋतूत आपण देवीचं स्वागत करतो.
देवी म्हणजे शक्ती. शक्ती आहे म्हणून सगळं आहे. विचार करण्याची, काम करण्याची, दिलेला शब्द पाळण्याची ताकदही तिचीच.
ही शक्ती तुमच्या घरात, मनात आणि कामात नऊ दिवस नाही, तर कायम वास करो.
घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏
तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि स्वतः दिलेले शब्द पाळण्यात व्यस्त रहा.
धन्यवाद.
जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा.
👉 Email Newsletter Join करा.

0 Comments