जगात सगळ्यात मोठ्ठ काय?

।। श्री ।।


सप्रेम नमस्कार, विनंती विशेष,

        मागच्या आठवड्यात आपण एखाद्याची मदत करणे किंवा एखाद्याची मदत घेणे यावर गप्पा मारल्या. ‘गप्पा मारल्या’ म्हणजे तेच हो—मी लिहिलं आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार वाचलं! सारा one-way कारभार! पण या इतक्या धावपळीच्या जगात मी तुमची प्रत्येक रविवारी आठवण काढतो, आणि तुम्हालाही या पत्राच्या निमित्ताने माझी आठवण येते—ही माझ्यासाठी फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे बरं. त्यासाठी once again — thanks a lot!

        मला नेहमी असं वाटतं की या पत्रांचे खूप वाचक असावेत. किती? तर इतके की जगात सर्वांत जास्त संख्येत कुणी असतील, तर रविवारी येणाऱ्या अजिंक्यच्या पत्राचे वाचक. वाचकसंख्या वाढेल तेंव्हा वाढेल, पण खरं पाहता जगातली सगळ्यात मोठ्ठी गोष्ट कोणती ठाऊक आहे का तुम्हाला? चला, त्याच विषयी बोलूया आजच्या पत्रात. Let’s go!


बिरबल सांगतो—सगळ्यात मोठ्ठं काय असतं ते!


तर काय झालं की, एकदा अकबराने आपल्या दरबारात उपस्थित असलेल्या सर्वांसमोर एक प्रश्न विचारला,

“या जगात सगळ्यात मोठ्ठं काय आहे?”

        नेमकं त्याच वेळी दरबारातील सगळ्यात चतुर व्यक्ती—बिरबल—दरबारात हजर नसतो. हजर असलेल्या एकालाही बादशहाच्या कोड्याचं उत्तर देता येत नाही. मग काय! अकबर भयंकर चिडतो! तो म्हणतो,

“आज संध्याकाळपर्यंत जर मला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, तर याद राखा! तुम्हा सर्वांची सरदारकी गेली म्हणून समजा! आणि हे असले मूर्ख मंत्री पदरी बाळगायला मी काही मूर्ख बादशाह नाही. तुम्हा साऱ्यांचे पुढच्या तीन महिन्यांचे पगार बंद करून टाकीन!”

        बादशहाचा अवतार पाहून आता मात्र सगळे मंत्री घाबरले. ते दिवसभर खूप विचार करतात पण त्यांना काही उत्तर मिळत नाही. शेवटी एकच पर्याय उरतो—बिरबलाकडे धाव घेणे. ते सारे बिरबलाकडे येतात आणि सगळा प्रकार सांगतात.

बिरबल हसतो आणि म्हणतो, “मी तर नव्हतोच दरबारात. मला काय घेणंदेणं! तुमचं तुम्ही बघा. तुम्हीच उत्तर द्या आणि बघा काय होतं ते.”

        पण सगळे बिरबलाच्या हातापाया पडतात. सरदार म्हणतात, “आमची सरदारकी जाईल.” मंत्री म्हणतात, “आमची नोकरी जाईल.”

शेवटी बिरबलाला दया येते. तो म्हणतो,

“ठीक आहे! असं करा—एक पालखी, ढोल आणि हत्ती घेऊन या. आपण संध्याकाळी बादशहाला भेटून उत्तर देऊया.”

        संध्याकाळी सगळे दरबारी बिरबलाने सांगितलेले सामान घेऊन पोहोचतात. बिरबल पालखीत बसतो आणि सर्वात शक्तिशाली सरदारास म्हणतो, “पालखी उचला आणि मला दरबारात घेऊन चला.”

ह्या अपमानाने सरदार भडकतात. तेंव्हा बिरबल म्हणतो,

“बघा, बादशहाला उत्तर द्यायचं असेल तर मला असंच न्यावं लागेल. नाही तर मला काही फरक पडत नाही. आपलं सामान उचला आणि निघा इथून.”

        आता करणार काय! नाइलाज होता. एवढे बाहुबली सरदार, मोठमोठे मंत्री—सारे बिचारे बिरबलाच्या पालखीचे भोई होतात आणि वाजतगाजत त्याला दरबारात घेऊन येतात.

अकबर हा प्रकार पाहून विचारतो, “हे काय चालू आहे?”

