ब्रेकिंग, म्हणजेच आपल्याला मोडणाऱ्या न्यूज!



ही कथा तुम्हाला ऐकायची असल्यास इथे👆🏽क्लिक करा.


कल्पना करा सकाळी सकाळी तुम्हाला जाग आली. बाहेरून तुम्हाला पक्ष्यांची किलबिल, दुधवाल्याचं ओरडणं, त्या ओरडण्यात दुधाची वाट पाहणाऱ्यांना समाधानी करणं आणि झोपलेल्यांना जागं करणं, हे सगळं ऐकू येतंय. तुम्ही बाहेर येता आणि अचानक तुमच्या जवळ पेपर येऊन पडतो. तुम्ही तो उचलता आणि वर बघता तोपर्यंत पेपर टाकणारा पोऱ्या पुढे निघून गेलेला असतो. तुम्ही आत येता आणि पेपर वाचायला सुरवात करतात. 

छान वाटतंय ना कल्पना करून? ह्याची आता कल्पनाच करावी लागते पण माझ्या लहानपणी हे सगळं अगदी असंच व्हायचं. महाराष्ट्रात तर सोडाच जगात काय चाललंय हे सुद्धा पेपर मधूनच कळायचं. पेपर एवढं इंटरेस्टिंग मेडीयम होतं ना… माहिती, मनोरंजन सगळं त्यातचं व्हायचं आणि बाकी रेडिओ ही होताच. गाणी ऐकायला, ठराविक वेळी बातम्या ऐकायला. 

नंतर आले TV. इथपर्यंतही सगळं ठीक होतं. एका वेळी पेपर, रेडिओ आणि TV अशी तीनही माध्यमं लोकांचं मनोरंजन करत होती. पण गोची तिथे झाली जेव्हा न्यूज TV वर यायला लागल्या आणि तेव्हापासून त्यात माहितीचं प्रमाण कमी आणि मनोरंजनाचं प्रमाण जास्त होऊ लागलं आणि आता तर सगळं इंटरनेट वर कळतं. अगदी बोटांवर. बापरे ! इन्फॉर्मेशनचं फुल्ल ऑन बोम्बार्डिंग आणि त्यात पण किती खरं आणि किती खोटं कळायला काहीच मार्ग नाही. कसं होणारे आपलं देव जाणे. तर अश्याच कॉन्फ्यूज्ड स्टेट मध्ये असलेल्या आदित्यची ही कथा आहे. 

आदित्य आज तब्येत बरी नसल्यामुळे घरीच होता. आरती म्हणजेच आदित्यची सौ ऑफिसला गेली होती त्यामुळे तो आज एकटाच घरी असणार होता. रोज काम करायची सवय असणारा माणूस अचानक घरी बसला की त्याच जसं होतं तसंच काहीसं आज आदित्यचं होत होतं. 

त्यानं त्याचा मोबाईल घेतला, थोडा वेळ स्क्रोल केला आणि ठेवून दिला. नंतर तो हॉल मध्ये आला. त्यानं TV ऑन केला. मोबाईल जसं स्क्रोल करतात तसं तो चॅनेल बदलू लागला. असं करत करत समोर न्यूज चॅनेल आलं. न्यूज मध्ये काय दाखवतायेत ते तरी पाहावं म्हणून तो ते बघायला लागला. 


न्युज चॅनेल १

 कोरोना के नये वेरिएन्ट ने बढाई चिंता. १२० गुना खतरनाक वेरिएन्ट आया सामने.


त्याने वैतागून चॅनेल बदलला. 


न्यूज चॅनेल २ 

ओमिक्रोन का कहर. नया  वेरिएन्ट मचा रहा है तबाही. ये वेरिएन्ट वॅक्सीन को भी कर सकता है बेअसर. अमेरिका में तबाही मचा रहा है ये वेरिएन्ट. 


ही न्यूज पाहून आदित्यला कसतरीच होऊ लागलं. त्याचं डोकं थोडं दुखत होतच. त्यानं चॅनेल बदललं. 


न्यूज चॅनेल ३: नाक बहना, गला दर्द, आँखो में जलन, सिर दर्द, थकान होना ये सब इस नये वेरिएन्ट के लक्षण हो सकते है.


आता मात्र त्याचं डोकं अजून दुखायला लागलं. त्याला काही कळेचना. आधीच्या चॅनेल वर वेगळा वेरिएन्ट, ह्या चॅनेल वर वेगळा वेरिएन्ट. बरं थोड्याफार फरकानं लक्षणंही सारखीच. त्यानं पुन्हा चॅनेल बदललं. त्या चॅनेल नी हीच न्यूज अजून थोडी बदलून, अजून कसल्यातरी वेरिएन्टचं नाव घेऊन आणि बघणाऱ्याला दहशत बसावी अशीच सांगितली. 

