उपासनेचा आधार

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

            पतंग उडवलाय कधी? आकाशात उंच जाणारा पतंग आपल्याला मुक्त वाटतो. पण तो उंच जातो तो दोरीमुळे. दोर तुटली की क्षणभर तो अजून मोकळा, अजून उंच गेल्यासारखा वाटतो, आणि मग भरकटत कुठेतरी झाडात, तारेवर अडकतो.

आज या दोरीबद्दल बोलायचं आहे. Let's Go!

शिबिरातून आलेली ओवी

        मागच्या आठवड्यात मी तुम्हाला दासबोध शिबिराबद्दल सांगितलं होतं. पांडे पोखरीच्या समर्थ मठात पाहिलेल्या, जवळपास पावणेतीनशे वर्षांपूर्वी हाताने लिहिलेल्या दासबोधाबद्दलही लिहिलं होतं. ते पत्र वाचलं नसेल तर इथे नक्की वाचा: एका टांकेंचि लिहिलें

त्या दोन-तीन दिवसांत भरपूर ओव्या ऐकल्या. प्रत्येक ओवी सुंदर होती. पण कधीकधी असं होतं ना, एखादं गाणं ऐकलं की ते दिवसभर डोक्यात वाजत राहतं? तसंच त्यातली एक ओवी डोक्यात अगदी पक्की बसली. शिबिरातून परत आलो तरी ती मनातून जायलाच तयार नाही. म्हणून ठरवलं, आजचं पत्र त्याच ओवीवर.

समर्थांची ओवी

उपासनेचा मोठा आश्रयो ⁠। उपासनेविण निराश्रयो ⁠।
उदंड केलें तरी तो जयो ⁠। प्राप्त नाहीं ⁠।⁠।⁠ २९ ⁠।⁠।

मराठी अर्थ

उपासनेचा माणसाला फार मोठा आधार असतो. उपासना नसेल तर माणूस निराधार होतो. मग त्याने कितीही, अगदी उदंड कष्ट केले, तरी त्याला खरा विजय मिळत नाही.

उपासना म्हणजे काय?

हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यांसमोर मोठी पूजा, उपास, कर्मकांड येतं. पण शब्द नीट फोडून पाहिला तर अर्थ फार सोपा आहे.

उप + आसन = जवळ बसणं.

बस्स. उपासना म्हणजे देवाजवळ बसणं. रोज थोडा वेळ, ठरवून, प्रेमाने देवाच्या सान्निध्यात बसणं.

आपण आपल्या जवळच्या मित्राकडे कारण नसताना जाऊन बसतो, गप्पा मारतो आणि मन हलकं होतं. उपासनाही तशीच. तो देव राम असेल, विठ्ठल असेल, गणपती असेल किंवा आपले सद्गुरू असतील. रोज त्यांच्याजवळ बसण्याची सवय म्हणजे उपासना.

उपासनेचा दुसरा अर्थ

आता काही जण म्हणतील, "देवासमोर बसायला वेळ कुठे आहे? माझं काम महत्त्वाचं आहे. मी कष्ट करतो, तीच माझी पूजा."

अगदी बरोबर. आणि गंमत अशी की समर्थांची ओवी त्यांच्यासाठीसुद्धा तितकीच खरी आहे.

उप + आसन म्हणजे जवळ बसणं. देवाच्या जवळ बसणं, किंवा आपल्या कामाच्या जवळ बसणं. रोज, न चुकता, मन लावून.

गल्लीत क्रिकेट खेळणारी खूप मुलं असतात. पण पुढे मोठा होतो तो, जो रोज सकाळी नेट्समध्ये जाऊन तासन्तास एकच शॉट घोटत राहतो. तो क्रिकेटची उपासना करतो.

गाणं गाणारे खूप असतात. पण मोठा गायक होतो तो, जो रोज पहाटे उठून रियाज करतो. रियाज हा शब्दच उपासनेचा दुसरा अवतार आहे.

लिहायची इच्छा खूप जणांना असते. पण लेखक होतो तो, जो रोज थोडं का होईना, लिहीत राहतो. ती लेखनाची उपासना.

अभ्यासाची उपासना करणारा अभ्यासात पुढे जातो. व्यायामाची उपासना करणारा शक्तीत पुढे जातो. समर्थांनी तर गावोगावी मारुतीची मंदिरं उभारून लोकांना बलाची उपासना करायला शिकवलं.

