।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
संपूर्ण आठवड्यात सगळे वार मिक्स असतात आणि रविवार म्हटलं की आपली भेट फिक्स असते. पत्राद्वारे असो, पण मला तुम्हाला भेटायला खूप छान वाटतं. तितक्याच या Virtual (आभासी) गप्पा. मनापासून सगळ्यांचे आभार, कारण तुम्ही माझे वाचक आहात. असेच वाचत रहा आणि पत्र आवडलं तर आपल्या मित्रांनाही पाठवत रहा.
आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी राग येणाऱ्या लोकांसाठी आहे. तुम्हाला जर खूप राग येत असेल तर आजचं पत्र खास तुमच्यासाठी. Let’s go!
सगळ्यांना माहिती असलेला मनाचा श्लोक
नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना लोभ हा अंगिकारूं ।
नको रे मना मछरू दंभ भारू ॥
या ओळीत समर्थ रामदास मनाला एक अतिशय साधी पण जीवनभर उपयोगी पडणारी शिकवण देतात. क्रोध म्हणजे राग, आणि खेदकारी म्हणजे शेवटी पश्चाताप घडवणारा. रागाच्या क्षणी माणूस विचार न करता बोलतो, कृती करतो, निर्णय घेतो. त्या वेळी त्याला ते योग्यच वाटत असतं. पण राग शांत झाल्यावर मनाला खरी जाणीव होते — उगीचच बोललो… असं करायला नको होतं. अनेकदा त्या एका क्षणाच्या रागामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो, मनावर ठसे पडतात आणि स्वतःलाही अपराधी वाटतं. म्हणून समर्थ मनाला आधीच सावध करतात — राग येणं थांबवणं कदाचित कठीण असेल, पण रागाच्या आधीन होऊन वागू नकोस. कारण क्रोधाचा शेवट बहुतेक वेळा खेदातच होतो.
गोष्टींमधून किंवा श्लोकांमधून एखादी समज अशी लागते की ती कधी कधी कोणाच्या कितीही सांगण्याने लागू शकत नाही. तर आज अशीच एक गोष्ट बघूया.
कुंपणावरचे खिळे
एका गावात अथर्व नावाचा एक हुशार पण चटकन रागावणारा मुलगा होता.
राग आला की त्याला स्वतःवर नियंत्रण राहत नसे.
तो मित्रांना दुखवायचा, घरच्यांशी कठोर बोलायचा… आणि नंतर शांत झाल्यावर मनात अपराधीपणाची भावना घेऊन बसायचा.
एक दिवस त्याच्या बाबांनी त्याला एक पिशवी दिली. त्या पिशवीत भरपूर खिळे होते.
ते म्हणाले —
“अथर्व, जेव्हा जेव्हा तुला राग येईल, तेव्हा घराच्या कुंपणावर एक खिळा ठोक.”
पहिल्या दिवशी अथर्वने तब्बल ४० खिळे ठोकले.
हात दुखले… शरीर थकलं… पण मनात एक नवीन विचार जन्माला आला —
राग व्यक्त करणं सोपं आहे, पण त्याची किंमत चुकवावी लागते.
रागावर नियंत्रण येत येत जसे दिवस गेले तसे खिळ्यांची संख्या कमी होत गेली.
अथर्वला हळूहळू कळायला लागलं की खिळा ठोकण्यापेक्षा स्वतःला थांबवणं जास्त शहाणपणाचं आहे.
एक दिवस असा उजाडला की त्याने एकही खिळा ठोकला नाही.
तो आनंदाने बाबांकडे गेला.
बाबांनी हसत त्याला सांगितलं —
“आता ज्या दिवशी तू पूर्ण शांत राहशील, त्या दिवशी एक खिळा काढून टाक.”
हळूहळू सगळे खिळे निघून गेले.
त्या संध्याकाळी बाबांनी त्याचा हात धरला आणि त्याला कुंपणाजवळ नेलं.
मावळत्या सूर्याच्या प्रकाशात कुंपणावरचे लहान लहान खड्डे स्पष्ट दिसत होते.
