।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
यंदाची दिवाळी थोडी खास झाली. फराळ, फटाके, पणत्या आणि रोषणाई तर होतीच, पण यावेळी दिवाळीत प्रभू श्रीराम मोठ्या पडद्यावर भेटायला आले. आज आहे रविवार, आणि आजचं पत्र त्यांच्याबद्दलच आहे. मनापासून सगळ्यांना नमस्कार करून पत्राची सुरुवात करतो. वाचकांचे खास आभार, वाचून प्रतिक्रिया देणाऱ्यांचे अजून खास आभार आणि पोस्टमनची भूमिका घेऊन पत्र ओळखीच्यांना पाठवणाऱ्यांचे तर अजूनच खास आभार.
आजचं पत्र थोडं वेगळं आहे. आज एका चित्रपटाबद्दल गप्पा, आणि त्यासोबत रामायणातला एक श्लोक. Let’s go!
रामायण: भाग १
या आठवड्यात मी नितेश तिवारी यांचा "रामायण: भाग १" हा चित्रपट पाहिला. एका वाक्यात सांगायचं तर, हा चित्रपट नक्की पाहा. आणि शक्य असेल तर मोठ्या पडद्यावरच पाहा.
याचं पहिलं कारण म्हणजे त्याची दृश्यं. अक्षरशः डोळे दिपवून टाकणारी. भारतीय चित्रपटात इतकी सुंदर आणि भव्य दृश्यं मी फार कमी वेळा पाहिली आहेत. अयोध्या, जंगलं, असुरांचं जग, सगळं इतकं जिवंत वाटतं की आपण त्या काळात जाऊन बसलो आहोत असं वाटतं.
आपल्याकडे रामायणावर आधी दोन मोठी कामं झाली. एक म्हणजे रामानंद सागर यांचं रामायण, ज्या वेळी रविवारी सकाळी रस्ते ओस पडायचे आणि लोक टीव्हीसमोर हात जोडून बसायचे. आणि दुसरं म्हणजे ते सुंदर अॅनिमेटेड रामायण, जे आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी पाहिलं. या दोघांनंतर आजच्या पिढीसाठी अजून एका सुंदर रामायणाची गरज होती. आणि या टीमने ती गरज खूप छान पूर्ण केली आहे.
सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट सांगणं
विचार करून बघा. जी गोष्ट भारतातल्या लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला माहीत आहे, ती तीन तास पडद्यावर दाखवायची, आणि तरीही लोकांना खुर्चीला खिळवून ठेवायचं. हे किती अवघड काम आहे! पुढे काय होणार हे सगळ्यांना माहीत असतं. तरीही नितेश तिवारी यांनी पूर्ण चित्रपटभर आपल्याला गुंतवून ठेवलं. यासाठी त्यांना आणि त्यांच्या टीमला मनापासून दाद.
मला एक गोष्ट नेहमी वाटते. रामायण, महाभारत यांसारख्या महान गोष्टी कुठल्याही माध्यमात जशाच्या तशा उतरवणं अशक्य आहे. मालिका असो, चित्रपट असो, नाटक असो वा पुस्तक, प्रत्येक जण त्यातला काही भागच पकडू शकतो. त्यामुळे या चित्रपटाबद्दलही लोक चांगलं बोलतील आणि वाईटही बोलतील. ते साहजिकच आहे.
पण एक गोष्ट नक्की. आज असा एक मोठा वर्ग आहे ज्याला रामायणासारखा मोठा ग्रंथ वाचायला वेळ नाही किंवा आवड नाही. अशा सगळ्यांना या चित्रपटातून रामायणाची एक सुंदर ओळख नक्की होईल. आणि कुणास ठाऊक, त्यातले काही जण चित्रपट पाहून मूळ ग्रंथाकडेही वळतील.
एक गोष्ट मात्र खटकली
चित्रपटात रावणाची लालसा, त्याच्या वासनेची बाजू पूर्णपणे टाळली आहे. रावण पराक्रमी होता, विद्वान होता, शिवभक्त होता, हे सगळं खरं. पण तो लालसी होता, हेही तितकंच खरं. आणि त्याच्या नाशाचं मूळ कारणही तेच होतं. कदाचित चित्रपट सगळ्या वयाच्या प्रेक्षकांसाठी, कुटुंबासाठी बनवायचा म्हणून त्यांनी हा भाग टाळला असेल. ते समजू शकतो. पण कुणीतरी हे लक्षात आणून द्यायला हवं, आणि आज ते काम मी करतोय. 😊
आजचा श्लोक
आता चित्रपटावरून थोडं रामायणाकडे वळूया. वाल्मिकी रामायणाच्या युद्धकांडात एक अतिशय हृदयस्पर्शी प्रसंग आहे.
रावणवध झाला आहे. युद्ध संपलं आहे. पण श्रीरामांच्या मनात मात्र प्रचंड वेदना आहे. सीतामाई अग्नीत प्रवेश करत आहेत आणि श्रीरामांचे डोळे अश्रूंनी भरलेले आहेत. त्याच वेळी कुबेर, यम, इंद्र, वरुण, महादेव आणि स्वतः ब्रह्मदेव विमानांतून लंकेत येतात. हात जोडून उभ्या असलेल्या श्रीरामांना ते विचारतात,
कर्ता सर्वस्य लोकस्य श्रेष्ठो ज्ञानवतां प्रभुः ।उपेक्षसे कथं सीतां पतन्तीं हव्यवाहने ।।कथं देवगणश्रेष्ठमात्मानं नावबुध्यसे ।
अर्थ: तुम्ही तर संपूर्ण विश्वाचे कर्ते आहात, ज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ आहात. मग अग्नीत जाणाऱ्या सीतेकडे तुम्ही असं दुर्लक्ष कसं करता? तुम्ही देवांमध्ये श्रेष्ठ आहात, हे तुम्ही स्वतःच कसं ओळखत नाही?
