कागदाचं विमान!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

        आज आहे रविवार आणि नेहमीप्रमाणे मी आलो आहे अजून एक पत्र घेऊन. मनापासून सगळ्यांना नमस्कार करून मी पत्राची सुरुवात करतो. वाचकांचे खास आभार, वाचून प्रतिक्रिया देणाऱ्यांचे अजून खास आभार आणि पोस्टमनची भूमिका घेऊन पत्र ओळखीच्यांना पाठवणाऱ्यांचे तर अजूनच खास आभार.

आज श्लोक नाही, ओवी नाही, सुभाषित नाही. आज बघूया गंमत राईट ब्रदर्सची. तेच राईट बंधू ज्यांनी जगातलं सगळ्यात पहिलं विमान उडवलं. Let’s go!

नेहमी दिसणारा प्रसंग

        हा प्रसंग आहे मागच्या आठवड्यातला. मी संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो, तेव्हा नेहमीप्रमाणे घरासमोर राहणारी सगळी लहान मुलं गोंधळ घालत खेळत होती. मी जाता-येता त्यांच्याशी बोलत असतो आणि जमलंच तर कधी दोन-पाच मिनिटं खेळतही असतो. माझ्या घरासमोर राहणारी एक लहान मुलगी मला म्हणाली, "दादा, बोअर होतंय. तू चल ना आमच्यासोबत खेळायला." (हो, मी काका असलो तरी मला दादा म्हणायची सवय मी कॉलनीत तरी टिकवून ठेवली आहे.😅)

        मी माझ्या गडबडीत होतो, म्हणून "उद्या खेळतो" असं सांगून निघालो. पण परत थांबलो आणि तिला आणि तिच्यासोबतच्या दोघी-तिघींना विचारलं, "तुम्ही कागदाचं विमान बनवून का खेळत नाही? मी तर लहानपणी कागदाची विमानं खूप उडवायचो." त्यांनी कदाचित कागदाचं विमान कधी पाहिलंच नव्हतं. मी म्हणालो, "अरे, लहानपणीचा हा माझा सगळ्यात आवडता खेळ होता. चला, तुम्हाला विमान बनवून देतो आणि कसं बनवायचं तेही शिकवतो. फक्त दोन मिनिटं लागतात."

        मी त्यांना दोन मिनिटांत विमानं बनवून दिली आणि बनवायलाही शिकवलं. त्यानंतरचे कमीत कमी दोन तास नुसता गोंधळ चालू होता. कोणी विमान बनवून देत होतं, कोणी उडवत होतं, तर कोणी विमानावरून भांडत होतं. काही जणांना तर आईने येऊन धपाटे घालत घरी नेलं.

        पण मी एक गोष्ट पाहिली. कोणाचं विमान लगेच खाली पडायचं, तर कोणाचं गोल फिरून परत यायचं. मग ती मुलं पंख थोडे दुमडायची, टोक थोडं वाकवायची आणि परत उडवायची. कोणीही त्यांना हे शिकवलं नव्हतं. उडवा, पडलं तर बघा, थोडं बदला आणि परत उडवा. याच प्रसंगावरून मला सायमन सिनेक यांच्या पुस्तकातली राईट बंधूंची गोष्ट आठवली. वाटलं, या रविवारी ही गोष्ट सगळ्यांना पाठवायलाच हवी.

Start With Why! – Simon Sinek

        सायमन सिनेक यांनी त्यांच्या “Start With Why” या पुस्तकातून एक गोष्ट जगभर लोकप्रिय केली. ही गोष्ट आहे राईट बंधू आणि सॅम्युअल पिअरपाँट लँगली यांची.

        सॅम्युअल लँगली हे त्या काळातलं मोठं नाव होतं. ते स्मिथसोनियन संस्थेचे प्रमुख आणि नावाजलेले शास्त्रज्ञ होते. विमान बनवण्यासाठी त्यांना अमेरिकन युद्ध विभागाकडून सुमारे ५०,००० डॉलर्स मिळाले होते. त्या काळात ही प्रचंड रक्कम होती. त्यांच्याकडे हुशार माणसं होती आणि वर्तमानपत्रं त्यांच्या मागे होती.

        दुसरीकडे विल्बर आणि ऑर्व्हिल राईट हे दोन भाऊ अमेरिकेतल्या डेटन गावात सायकलचं दुकान चालवायचे. ते कॉलेजला गेले नव्हते, त्यांच्याकडे सरकारी पैसा नव्हता आणि त्यांच्याकडे कुणाचं लक्षही नव्हतं.

