।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
तुमचे येणारे रिप्लाय हे माझ्यासाठी एक फार महत्त्वाचं कारण आहे, ज्यामुळे मला प्रत्येक आठवड्यात लिहावंसं वाटतं. मला लिहिण्याची आवड आहेच, पण तरीही - वक्त्याला एखादा छान श्रोता मिळाला की भाषण कसे मस्त रंगते! अगदी तसंच मला प्रत्येक रविवारी जाणवतं.
So, thank you for being such a wonderful reader.
तुम्ही कधी कोणाला मदत केली आहे कां? किंवा तुम्हाला कधी कोणी मदत केली आहे का? हे दोन्हीही प्रसंग तुमच्या आयुष्यात नक्कीच घडले असतील. आपल्या रोजच्या जीवनात आपण नेहमीच कुणाला तरी मदत करत असतो किंवा कोणाची तरी मदत घेतच असतो. नुकतीच, मला पण एकाने मदत केली आणि आज आपण त्या बद्दलच बोलूयात. लेट्स गो!
गोष्ट - संपूर्ण ताकद वापरण्याची
एकदा एक वडील आणि छोटा मुलगा असे दोघे सकाळी सकाळी टेकडी वर मस्त फिरायला गेलेत. सकाळची थंड हवा, शांत वातावरण, हळू हळू क्षितिजावर उगवणारा सूर्य आणि गप्पा!! दोघेही जसजशी वाट मिळेल तसे फिरत निघाले. तर झालं असं की त्यांचा वाटेवर मध्येच एका झाडाची फांदी आडवी पडलेली होती. ती फांदी इतकी पण मोठी नव्हती की एक माणूस त्याला हलवू शकणार नाही; पण ८-९ वर्षाचा मुलासाठी ती फांदी नक्कीच थोडी जड होती.
पुढची वाट अडली होती. पुढे जाण्यासाठी रस्ता मिळतं नव्हता. म्हणून मग त्या छोट्या मुलाने फांदी हलवण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी पण अडवले नाही. पण त्याच्या कडून काही फांदी जागची हलली नाही. आपल्या मुलाचे प्रयत्न वडील बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित होते. फांदी हलवण्याचा प्रयत्न एक दोन वेळा केल्यावर मुलाने वडिलांकडे बघितले आणि विचारले, "बाबा, तुम्हाला काय वाटतं? मी ही फांदी हलवू शकेन?" बाबा म्हणाले, "हो, जर तू तुझी पूर्ण शक्ती वापरलीस तर नक्कीच फांदी हलवू शकशील."
मुलगा खुश झाला. वडिलांच्या आश्वासक शब्दांनी त्याला परत हुरूप आला. त्याने पुन्हा प्रयत्न करायला सुरवात केली! पण फांदी काही हलेचना! आणखी थोडे प्रयत्न करून तो थांबला.
तो थोडा नाराज होऊनच वडिलांना म्हणाला, "बाबा खोटं नका न बोलू! मी ही फांदी खरंच हलवू शकतो का? मला खरं खरं सांगा!"
बाबा परत म्हणाले, "अरे, मी म्हणालो ना! तू पूर्ण ताकद लावलीस तर तुला फांदी हलवता येईल. शंकाच नाही!".
"पण मी तर माझी सगळी ताकद लावून पहिली, फांदी तर हलतंच नाहिये माझ्या कडून." मुलगा त्राग्याने म्हणाला!
त्यावर वडील शांतपणे म्हणाले, "हो, पण तू ‘तुझी’ ताकद वापरलीस. मी इथे तुझ्या बाजूला उभा आहे—मला तू विचारलं का मदत करायला? जेव्हा आपण आपल्या बरोबर असलेल्या लोकांची, आपल्या सहकाऱ्यांची ताकदही घेऊन प्रयत्न करतो, तेव्हाच त्याला ‘पूर्ण ताकद’ म्हणतात."
इतकं म्हणत वडीलही मदतीसाठी पुढे सरसावले . दोघांनी मिळून फांदीला हात लावला—आणि ती सहजपणे बाजूला झाली.
आता AI असल्यावर कोणाची मदत लागत नाही!
ही जी गोष्ट मी आत्ता सांगितली - कदाचित मी ह्या आधीही एका पत्रात सांगितली आहे. पण ती इतकी महत्त्वाची आहे की परत परत ऐकली तरी चालेल.
