।। श्री ।।
सुमतीआजींच्या मनात खूप दिवसांपासून एक इच्छा होती. बदामीला जाऊन शाकंभरीचं दर्शन घ्यायचं. सकाळची अष्टांगपूजा करायची आणि त्यानंतर देवीला लघुरुद्र करायचा. माधवआजोबा, मुलगा समीर, सून गौरी आणि आठ वर्षांचा नातू अथर्व, असे पाच जण बदामीला निघाले.
अथर्वला प्रवासाबद्दल एकच प्रश्न होता, आणि तो त्याने पुण्यापासून बदामीपर्यंत दर पन्नास किलोमीटरला विचारला: "तिथे खायला काय मिळतं?" आठ वर्षांच्या मुलाच्या दृष्टीने प्रत्येक तीर्थक्षेत्र हे मुळात एक मोठं खाऊचं दुकान असतं. त्याच्या आजूबाजूला चुकून काही देवळं बांधलेली असतात.
बेळगाव ओलांडल्यावर पाट्यांवरची अक्षरं गोल गोल होऊ लागली. जणू कोणीतरी आपली देवनागरी घेऊन तिला जिलेबीसारखी तळली होती. आजोबा प्रत्येक पाटी मोठ्याने वाचायचा प्रयत्न करत होते: "हे... ब... नाही, ड... हं, बदामी असणार." पुढे पाटीखाली इंग्रजीत “Hubballi” लिहिलेलं निघालं.
पहाटे साडेचारला आजींनी सगळ्यांना उठवलं. अथर्वला उठवणं हे एक स्वतंत्र धार्मिक कार्य होतं. त्याला चार वेळा हलवावं लागलं. शेवटी आजींनी "देवीला भेटायला जायचंय" म्हटल्यावर तो डोळे न उघडताच उठून बसला. आजीच्या आवाजात ही एक शक्ती असते. ती गजरापेक्षा प्रभावी असते, आणि तिला snooze बटण नसतं.
देवीचं मंदिर गावाबाहेर, तिलकारण्य नावाच्या जुन्या जंगलात आहे. आणि भारतातल्या प्रत्येक प्रसिद्ध देवस्थानाप्रमाणे, तिकडे जाणारी गल्ली देवळापेक्षाही अरुंद होती. भक्ताने नम्र होऊन, अंग चोरूनच देवापर्यंत पोहोचावं, अशी त्यामागची योजना असावी. पहाटेच्या अंधारातही दोन्ही बाजूंना गाड्या होत्या. MH-12, MH-14, MH-09... "अर्धं पुणं आणि पूर्ण कोल्हापूर आपल्या आधीच उठलेलं दिसतंय," समीर म्हणाला.
तेवढ्यात एक माणूस गाडीसमोर आला आणि हात हलवत कन्नडमध्ये काहीतरी जोरजोरात सांगू लागला. त्याचा आवाज मोठा होता, हात त्याहून मोठे होते, आणि भाषा पाचही जणांना एकदमच अगम्य होती.
पाचही जणांनी एकाच वेळी मान डोलावली.
मराठी माणसाचा हा एक विशेष गुण आहे. त्याला काही कळलं नाही की तो मान डोलावतो. कारण "कळलं नाही" असं म्हटलं, तर समोरचा पुन्हा सांगेल आणि पुन्हा कळणार नाही. अर्धवट झोपेत असलेल्या अथर्वनेही मान डोलावली. हे संस्कार रक्तातच असतात.
"त्याने हात त्या कोपऱ्याकडे केला," आजोबा म्हणाले. हाताची भाषा सगळीकडे एकच असते, या सिद्धांतावर विसंबून समीरने गाडी त्या कोपऱ्यात लावली.
मंदिरासमोर मोठं तळं आहे. त्याच्या काठावर एक उंच, जुना दीपस्तंभ उभा आहे. पहाटेच्या निळसर प्रकाशात तळ्याचं पाणी शांत होतं आणि पलीकडे मंदिराचं शिखर दिसत होतं. हे मंदिर मूळ सातव्या शतकात बदामीच्या चालुक्य राजांनी बांधलं. बनशंकरी ही त्यांची कुलदेवता. आपल्या घरात एखादी वस्तू चौदा वर्षं टिकली तर आपण तिचं कौतुक करतो. इथे चौदाशे वर्षं लोक येत आहेत, हात जोडत आहेत, आणि देवी त्यांना ऐकत आहे.