मग त्यानं त्याचा मोबाईल काढला आणि गूगल उघडलं. जसं त्यानं गूगल वर covid-१९ वेरिएन्ट टाकलं गूगल नं आपली जादू दाखवायला सुरुवात केली. काहीच सेकंदात त्याला जवळपास कोट्यवधींमध्ये रिजल्ट्स आले. तो पहिल्या पानावरुन खाली खाली स्क्रोल करत गेला तर पुढे दिसणाऱ्या पानांच्या संख्येवरून हे सगळं न संपणारं आहे असं त्याच्या लक्षात आलं. 

पण एवढं असूनही मनात कुठेतरी चुकचुकणारी शंकेची पाल त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तो एक एक वेबसाईट उघडून त्यातली इन्फॉर्मेशन वाचू लागला. इन्फॉर्मेशन वाचता वाचता त्याला काही सायंटिफिक टर्म्स समजण्यात अडचण येऊ लागली मग त्यानं यूट्यूब उघडलं. समोर TV वर न्यूज चालूच होत्या. मग हळू हळू एक विडिओ त्या विडिओ खाली रिकमेंडेशन मध्ये येणार दुसरा विडिओ असं करत करत त्याने कितीतरी विडिओ पाहून काढले. ह्या सगळ्यात त्याच्या किती वेळ गेला त्यालाही कळलं नाही. 

अचानक त्याला खूप थकवा जाणवू लागला. त्याने बसलेल्या जागेवरून उठण्याचा प्रयत्न केला पण त्याला उठताच येईना. मग तो तसाच बसून राहिला. आपलं डोकं आता फुटतंय की काय असं त्याला वाटायला लागलं. त्या न्यूज, व्हिडिओस आणि गूगल वर वाचलेल्या इन्फॉर्मेशन ची तो स्वतःच्या डोकेदुखीशी पडताळणी करू लागला आणि मग आपली डोकेदुखी ही नक्कीच साधी डोकेदुखी नाही अशी त्याची खात्री झाली. 

शेवटी आता ह्याच्यावर काहीच इलाज नाही ह्या निराशेनं तो डोक्याला हात लावून अंगावरून पांघरून घेऊन तसाच बसला. थोड्या वेळात त्याला दार बाहेरून उघडल्याचा आवाज आला. त्यानं दाराकडे लक्षही दिलं नाही. त्यानं वर पाहिलं तेव्हा आरती त्याच्यासमोर उभी होती. तिनं आदित्यच्या बाजूला असलेला रिमोट आपल्या हातात घेतला आणि TV बंद केला आणि म्हणाली, “काय झालं रे? असा डोक्याला हात लावून का बसलायेस?”


आदित्य कण्हत म्हणाला, “डोकं दुखतंय ग खूप.”


आरतीने पसारा आवारात आवारात बोलणं सुरु केलं, “सर्दीनं दुखत असेल. जेवण केलंस नीट? आणि वाफ घेतलीस का?”


आदित्य अजूनही घाबरले होता तो म्हणाला, “अ… हो केलं.” 


आरती किचन मध्ये टेबलावरच जेवणाचे भांडे बघत बघत म्हणाली, “हो? काय खाल्लं?”


आदित्य थकवा आल्या सारखा बोलत होता, ”अ… आठवत नाही. जाऊदे ना… अगं…”


आरती टेबलावर ठेवलेल्या जेवणाकडे हात दाखवत म्हणाली, “काय जाऊदे ना… का नाही केलं जेवण? माहितीये ना आपल्याला बरं वाटत नाहीये मग नीट जेवून घ्यायचं आणि आराम करायचा. त्यासाठीच घेतली होती ना तू सुट्टी.”


आदित्य कण्हत कण्हत, “हो बरोबरे तुझं पण मला वाटतं काहीतरी गडबड आहे. कारण मला सर्दी तर झाली नाहीये म्हणजे त्यामुळे डोकं दुखण्याचा प्रश्नच येत नाही. हे इथे डोळ्याच्या वर भयानक दुखतं आहे बघ.”


आता आरती काळजीने विचारते, ”मग काय झालंय असं वाटतंय तुला?”