सध्या टेक्नॉलॉजीमुळे कधी कधी आपण ‘मला कोणाची गरज नाही’ असा (गैर)समज करून घेतो आणि काम करतो. गरज पडली तरी मनात येतं—“आता तर AI आहे!”
काय काय नाही करू शकत AI? तुम्हीच सांगा. मी जे प्रत्येक आठवड्यात लिहितो त्याचं प्रूफरीडिंग, मी जर काही कोडींग केलं कुठल्या सॉफ्टवेअर साठी तर त्याला बरोबर करण्याचं काम, मला न समजलेल अवघड कन्सेप्टस् समजावून सांगण्याचं काम, फोटो एडिट करायचं काम, मला कुठे फिरायला जायचं आहे तर तिथे काय काय बघण्यासारखं आहे ते मला सांगण्याचं काम….
तुम्ही बोला ते काम AI करेल - ते सुद्धा एकदम फ्री.
मग आता कशाला हवी कुणाची मदत? सगळ्यांकडेच तर AI आहे. मग कुणाला, "मी काही मदत करू का?" असं तरी का विचारायचं किंवा कोणी मदत करायला तयार असेल तरी त्याला का हो म्हणायचं? माझ्या कडे तर AI आहे न? काय गरज कोणाची? “नकोय मला तुमची मदत. Thank you very much!”
पण टेक्नॉलॉजीला अजून human touch, आपलेपणा, भावना देण्याचा मार्ग सापडलेला नाही.
काम AI करू शकतं — पण आपलेपणाचा स्पर्श अजूनही कठीण आहे.
माझीही लिहिण्यामधली ताकद वाढली!
आजच पत्र हे एका व्यक्तीला “Thank You” म्हणण्यासाठी! आणि अशी मदत करण्याची इच्छा हे पत्र वाचणाऱ्या प्रत्येकास व्हावी एवढयाच एका कारणासाठी लिहिलं आहे.
काही दिवसांपूर्वी मला माझ्या एका दादाचा फोन आला: “अजिंक्य, उद्या तुला असा असा वेळ आहे का? माझ्या घरी एक जण आलेले आहेत. त्यांना श्रीरामांच्या मंदिरात जायचं आहे. तू सोबत आलास तर तितक्याच गप्पा होतील, ओळखही होईल.”
मी लगेच तयार झालो.
आणि अशा प्रकारे भालगांव प्रवासात माझी मयुरेश देशपांडे, म्हणजे मयुरेश दादांशी ओळख झाली. आम्ही दोघेही इंजिनियर, दोघांनाही समर्थांचे विचार आवडतात, टेक्नॉलॉजी, पुस्तके असे अनेक कॉमन इंटरेस्टस् - त्यामुळे आमच्या गप्पा भरपूर रंगल्यात.
मी त्यांना सहजच माझ्या पात्रांबद्दल सांगितलं. या डिजिटल जगात मी पत्र का पाठवतो आहे? असा प्रश्न साहजिकच त्यांना पडला. पण पत्र म्हणजे ब्लॉग आहेत आणि मी प्रत्येक आठवड्याला लिहितो ही सगळी कल्पना मी त्यांना दिली. पत्रं दाखवली. बाकी गप्पा झाल्यात आणि आम्ही दर्शन घेऊन परतलो.
काही दिवसानंतर त्यांचा स्वतःहून मला मेसेज आला,” तू जे पत्र लिहितो त्याचं proofreading कुणी करतं का? नसेल करत तर मी तूला करून देऊ शकतो.”
आता माझ्या जागी येऊन तुम्ही विचार करा - मी फार तर फार १-२ तास कोणाला तरी भेटलो आहे आणि त्या व्यक्ती ला मी कसं काय काम सांगणार? परत तो व्यक्ती माझ्या पेक्षा वयाने, ज्ञानाने मोठा. पण तरीही मी प्रत्युत्तरादाखल त्यांना विचारलं , “तुम्हाला वेळ मिळेल का? चालेल का मी लिहून दिलेलं? बऱ्याच चुका असतात…” त्यांच्यासोबत थोडं कॉर्डिनेट केलं आणि पत्र proofreading होणं सुरू झालं.
त्यांनी प्रूफ रीड करून सुधारलेलं पत्रं वाचतांना मलाही विलक्षण आनंद मिळायला लागला.
