श्रवणस्वार्थ

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

        आपल्या खिशात एक खजिना आहे, आणि आपल्याला त्याची कल्पनाच नाही. आज आहे रविवार, आणि आजचं पत्र याच खजिन्याबद्दल आहे. मनापासून सगळ्यांना नमस्कार करून पत्राची सुरुवात करतो. वाचकांचे खास आभार, वाचून प्रतिक्रिया देणाऱ्यांचे अजून खास आभार आणि पोस्टमनची भूमिका घेऊन पत्र ओळखीच्यांना पाठवणाऱ्यांचे तर अजूनच खास आभार.

आज परत एकदा दासबोध. दशक सात, समास आठ, "श्रवणनिरूपण". या संपूर्ण समासात समर्थांनी श्रवणाचा, म्हणजे ऐकण्याचा, इतका मोठा महिमा सांगितला आहे की वाचताना प्रश्न पडतो, एवढं साधं ऐकणं इतकं महत्त्वाचं कसं? चला, बघूया. Let’s go!

आधी एक गोष्ट

एका गावाच्या वेशीवर एक भिकारी बसायचा. वर्षानुवर्षं तो एकाच जुन्या लाकडी पेटीवर बसून येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे हात पसरायचा. कुणी एक रुपया द्यायचं, कुणी काहीच नाही.

एक दिवस एक प्रवासी तिथून जात होता. भिकाऱ्याने हात पुढे केला. प्रवासी म्हणाला, "माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. पण तू ज्या पेटीवर बसला आहेस, त्यात काय आहे?"

भिकारी म्हणाला, "काही नाही. जुनी पेटी आहे. मी कधी उघडूनही पाहिली नाही."

"एकदा उघडून तर बघ," प्रवासी म्हणाला.

भिकाऱ्याने कसंबसं झाकण उचललं, आणि बघतच राहिला. पेटी सोन्याने भरलेली होती. वर्षानुवर्षं तो खजिन्यावर बसून भीक मागत होता.

ही गोष्ट वाचून आपल्याला त्या भिकाऱ्याचं हसू येतं. पण थांबा. आपणही तेच करत नाही आहोत का?

आजची ओवी

समर्थ रामदास स्वामी याच समासात म्हणतात,

जेथें नाहीं श्रवणस्वार्थ । तेथें कैंचा हो परमार्थ ।
मागें केलें तितुकें वेर्थ । श्रवणेंविण होये ।। ४५ ।।

सोपा अर्थ असा: जिथे ऐकण्याचा स्वार्थच नाही, म्हणजे ऐकून काहीतरी मिळवण्याची इच्छाच नाही, तिथे परमार्थ कसा घडणार? आणि श्रवणाशिवाय आधी जे काही केलं असेल, ते सगळं व्यर्थ होतं.

या ओवीतला "श्रवणस्वार्थ" हा शब्द मला खूप आवडला. आपण "स्वार्थ" हा शब्द नेहमी वाईट अर्थाने वापरतो. पण समर्थ इथे म्हणतात, ऐकण्याच्या बाबतीत स्वार्थी व्हा! मनात भूक हवी, की मला हे ऐकायचंच आहे, यातून मला काहीतरी मिळवायचंच आहे.

आणि मग कठोर शब्द येतो, "वेर्थ". श्रवण नसेल तर बाकी केलेलं सगळं व्यर्थ. कारण दिशाच माहीत नसेल, तर कितीही धावलं तरी पोहोचणार कुठे?

आपल्या खिशातला खजिना

        समर्थांच्या काळात श्रवण करायचं म्हणजे सोपं नव्हतं. ग्रंथ हाताने लिहिलेले, मोजके. प्रवचन ऐकायचं तर कुठेतरी मठात, देवळात जायचं. कीर्तनकार गावात आले तरच ऐकायला मिळायचं. ज्याला ज्ञान हवं, त्याला अक्षरशः मैलोन्‌मैल चालत जावं लागायचं.

आणि आज?

        आज आपल्या खिशातल्या फोनमध्ये YouTube आहे. त्यावर भगवद्गीता आहे, दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, देवी भागवत आहे, रामायण आहे, महाभारत आहे, संतांची चरित्रं आहेत. आणि तेही मराठीत, हिंदीत, इंग्रजीत, ज्या भाषेत आपल्याला हवं त्या भाषेत. मूळ ओव्यांसकट, सोप्या अर्थासकट, गोष्टीरूपात, मुलांसाठी वेगळं, मोठ्यांसाठी वेगळं. एका रामायणाचीच किती रूपं आहेत ऐकायला! वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण, गीतरामायण, कथारूपाने सांगितलेलं रामायण. फक्त रामायण-महाभारत हे एकच क्षेत्र घेतलं तरी आयुष्य पुरणार नाही इतकं ऐकायला उपलब्ध आहे.