आदित्य पांघरून डोक्यावर आडवा होत म्हणाला, “माहित नाही यार. पण मी आत्ता न्यूज बघत होतो तर त्यात ते सांगत होते की कोरोना चा नवा व्हेरिएन्ट आलाय. तो सगळ्या देशांमध्ये पसरतोय. आणि त्याची लक्षण पण सांगितली त्यांनी. खूप डोकं दुखत म्हणे त्यात असंच डोळ्याच्या वर आणि हा कोरोना असा थांबणार नाहीये तो सतत म्यूटेट होत असतो. म्हणजे त्याचे अजून वेरिएन्टस येणार. मला खूप भीती वाटायला लागलीये आता. बहुतेक माझं डोकं त्याच्यामुळेच दुखत असेल.”


आरतीनं आदित्यच सगळं म्हणणं शांत पणे ऐकून घेतलं. तिनं त्याच्याकडे जरावेळ बघितलं आणि ती आत रूममध्ये गेली. आदित्य अजूनही तसाच बसला होता. थोड्या वेळात आवरून आरती बाहेर आली. 


आरती कारची किल्ली घेत म्हणाली, “चल…उठ…आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ.”


आदित्य घाबरत घाबरत म्हणाला, “मी आता बाहेर फिरणं बंद केलं पाहिजे….नको.”


आरती वैतागून म्हणाली, “डॉक्टर घरी येणार आहेत का? आपल्यालाच जावं लागेल. चल. उठ उठ.”


आदित्यला ह्यावर काय बोलावं काहीच सुचलं नाही, त्यामुळे नाईलाजाने त्याला उठावंच लागलं. तो रूममध्ये गेला आणि एक शर्ट अंगावर चढवून बाहेर आला आणि दोघेही घरातून निघाले. बायको अशी बोलल्यावर कोणता नवरा नाही म्हणायची हिम्मत करेल बरं! आदित्यला बाजूला बसवून आरतीने कार चालवली. आदित्य पूर्ण प्रवासात घाबरत आणि खूप जास्त काळजीत बसलेला होता. ते दवाखान्यात पोहोचले गाडीतून उतरल्यावर आदित्यच्या लक्षात आलं की आरतीनं त्याला डोळ्यांच्या दवाखान्यात आणलं होतं. सर्दी, डोकं दुखी आणि हा तर डोळ्याचा दवाखाना, का? हा विचार त्याच्या डोक्यात येणाच्या आत दोघेही आत गेले. थोड्याच वेळात आदित्यचे डोळे चेक झाले.


डॉक्टर म्हणाले, “तुमचा नंबर वाढलाय. त्यामुळेच तुमचं डोकं दुखतंय. बाकी काहीच प्रॉब्लेम नाही.”

आदित्य एकदम बरं झाल्या सारखा ओरडला, “म्हणजे कोरोना नाही!” त्याच्या ह्या वाक्यावर तो काही वेळापूर्वी झोपेतून उठू शकत नव्हता हे सांगितलेला खोटं वाटेल.


आरती त्याला शांत बस असा हात दाखवत म्हणाली, ”थँक यु डॉक्टर. मलाही तसंच वाटत होतं पण ह्याची शंका दूर करण्यासाठी आम्ही इथे आलो.” डॉक्टर म्हणाले, “कसली शंका?”


आरती काहीतरी बोलायला जाते पण आदित्य तिला अडवतो आणि म्हणतो, “नाही काही नाही,काही नाही. थँक यु डॉक्टर. मी लगेच चष्मा बनवून घेतो. मग सांगतो तुम्हाला. okay?”


दोघंही पुन्हा कारमध्ये बसले. पूर्ण प्रवासात दोघांमध्ये काहीच संवाद झाला नाही. आदित्यने आरतीशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिचा चेहरा पाहून त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. थोड्याच वेळात ते घरी पोहोचले. 


आरती चांगलीच चिडलेली होती. वेळ गेला तो वेगळा, वैताग झाला तो वेगळा आणि हे सगळं डोक्यात का आलं होत? बिनकामाच्या न्यूज बघण्यामुळे. आदित्य जसा घरात आला दार लावलं की लगेच म्हणाला, “ आरती… सॉरी,सॉरी! अगं पण ते न्यूज मध्ये हेच दाखवत होते. आणि न्यूज वाले…”