बिरबल म्हणतो,

“महाराज, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. जगातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गरज. ती कितीही मोठी होऊ शकते. हे सगळे मंत्री रोज मला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. पण आज त्यांची गरज होती तर त्यांनी मला खांद्यावर उचलून इथे आणलं.

आपल्या आज्ञेनुसार उत्तर संध्याकाळी मिळालं—आता ह्यांच्यावर आपली खप्पामर्जी होण्याची गरज नाही.”


अकबर बिरबलाच्या चातुर्यावर खूश झाला.


कार्टून नेटवर्क’चा वेळ संपायचा!

        

        ही गोष्ट सांगण्यामागचं कारण कळलं का? गरज किती मोठी होऊ शकते आणि गरजेपायी आपण किती खाली उतरू शकतो हे दाखवणे.

आज आपल्या गरजा अशाच वाढल्या आहेत.

        माझ्या लहानपणी मुलांचं एकमेव चॅनेल होतं—Cartoon Network. ते रात्री ९ वाजता बंद व्हायचं.

नवीन वाचकांना हे खोटं वाटेल.

“असं चॅनेल कधी बंद होतं असतं का?”—असा प्रश्न नक्की मनात येईल.

पण त्या वेळी असं होतं!

कदाचित मुलांनी जास्त टीव्ही बघू नये म्हणून…

किंवा त्यांच्या कडे अजून चोवीस तास दाखवायला कंटेन्ट नव्हता म्हणून…

माहिती नाही, पण तो काळ चांगला होता.


आज चोवीस तास कोणतंही चॅनेल बघूनही अजून बघावंसं वाटतं—इतकं कंटेन्ट आहे!

आणि आपण फक्त तेच बघत बसावं अशीच चॅनेलवाल्यांची इच्छा.


म्हणून टीव्ही–मोबाईल गरजेपुरतेच असावेत. नाहीतर—एक सिरीयल काय, दोन काय; हिंदी, मराठी, इंग्लिश—OTT वेगळं, YouTube वेगळं, TV वेगळं; कार्टून, अॅनिमे, सिनेमे—कशालाही लिमिट नाही.


मी थोडा वेळ काढून लिमिटमध्ये भरपूर बघतो, भरपूर वाचतो आणि बऱ्याचदा तुम्हाला सुचवतोही की ते वाचण्यासारखं आहे, ते पाहण्यासारखं आहे.

तुम्हीही जर माझ्यासारखाच limit-set करून काही चांगलं कंटेन्ट consume करत असाल तर ते मला नक्की कळवा.

गरज किती मोठी आहे?

गरज कधीच संपत नाही—हे आपण बिरबलाच्या गोष्टीतून पाहिलं.


आजच्या पत्रात ओवी नाही, श्लोक नाही.

आजचं पत्र एकच सांगतंय — Action घ्या.


आजच्या कंटेन्टच्या जगात आपण भरपूर बघतो, भरपूर वाचतो.

पण यश Action घेण्यानेच मिळतं, हे आपण विसरलो आहोत.


आपण काय करू शकतो?

फोनच्या सेटिंगमध्ये वेळ खाऊन टाकणाऱ्या appsना टायमर लावा.

Updated राहण्याची गरज आता सवय बनते आहे.

मग आपण परत परत WhatsApp, Instagram वगैरे उघडत राहतो. ते योग्य नाही.


बाकी गरजा प्रत्येकाच्या हातात आहेत.

पण कंटेन्टची गरज तरी कमी करण्याचा प्रयत्न या पत्रापासून सुरू करूया.


आज सगळे Subscribe करा असं म्हणतात.

आज मी उलट सांगतो —

Unsubscribe करा!

त्या प्रत्येक गोष्टीला जी तुमच्या २४ तासांच्या वेळेतून खूप काही खाऊन टाकते.

माझी पत्रं तुम्ही रविवारी वाचून वेळ देता—पण त्यातून तुम्हाला काही शिकून आयुष्यात काहीही उपयोग होत नसेल, तर मला सुद्धा unsubscribe करा.

पण unsubscribe करून मिळालेला वेळ — शिकलेलं implement करण्यात वापरा.

भेटूया पुढच्या पत्रात.

तोपर्यंत — स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि शिकलेलं implement करण्यात व्यस्त रहा!

आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.







Post a Comment

0 Comments