गाभाऱ्यात देवी होती. काळ्या पाषाणातली, अष्टभुजा, सिंहावर बसलेली. तिच्या पायाखाली दैत्य दबलेला होता आणि आठ हातांत आठ शस्त्रं होती. रूप उग्र होतं, पण डोळ्यांत अशी माया होती की वाटावं, ही शस्त्रं आपल्याला घाबरवायला नाहीत, आपलं रक्षण करायला आहेत.
आजोबा अथर्वला सांगत होते, "एकदा भयंकर दुष्काळ पडला. तेव्हा देवीने भाजीपाला, फळं, अन्न देऊन लोकांना जगवलं. म्हणून तिचं नाव शाकंभरी."
"म्हणजे देवीने सगळ्यांना जेवायला दिलं?" अथर्वला पहिल्यांदाच देवीबद्दल खरी आपुलकी वाटली. जेवायला देणारी व्यक्ती अथर्वच्या दृष्टीने आपोआप आदरणीय असते. याच कारणासाठी त्याची आजीवर अपार श्रद्धा आहे.
सहा वाजता गाभाऱ्यात अष्टांगपूजा सुरू झाली. गुरुजी साठीचे होते. कपाळावर गंध, अंगावर उपरणं, आणि आवाज असा धीरगंभीर की गाभाऱ्याचे दगडही ऐकत असावेत. संकल्प झाला आणि एकेक उपचार सुरू झाला. आजी देवीसमोर हात जोडून बसल्या होत्या आणि त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं. खूप दिवसांपासून मनात जपलेलं दर्शन आज पूर्ण झालं होतं.
अकरा वाजता लघुरुद्र बसला. तो गाभाऱ्यातल्या मूळ मूर्तीवर होत नाही. मंदिरातच थोड्या वेगळ्या जागी देवीची एक चांदीची मूर्ती आहे, तिथे बसून अभिषेक होतो. समईच्या प्रकाशात ती मूर्ती अशी झळाळत होती की वाटावं, गाभाऱ्यातली देवीच जवळ येऊन बसली आहे. रुद्राची आवर्तनं सुरू झाली. प्रत्येक मंत्राबरोबर पळीपळीने देवीवर जलाची धार पडत होती. आजोबा मंत्रांबरोबर हळूहळू ओठ हलवत होते. त्यांना रुद्र पाठ आहे, हे समीरला त्या दिवशी पहिल्यांदा कळलं.
आणि अथर्व? पहाटे साडेचारला उठलेला अथर्व आता सात तास पूजेत बसला होता. पहिली दहा मिनिटं त्याने चांदीची मूर्ती पाहिली. पुढची दहा मिनिटं मंदिराचे खांब मोजले. मग स्वतःची बोटं मोजली, दोनदा. मोठ्या माणसांचं एक युग म्हणजे लाखो वर्षं. मुलांचं एक युग म्हणजे पंचेचाळीस मिनिटं. अथर्वने आतापर्यंत अशी अनेक युगं पार केली होती.
शेवटी तो आजीच्या कानाशी वाकला आणि नम्रपणे कुजबुजला, "आजी, पळी पळी पाणी का घालतायत? पूर्ण तांब्यानं एकदम का नाही घालत?"
आजी मायेने हसल्या. "देवीला घाई नाही, बाळा. प्रत्येक धारेबरोबर गुरुजी एक मंत्र म्हणतायत. आपण देवीशी बोलतोय. सावकाश, मनापासून बोलायचं. बस माझ्याजवळ. झालं की तुला नारळपाणी घेऊ."
बाहेर नारळवाला होता, फुगेवाला होता, भेळवाला होता. अथर्वचं मन तिन्हींकडे आळीपाळीने धावत होतं. पण आजीचा हात त्याच्या हातात होता. आणि आठ वर्षांच्या मुलाला बांधून ठेवायला आजीच्या हातापेक्षा मजबूत दोरी अजून कोणी बनवलेली नाही. तो पूर्ण लघुरुद्र होईपर्यंत बसला. आणि प्रसादाचा पेढा सगळ्यात आधी त्यानेच घेतला.