ती आदित्य ला वाक्य पूर्ण करू न देता म्हणाली, “सगळं खरं सांगतात? बावळट आहेस तू. अरे TV वरच्या न्यूज हा धंदाय धंदा. ऑथेंटिक न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवणं हे आता त्यांचं कामच राहिलेलं नाहीये. जेवढे जास्त लोकं त्यांच्या चॅनेल वर बसतील तेवढा त्यांचा ऍड रेव्हेन्यू जनरेट होतो. मग ते त्यांच्या ब्रॅण्ड्सना आणि प्रॉडक्ट्सना आपल्या चॅनेल वरच्या व्हियुअर्स चा आकडा सांगून पैसा कमावतात. हे मला माहितीये अजून एक मज्जा माहिती, हे तुलाही माहिती आहे. पण तुझ्यासारखी लोकं आपलं डोकं न वापरता ती वायफळ बडबड, लोकांच्या चुघल्या, सेलेब्रिटीस चे गॉसिप आणि असंख्य इल्लोजिकल गोष्टी बघत बसतात आणि आज तुझ्यासोबत जसं झालं तसं होतं. विचार कर ना, जर हे आज तुझ्यासारख्या सुशिक्षित माणसासोबत झालंय मग आपल्या देशात अशिक्षितांची संख्या तर अजून जास्त आहे. ह्या असल्या गोष्टी बघून सुशिक्षित पण अशिक्षितांसारखे वागायला लागतात.” 


आदित्य पुन्हा एका सॉरी म्हणत उत्तर देतो, “मान्यय मला हे सगळं. अगं पण न्यूज पाहिलीच नाही तर आपण अपडेटेड कसं राहणार?  कुठे चोरी झाली, दंगा झाला, नैसर्गिक आपत्ती आली तर कोणीही काळजीपोटी ती न्यूज शेअर करणारच ना…बघणारचं ना.. ”


आरती पुन्हा तितक्याच काळजीने बोलू लागली, “हेच तर चुकतं ना आपलं. जर कुठे काही प्रॉब्लेम झाला तर आपण त्या प्रोब्लेमवर सोल्युशन काढण्यापेक्षा ती न्यूज किंवा तो प्रॉब्लेम शेअर करत बसतो. त्यात भरतीला न्यूज लिहिणारे, विचार करणारी, लिहिणारी, त्याप्रमाणे व्हिडिओ बनवणारी, आपलं सगळं लक्ष वेधून घेईल असं म्युसिक बनवणारी टीम असती ह्यांच्या कडे, हे वेगळंच. त्यांना बरोबर माहिती कश्या पद्धतीने लिहावं, काय आपल्या न्यूज च्या thumbnail ला असावं ज्याने जास्तीत जास्त लोकं बघत बसतील आणि शेअर करतील. त्यात कसा मसाला दाखवता येईल. आणि तुला काय वाटतं तुझ्या कुठे चोरी झाली, कुठे खून झाला किंवा अजून कोणी काय महान पराक्रम केले हे दुसर्यांना पाठवून हे सगळं बदलणार आहे? हे शेअर बिअर करून ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना ती पोहोचणारच नाहीये. निव्वळ नेगेटिव्ह गोष्टी दाखवून नेगेटिव्हिटी अजून वाढेल. You are a living and breathing negativity Magnet. ”


आदित्य म्हणाला, “हो मला पटत आहे तुझं पण मी काय करू? मी लिहितो का न्यूज?”

आरती म्हणाली, “फॉरवर्ड तर करतो ना? इतकीच काळजी आहे ना लोकांना माहिती पोचवण्याची तर मग मी म्हणते त्यांना एक नेगेटिव्ह न्यूज दाखवून चार पॉसिटीव्ह गोष्टीसुद्धा दाखवाव्यात. जगात फक्त वाईटच गोष्टी घडत नाहीत…चांगलं पण शेअर करण्यासारखं असतं ना! हे बघ… माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की जर न्यूज चॅनेल्स आपला स्टान्स बदलायला तयार नसतील तर मग आपणचं शहाणं झालं पाहिजे.” आरतीच्या बोलण्यामध्ये मुद्दे इतकेच बरोबर होते की त्या वर उत्तर देण्यासारखं काही राहीलच नव्हतं.


आदित्यला त्याची चूक कळाली. त्याने आरतीच्या समोर हात जोडले आणि म्हणाला, “बरं माझी आई, आता ह्या पुढे न्यूज बघणारं नाही आणि फॉरवर्ड तर बिलकुलच करणार नाही! झालं?”


हे म्हणत म्हणत तो आरतीचं लक्ष नसताना अलगद त्याच्या जागेवरून उठला. त्यानं रिमोट उचलला TV ऑन केला. TV चा आवाज आल्याने आरती लगेच आदित्यकडे वळाली आणि तिचा रागाचा चेहरा बघून आदित्य म्हणाला, “तुपण बस. मी आता न्यूज नाही कार्टून लावतोय.” आणि दोघेही जोरजोरात हसायला लागले.


