शक्ती आहे म्हणून सगळं आहे!

 ।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

घराघरांत घट बसलेत, देवीचा जागर सुरू आहे, आणि रात्री गरब्याचा ठेका.

या नऊ दिवसांत आपण देवीकडे बरंच काही मागतो. पण तिचं खरं नाव माहिती का? शक्ती.

अजून एक रविवार आणि पुन्हा एकदा माझे पत्र येण्याची वेळ झाली आहे. वाचकांचे, प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आणि पत्र पुढे पाठवणाऱ्यांचे मनापासून धन्यवाद.

आज बोलूया त्याच शक्तीबद्दल. Let's Go!

शक्ती म्हणजे देवी

आपण देवीला अनेक रूपांत पाहतो.

लक्ष्मी देवी, सरस्वती देवी, जगदंबा देवी.

धनाची शक्ती, ज्ञानाची शक्ती, आणि सगळ्यांचा पाया असलेली जगदंबेची शक्ती.

पैसा, शिक्षण, नाव, नाती... हे सगळं आयुष्यात हवं असतं.

पण थोडा विचार करा. हे सगळं उपभोगायला शरीरात आणि मनात ताकद नसेल, तर?

१ आणि ०

मला हे असं समजतं.

शक्ती म्हणजे १.

आणि पैसा, शिक्षण, पद, प्रतिष्ठा म्हणजे त्यापुढे लावलेले ०.

१ असेल तर १०, १००, १००० होतात.

पण १ नसेल तर?

कितीही ० लावा, उत्तर शून्यच.

शक्ती सोडून बाकी सगळं मिळवण्याची तयारी करणं, म्हणजे १ वर काम न करता नुसते ० वाढवत बसणं.

हे मला एका साध्या खेळातून लक्षात आलं.

संगीत खुर्ची

मागच्या आठवड्यात माझ्या मुलाच्या जिम्नॅस्टिक्स क्लासमध्ये लहान मुलांचे खेळ होते.

क्लासला मुलांचे पालकही असतात.

मुलांचे खेळ झाले आणि कोच म्हणाले, "चला, आता पालकांचे खेळ!"

खेळ अगदी साधा. संगीत खुर्ची.

संगीत वाजतं, सगळे खुर्च्यांभोवती पळतात. संगीत थांबलं की खुर्ची पकडायची. जागा मिळाली नाही तर आऊट.

खेळायला उभा राहिलो आणि एक गोष्ट जाणवली.

माझ्यासारखे एक-दोघे सोडले, तर बहुतेक पालक एकतर शरीराने जड होते, किंवा मनाने अडलेले.

"लहान मुलांसमोर आपण काय खेळणार?" असा संकोच चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

आणि व्हायचं तेच झालं.

एक एक करत सगळे आऊट झाले.

शेवटी उरलो आम्ही दोघे. मी आणि माझा मित्र. आम्ही दोघेही बऱ्यापैकी फिट.

आणि शेवटची खुर्ची मी पकडली.

महत्त्वाचं जिंकणं नाही

मी जिंकलो, हे इथे महत्त्वाचं नाहीच.

महत्त्वाचा प्रश्न हा आहे—

रोजच्यापेक्षा वेगळं, शरीराची परीक्षा पाहणारं काहीतरी अचानक समोर आलं, तर आपण त्यासाठी तयार आहोत का?

बऱ्याचदा उत्तर असतं, नाही.

कधी शरीर तयार नसतं, कधी मन.

आणि दोन्हीपैकी काहीही तयार नसणं, हाच खरा प्रॉब्लेम आहे.

आज संगीत खुर्ची आहे. उद्या धावत बस पकडायची असेल, मुलासोबत डोंगर चढायचा असेल, किंवा घरात एखादी जड वस्तू उचलायची असेल.

ती शक्ती एका दिवसात येत नाही.

रोज सूर्यनमस्कार, जिम, योगासनं... काहीतरी केल्याशिवाय ती मिळत नाही.

आणि हे न करण्याचं कारण बहुतेक वेळा एकच असतं—

आळस.

समर्थ आणि आळस

समर्थांनी आळसावर इतक्या ओव्या लिहिल्या आहेत, की फक्त त्यांचं एक वेगळं पुस्तक तयार होईल!

त्यातली एक ओवी सांगतो. समासाचं नाव आहे मूर्खलक्षण.

तपीळ खादाड आळसी ।

कुश्चीळ कुटीळ मानसीं ।

धारिष्ट नाहीं जयापासीं ।

तो येक मूर्ख ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

जो तापट, खादाड आणि आळशी आहे,

जो दुराचारी असून मनातून कुटिल आहे,

आणि ज्याच्याकडे जराही धैर्य नाही,

तो मूर्खच होय.

बघा, समर्थांनी आळशी माणसाला थेट मूर्खांच्या यादीत टाकलं आहे.

आणि हे खरंच आहे. आळस हळूहळू शरीरातली ताकद, मनातलं धैर्य आणि आयुष्यातल्या संधी, सगळंच खाऊन टाकतो.

आळस खरंच भयानक आहे.

मी अजून कमीच आहे

माझ्यापेक्षा कमी फिट असलेल्यांसोबत मी जिंकलो, ही काही फार मोठी गोष्ट नाही.

पण एक समाधान नक्की आहे.

सध्या तरी इतका फिटनेस राखून आहे, की अचानक काही शारीरिक खेळ आला तर खेळू शकतो.

आणि तरीही मी स्वतःला अजून कमीच समजतो. त्यावर अजून काम करत राहीन.

कारण १ जितका मजबूत, तितके पुढचे ० जास्त किमतीचे.

तुम्ही कुठे आहात?

उद्या अचानक संगीत खुर्ची खेळायची वेळ आली, तर तुम्ही शेवटपर्यंत टिकाल का?

विचार करा, आणि मला नक्की कळवा.

देवीकडे एकच प्रार्थना

नवरात्रीचे हे दिवस शक्तीच्या उपासनेचे.

देवीकडे एकच प्रार्थना करतो—

ती शक्ती या नवरात्रीत आपल्या सगळ्यांना मिळो. शरीराची, मनाची आणि आळसावर मात करण्याची.

तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि रोज थोडा थोडा, जमेल तितका व्यायाम करण्यात व्यस्त रहा.

आपण भेटूया पुढच्या रविवारी.

धन्यवाद.

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—

👉 WhatsApp ग्रुप Join करा.

👉 Email Newsletter Join करा. 

Post a Comment

0 Comments