बँक अकाउंट ची गोष्ट!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

अजून एक रविवार… आणि मी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे एक नवीन विचार.

मागच्या पत्राला दिलेल्या प्रत्येक प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळ काढून वाचता, विचार करता आणि इतरांपर्यंत पोहोचवता — हे खूप महत्त्वाचं आहे.

तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो, हे सगळे प्रतिसाद तुम्ही वेबसाईटवर त्या त्या रविवारचे ब्लॉग उघडून पाहू शकता. तुमच्या नावाने (आणि नाव माहिती नसेल तर “अनोळखी” म्हणून) ते दिसतील.

आज बोलुया आपल्या सगळ्यांकडे असलेल्या बँक अकाउंट बद्दल. Let's Go! 

बँक अकाउंटची गोष्ट

कल्पना करा, एक अशी बँक आहे जी दररोज सकाळी तुमच्या खात्यात ८६,४०० रुपये जमा करते.
त्या पैशांपैकी एकही रक्कम पुढच्या दिवशी शिल्लक राहत नाही.
तुम्हाला कर्ज घेण्याची परवानगी नाही.
आणि दर संध्याकाळी, तुम्ही दिवसभरात वापरले नाहीत ते सर्व पैसे रद्द केले जातात.

तुम्ही काय कराल?

नक्कीच प्रत्येक रुपया वापराल!

खरं तर, प्रत्येकाकडे अशी एक बँक असते — तिचं नाव आहे “वेळ”.

दररोज सकाळी ती तुम्हाला ८६,४०० सेकंद देते.
प्रत्येक रात्री, तुम्ही योग्य कामासाठी वापरले नाहीत ते सेकंद कायमचे नष्ट होतात.
त्यात काहीही शिल्लक राहत नाही. ओव्हरड्राफ्ट (जादा वेळ) मिळत नाही.

प्रत्येक दिवस एक नवीन खाते उघडतो,
आणि प्रत्येक रात्री त्या दिवसाची नोंद पूर्णपणे मिटवली जाते.

जर तुम्ही त्या दिवसाचा वेळ वापरला नाही, तर त्याचं नुकसान तुमचंच आहे.

मागे परत जाण्याचा मार्ग नाही.
“उद्याच्या” वेळेतून आज काहीही उधार घेता येत नाही.

म्हणूनच, वेळ कधीच कमी किंवा जास्त नसतो.
वेळेचं व्यवस्थापन आपणच ठरवतो — दुसरं कोणी नाही.

आपल्याकडे वेळ नाही असं नसतं,
तर आपण तो वापरायचा का नाही — हा खरा प्रश्न असतो.


टाईमपास

“टाईमपास” हा शब्द भारतीयांनीच लोकप्रिय केला आहे.

आणि खरं सांगायचं तर, आपल्याला नको त्या गोष्टींमध्ये वेळ घालवायची सवय लागली आहे — हे मान्य करायलाच हवं. 

प्रॉब्लेम तिथे सुरू होतो,

जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत जिंकलो किंवा हरलो म्हणून
पुढचे कित्येक दिवस फक्त चर्चा, वाद आणि प्रतिक्रिया देण्यात वेळ घालवतो.


उदाहरण — “धुरंदर”

सध्या “धुरंदर” हा चित्रपट खूप चर्चेत आहे.
सगळे बघत आहेत, आणि सगळ्यांना काही ना काही मत आहे.

पण चित्रपटापेक्षा जास्त चर्चा कशावर आहे?

तो कोणाला support करतो, कोणाला target करतो…

पण चित्रपट म्हणजे काय?

एक काल्पनिक गोष्ट.

सुरुवातीलाच लिहिलेलं असतं —
“यातील घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. जर काही साम्य आढळलं, तर तो योगायोग समजावा.”

मग आपण एवढं seriously का घेतो?

कोणी म्हणतं — “खूप भारी आहे”
कोणी म्हणतं — “पूर्ण वाईट आहे”
आणि काही जण फक्त ह्या दोघांचं भांडण बघत बसतात.

तीनही ठिकाणी एकच गोष्ट चालू आहे —
टाईमपास.


आता वेगळा चष्मा घालून बघूया

ज्यांनी हा चित्रपट बनवला —
कथा, गाणी, डायलॉग, अभिनय, दिग्दर्शन…

त्यांनी हा ४–५ वर्षांचा प्रवास “टाईमपास” म्हणून केला असेल का?

नक्कीच नाही.

त्यांनी प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठेवून काम केलं असेल.

कारण चांगला परिणाम हवा असेल,
तर वेळ घालवावा लागत नाही — वेळ गुंतवावा लागतो.


मग आपण काय करायचं?

माझ्या मते, अशा निरर्थक चर्चांमध्ये अडकण्यापेक्षा
वेळेचा योग्य उपयोग करायचा असेल, तर दृष्टिकोन बदलायला हवा.

हा चित्रपट कोणासाठी आहे, त्याने किती कमाई केली,
किंवा त्यावर कोणाचं काय मत आहे —
या गोष्टींवर वेळ घालवण्यापेक्षा आपण स्वतःला प्रश्न विचारूया:

  • या चित्रपटाचा लेखक कोण आहे?
  • त्याने आतापर्यंत किती काम केलं आहे?
  • तो इतरांपेक्षा वेगळं काय करतो?
  • दिग्दर्शन, अभिनय, संगीत किंवा कॅमेरा वर्कमध्ये आपण काही शिकण्यासारखं आहे का?
  • जर उद्या आपल्यालाच अशा कोणत्याही क्षेत्रात काम करायची वेळ आली, तर आज आपण त्यातून काहीतरी शिकू शकतो का?

हेच तत्त्व राजकारण, खेळ आणि चित्रपट — तिन्ही ठिकाणी लागू होतं.

चित्रपट असो, राजकारण असो किंवा खेळ —
हे सगळं एन्जॉय करा… आणि तिथेच सोडून द्या. 

भारतीय लोकं या ३  गोष्टींना नको तितकं सिरियसली घेतात.

त्यात काय खरं आणि काय खोटं यावर भांडण करण्यात
ना आपला वेळ वाचतो, ना काही नवीन तयार होतं.


पुढच्या रविवारपर्यंत एक छोटा प्रयोग करूया —
दररोज थोडा वेळ “चर्चा करून टाईमपास” साठी नाही,
तर स्वतःला घडवण्यासाठी द्या आणि स्वतःचे ८६,४०० सेकंद सांभाळून वापरा. 

आपण भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा एका नवीन गोष्टीसोबत.

तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा
आणि आपला वेळ योग्य ठिकाणी लावण्यात व्यस्त रहा.

धन्यवाद.


जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा
👉 Email Newsletter Join करा








Post a Comment

0 Comments