।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
मागच्या आठवड्यात मी “सगळेच जण लेखक आहेत” असं म्हटलं आणि तुम्ही काय मस्त मस्त रिप्लाय पाठवले! व्वा! रिप्लाय वाचून मज्जाच आली. माझ्या एकदा सांगण्यावरून जर तुम्ही लेखक बनत असाल, तर अजून काहीतरी आपल्या सगळ्यांच्या कामाचं सांगावं असं मला वाटलं. म्हणून आजचं हे स्पेशल पत्र.
वेळात वेळ काढून पत्र वाचणाऱ्या सर्व वाचकांना मनापासून नमस्कार — अगदी समोर उभं राहून वाकून नमस्कार. पोस्टमन बनून माझं पत्र स्टेटसला ठेवणाऱ्या, दुसऱ्यांना पाठवणाऱ्या, “वाचा” म्हणून सांगणाऱ्या व्यक्तींना वेगळाच नमस्कार.
इंग्रजी ही जगमान्य भाषा आहे. शिकावी लागते, हे सगळं ठीक आहे. पण मराठीसारख्या श्रीमंत भाषेची तुलना इंग्रजीसारख्या गरीब भाषेशी करायची? नाही नाही — आपण तुलना नको, गंमत बघूया. Let’s go!
श्रीमंत आणि गरीब भाषा
भाषा ही भाषा असते. मी गंमत म्हणून एकाला “श्रीमंत” आणि एकाला “गरीब” म्हणतो आहे. गरीब म्हणजे मर्यादित अक्षरांची भाषा.
इंग्रजीत अक्षरं आहेत २६ (A ते Z).
मराठीत ४९. (ळ, ॠ धरले तर अजून वाढतात; पण आपण ४९ धरू.)
इथे मराठी जिंकली.
स्वर इंग्रजीत ५ (A, E, I, O, U).
मराठीत १३ (अ, आ, इ, ई… ).
पुन्हा मराठी पुढे.
व्यंजन इंग्रजीत २१.
मराठीत ३६ (क, ख, ग, घ, ङ…).
ज्या भाषेत अक्षरं जास्त, ती श्रीमंत — असं साधं गणित लावलं तर मराठी पुढेच आहे.
मराठीबद्दल अजून एक माझ्या आवडीची गोष्ट म्हणजे आपण जे लिहितो तेच वाचतो. मराठी ही फोनेटिक भाषा आहे. उदाहरण बघा — एका मुलाचं नाव “वेद” आहे. मराठी वाचणाऱ्याला ते सहज वाचता येतं.
आता हेच इंग्रजीत लिहिलं — His name is Ved.
कोणी “वेड” वाचेल, कोणी “वेद” वाचेल. काही नेम नाही.
पण मराठीत “वेद” या शब्दाला कोणी “वेड” म्हणणार नाही — हे नक्की.
इंग्रजीत PUT म्हणजे “पुट”, पण BUT म्हणजे “बुट” नाही — “बट”!
मी म्हणालो ना — भाषांची गंमत असते!
सांख्य आणि संख्या
मी संजय उपाध्ये यांचे पुस्तकं आणि व्हिडिओ भरपूर पाहतो. त्यांच्या कडून एक छान विचार ऐकला होता — आपल्याला “सांख्य” कडून “संख्ये" कडे जायचं आहे.
“सांख्य” म्हणजे महर्षी कपिल मुनी यांचं तत्त्वज्ञान.
तत्त्वज्ञानाच्या वाटेला लोकं फारसं फिरकत नाहीत. ते महत्त्वाचं आहेच, पण जितक्या संख्येने ते वाचलं आणि अभ्यासलं गेलं पाहिजे, तितकं होत नाही.
जे नको तिथे सगळी संख्या गोळा झालेली असते.
आणि मोठ्या संख्येपुढे सांख्य कमी पडतं — किमान काही काळासाठी तरी.
म्हणून सांख्य मानणारे सगळे संख्येने एकत्र आले पाहिजेत.
एक छोटा बदल, मोठा अर्थ
मला आवडणारा एक श्लोक —
जय जय रघुवीर समर्थ
कल्पना करा — आपण सगळे एका कार्यक्रमात जमलो आहोत. गप्पा, कविता, गोष्टी झाल्या. शेवटी मी म्हणालो, “आता आपण सगळे मिळून हा श्लोक म्हणूया.”
पहिल्या दोन ओळी सुंदर एकसंध जातील.
पण तिसरी ओळ आली की गडबड!
पुरुष मंडळी म्हणतील — “मी ठेवितो मस्तक…”
महिला मंडळी म्हणतील — “मी ठेविते मस्तक…”
एकसंध आवाज तुटेल.
एक प्रयत्न “संख्या” दाखवण्याचा — पण तिथेही भंग.
यावर उपाय काय?
मराठी भाषा — हाच पर्याय
फक्त एक शब्द बदलूया.
“मी ठेवितो मस्तक” ऐवजी
“आम्ही ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी…”
आता सगळे मिळून म्हटलं तर?
आवाज एकसंध, खणखणीत, सुंदर!
आधी का नाही आला?
कारण तिथे “मी” होता.
“मी”चं “आम्ही” झालं — आणि अर्धे प्रश्न संपले.
चाल, ताल, मन — सगळं एकत्र आलं.
ही गंमत मला मराठी भाषेत जाणवते.
कधी कधी मला वाटतं — हे सगळं इंग्रजीत लिहावं. माझे पत्र मर्यादित लोकांपर्यंत का जावे? जगभर सगळ्यांनी वाचावं! पण प्रत्येक वेळी मन सांगतं — मराठीत सांगण्याची मज्जाच वेगळी असते. कारण मराठी फक्त भाषा नाही, ती आपुलकी आहे, ती भावना आहे, ती जोड आहे. “मी” पासून “आम्ही” कडे नेणारी हीच आपली मायबोली. म्हणून आज मराठी मातृभाषा दिनानिमित्त (आज म्हणजे २७ फेब्रुवारी) आपण एक वचन देऊया — मराठी बोलूया, लिहूया, वाचूया आणि अभिमानाने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया. मराठी मातृभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! जय महाराष्ट्र!
भेटूया पुढच्या रविवारी.
पुढचा रविवार येईपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि मराठी बोलण्यात, लिहिण्यात, वाचण्यात व्यस्त रहा.
धन्यवाद 🙏
पुढच्या रविवारी सकाळी ९ वाजता भेटूया.
जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा
👉 Email Newsletter Join करा

0 Comments