लिहिणारा कुणीही असो—लिहितांना आपण विचारांच्या प्रवाहात असतो. शब्द चुकणे, व्याकरणातील हलक्या चुका होणे, काही पुनरुक्त शब्द येणे—हे सारं होतंच. त्याला परत एकदा शांत पणे बसून नीट करावं लागतं. असं प्रूफ रीड करणारा कुणीतरी दुसरा व्यक्ती असेल तर कधीही चांगलं. कारण आपण स्वतः लिहून परत नीट करायला बसलो तर त्या मधल्या चुका सापडणं फार कठीण असतं. समर्थ म्हणतात ना "आपला अवगुण दिसेना काही केल्या" त्या मधला हा प्रकार.
मोठमोठ्या लेखकांकडे तर वेगळी प्रूफरीडिंग टीम असते. मी तर आवड म्हणून लिहायला सुरवात केलेली. तेव्हा मला “प्रूफरीडिंग” म्हणजे काय हेही माहीत नव्हतं.
पण माझा असा अनुभव आहे की "युनिव्हर्स ला मनापासून काम करणारा व्यक्ती खूप आवडतो". आपण कामाला सुरुवात केली की युनिव्हर्स आपल्याला आवश्यक असणारे लोक आपोआप भेटवतो.”
म्हणून कधी काही मला कृतज्ञता (Gratitude) हा एकमेव मार्ग दिसतो. तर ह्या पत्राला निमित्त करून मी मयुरेश दादांना धन्यवाद म्हणतो आहे. तुम्हाला जर कधी वाटलं असेल की—
“हे पत्र खूप छान आहे, चुका नाहीत”—
तर त्याचं संपूर्ण श्रेय मयुरेश दादा यांचं आहे.
आपण करत असलेल्या कामाच्या बदल्यात काही मिळणार नाही हे माहीत असूनही मदत करायला पुढे येणं—
ही सवय प्रत्येकामध्ये यावी, हेच या अनुभवातून शिकण्यासारखं आहे.
मयुरेश दादा, पुन्हा एकदा धन्यवाद. अजून खूप मोठं समर्थ कार्य आपल्या दोघांकडून समर्थ करून घेतील असं काही तरी करूया.
भेटूया पुढच्या पत्रात. तोपर्यंत — स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि कोणाची तरी मदत करण्यात व्यस्त रहा!
धन्यवाद!
Proofreader's note - मी काही व्यावसायिक मुद्रण शोधक नाही. त्यामुळे माझ्या कडूनही खूपशा चूका होत असतीलच! तुम्ही सारे सांभाळून घ्याल ही अपेक्षा आहे. - मयुरेश.
आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.
आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.


3 Comments
प्रिय अजिंक्य, सस्नेह नमस्कार!
ReplyDeleteतुझे पत्र मिळाले व वाचले....👍🏻😊
अनन्य सेवा दे रे राम।
प्रसंग ओळखी दे रे राम।
जनसुखकारक दे रे राम।
हे मागणे (आजच्या युगातील स्वयं सूचना) समर्थांनी का मागितले असेल? आपणा सर्वांसाठी हे का लिहून ठेवले असेल?? याची प्रचिती अजिंक्य तुझ्या पत्रातील प्रसंगातून आज पुन्हा आली.
आज स्वतःचा स्वतःशी आणि इतरांशी देखील असलेला संवाद संपत चाललेला असताना तुझी पत्र मात्र दोन्ही गोष्टी घडवतात.
मयुरेश दादा व तुझी समर्थांनी घडवून आणलेली भेट तुम्ही दोघांनी ऋणानुबंधात परिवर्तित केली व या नवीन नात्याचा उपयोग आमच्या सारख्या वाचकांना १) स्वतःच स्वतःला भेटायला आणि २) सभोवताली असलेल्या व्यक्तींना जाणायला त्यांच्याशी सुसंवाद साधायला प्रेरित करण्यासाठी केला.
लै भारी!
श्रीराम समर्थ
अजिंक्य मी hi तुझे पत्र वाचतं आहे खूपच छान असतात अध्यात्म आणि नवीन पिढी याचा सुवर्ण मध्य साधून आणि रामदास स्वामींचे श्लोकातून सांगत असतो छान वाटतं मुलांना hi समजत
ReplyDeleteक्या बात है! भारीच👏👌
ReplyDelete