        तरीही १७ डिसेंबर १९०३ रोजी किटी हॉक इथे राईट बंधूंनी जगातलं पहिलं नियंत्रित, इंजिनवर चालणारं उड्डाण करून दाखवलं. ते उड्डाण फक्त १२ सेकंदांचं होतं आणि विमान फक्त १२० फूट गेलं. पण इतिहास घडला होता. गंमत म्हणजे याच्या फक्त नऊ दिवस आधी, ८ डिसेंबरला, लँगलींचं “Aerodrome” नावाचं विमान दुसऱ्यांदा पोटोमॅक नदीत कोसळलं होतं. वर्तमानपत्रांनी त्यांची खूप थट्टा केली आणि लँगलींनी प्रयत्नच सोडून दिले.

सिनेक यांचा निष्कर्ष असा की राईट बंधूंकडे "का" (Why) होतं. त्यांना उडण्याचं खरं वेड होतं. लँगलींना मात्र प्रसिद्धी आणि श्रेय हवं होतं.

पण गोष्ट इथेच संपत नाही

            राईट बंधू फक्त इच्छाशक्तीमुळे जिंकले नाहीत, तर त्यांच्या पद्धतीमुळे जिंकले. लँगलींचं लक्ष शक्तिशाली इंजिनवर होतं. राईट बंधूंनी मात्र ओळखलं की खरी अडचण विमान हवेत नियंत्रित करण्याची आहे. पुस्तकातले आकडे चुकीचे निघाले तेव्हा त्यांनी स्वतः छोटा पवन-बोगदा बनवला आणि शेकडो पंख तपासले. आधी पतंग, मग ग्लायडर्सवर हजारो उड्डाणं करून ते स्वतः उडायला शिकले आणि मगच इंजिन बसवलं. त्यांच्या चुका लहान आणि स्वस्त होत्या. सगळा खर्च मिळून सुमारे १,००० डॉलर्स झाला आणि प्रत्येक चुकीतून ते काहीतरी शिकले. याउलट लँगलींचं सरकारी पैशांवर बनलेलं विमान थेट सगळ्या जगासमोर नदीत कोसळलं. आणि "त्यांच्याकडे काहीच नव्हतं" हेही पूर्ण खरं नाही. सायकलच्या दुकानानेच त्यांना यंत्र, तोल आणि हलक्या रचनेची उत्तम समज दिली होती.

आपल्यासाठी काय?

        आता परत माझ्या घरासमोरच्या त्या मुलांकडे येऊया. त्या दिवशी ती मुलं नकळत तेच करत होती जे राईट बंधूंनी केलं होतं. उडवा, पडलं तर बघा, थोडं बदला आणि परत उडवा. त्यांना कुणाची परवानगी नको होती, मोठं बजेट नको होतं आणि कुणाची टाळीही नको होती. फक्त विमान उडवायचं होतं.

        आपण मोठे झालो की हेच विसरतो. सगळं पक्कं ठरल्याशिवाय, पैसा जमल्याशिवाय, सगळ्यांसमोर एकदम मोठं करून दाखवल्याशिवाय आपल्याला सुरुवातच करायची नसते. आणि मग लँगलींसारखं एकदा मोठं विमान पडलं की आपण प्रयत्नच सोडून देतो.

        खरं सांगू? माझं हे रविवारचं पत्र म्हणजेही माझं एक कागदाचं विमानच आहे. पुढे जाऊन मला एक चांगला लेखक व्हायचं आहे, आणि हे पत्र म्हणजे त्या दिशेने टाकलेलं दर आठवड्याचं एक छोटं पाऊल आहे. कधी पत्र छान उडतं, तर कधी लवकरच खाली येतं. पण तुमच्या प्रतिक्रिया वाचून मी दर आठवड्याला पंख थोडे दुमडतो, टोक थोडं वाकवतो आणि पुढच्या रविवारी परत उडवतो. राईट बंधूंनी एकदम मोठं विमान बनवलं नव्हतं, आधी हजारो छोटी उड्डाणं केली होती. मीही तेच करतोय.

        म्हणून या आठवड्यात एकच छोटा प्रश्न स्वतःला विचारा. मी असं कोणतं काम पुढे ढकलत आहे जे मी कागदाच्या विमानासारखं छोटं करून आजच उडवून पाहू शकतो? पडलं तर पडू दे. पंख थोडे दुमडायचे आणि परत उडवायचं.

        आणि हो, कधी वेळ मिळाला तर घरातल्या लहान मुलांना एक कागदाचं विमान बनवून द्या. पुढचे दोन तास घरात गोंधळ झाला तर त्याची जबाबदारी माझी नाही! 😄

स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली छोटी छोटी विमानं उडवण्यात व्यस्त रहा.

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—

👉 WhatsApp ग्रुप Join करा.

👉 Email Newsletter Join करा.




Post a Comment

0 Comments