आज बोलूया AI बद्दल!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

            स्वागत आहे अजून एका नवीन पत्रात. मी प्रत्येक काही वर्षांपूर्वी पत्र-पत्र हा खेळ सुरू केला आणि चांगला प्रतिसाद तुमच्या प्रत्येकाकडून मिळायला लागल्यावर हा खेळ रविवार ते रविवार सुरु राहिला. खरं तर मला इंटरनेट वर जे काही इंटरेस्टिंग सापडतं होतं ते सांगण्यासाठी मी हा पत्र व्यवहार सुरु केला होता. मग भरपूर विषय त्या मधे वाढतं गेले.

            आजचा विषय आहे AI बद्दल अर्टिफिशल इंटीलिजन्स. हे पत्र AI ने नाही मीच लिहिलं आहे. AIची मदत घेतली असेल थोडी फार तरी लिहिलं मीच आहे. चला तर मग गप्पा मारूया आणि समजून घेऊया AI ला कसं वापरावं. लेट्स गो!

AI मुळे तुमचे जॉब जाणार!

        ही एक भीती मी कित्तेक दिवस झाले ऐकतो आहे. पण माझं प्रामाणिक मत आहे, मी जास्त फिरवून फिरवून न सांगता सरळ सांगतो. AI मुळे जॉब जाणार नाहीत AI चा वापर करून काम कसं सोप्प करावं हे शिकलो नाही तर नक्की जॉब जाणारं. कारण काम करणं खरंच सोप्प झालं आहे. आपण कन्टेन्ट क्रिएशन हे काम बघितलं तर कन्टेन्ट क्रिएट करायला आधी जी मेहनत लागायची ती आता नाही लागतं. स्टुडिओ नसतानाही आपण स्टुडिओ मधे रेकॉर्ड करावं तसं रेकॉर्ड करू शकतो. व्हिडिओ कॅमेरा नसतानाही कॅमेऱ्याने काढावे असे फोटो व्हिडिओ बनवू शकतो. आपल्या कडे दहा जण नाही ज्यांना मिळून आपल्याला एखादी जाहीरात बनवायची आहे. हे दहा जण AI च्या मदतीने आपण उभे करू शकतो.


        काही वर्षांपूर्वी जसे कंप्युटर नवीन नवीन होते आणि ज्यांनी ज्यांनी ते शिकण्याची तयारी दाखवली नाही त्यांना जॉब आणि बिझनेस मधे खूप कष्ट बघावे लागले होते तोच प्रकार AIचा आहे. मग हे AI टूल्स शिकावे का नाही? नक्की शिकावे. फार सोप्प आहे. आज ऑनलाईन AI शिकवणारे शंभर जण नक्की आहेत. कोणी एक्सेल शिकवतात, कोणी फोटो एडिटिंग, कोणी व्हिडिओ, कोणी ऑटोमेशन शिकवतात कोर्सेसचं कोर्सेस. बरं हे सगळे कोर्सेस महाग आहे का? नाही. फार कमी पैशात आपल्याला सगळ्या टूल्स ची ओळख करून घेता येते. नंतर त्याच्या मधे एक्पर्ट बनायला कदाचित जास्त पैसे लागतील. पण ओळख करून घेऊन रोजच्या कामाला वापरणं हे काही अवघड नाही.

या वयात काय करायचं आहे शिकून?

    मी खूप लोकांमधे एक न शिकण्याची सवय लागलेली पाहिली आहे. मी तुम्हाला काही जणांचे नावं आणि त्यांचे वय सांगतो जे सारखे तुम्हाला कुठल्या न कुठल्या कारणाने नवीन काहीतरी केल्यामुळे चर्चेत दिसतात. ते चांगलं काम करतात का वाईट हा विषय मी बोलतं नाहीये. पण त्यांची जे काही वय आहे त्या मधली त्यांची धडपड बघा. आपल्या सगळ्यांचे लाडके नरेंद्र मोदी त्यांचं वय आहे ७४, डोनाल्ड ट्रम्प ह्यांचं वय आहे ७९, बिल गेट्स चे वय आहे ६९, अमिताभ बच्चन ८२, नाना पाटेकर ह्यांचं वय ७४ आहे, व्लादिमिर पुतीन चे वय आहे ७२ अजून कोण सांगावे गौतम अदानी ६३ वर्षांचे आहेत. मुकेश अंबानी ६८ वर्षांचे आहेत.