प्रसाद घेऊन सगळे समाधानाने गाडीपाशी आले, आणि थबकले.
त्यांच्या गाडीसमोर एक पांढरी गाडी आडवी लावलेली होती. ती नुसती लावलेली नव्हती, तर प्रतिष्ठापना केलेली होती. अंतर इतकं नेमकं होतं की कोणीतरी फूटपट्टी घेऊन, कदाचित मुहूर्त पाहून ती लावली असावी. शेजारी सांगलीच्या आणि सोलापूरच्या आणखी दोन गाड्यांचीही अशीच अवस्था होती. संकटात सापडलेल्या मराठी माणसांची लगेच ओळख होते. पाच मिनिटांत सांगलीकरांनी सगळ्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रणही दिलं.
गौरीने मोबाईलवर वाक्य शोधलं: ई गाडी यारदु? म्हणजे "ही गाडी कोणाची?" समीरने ते तीनदा तोंडपाठ केलं आणि पहिल्या घराचं दार ठोठावलं. त्याचा उच्चार ऐकून घरातल्या आजीबाईंनी दार अर्धवट लावलं आणि म्हणाल्या, "गोत्तिल्ला."
दुसऱ्या घरी: "गोत्तिल्ला." तिसऱ्या घरीही: "गोत्तिल्ला."
"बाबा, गोत्तिल्ला म्हणजे काय?" अथर्वने विचारलं.
गौरीने मोबाईलमध्ये पाहिलं. "माहीत नाही."
"म्हणजे गोत्तिल्ला!" अथर्व टाळ्या वाजवत ओरडला. पुढचा तासभर कुठलाही प्रश्न आला, अगदी "होमवर्क झाला का?" हासुद्धा, तरी त्याचं उत्तर एकच होतं: "गोत्तिल्ला!"
शेवटी ओट्यावर बसलेल्या एका गृहस्थांनी मोडक्या हिंदीत सांगितलं, "ये गाडी गुरुजी का है. वो बाहर पूजा बताने गये. दो घंटे में आयेगा. बैठो."
सगळे ओट्यावर बसले. आणि बोलता बोलता गोष्ट उलगडली. इथे राहणारे लोक रोजच त्रासलेले होते. दर्शनाला येणारे भक्त त्यांच्या दारात, त्यांच्याच पार्किंगमध्ये गाड्या लावून दिवसभर निघून जातात. सांगून, पाट्या लावून, विनवून झालं होतं. भक्त देवाकडे जाण्याच्या घाईत असतो, आणि त्या घाईत रस्त्यातल्या माणसाकडे त्याचं लक्ष जात नाही. म्हणून त्यांनी उपाय काढला होता: चुकीच्या जागी लावलेल्या गाडीसमोर मुद्दाम आडवी गाडी लावायची.
"म्हणजे सकाळी तो माणूस 'इथे लावू नका' असं सांगत होता," समीर हळूच म्हणाला.
"आणि आपण पाचही जणांनी मान डोलावली," आजोबा म्हणाले. "म्हणजे 'हो, इथेच लावतो' असं ठामपणे सांगितलं."
ओट्यावरचे गृहस्थ पहिल्यांदाच हसले. माणसाने आपली चूक कबूल केली की भाषेची भिंत आपोआप पडते.
मग समीरने सहज विचारलं, "गुरुजींचं नाव काय?"
नाव ऐकलं आणि समीर थबकला. "गौरी, हे तर आपलेच गुरुजी! आपला लघुरुद्र त्यांनीच केला!"
फोन लागला. पाच मिनिटांत गुरुजी स्कूटरवरून आले. सगळ्यांना पाहताच त्यांचा चेहरा उजळला. "अरे, तुम्ही! आत्ताच तर आपण देवीचा लघुरुद्र केला!" त्यांनी एका मुलाला हाक मारली, आणि दोन मिनिटांत गाडी बाजूला झाली. गाडी आडवी लावायची कल्पना आपलीच होती, हेही त्यांनी हसत कबूल केलं. मग समीरच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, "पण तुम्ही आपले आहात. देवीसमोर एकत्र बसलो आपण."
त्या "आपले आहात" मध्ये जे होतं, ते कुठल्याही Google Translate मध्ये मावणार नाही.
