तुम्ही कोण? फलहार वाले का फराळ वाले!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष, 

             बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम..ज्ञानेश्वर महाराज कि जय..! जगद्गुरू तुकाराम महाराज कि जय..! पंढरीनाथ महाराज कि जय..!

             समर्थांचं एक खूप छान करुणाष्टक आहे. बुद्धी दे रघूनायका. मी ह्या आधीही माझ्या पत्रात या करुणाष्टकाबद्दल खूपदा सांगितलं आहे. मला एक प्रश्न पडला, समर्थांनी "बुद्धी दे रघूनायका" हेच का लिहिलं? शक्ती दे रघूनायका, युक्ती दे रघूनायका, लक्ष्मी दे रघूनायका, मी माझ्या छोट्या बुद्धी हे काढलेले वेवेगळे पर्याय काव्याच्या मीटर मधे पण बसतं आहेत आणि चुकीचे पण नाही. शक्ती नको आहे का तुम्हाला आणि मला? युक्ती पाहिजे आहे, लक्ष्मी पाहिजे आहे मग हे सगळं सोडून बुद्धी दे रघूनायका का लिहिलं असेल?

    हेच सगळं काही बोलूया आजच्या पत्रात. लेट्स गो!

देवा, इतकी ताकद आहे तुझ्यात?

एक गोष्ट सांगतो मग तुम्हाला समजेल का बरं बुद्धी दे रघूनायका प्रत्येक प्रसंगी बरोबर आहे ते. 

            एकदा एक महादेवाचा भक्त एका जहाजेतून एका नदीच्या किनाऱ्या वरून दुसऱ्या नदीच्या किनाऱ्यावर जातं होता. तो मनापासून भक्ती करायचा. त्याने पोशाख पण एखाद्या संन्याशासारखे घातलेले होते की ज्याने आपलं मन कुठेही न भटकता आपण फक्त महादेवाच्या नामस्मरणात राहू. तो तसाच दिवस रात्र वागायचा. हा प्रवास चालू असताना जहाजेत असणाऱ्या बाकी प्रवाश्याना त्याची मजा घ्यावीशी वाटली. जगाचा नियम आहे आपल्या पेक्षा कोणी वेगळा दिसला की त्याला त्रास देणारचं. 

        ते त्याला वाट्टेल तसं बोलतं होते, छोटे-छोटे दगडं मारतं होते, शक्य तितके विनोद करून त्याच्या दिसण्यावरून हसतं होते. पण तो भक्त काही साधा सुधा भक्त नव्हता. त्याने सुद्धा दुर्लक्ष करून नामस्मरण चालू ठेवलं. पण आपल्या भक्ताला परत परत होणारा त्रास बघून महादेव त्याच्या समोर प्रकट झाले.

        महादेव म्हणाले, "इतकेच त्रास देत आहेत ना तुला हे सगळे. एक काम करतो. नाव पलटून टाकतो. तुला काही होणार नाही पण ह्यांना अद्दल घडेल." भक्त म्हणतो, "जाऊ द्या ना महादेवा! असा किती वेळ संबंध येणार आहे ह्यांचा? एकदा का त्या किनाऱ्यावर पोहोचलो ते आपल्या कामाला आणि मी माझ्या नामस्मरणात." पण महादेवांना हे काही आवडेना. त्यांनी पुन्हा विचारलं, "वादळं आणून ह्यांना अद्दल घडवलीच पाहिजे. जहाज पलटली म्हणजे ह्यांची बुद्धी ठिकाणावर येईल."

        भक्त म्हणाला, "देवा तुमच्यात इतकीचं ताकद आहे ना तर फक्त एक काम करा. जहाज नको, उगीचच गंमत वाटते म्हणून त्रास देऊ नये ही बुद्धी पालटा."

        ही एक मात कथा आहे. वाढवून चढवून बुद्धी महत्वाची आहे हे सांगण्यासाठी रचलेली. बुद्धी जर जागेवर आली तर सगळं काही बरोबर होतं. शक्ती येते, युक्ती येते सगळं बुद्धीच्या साहाय्याने मिळवता येतं.

आता समजलं! का बुद्दी दे रघूनायका?

            म्हणून समर्थ बुद्धी दे रघूनायका म्हणतात हा मी लावलेला अंदाज आहे. ह्या वर अजून एक कारण सांगतो का "बुद्धी दे रघूनायका" हे करुणाष्टक रोज म्हणावं.