      ह्या पैकी कोण तरुण आहेत सांगा बरं? मी तर म्हणेल सगळे तरुण आहेत कारण त्यांचं मन तरुण आहे. आता पुरे, आता काय करायचं शिकून, हा विचार केला नाही त्यांनी. शिकतं राहिले म्हणून आज ज्या जागेवर आहेत तिथे त्यांना अभिमानाने आणि गौरवाने बघितलं जातं. वय काहीही असो स्वतः ज्या कामात आहेत त्या कामात हे सगळे जण आजही शिकतं आहेत काहीतरी नवीन करून बघत आहेत.

        ह्या सगळ्यांचे उदाहरणं डोळ्यासमोर ठेऊन तरी आपण आपलं काम जितके दिवस शक्य आहे तितके दिवस करत राहिलं पाहिजे, शिकतं राहिलं पाहिजे.

आता AIची मजा पहा!

            मी माझे पत्र म्हणजे ब्लॉग्स लिहिणं सुरु केलं मला आवड आहे म्हणून. मला खूप जणांनी सांगितलं की कोणालाही वाचायला वेळ नाही आज काल. तू चांगलं लिहितो पण ह्या सगळ्या ब्लॉग्सचे ऑडिओ पण कर म्हणजे आम्ही कधी पण ऐकू शकतो. खरं तर मला वाचायला वेळ मिळतं नाही हा पॉईंट च मला समजत नाही. पण असो, असेल कंटाळा देऊ म्हणलं आपण ऑडिओ. पण एक ऑडिओ करायला माझं काम किती वाढतं बघा ना. 

        सगळ्यात आधी लिहायचं मग रेकॉर्ड करायचं. आता रेकॉर्ड घरी करता येतं पण पाहिजे तसा, ज्याला  प्रोफेशनल म्हणतात तो आवाज रेकॉर्ड होणार नाही. मग एका स्टुडिओ ला जा. रेकॉर्ड करा. रेकॉर्ड म्हणजे नुसतं वाचून दाखवायचं नाही, त्याची एक प्रॅक्टिस करावी लागेल. एकदा-दोनदा. पण फक्त रेकॉर्ड करून होतं नाही त्याला एडिट करावं लागतं. १० मिनिटं जरी म्हणलं तरी अजून एक प्रोसेस वाढली आणि चला मी मान्य केलं लिहिणं फुकट आहे. भरपूर वाचन इतकीचं कॉस्ट लागती लिहिण्यासाठी. पण रेकॉर्डिंग स्टुडिओ माझ्या घरी नाही. मला वेगळे पैसे मोजावे लागणार. मग वेगळं यू ट्यूब ला अपलोड करा. 

        ह्या चार पाच प्रोसेस AI एका क्लिक वर करतं. ते पण स्टुडिओ सारखं रेकॉर्डिंग आणि मला तर एक आवाज मुलाचा आणि एक आवाज मुलीचा हे पण मिळालं. ही AI वापरून केलेली रेकॉर्डिंग ऐकायची आहे तुम्हाला? माझं एक जुनं पत्र आहे "What's in it for me?" ह्या पत्रामधे मी दासबोधाबद्दल थोडक्यात माझी ओळख कशी झाली हे सांगितलं. ते मी AI ला रेकॉर्डिंग ला दिलं आणि त्या पत्राचा (लेखाचा) AI ने एक मस्त पॉडकास्ट बनवला. 

ऐका आणि कसा वाटला मला नक्की कळवा. 


        कसा वाटला मग पॉडकास्ट? तुम्ही अजून नीट ऐकलं तर तुम्हाला समजेल AI ने माझा ब्लॉग हा नुसता ऑडिओ नाही बनवला पण त्याचा एक सारांश सोप्या आणि कमी शब्दात गप्पा करतं आहेत दोघे असा बनवला. अजून काय काय शिकणारं आहे हे AI बघूया. बाकीच्यांचं माहिती नाही मी तरी AIचा पुरेपूर वापर करतो. कामात सुद्धा आणि अशी मजा म्हणून सुद्धा. प्रत्येकाने ही शिकण्याची सवय कधीही सोडू नये आय मताचा मी आहे. 

            या पॉडकास्ट करणाऱ्या दोघांच्या काही चुका झाल्या असतील तर त्यांना मोठ्या मनाने माफ करा कारण दोघे एक तर अस्तित्वात च नाहीत. ते पण AI ने बनवले आहेत. ते चुका नक्की सुधारतील. अजून भरपूर AI पॉडकास्ट घेऊन आपण भेटूया पुढच्या पत्रात. 

        स्वस्थ रहा, मस्त रहा आणि AI टूल्स शिकण्यात व्यस्थ रहा. धन्यवाद. 

आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.







Post a Comment

0 Comments