शत्रू बुद्धी विनाशाय!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष, 

      नवीन रविवार नवीन विषय. मागच्या रविवारी मी जरा AIचा वापर करून एक प्रयोग केला आणि प्रत्येकाला तो प्रयोग आवडला. आपल्या प्रतिसादामुळे मला दिशा मिळते म्हणून खूप खूप धन्यवाद. वाचत रहा आणि आपल्या चांगल्या किंवा वाईट प्रतिक्रिया देतं रहा.

        आजच्या पत्रात मी संध्याकाळी श्लोक का म्हणले पाहिजे ह्या विषयाला घेऊन काहीतरी लिहिलं आहे. त्या वर बोलूया आणि रामायणा मधे विश्वामित्र ऋषी सुद्धा आपल्याला संध्याकाळी श्लोक म्हणायला सांगतात. ते कुठे ते बघूया. लेट्स गो!


७ वाजता शुभंकरोती म्हणायची सवय!

    आहे ना ही एक मोठी समस्या. "आमच्या घरी मुलांना संध्याकाळी शुभंकरोती म्हणायची सवय नाही" ही तक्रार जवळपास प्रत्येक घरात सापडेल. आणि ही काही मारून मारून लावण्याची सवय नाही. आनंदाने एखाद्याला संध्याकाळी श्लोक म्हणावे वाटले पाहिजे. ह्यात खरी गम्मत आहे. कुठली सवय लावणं किंवा त्याचं महत्व पटवून देणं हा प्रकार एखादी गोष्ट सांगून जितक्या लवकर आणि नेहमीसाठी होऊ शकतो तो किती पण मारून, रागावून नाही होऊ शकतं. ही गोष्टींची ताकद आहे.

    पण अशी कुठली गोष्ट आहे जी संध्याकाळी श्लोक म्हणायचं महत्व पटवून देईल. एक गोष्ट आहे जी वाल्मिकी रामायणात येते. स्वतः विश्वामित्र ऋषी रामांना संध्याकाळ आणि राक्षस ह्याचं गणित समजावून सांगतात. ही कथा ताटका वध ह्या प्रसंगात येते.

रामायणातल्या फाइट्स! 

    मला सिनेमांमधले फाइट्स बघायला लहानपणी पासून आवडतं. ते  सगळं खोटं असतं हे सुद्धा मला लहानपणी पासून माहिती. तरीही मी वेगवेगळ्या भाषे मधले भरपूर फाइट्स असणारे चित्रपट पाहिले आहेत. ते करण्याचा प्रयत्न पण केला आहे. मी काही वर्षांपूर्वी रामायण वाचायला सुरवात केली आणि त्या मधले फाइट्स हे मला एखाद्या उत्कृष्ट चित्रपटात असावे असेच वाटले. उदाहरणं घेऊया ताटका वधाचं. 

        श्री रामांनी आपल्या धनुष्याचा टणत्कार करून ताटकेला बोलावलं. इथेच बघा काय स्टाईल आहे बोलवण्याची. मी म्हणालो ना ऍक्शन म्हणजे ऍक्शन. ताटका वैतागून येते आणि सुरवातीला ती धुळीचं मोठं वादळं निर्माण करते. मग श्री रामांना कसं काय मी एका स्री वर वार करू म्हणून मनात गडबड असते. ह्या प्रकारात ती मोठे मोठे दगडं फेकायला सुरवात करते. श्री राम बाणांनी सगळे दगडं उडवून लावतातं आणि लक्ष्मण तिचे नाक आणि कान कापतात. ह्या वर ती अजून संतापते आणि रूप बदलून ती अजून मोठे मोठे दगडं आकाशातून फेकायला सुरवात करते. मग श्री राम बाण मारून तिचे दोन्ही हात वेगळे करतात. 

        विश्वामित्र ऋषी रामांना म्हणतात, "रामा, हिच्यावर दया करणे व्यर्थ आहे. हीच यज्ञात विघ्न आणते. तिच्यात खूप वेगवेगळ्या शक्ती आहेत. त्या बाहेर येण्याच्या आधी तिला मारून टाक."

    इथे विश्वामित्र ऋषी ती गोष्ट सांगतात जी संध्याकाळी श्लोक म्हणायचं महत्व सांगते. विश्वामित्र ऋषी म्हणाले, "मारू का नको हा विचार करण्यात वेळ घालवू नको रामा. आता संध्याकाळ होऊ लागली आहे. संध्याकाळ झाली की राक्षसांचे बळ वाढते. त्यांना कोणीही जिंकू शकतं नाही आणि ते अजिंक्य बनतात."

    हे ऐकता क्षणी श्री रामांनी शब्दवेधी बाण मारला. तो बाण असा काही होता की तिच्या चारही बाजुंना पिंजरा तयार झाला आणि अजून एक श्री रामांनी असा काही मारला की तो तिच्या हृदयात गेला. मोठा आवाज करत ती खाली कोसळली.

    हे बघून सगळे देव खूप खुश झाले. त्यांनी विश्वामित्र ऋषींना खूप आशीर्वाद दिले आणि आपले कल्याण असो असे म्हणाले.

अर्थ समजून घ्यावा लागतो

        वाचलं ना विश्वामित्र ऋषी काय म्हणाले "संध्याकाळ झाली की राक्षसांचा बळ वाढतं". आता तुम्ही म्हणालं आता कुठून आले राक्षस. त्या काळात असतीलही. आता कोण राक्षस मला मारायला येणार आणि काय त्याची ताकद वाढणारं? 

        पण एक विचार करून बघा. संध्याकाळ झाली की वाटतं की नाही काही तरी चटपटीत खावं, फिरायला जावं, बाहेरचं भरपूर खावं किंवा उगीचच सकाळ पासून जो छान गेलेला दिवस असतो तरीही प्रसन्न वाटणं कमी होऊ लागतं. उगीच भलते भलते विचार मनात येऊ लागतात. हे माझ्या मते तरी राक्षस येणासारखंच आहे. मी माझा अनुभव सांगतो आहे मला तर संध्याकाळी अशी काही भूक लागतं होती जी जंक फूड खाऊनच शांत व्हायची. 

        त्या मुळे ह्या संध्याकाळच्या वेळेला आपल्याला न दिसणाऱ्या राक्षसांना ताकद मिळते. ती न मिळावी वाटतं असेल तर संध्याकाळचा थोडा वेळ हा नाम स्मरणात, श्लोक म्हणण्यात, शुभंकरोति म्हणण्यात घालवावा.

        तुम्हीच विचार करा अशी एखादी त्या कृतीच महत्व पटवून देणारी गोष्ट जर सांगितली तर लहान मुलं कसले मोठे सुद्धा माझे पत्र वाचणारे आज आत्ता पासून संध्याकाळी श्लोक म्हणण्याची सुरवात करतील. कसले छान आहेत आपले संध्याकाळचे श्लोक, "शत्रू बुद्धी विनाशाय" म्हणलं आहे. शत्रू नको रे त्याची ती चुकीची बुद्धी संपवून टाक ह्या पेक्षा छान काय पाहिजे अजून. त्या शत्रूची बुद्धी संपवता आली ह्या इतका मोठा विजय कुठला नाही असं माझं मत आहे. 

        तर आजपासून संध्याकाळच्या प्रार्थनेचं महत्व पटवून देतांना ताटका वध ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपण भेटूया पुढच्या पत्रात. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि संध्याकाळी श्लोक म्हणण्यात व्यस्थ रहा. धन्यवाद. 

आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.











Post a Comment

0 Comments