म्हणजे इथे उपासनेचा अर्थ त्या त्या कामाची प्रॅक्टिस असा घेतला तरी ओवी अगदी बरोबर बसते.

आश्रय म्हणजे काय?

        अंगणातली वेल आठवा. वेल हिरवीगार असते, जोमाने वाढते. पण तिला मांडव नसेल तर ती जमिनीवरच पसरते, पायाखाली तुडवली जाते. तीच वेल मांडवाचा आधार मिळाला की वर चढते, सावली देते आणि फुलांनी बहरते.

वेल तीच, जोर तोच. फरक फक्त आधाराचा.

आपल्यात क्षमता आहे, बुद्धी आहे, मेहनत करायची तयारी आहे. पण रोजच्या उपासनेचा आधार नसेल, मग ती देवाची असो वा कामाची, तर एक अपयश किंवा एक वाईट दिवस आपल्याला जमिनीवर आणतो. उपासना हा तो मांडव आहे, ती पतंगाची दोरी आहे.

उदंड केलें तरी...

ओवीतली ही ओळ मला सगळ्यात जास्त भिडली. समर्थ कष्ट करू नका असं म्हणत नाहीत. ते तर स्वतः सगळ्यात मोठे उद्योगी! ते म्हणतात, कष्ट करा, उदंड करा. पण उपासना नसेल तर हाती काय लागतं?

एखादा मुलगा एका रविवारी आठ तास बॅटिंग करतो आणि मग महिनाभर बॅट हातातच घेत नाही. कष्ट उदंड झाले, पण विजय नाही. याउलट जो रोज फक्त एक तास, पण न चुकता सराव करतो, तो वर्षभरात कुठच्या कुठे पोहोचतो.

कष्ट एकदाच उदंड करण्यापेक्षा रोज थोडे करणं, हीच खरी उपासना.

आयुष्याचंही तसंच आहे. खूप धावपळ करून खूप काही मिळवलेली माणसं आतून अस्वस्थ असतात, कारण मनाला रोजचा आधार नसतो. बाहेरून "जय" दिसतो, पण आत तो पोहोचलेला नसतो.

मग उपासना करायची कशी?

अगदी सोपं ठेवायचं:

  • ठराविक वेळ: रोज ठरलेल्या वेळी, अगदी १० मिनिटं का होईना.
  • ठराविक जागा: देवघरासमोर, अभ्यासाच्या टेबलावर, मैदानावर. जिथे तुमची उपासना आहे तिथे.
  • मोबाईल दूर: त्या वेळेत फोनला सुट्टी.
  • रोज: सगळ्यात महत्त्वाचं. एक दिवस दोन तास बसण्यापेक्षा रोज दहा मिनिटं बसणं जास्त मोलाचं. पतंगाची दोरी अशीच रोज थोडी थोडी मजबूत होत जाते.

उपासनेचा फायदा काय?

उपासना करणाऱ्याच्या आयुष्यात संकटं येत नाहीत असं नाही. येतात. पण तो डगमगत नाही. देवाची उपासना करणाऱ्याला माहीत असतं की मी एकटा नाही. कामाची उपासना करणाऱ्याला माहीत असतं की मी तयार आहे. हा विश्वासच त्याचा "मोठा आश्रयो" होतो.

ज्याला हा आधार आहे तो कष्टालाही घाबरत नाही आणि यशानेही बिघडत नाही. आणि खरा जय हाच आहे.

या आठवड्याचं छोटंसं काम

आता तुमची उपासना तुम्हीच ठरवा. देवाजवळ बसणं, गाणं, लिहिणं, व्यायाम, अभ्यास, एखादं वाद्य किंवा तुमचं रोजचं काम. फक्त एक निवडा आणि या आठवड्यात सात दिवस, रोज न चुकता तिच्याजवळ बसा.

आणि एक गोष्ट मनात पक्की करून घ्या: उपासनेशिवाय विजय नाही. एवढं समजलं, म्हणजे झालं.

तुमची उपासना कोणती, मला नक्की कळवा.

तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या उपासनेत व्यस्त रहा.

धन्यवाद.

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—

👉 WhatsApp ग्रुप Join करा.

👉 Email Newsletter Join करा.

Post a Comment

0 Comments