।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
काही क्षण असे असतात जिथे आपण काहीही बोलत नाही, फक्त पाहत राहतो. या आठवड्यात माझ्या आयुष्यात असाच एक क्षण आला. आज आहे रविवार, आणि आजचं पत्र त्याच क्षणाबद्दल. मनापासून सगळ्यांना नमस्कार करून पत्राची सुरुवात करतो. वाचकांचे खास आभार, वाचून प्रतिक्रिया देणाऱ्यांचे अजून खास आभार आणि पोस्टमनची भूमिका घेऊन पत्र ओळखीच्यांना पाठवणाऱ्यांचे तर अजूनच खास आभार.
आज परत एकदा दासबोध. पण आज फक्त ओवी नाही, सोबत काही फोटोसुद्धा. Let's go!
२७५ वर्षांपूर्वीचा दासबोध
दासबोध शिबिराच्या निमित्ताने पांडे पोखरी गावातल्या समर्थांच्या मठात जाण्याचा योग आला. तिथे एका जुन्या पत्र्याच्या पेटीतून एक ग्रंथ बाहेर काढला गेला. तो होता इ.स. १७५१ मध्ये हाताने लिहिलेला दासबोध. म्हणजे तब्बल २७५ वर्षांपूर्वी, शाईने आणि टाकाने लिहिलेला.
पानं पिवळसर झाली होती, कडा थोड्या झिजल्या होत्या. पण अक्षर? अक्षर जणू कालच लिहिलंय. मी स्वतः जवळपास ३० पानं उलटून पाहिली. कुठेही एकही खाडाखोड दिसली नाही.
आणि मग लक्षात आलं, हे काही अपघाताने घडलेलं नाही. समर्थांनी दासबोधातच एक संपूर्ण समास यावर लिहिला आहे: दशक १९, समास १, "लेखनक्रियानिरूपण". सुंदर अक्षर कसं असावं, कागद कसा असावा, शाई कशी करावी आणि ग्रंथ कसा जपावा, हे सगळं त्या वीस ओव्यांमध्ये आहे. हा ग्रंथ म्हणजे त्या समासाचं जिवंत उदाहरण आहे.
चला, ग्रंथात जे पाहिलं आणि समर्थांनी जे सांगितलं, ते शेजारी शेजारी ठेवून पाहूया.
१. पाहताच समाधान वाटावं
ग्रंथ उघडला आणि पहिली भावना होती ती समाधानाची. काहीही न वाचता, फक्त अक्षरं पाहूनच मन शांत झालं.
ब्राह्मणें बाळबोध अक्षर । घडसुनी करावें सुंदर ।
जें देखतांचि चतुर । समाधान पावती ।। १ ।।
अक्षर घडवायचं असतं. ते आपोआप सुंदर होत नाही, त्यावर सराव करावा लागतो. आणि ते असं असावं की पाहताच शहाण्या माणसाला समाधान वाटावं.
२. मोत्यांच्या माळेसारख्या ओळी
काळ्याभोर शाईतली गोलसर, ठसठशीत अक्षरं, आणि प्रत्येक ओळ अशी सरळ जणू कुणीतरी मोती ओवले आहेत.
वाटोळें सरळें मोकळें । वोतलें मसीचें काळें ।
कुळकुळीत वळी चालिल्या ढाळें । मुक्तमाळा जैशा ।। २ ।।
अक्षर वाटोळं, सरळ आणि मोकळं. शाई अगदी ओतल्यासारखी काळीभोर. ओळी मोत्यांच्या माळेसारख्या. फोटो बघा, ही उपमा जशीच्या तशी दिसते.
३. जणू एकाच टाकाने लिहिलेलं
३० पानं उलटली, पण अक्षराचं वळण तेच, आकार तेच, काळेपणा तोच. पहिलं पान आणि तिसावं पान, फरकच सापडत नाही.