        आणि हे फक्त अध्यात्मापुरतं नाही. व्यवसाय असो, आरोग्य असो, शेती असो, पैशाचं नियोजन असो, मुलांचं संगोपन असो, विज्ञान असो, इतिहास असो, ज्या क्षेत्रात आपल्याला रस आहे, त्या क्षेत्रातले उत्तम लोक आज मोफत बोलत आहेत. आपल्याला फक्त ऐकायचं आहे.

आणि हे सगळं पूर्णपणे मोफत आहे.

        ज्या ज्ञानासाठी पूर्वी लोक आयुष्य खर्च करायचे, ते आज एका बोटाच्या अंतरावर आहे. पण आपण काय करतो? तोच फोन हातात घेऊन रील्सवर बोटं फिरवत बसतो. खजिन्याच्या पेटीवर बसून भीक मागत बसतो. समाधानाची भीक, शांततेची भीक, दिशेची भीक.

        आपले कान कधीच रिकामे नसतात. इअरफोन सतत कानात असतात. आपण ऐकतोय खूप, पण ऐकतोय काय? पोटात सतत काहीतरी जात राहिलं म्हणून पोषण होतं असं नाही. जंक फूड खाऊनही पोट भरतंच. पण शरीर आतून पोखरतं. मनाचंही तसंच आहे.

फक्त इच्छा पाहिजे

सगळं उपलब्ध आहे. वेळही आहे. साधनही आहे. कमी आहे ती फक्त एकाच गोष्टीची, इच्छेची. समर्थांच्या भाषेत, "श्रवणस्वार्थाची".

आणि यासाठी वेगळा वेळ काढायचीही गरज नाही. सकाळी चालायला जाताना लावा. गाडीने ऑफिसला जाताना लावा. स्वयंपाक करताना लावा. रात्री झोपण्याआधी दहा मिनिटं लावा. हात आपलं काम करत राहतील, आणि कानांना त्यांचं खरं अन्न मिळेल.

समर्थ याच समासात सुंदर उपमा देतात. जसं अन्न रोज खावं लागतं, पाणी रोज प्यावं लागतं, तसंच श्रवण रोज करावं लागतं. शरीराला आपण दिवसातून तीन वेळा जेवण देतो. मनाला दिवसातून पंधरा मिनिटं तरी देऊया ना?

आणि समर्थ हेही स्पष्ट सांगतात की जो आळसाने श्रवणाचा अनादर करतो, तो स्वतःच्याच हिताला मुकतो. "उद्यापासून सुरू करतो" हा आळस. रीलवरून बोट न हलवण्याचा आळस. चारशे वर्षांपूर्वी समर्थांनी आपला हा आळस इतक्या नेमकेपणाने ओळखला, यातच दासबोधाचं मोठेपण आहे.

सवय लागली की सगळं आपोआप

    अध्यात्म श्रवणाची एक गंमत आहे. ज्याला ग्रंथ ऐकायची सवय लागते, त्याला माणसं ऐकायचीही सवय आपोआप लागते. कारण ऐकताना आपण थांबायला शिकतो, धीर धरायला शिकतो, समोरचा काय सांगतोय ते समजून घ्यायला शिकतो. मग घरी मुलं काही सांगत असतील, आई-वडील काही सांगत असतील, कामावर ग्राहक किंवा सहकारी काही सांगत असतील, ते सगळं आपण वेगळ्या कानाने ऐकू लागतो.

    समर्थ म्हणतात, श्रवणाने मन आवरतं, संशय तुटतात, स्वभाव पालटतो आणि समाधान मिळतं. हे सगळं वेगवेगळं शिकावं लागत नाही. एकच सवय लावली, की बाकी सगळं मागून येतं. मूळ पकडलं की फांद्या आपोआप फुलतात.

आपल्यासाठी काय?

        हे पत्र वाचून झाल्यावर फक्त एवढंच करा. आत्ताच, आजच, YouTube उघडा. गीता, दासबोध, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, देवी भागवत, जे मनाला भावेल ते एक निवडा. आपल्याला हव्या त्या भाषेत. आणि ठरवा, रोज फक्त पंधरा मिनिटं. महिनाभर. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच ग्रंथ.

        महिन्याभराने आपल्याला स्वतःलाच फरक जाणवेल. आणि मग कदाचित आपल्या लक्षात येईल की आपणही इतकी वर्षं त्या खजिन्यावर बसलो होतो. फक्त झाकण उचलायचं बाकी होतं.

स्वस्थ रहा, मस्त रहा आणि रोज थोडं थोडं श्रवण करण्यात व्यस्त रहा.

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—

👉 WhatsApp ग्रुप Join करा.

👉 Email Newsletter Join करा.

Post a Comment

0 Comments