।। श्री ।।
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष,
नवीन आठवड्यात तुमचं स्वागत आहे. माझे पत्र वाचून त्याला वेळ काढून प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार आणि पोस्टमनची भूमिका निवडून हे पत्र अजून खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या मित्रांचे खास आभार.
रोज युद्धाचे अपडेट्स तर तुम्ही वाचत असालच. म्हणून म्हणलं, आपणही सध्या ट्रेंडिंग असलेल्या या विषयाला थोडा हात घालावा. नक्कीच मी तुम्हाला युद्धाचे अपडेट्स देणार नाही; पण मी एका वेगळ्याच युद्धाबद्दल आणि ते जिंकण्याबद्दल बोलणार आहे. चला, सुरुवात करूया! Let's Go!
युद्ध म्हटलं की एकच युद्ध नसतं
काही दिवसांपूर्वी मी The Art of War हे पुस्तक वाचत होतो.
हे पुस्तक प्राचीन चिनी सेनापती Sun Tzu यांनी लिहिलं आहे.
सन त्सू हे सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये होऊन गेलेले सेनापती आणि रणनीतीकार होते. युद्ध कसं जिंकायचं यापेक्षा युद्ध कसं टाळायचं आणि बुद्धीने विजय कसा मिळवायचा यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या विचारांचा प्रभाव इतका मोठा आहे की आजही जगभरातील सैन्य, उद्योगपती आणि नेते त्यांच्या पुस्तकाचा अभ्यास करतात.
त्यात एक वाक्य आहे, जे पहिल्यांदा वाचलं तेव्हा थोडं आश्चर्य वाटलं.
“सर्वात मोठी युद्धकला म्हणजे शत्रूला न लढताच जिंकणे.”
म्हणजेच खरी ताकद ही तलवारीत नसते;
ती बुद्धीत आणि संयमात असते.
पण जर समोरचाच लढायला तयार असेल तर?
जर युद्ध टाळणं शक्यच नसेल तर?
तेव्हा काय करायचं?
तेव्हा आठवतो एक प्रसंग
आपल्या इतिहासातला एक खूप प्रसिद्ध क्षण.
छत्रपती शिवाजी महाराज आणि
अफझलखान यांची भेट.
वरवर पाहिलं तर ती एक साधी भेट वाटत होती.
पण प्रत्यक्षात तो क्षण खूप धोकादायक होता.
महाराजांना माहीत होतं की अफझलखानावर पूर्ण विश्वास ठेवणं योग्य नाही.
म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध सुरू होण्याआधीच तयारी केली.
-
अंगाखाली चिलखत
-
हातात वाघनखं
-
आणि मनात पूर्ण सावधपणा
जेव्हा अफझलखानाने कपटाने हल्ला केला…
तेव्हा हीच तयारी कामी आली.
इथे युद्ध टाळणं शक्य नव्हतं,
पण तयारीमुळे विजय शक्य झाला.
आजच्या काळातील शिकवण
एका बाजूला Sun Tzu सांगतात —
“न लढता जिंकणं ही सर्वोत्तम रणनीती आहे.”
आणि दुसऱ्या बाजूला
छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात —
“लढावं लागलं तर तयार असलं पाहिजे.”
म्हणजेच आयुष्यात दोन गोष्टी एकत्र शिकायला हव्यात.
शक्य असेल तिथे वाद टाळणे. पण गरज पडली तर ठाम उभं राहणे.
आपलं युद्ध वेगळंच!
सगळेच युद्धात जिंकतात असं नाही.
इथे मी बाहेर चाललेल्या युद्धाबद्दल बोलत नाही. मी त्या युद्धाबद्दल बोलतोय जे आपल्या मनात रोज चालू असतं.
राग आणि संयम यांचं युद्ध.
भीती आणि धैर्य यांचं युद्ध.
अहंकार आणि समजूतदारपणा यांचं युद्ध.
आणि हे मनातले युद्ध जिंकण्यासाठी आपल्याला इतिहासातील महत्त्वाचे क्षण माहिती असणे गरजेचे आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज किंवा इतर महान व्यक्ती एखाद्या संकटात अडकले तेव्हा त्यांनी नेमका काय विचार केला, त्या संकटातून ते कसे बाहेर पडले, कुठे चूक झाली—या सगळ्याचा अभ्यास झाला पाहिजे.
एकदा विचार करून बघा, घोडखिंडीच्या प्रसंगाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या जिवलग मावळ्याला मागे ठेवून स्वतः पुढे जावं लागलं तेव्हा त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल?
अफझलखानाच्या प्रसंगाच्या वेळी त्यांच्या पत्नी खूप आजारी होत्या. विचार करून बघा—आपल्या घरातलं कोणी आजारी असताना आपलं कामात लक्ष तरी लागतं का?
असे किती प्रसंग सांगावेत? संपूर्ण शिवचरित्र हे कठीण आणि वाईट परिस्थितींनी भरलेलं आहे. पण त्या प्रत्येक प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्य निर्णय घेतला आणि त्यातून मार्ग काढला. हेच तर खरं शिकण्यासारखं आहे.
बाहेर चाललेल्या युद्धाचे अपडेट्स तर घ्या, पण त्याचबरोबर स्वतःसोबतचं युद्ध जिंकण्यासाठी इतिहासातील महान लोकांची चरित्रं नक्की अभ्यासा.
वाचण्याचा कंटाळा आहे का तर तुमच्या साठी यु ट्यूब वर ही एक पूर्ण प्ले लिस्ट आहे ज्या मधे शिवाजी महाराजांचं चरित्र समजावून सांगितलं आहे. चालता फिरता ऐकली तरी भरपूर काही माहिती होईल. ती लिंक मी इथे देतो आहे.
पुढच्या रविवारी सकाळी ९ वाजता भेटूया.
तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि
आपापली युद्धं जिंकण्यात व्यस्त रहा.
धन्यवाद.
जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा
👉 Email Newsletter Join करा

1 Comments
अत्यंत समर्पक लेख.. आपले युद्ध आपल्याशीच असते... प्रयत्नपूर्वक ते नक्की जिंकता येईल.... असेच लिहिते राहा...... 🙏👍
ReplyDelete