        मानव हा बुद्धिमान प्राणी नक्कीच आहे पण निर्णय सगळे भावनात्मक घेतो. तुम्ही जाहिराती नीट बघा. त्या मधे बुद्धीला आवडेल असं फार कमी दाखवतात भावनात्मक जास्त दाखवतात. एखादा फोन किती फीचर्स मुळे कोणाला किती कामाला येऊ शकतो हे काम बुद्धीचं आहे हे जास्त दाखवलं जाणारं नाही. पण माझ्या हातात एक मस्त महागडा फोन दिसला की मी कसा चार चौघात उठून दिसेल ही भावना मनात टाकली की झालं. ही झाली भावना. जाहिराती हे बरोबर पकडतात आणि तेच दाखवतात.

        म्हणून या भावनात्मक, स्वतःकडे ओढणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू, विचार, सवयी, अन्न, जीवन जगण्याच्या पद्धती ह्या सगळ्यांपासून दूर राहून बुद्धी वापरून शांत आणि यशश्वी जीवन जगता यावं म्हणून मी रोज बुद्धी दे रघूनायका म्हणायला सुरवात केली. भावनेच्या भरात बोलणे, भावनेचा भरात निर्णय घेणे ह्या चुका मी पण केलेल्या आहेत. सगळे करतात. पण ती चूक सुधारण्यासाठी "बुद्धी दे रघूनायका" हे करुणाष्टक फार छान काम करतं. 

फलहार का फराळ?

           एक उदाहरणं सांगतो. आज आषाढी एकादशी. जवळपास सगळे उपवास करतात. पण कसा करतात? भावनेच्या भरात केलेला उपवास म्हणजे बटाट्याचे चिप्स, केळ्याचे चिप्स, फराळी चिवडा, साबुदाणा वगरे वगरे सगळं. हे सगळे पदार्थ उपवासाला चालतात हे ठरवणारं कोण आहे? मला तरी माहिती नाही. खरं तर मला माहिती आहे हळूच कानात सांगतो, कान इकडे करा. उपवासाला फराळी चिवडा चालतो असं ठरवणारे बिझनेस मॅन आहेत, ज्यांना हे बरोबर समजतं की कसं तुम्हाला तुम्हाला भावनेच्या भरात विकत घ्यायला लावायचं.

            सगळे खातात हे उपवासाला म्हणून आपण पण खाऊया ही भावनाच आहे. पण बुद्धीने केलेला उपवास म्हणजे पोटाला एक दिवस आराम होईल असं अन्न. फळ हे पोटाला आराम देणारं अन्न आहे. उपवासाच्या दिवशी कुठलीही इच्छा मनात येऊ न देता जास्तीत जास्त नामस्मरण करायचं हा झाला बुद्धीने केलेला उपवास. हे नियम सगळ्यांनीच पाळले तर सगळ्यात आधी बिझनेस होणार नाही, बिझनेस तर नाही भरतीला लोकं पोटाला एक संपूर्ण दिवस आराम दिल्याने कदाचित कुठल्यातरी आजारातून बरेही होतील.

        हा असला नियमबद्ध उपवास डोक्यातून काढून बिझनेस होईल अशी एखादी उपवासाची सवय सगळ्यांना सांगून सांगून, जाहिराती दाखवून दाखवून एकदा का लागली की झाला बिझनेस सुरु. आणि आपला विश्वास बसतो सुद्धा. चला मी म्हणतो देवासाठी, नामस्मरणासाठी उपवास हे सगळे विचार बाजूला ठेऊन एक वेगळा विचार घेऊ. 

        उपवास म्हणजे पोटाला आराम हे तरी मान्य आहे ना तुम्हाला? मग तळलेलं (पाल्म तेलात तळलेलं) खाऊन कसा काय पोटाला आराम मिळणार? तळलेलं पचवणं सोप्प आहे का फळं पचवणं सोप्प? हा विचार पण आपण सगळे करतं नाहीत, इतका मोठा इम्पॅक्ट असतो भावनांचा. जाहिरातीत सांगितलं चालतं म्हणजे चालतं. आणा विकत.

        मी तर या वर्षी पहिल्यांदा बुद्धीने केला जाणारा उपवास करणार आहे. तुम्ही कुठला करणारं आहात तुम्ही ठरवा. मी एक चांगलं, एक वाईट असं म्हणतं नाही. कारण सगळ्यांची प्रकृती, रोजच्या सवयी, रोजचे श्रम हे वेगळे वेगळे असल्याने फक्त फळं खा, फक्त तळलेलं खा हे वाक्य प्रत्येकाला लागू होतं नाहीत. तुम्ही भावनांच्या आधी बुद्धीचा विचार करून स्वतःसाठी निर्णय घ्या इतकंच माझं मत आहे.

                पुन्हा एकदा, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम..ज्ञानेश्वर महाराज कि जय..! जगद्गुरू तुकाराम महाराज कि जय..! पंढरीनाथ महाराज कि जय..!

स्वस्थ रहा, मस्त रहा आणि पांडुरंगाचा जयजयकार करण्यात व्यस्त रहा. धन्यवाद. 

आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.





Post a Comment

0 Comments