बाबांनी शांत आवाजात विचारलं —
“अथर्व, खिळे निघाले… पण हे खड्डे दिसतायत ना?
रागाच्या भरात आपण जे शब्द बोलतो, त्या जखमा अशाच मनात ठसे ठेवून जातात.
माफीने वेदना कमी होतात… पण ठसा पूर्णपणे नाहीसा होत नाही.”
रागाच्या भरात न बोलता आपण शांत पणे उत्तर द्यायला शिकलो तर आपल्या आयुष्यातील अनेक “कुंपणं” तुटण्यापासून आपण वाचवू शकू.
पण रागाच्या क्षणी घेतलेला चुकीचा निर्णय मात्र अनेक नाती शांतपणे तोडून जातो.
आपल्याला सगळ्यांना राग येतो. माझ्या मते आला ही पाहिजे. पण त्या रागामध्ये चुकीचे निर्णय घेणे, चुकीचं बोलणे किंवा एखाद्यावर हात-पाय चालवणे हे थांबलं पाहिजे. त्या रागातील ऊर्जा जर योग्य ठिकाणी वापरता आली, तर नक्कीच एक-एक करत सगळ्या गोष्टी नीट करता येतात.
शेवटी मला काय सांगायचं आहे
शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं — आयुष्यात अनेक मोठ्या गोष्टी आपल्या हातात नसतात, पण आपल्या प्रतिक्रिया मात्र आपल्या हातात असतात. रागाच्या एका क्षणात आपण जे गमावू शकतो, ते अनेक वर्षांच्या प्रयत्नांनीही परत मिळत नाही. म्हणून थोडं थांबूया, थोडं समजून घेऊया आणि जपून बोलूया. कदाचित हाच छोटासा बदल आपल्या नात्यांना, आपल्या मनाला आणि आपल्या आयुष्याला अधिक शांत आणि सुंदर बनवेल.
आपण भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा एका नवीन गोष्टीसोबत.
तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या रागाला योग्य दिशा देण्यात व्यस्त रहा.
धन्यवाद.
जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा
👉 Email Newsletter Join करा

10 Comments
छान, समजावून ( सम + जावून ) सांगितले....
ReplyDeleteएका छोट्या कमेंट मधे "समजावून" चा छान अर्थ सांगितला तुम्ही. धन्यवाद.
Deleteपर्फेक्ट्ली सेड, गुड वन 👍👍
ReplyDeleteआजचा पत्रलेखनाचा विषय अतिशय सुंदर आणि विचारप्रवर्तक आहे👍🏻
ReplyDeleteसमर्थ रामदास स्वामींचा ‘नको रे मना क्रोध हा खेदकारी’ हा श्लोक या विषयाला अत्यंत समर्पक आहे.
खरंच, रागावर नियंत्रण ठेवणे ही जीवनातील फार महत्त्वाची गोष्ट आहे.
मन शांत, संयमी आणि प्रसन्न ठेवण्यासाठी हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणावा. 🙏🙏
खूप मस्त आणि योग्य च लिहिले की रागाला योग्य नियंत्रण आणि त्या मधील ऊर्जेचा योग्य विनियोग....अतिशय अचूक आणि तंतोतंत 👍
ReplyDeleteखुपच सुंदर 👌🏻👌🏻👍🏻💐
ReplyDeleteक्रोधावर नियंत्रण ठेवणे खरच गरजेचे आहे. तु छान पटवून दिले आहेस.रागात मारलेले शब्दरुपी बाण कधीच परत घेता येत नाहीत. जीवनात संयम असणे फार महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने प्रयत्न करावा.अजिंक्य छान.जय जगदंब.
ReplyDeleteखुप छान. 👌👌👌👍🙏🙏
ReplyDeleteखुप छान. समर्पक लेख 👌👌🙏🙏
ReplyDeleteअगदी खरयं क्षणिक राग होत्याच नव्हत करुन टाकतो. बोधकथेने हा विचार अधिकच गडद झाला. आपले लेखन व मांडणी उद् बोधक आहे.
ReplyDelete