आहे की नाही मज्जा. मला सांगा असं कितीदा झालं आहे तुमच्या सोबत? तुम्ही एक न्यूज बघण्यासाठी बसले आणि तुमचे ३-४ तास कसे गेले हे तुम्हाला समजलं ही नाही. बर हे फक्त वेळेचं गणित, तुमच्या डोक्यातल्या विचारांसोबत काय काय होत आहे, हे असे खोटे, मसालेदार, वाढवून-चढवून सांगितलेले रील्स, न्यूज आणि बिनकामाचा इंटरनेट बघून! नुसता भुगा.

प्रयन्त स्वतःला नेगेटिव्हिटी पासून दूर ठेवण्याचा असावा इतकंच. मला आलेल्या अनुभवावरून आणि मी वाचलेल्या पुस्तकांवरून एक सांगतो, आपलं जे मन आहे ना त्याचं पाहिलं काम आणि सगळ्यात महत्वाचे काम हे आपलं रक्षण करणे आहे. मोठं होणे, वाढ, यश, एखाद्या क्षेत्रात उंची गाठणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात नंतर येतात आधी जी गोष्ट येते ती म्हणजे संरक्षण, शरीराला आरामात ठेवणे, त्रास होऊ न देणे, शक्य तितकं जिभेला आणि मनाला आवडेल असे खायला देणे.

एक उदाहरण सांगतो तुमच्या समोर जर २ TV आहेत आणि एका TV वर यशश्वी होण्याची १० सूत्रे असा काही कार्यक्रम चालू असेल आणि दुसऱ्या TV वर कसा एक अकॅसिडेन्ट झाला आणि कसे ३ जण गंभीर जखमी झाले असं काही चालू असेल तर मनाला कधी पण अकॅसिडेन्ट संबंधीच्या गोष्टी बघण्यात रस जास्त असेल. 

तुम्ही विचारताल का? कारण मी सांगितलं ना! मन हे उत्कृष्ट पणे आपला सांभाळ करण्यावर लक्ष देत असत. असा अकॅसिडेंट आपला होऊ नये, झाला तर नंबर कुठला लावला, काय काळजी घ्यावी हे न होण्यासाठी काय करावं, आपल्या ओळखीच्या कोणाचा तर नाही ना किंवा नुसतीच चिंता हे मनाचे काम लगेच आपल्या नकळत सुरु होते. बाकी सगळं नंतर आहे आपल्या मनासाठी. सगळ्यांनी ३ इडियट्स पहिला असेल ना त्या मध्ये दाखवल्या सारखं “ऑल इज वेल” म्हणायचं आणि आपलं लक्ष हे पॉसिटीव्ह गोष्टीवर ठेवण्याचा प्रयत्न कायम चालूं ठेवायचा. पुढच्या वेळेस तुम्ही TV बघताना निगेटिव्ह न्यूज आली ना तर चॅनल बदलून बघा मनाला छान वाटेल. अवघड नक्कीच आहे पण अशक्य नाही.


तर न्यूज बघत बसण्याचा सुटला आहे……. नाही नाही… थोडं चुकलं.


तर कानात हेडफोन्स लावून, गाडीत, गाडीवर, माडीवर, ऑफिस मध्ये, शाळेत, कॉलेज मध्ये, बँकेत, झोपून, बसून,आडवं-तिडवं पडून न्यूज किंवा इंटरनेट बघत बसण्याचा सुटला आहे सगळी कडे वारा. 

आणि अजिंक्य चा तुम्हाला सगळ्यांना सायोनारा. 


लेखक: ऋषिकेश भावठाणकर आणि अजिंक्य कवठेकर 


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

If you like to read such short stories make sure you subscribe to our email newsletter. One email every Sunday to your inbox. Click here to subscribe. Sunday Newsletter.

And if you like to listen to such books and stories make sure you download KUKUFM.

Experience the magic of storytelling like never before with Kukufm, your go-to audiobook platform!

Immerse yourself in a vast library of captivating audiobooks spanning a multitude of genres,

all at your fingertips.


As an affiliate partner, I'm excited to offer you an exclusive opportunity to get a whopping 50% off on your Kukufm subscription when you purchase through my link.

But hurry, this offer is available for a limited time only! Click the link below and join Kukufm today!

GRAB THE OFFER NOW!

Click here to get your yearly subscription at 50% OFF.

Weekly Productivity tips!

This is our weekly newsletter where we share high-quality insights from the web and our experiences, directly to your inbox.

    We won't send you spam. Unsubscribe at any time.

    Post a Comment

    0 Comments