पहिलें अक्षर जें काढिलें । ग्रंथ संपेतों पाहात गेलें ।
येका टांकेंचि लिहिलें । ऐसें वाटे ।। ४ ।।
अक्षराचें काळेपण । टांकांचें ठोसरपण ।
तैसेंचि वळण वांकाण । सारिखेंचि ।। ५ ।।
पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत अक्षर असं वाटावं की जणू एकाच टाकाने लिहिलंय. हे एका दिवसाचं काम नाही. हे मनाच्या स्थिरतेचं लक्षण आहे.
४. ओळीला ओळ लागत नाही
ओळींमधलं अंतर अगदी नेमकं. वरच्या ओळीची वेलांटी खालच्या ओळीत कुठेही घुसलेली नाही.
वोळीस वोळी लागेना । आर्कुली मात्रा भेदीना ।
खालीले वोळीस स्पर्शेना । अथवा लंबाक्षर ।। ६ ।।
पान शिषानें रेखाटावें । त्यावरी नेमकचि ल्याहावें ।
दुरी जवळी न व्हावें । अंतर वोळीचें ।। ७ ।।
एक ओळ दुसरीला चिकटू नये. आधी पानावर शिशाने रेघा आखाव्या, आणि मग त्यावर नेमकं लिहावं.
५. एकही खाडाखोड नाही
३० पानं पाहिली. मुद्दाम शोधलं. एकही चूक, एकही खाडाखोड सापडली नाही.
कोठें शोधासी आडेना । चुकी पाहातां सांपडेना ।
गरज केली हें घडेना । लेखकापासुनी ।। ८ ।।
चूक शोधायला गेलात तरी सापडू नये. या ओवीचा अर्थ मला पुस्तकात नाही, तर डोळ्यांसमोर दिसला.
६. कडा झिजल्या, पण अक्षर सुखरूप
पानांच्या कडा खरंच झिजल्या आहेत. पण दोन्ही बाजूंना लाल रेषांचा समास सोडलेला आहे, आणि त्या रेषांच्या आतलं अक्षर अगदी सुखरूप आहे.
बहु बारिक तरुणपणीं । कामा नये म्हातारपणीं ।
मध्यस्त लिहिण्याची करणी । केली पाहिजे ।। १० ।।
भोंवतें स्थळ सोडून द्यावें । मधेंचि चमचमित ल्याहावें ।
कागद झडतांहि झडावें । नलगेचि अक्षर ।। ११ ।।
तरुणपणी फार बारीक लिहिलं, तर म्हातारपणी ते आपल्यालाच वाचता येणार नाही. म्हणून मध्यम अक्षर. आणि कडेला जागा सोडून मध्येच लिहावं, म्हणजे कागद झिजला तरी अक्षर जाणार नाही. २७५ वर्षांनंतरही समर्थांचं सांगणं खरं ठरलंय!
७. काळ्या अक्षरांत लाल रंग
ओव्या काळ्या शाईत, आणि ओवीचे क्रमांक, ॥ चिन्हं आणि समासाच्या रेषा लाल रंगात.
हिंगुळ संग्रहीं असावे । वाळले आळिते पाहोन घ्यावे ।
सोपें भिजउनी वाळवावे । संग्रह मसीचे ।। १८ ।।
हिंगूळ म्हणजे लाल रंग. लिहिण्याचं सगळं साहित्य, शाईचा साठा, रंग, हे आधीच जमवून ठेवावं.
८. पत्र्याच्या पेटीत जपलेला
आणि हा ग्रंथ मला कुठे दिसला? एका पत्र्याच्या पेटीत, नीट जपून ठेवलेला.
नाना गोप नाना बासनें । मेणकापडें सिंदुरवर्णे ।
पेट्या कुलपें जपणें । पुस्तकाकारणें ।। २० ।।
ग्रंथ गुंडाळायला कापडं, मेणकापड, पेट्या, कुलपं. पुस्तकाकारणें, म्हणजे पुस्तक जपण्यासाठी. समर्थांनी सांगितलं, आणि अगदी तसंच घडलं.