देव पुढे म्हणतात,
उपेक्षसे च वैदेहीं मानुषः प्राकृतो यथा ।
अर्थ: आणि तरीही तुम्ही एखाद्या साध्या माणसासारखं वागताय.
म्हणजे देव श्रीरामांना सांगतायत, तुम्ही देव आहात, मग हे दुःख एखाद्या सामान्य माणसासारखं का भोगताय?
यावर श्रीराम उत्तर देतात,
आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम् ।सोऽहं यस्य यतश्चाहं भगवांस्तद्ब्रवीतु मे ।।
अर्थ: मी तर स्वतःला मनुष्यच मानतो, दशरथाचा पुत्र राम. मी खरा कोण आहे आणि कुठून आलो आहे, ते आपणच मला सांगावं.
त्यानंतर ब्रह्मदेव सांगतात, "भवान्नारायणो देवः", म्हणजे तुम्ही साक्षात नारायण आहात.
विचार करा. ज्यांनी समुद्रावर सेतू बांधला, ज्यांनी रावणासारख्या बलाढ्य राजाचा पराभव केला, त्यांना देव स्वतः येऊन सांगतायत की तुम्ही परमेश्वर आहात, हे दुःख तुम्हाला भोगायची गरज नाही. आणि त्या सगळ्यात कठीण क्षणी, डोळ्यांत अश्रू असताना, श्रीराम म्हणतात, नाही. मी स्वतःला माणूसच मानतो.
माणूस म्हणून जगणं
मला या प्रसंगात खूप मोठा अर्थ दिसतो. श्रीरामांनी माणूस म्हणून जगणं निवडलं. आणि माणसाला काहीही मिळवायचं असेल तर प्रयत्न करावे लागतात. कुठलाही चमत्कार नाही, कुठलाही शॉर्टकट नाही.
वनवास आला, तो त्यांनी स्वीकारला. सीतामाईंचं हरण झालं, तेव्हा ते झाडाझाडाला, पानापानाला विचारत फिरले. सेतू बांधण्यासाठी त्यांनी वानरसेनेसोबत मेहनत घेतली. आणि युद्ध जिंकल्यानंतरही, सगळ्यात मोठ्या दुःखाच्या क्षणी, त्यांनी देवपणाचा आधार घेतला नाही. ते दुःख त्यांनी माणूस म्हणूनच स्वीकारलं. देव असूनही प्रत्येक संकट माणसासारखं भोगलं, आणि तेही तक्रार न करता, धीर न सोडता.
मग आपण कोण? आपल्या आयुष्यात थोडे कठीण दिवस आले, व्यवसायात अडचणी आल्या, घरात काही प्रश्न आले, तब्येत बिघडली, की आपण लगेच खचून जातो. "माझ्याच वाट्याला हे का?" असा प्रश्न विचारतो.
पण श्रीराम आपल्याला सांगतायत, संघर्ष हा माणूस असण्याचाच एक भाग आहे. ज्यांनी स्वतः देव असूनही माणूस म्हणून सगळं सोसलं, त्यांच्यापुढे आपले प्रश्न किती छोटे आहेत! कठीण दिवस येणारच. ते येऊ द्यायचे, त्यांचा सामना करायचा, प्रयत्न करत राहायचे, आणि हे सगळं धीराने, शांतपणे करायचं.
आपल्यासाठी काय?
या आठवड्यात दोन गोष्टी करा. एक, जमलं तर कुटुंबासोबत "रामायण: भाग १" मोठ्या पडद्यावर पाहा. मुलांना सोबत न्या. चित्रपट संपल्यावर त्यांना रामायणातल्या अजून गोष्टी सांगा.
आणि दुसरं, सध्या आयुष्यात एखादा कठीण काळ चालू असेल, तर स्वतःला एवढंच सांगा: "श्रीरामांनीही हे सगळं माणूस म्हणून सोसलं, मग मीही सोसेन. धीराने."
दिवाळीच्या शुभेच्छा
चौदा वर्षांचा वनवास, सीतामाईंचा विरह, लंकेतलं युद्ध, सगळं सोसून जेव्हा श्रीराम अयोध्येत परत आले, तेव्हा अयोध्यावासीयांनी घराघरात दिवे लावून त्यांचं स्वागत केलं. तीच आपली दिवाळी.
म्हणजे दिवाळी हा फक्त दिव्यांचा सण नाही. तो आहे कठीण दिवसांनंतर येणाऱ्या आनंदाचा सण. वनवास कितीही मोठा असला तरी एक दिवस तो संपतो, आणि अयोध्येत परतण्याचा दिवस नक्की येतो, हे सांगणारा सण.
तुमच्या आयुष्यात जर एखादा वनवास चालू असेल, तर तो लवकर संपो. आणि तुमच्याही घरी श्रीराम परत येवोत. आनंद, समाधान, आरोग्य आणि भरभराट घेऊन.
तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा! 🪔🙏
स्वस्थ रहा, मस्त रहा आणि धीराने प्रयत्न करण्यात व्यस्त रहा.
जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा.
👉 Email Newsletter Join करा.

0 Comments