आळशी राजाची गोष्ट

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे पुन्हा एका नवीन रविवारी, पुन्हा एका नवीन पत्रासोबत. रविवार-ते-रविवार चालणारा आपल्या गप्पांचा हा प्रवास असाच कायम चालू राहावा, हीच इच्छा. आज मी तुम्हाला एक छोटी पण विचार करायला लावणारी गोष्ट सांगणार आहे — आळशी राजाची.

पण गोष्ट सुरू करण्याआधी मनापासून तुमचे आभार.
तुम्ही वेळ काढून माझे पत्र वाचता, मला रिप्लाय करता — ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे.

माझे पत्र पुढे अजून लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या सगळ्या “पोस्टमन” मित्रांचेही विशेष आभार. तुमच्यामुळे हा छोटासा प्रवास अजून मोठा होत आहे.

आळस हे एकमेव कारण आहे जे आपल्या प्रत्येकाच्या यशाच्या मध्ये येत असते.
आपल्याला काय करायला हवे हे माहिती असते, पण ते उद्यावर ढकलण्याची सवय आपल्या सगळ्यांनाच असते.

असाच आळस एका राजाच्या आयुष्यात आला…
आणि पुढे काय झाले ते पाहूया आजच्या पत्रात.

लेट्स गो!



गोष्टी का महत्त्वाच्या असतात?

“आळस हा माणसाचा शत्रू आहे” हे वाक्य जवळपास सगळ्यांना माहिती आहे.
पण तरीही हा आळस आपल्यातून कधीच पूर्णपणे जात नाही.

आपल्या आसपासचे लोक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगतात.
पण तरीही जे काम एक चांगली गोष्ट करू शकते ते कधी कधी कोणीही करू शकत नाही. म्हणूनच प्रत्येकाने गोष्टी ऐकायला आणि वाचायला पाहिजे.

एखादी गोष्ट आपल्याला असं काही शिकवून जाते जे फक्त त्या गोष्टीला आणि ती मनापासून ऐकणाऱ्या किंवा वाचणाऱ्यालाच समजतं.

खोटं वाटत असेल तर पुढची गोष्ट मनापासून वाचा…
आणि त्या गोष्टीदरम्यान तुमच्या मनात चालणाऱ्या विचारांचे नक्की निरीक्षण करा.


आळशी राजा

(The Lazy King)

एके काळी कुमार नावाचा एक राजा होता. तो खूप आळशी होता. त्याला काहीच काम करायला आवडत नव्हते. तो नेहमी आपल्या सेवकांनी (attendants) त्याची सेवा करावी अशी वाट पाहत असे.

तो बहुतेक वेळा पलंगावर पडूनच राहत असे.

हळूहळू तो खूप निष्क्रिय (inactive) झाला.
तो फक्त त्याला आवडणारे अन्न खात असे.

काही दिवसांनी तो इतका लठ्ठ झाला की त्याला स्वतःहून चालताही येत नव्हते. त्याची तब्येत बिघडली. त्याला बरे करण्यासाठी डॉक्टरांना बोलावले गेले, पण काहीही करून तो पूर्णपणे बरा होत नव्हता.


साधूची भेट

एके दिवशी राजाचा मंत्री शहराच्या बाहेर एका साधूला भेटला.

बोलताना त्या साधूला कळले की राजा कुमार आजारी आहे.
साधूने मंत्र्याला सांगितले की तो राजाला बरे करू शकतो.

हे ऐकून मंत्र्याला खूप आनंद झाला.
त्याने लगेच साधू आणि राजाची भेट घडवून आणली.

साधूने राजाला पाहिल्यावर सांगितले की काही गंभीर झालेले नाही. राजा लवकरच बरा होईल.

पण त्यासाठी एक अट होती.

राजाला रोज साधूच्या झोपडीपर्यंत यावे लागणार होते —
आणि ती झोपडी राजवाड्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर होती.


पहिली चाल

राजाला त्या झोपडीपर्यंत पायी जावे लागले.

अनेक वर्षांनंतर राजा पहिल्यांदाच चालण्यासाठी बाहेर पडला.
त्याचे मंत्री आणि सेवक त्याच्यासोबत होते.

झोपडीपर्यंत पोहोचेपर्यंत राजा धाप लागून घामाने ओला झाला होता.

साधूने त्याला थंड पाणी दिले.
पाणी प्यायल्यानंतर राजाला थोडे बरे वाटले.


साधे नियम

यानंतर साधूने राजाला काही साधे नियम (discipline) सांगितले.

तो म्हणाला —

“कुमार,
दररोज सकाळी लवकर उठा.
रोज चालत माझ्या झोपडीपर्यंत या.
जेवण वेळेवर करा.
आणि वेळेवर झोपा.”

हळूहळू हाच राजाचा रोजचा दिनक्रम (routine activity) झाला.


एक महिन्यानंतर…?

एक महिना झाला.

राजाचे वजन थोडे कमी झाले.
त्याला स्वतःला हलकं वाटू लागलं.
तो पुन्हा सक्रिय (active) झाला.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे —
त्याचे आजारही हळू हळू  नाहीसे झाले.

खूप संपत्ती असूनही राजा आनंदी नव्हता, कारण तो निरोगी नव्हता.
पण साध्या सवयींमुळे त्याचे आयुष्य बदलले.

राजा कुमार पुन्हा निरोगी आणि आनंदी जीवन जगू लागला.


गोष्टीचा अर्थ

“आरोग्य हेच खरे धन”

आपले शरीर ही आपली सर्वात मौल्यवान (precious) संपत्ती आहे.

वेळ आणि आरोग्य या दोन गोष्टींची किंमत आपल्याला ते संपल्यावरच कळते.

आपण पैसे देऊन आरोग्य विकत घेऊ शकत नाही. ते फक्त चांगल्या सवयींमुळे मिळते.

ज्याच्याकडे आरोग्य आहे त्याच्याकडे आशा असते…
आणि ज्याच्याकडे आशा असते त्याच्याकडे सर्व काही असते.


शेवटी मला म्हणायचं इतकंच आहे 

आजच्या काळात साध्या सवयी आणि साधे नियम आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत.

महागडे आणि ऍडव्हान्स गॅझेट्स आपल्या आयुष्यात आली… पण त्याच वेळी आपली हालचाल कमी झाली.

निरोगी आणि फिट रहाणं हे फार काही अवघड नाही फक्त रोज नियमीत काही सवयी आणि काही नियम पाळलं की झालं. 

पुढच्या रविवारी पुन्हा अशाच एका गोष्टीतून गप्पा मारूया. तोपर्यंत — स्वस्थ रहा, मस्त रहा आणि स्वतःला निरोगी ठेवण्यात व्यस्त रहा.

धन्यवाद 🙏

पुढच्या रविवारी सकाळी ९ वाजता भेटूया.


जर तुम्हाला आमचे पत्र नियमित मिळावे असे वाटत असेल, तर—

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा
👉 Email Newsletter Join करा


Post a Comment

0 Comments