समीरने शेजारच्या दोन गाड्यांकडे बोट दाखवलं. "गुरुजी, यांचंही काही होईल का?"
गुरुजींनी त्या गाड्या पाहिल्या आणि ओट्यावरच्या गृहस्थांशी कन्नडमध्ये काहीतरी बोलले. त्यांनी लगेच दोन-तीन फोन लावले. एका फोनवरून दुसरा माणूस सापडला, दुसऱ्यावरून तिसरा. सांगलीकरांच्या समोरची गाडी शेजारच्या दुकानदाराच्या भावाची निघाली. सोलापूरकरांना अडवणाऱ्या गाडीचा ड्रायव्हर गल्लीच्या टोकाला चहा पीत बसला होता. "आमचा पवन आहे तो," ओट्यावरचे गृहस्थ म्हणाले, आणि त्याला हाक मारायला एक मुलगा धावला.
हळूहळू, एकेक धागा जोडत, सगळ्यांच्या गाड्या मोकळ्या झाल्या. जाताना सांगलीकरांनी पुन्हा एकदा लग्नाचं आमंत्रण दिलं. या वेळी गुरुजींनाही दिलं.
गाडी सुरू झाली. आजींनी अथर्वला जवळ घेतलं.
"बघितलंस? तू विचारत होतास, इतका वेळ का बसायचं. आज आपली गाडी कशामुळे सुटली?"
"गुरुजींमुळे."
"आणि गुरुजींनी आपल्याला ओळखलं कशामुळे?"
अथर्व थोडा विचारात पडला. मग त्याचा चेहरा उजळला. "कारण आपण त्यांच्यासोबत लघुरुद्राला बसलो होतो!"
"बरोबर. आणि बघ, एक ओळख निघाली तर त्यातून दुसरी निघाली, दुसरीतून तिसरी. सगळ्यांच्याच गाड्या सुटल्या. माणसांचं असंच असतं, बाळा. कोणासोबत मनापासून वेळ घालवला की ओळख होते. आणि ओळख झाली की माणसं एकमेकांच्या मदतीला धावून येतात. नुसतं फोनमध्ये डोकं घालून ओळखी होत नाहीत."
"आणि देवाचंही असंच आहे. ज्या शक्तीने हे सारं जग घडवलं, तिच्याशी ओळख ठेवायची तर रोज थोडा वेळ तिच्याजवळ बसायला हवं. आपण सगळेच काहीतरी घडवायचा प्रयत्न करत असतो. अभ्यास, व्यवसाय, कला. पण जे सुंदर सुचतं, ते तिच्या कृपेने सुचतं."
"ज्ञानेश्वर माउली म्हणतात, जें जें भेटे भूत। तें तें मानिजे भगवंत॥ जो भेटेल त्याच्यात देव पाहा. म्हणून पूजा, जप, शांत बसणं. मंत्रांचा अर्थ आज कळला नाही तरी हरकत नाही. ते कानावर पडत राहिले पाहिजेत. बी पेरलं की लगेच झाड दिसत नाही, पण ते आत वाढत असतं."
अथर्वने मान डोलावली. सकाळच्या मान डोलावण्यासारखी ही नव्हती. या वेळी त्याला खरंच कळलं होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आजी देवघरात बसल्या होत्या. समई तेवत होती, आणि उदबत्तीचा धूर हळूहळू वर जात होता.
मागून छोटी पावलं आली. अथर्व गुपचूप आजींच्या शेजारी मांडी घालून बसला. कोणी सांगितलं नव्हतं, कोणी उठवलं नव्हतं. त्याने हात जोडले आणि डोळे मिटले. कदाचित पाच मिनिटं, कदाचित तीनच. पण बसला.
आजींनी काही विचारलं नाही, काही बोलल्या नाहीत. त्या फक्त त्याच्याकडे पाहत राहिल्या.
आठ वर्षांचं एक मूल कोणी न सांगता देवासमोर येऊन बसलं होतं. शाकंभरीचं दर्शन घ्यायला ते सगळे बदामीला गेले होते. पण त्या सकाळी आजींना कळलं, की शाकंभरी त्यांच्यासोबत घरी आली होती.
जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा.
👉 Email Newsletter Join करा.



0 Comments