२७५ वर्षं जपणं
एखादी वस्तू दोन-चार वर्षं नीट ठेवणं आपल्याला जड जातं. फोन दोन वर्षांत बदलतो, पुस्तकं पसाऱ्यात हरवतात, वह्या रद्दीत जातात. आणि इथे एक ग्रंथ पिढ्यान्पिढ्या, २७५ वर्षं, तितक्याच प्रेमाने जपला गेला.
लिहिणारा सुंदर लिहून गेला, आणि मग प्रत्येक पिढीने त्याला ऊन, पाणी, वाळवी आणि दुर्लक्षापासून वाचवलं. हा ग्रंथ म्हणजे दोन गोष्टींचं उदाहरण आहे: सुंदर अक्षर आणि जपणूक. यातली एकही गोष्ट नसती, तर आज मी हे पत्र लिहू शकलो नसतो.
हे कोणासाठी?
समर्थ हे सगळं कोणाला सांगत आहेत? फक्त कारकुनांना किंवा लेखनिकाचं काम करणाऱ्यांना? नाही.
ज्याचें वय आहे नूतन । त्यानें ल्याहावें जपोन ।
जनासी पडे मोहन । ऐसें करावें ।। ९ ।।
ज्याचं वय कमी आहे, त्याने जपून लिहावं. हात अजून घडतोय, सवय अजून लागतेय. आता जे घडेल ते आयुष्यभर राहील. आणि असं लिहावं की पाहणाऱ्याला भुरळ पडावी.
ऐसा ग्रंथ जपोनि ल्याहावा । प्राणीमात्रांस उपजे हेवा ।
ऐसा पुरुष तो पाहावा । म्हणती लोक ।। १२ ।।
ग्रंथ असा लिहावा की बघणाऱ्याला हेवा वाटावा. तो ग्रंथ पाहून मला खरंच हेवा वाटला.
काया बहुत कष्टवावी । उत्कट कीर्ति उरवावी ।
चटक लाउनी सोडावी । कांहीं येक ।। १३ ।।
शरीराला कष्ट द्यावेत, आणि मागे काहीतरी उरवावं. लोकांना काहीतरी चांगलं करण्याची चटक लावून जावं.
त्या १७५१ च्या ग्रंथाने नेमकं हेच केलं. लिहिणारा कोण होता, हे आज आपल्याला माहीत नाही. पण त्याने लावलेली चटक २७५ वर्षांनंतर मला हे पत्र लिहायला लावतेय. मोठेपणा लिहिणाऱ्याचा नाही, मोठेपणा ग्रंथाचा आहे.
आपण काय करू शकतो?
आज आपण सगळं टाइप करतो, आणि हाताने लिहिणं जवळजवळ सुटलंय. पण एक वही, एक पेन आणि रोज पाच मिनिटं, दासबोधाची एक ओवी सावकाश, सुंदर अक्षरात लिहायची, एवढ्यानेही सुरुवात होऊ शकते.
इतकं सुंदर अक्षर काढण्याचा प्रयत्न रोज करावा, की टायपिंगच्या जमान्यात सुंदर लिहिणं विसरून जावं, हे ज्याचं त्यानं ठरवावं. 😊
मी मात्र एवढंच सांगेन, कुणास ठाऊक, आपल्यापैकी कुणाची तरी हाताने दासबोध लिहिलेली वही २७५ वर्षांनी कुणाच्या तरी हातात असेल. आणि आज आपण जसं त्या ग्रंथाकडे पाहत राहिलो, तसंच तेही पाहत राहतील आणि म्हणतील, "किती सुंदर लिहिलंय!"
स्वस्थ रहा, मस्त रहा आणि सुंदर अक्षरात ओव्या लिहिण्यात व्यस्त रहा.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा.
👉 Email Newsletter Join करा.





0 Comments