।। श्री ।।
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष,
हे पत्र वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार. प्रत्येक आठवड्यात लिहिणं जितकं अवघड, तितकंच वाचणंही अवघड असतं, असं मला वाटतं. पण तुम्ही वेळ काढून वाचता आणि वाचून प्रतिसादही देता, म्हणून विशेष आभार.
आज आपण जाणार आहोत बिझनेसच्या Quality Shop Floor वर — कसं ते बघूया!
आणि नेहमीप्रमाणे, त्या शॉप फ्लोअरवर वापरात येणारी एखादी संकल्पना जुन्या ग्रंथात सापडते का, तेही पाहूया. लेट्स गो!
सुधारणा करण्याची PDCA पद्धत
बिझनेस किंवा जॉब करणाऱ्यांनी आणि त्यातही ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करणाऱ्यांनी कदाचित् हा शब्द ऐकला असेल - PDCA अर्थात् Plan - Do - Check - Act.
कामाची किंवा प्रॉडक्ट ची Quality चेक करण्यासाठी आणि त्यात रोज थोडी थोडी सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही पद्धत बहुतेक साऱ्याच उद्योगांत वापरली जाते. ही पद्धत डॉ. विल्यम एडवर्ड डेमिंग यांनी इ.स. १९५० मध्ये विकसित केली. डॉ. डेमिंग हे एक मॅनेजमेंट कन्सल्टंट होते. हीच पद्धत बिझनेस मध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध पद्धत म्हणूनही ओळखली जाते. फार अवघड काही नाही. ही एक अगदी सोपी पद्धत आहे. आपण सुद्धा बऱ्याचदा नकळत हीच पद्धत वापरत असतो.
P म्हणजे Plan — म्हणजेच आधी नियोजन करायचं.
D म्हणजे Do — तो प्लॅन यशस्वी रीतीने पूर्ण करायचा.
C म्हणजे Check — अर्थात तपासणे.
आपण तपासायचं की आपण प्लॅनप्रमाणे वागलो का?
A म्हणजे Act — तपासणी (Check) चा जो काही निकाल येईल, त्यावरून प्लॅनमध्ये आवश्यक बदल करायचे, आणि मग ही चारही पावलं परत परत करत राहायची.
आता थोडं स्वतःशीच विचार करून सांगा — अगदी हीच पद्धत अवलंबून आपण नवीन काहीही करायला शिकत नाही का? जरा आठवून बघा, तुम्ही सायकल चालवायला कसे शिकलात?
आधी ठरवलं की “सायकल शिकायची आहे” — हा झाला प्लॅन (P).
मग सायकल घेऊन प्रयत्न केले — म्हणजे डू (D).
नंतर चेक (C) केलं — जमतंय का? भीती वाटतेय का? सायकल धरायला कोणी हवंय का?
त्या प्रमाणे पुन्हा ऍक्ट (A) केलं — म्हणजे सायकलला balancing wheels लावलेत, किंवा कुणाला तरी सायकल धरायला सांगितलं.
आणि हेच परत परत करत करत आज आपण इतके एक्स्पर्ट झालो आहोत की मोबाईल एका कानात आणि खांद्यावर धरून संपूर्ण ट्रॅफिक पार करतो! (असं करू नका! असं करणाऱ्याला एक्स्पर्ट नव्हे तर ओव्हर-कॉन्फिडंट म्हणतात! असं केल्याने स्वतःसोबत इतरांचाही जीव धोक्यात येतो!)
मुद्दा असा की, अशा प्रकारे Continuous Improvement म्हणजेच सातत्याने सुधारणा होत राहते. कधी काळी सायकलवर बसायची भीती वाटायची, आणि आज कुठलीही गाडी आत्मविश्वासाने चालवतो. हा झाला बिझनेस मधला कन्सेप्ट.
आता नेहमीप्रमाणे बघूया — समर्थ आपल्याला PDCA कशा पद्धतीने समजावून सांगतात ते.
दीर्घसूचना म्हणजे लॉंग टर्म प्लँनिंग!
म्हणौन असावी दीर्घसूचना । अखंड करावी चाळणा ।
पुढील होणार अनुमाना । आणून सोडावें ।। १२ ।।
समर्थ म्हणतात की विवेकी माणसाच्या ठिकाणी दूरदृष्टी असावी. त्याने निरंतर परिस्थितीचा अंदाज घेत रहावा आणि विचारशक्तीच्या सहाय्याने पुढे काय होऊ शकतं, याचं अनुमान करावं.
मी जसं नेहमी म्हणत असतो - जुने शब्द एकदा समजून घ्यावे लागतात. त्या काळातले समर्थांचे शब्द आजच्या काळानुरूप लावून घ्यावे लागतात.
दीर्घसूचना म्हणजे लॉंग टर्म प्लँनिंग,
चाळणा म्हणजे अनॅलिसिस,
अनुमाना म्हणजे प्लॅन्स.
शब्दार्थ समजून घेतला. आता समर्थांचा लक्ष्यार्थ समजून घेऊया. अहो, समर्थ PDCAच सांगत आहेत!
थोडा विचार केल्यावर मला तर असं वाटलं की समर्थ PDCAचं नेक्स्ट व्हर्जन सांगत आहेत. बघा न - PDCA मध्ये फक्त प्लॅन येतो. पण समर्थ मात्र दीर्घसूचना म्हणतात - अर्थात् लॉंग टर्म प्लॅन कर. शॉर्ट टर्म नको. प्लॅन हा लॉंग टर्म असावा आणि त्याला छोट्या-छोट्या गोल्स मध्ये distribute करून मग काम करावं. समर्थ पुढे म्हणतात - चाळणा कर. अर्थात् चेक कर की जे ठरवलं होतं त्याच प्रमाणे सगळं झालं का? नेमकं हेच आपण विसरतो. काम करण्याच्या गडबडीत, ते काम कशासाठी करतो आहोत हेच विसरून जातो. काय साध्य करण्यासाठी काम सुरू केलं होतं हे आपण विसरतो.
आपल्या कामात, काम करायच्या पद्धतीत काही बदल अपेक्षित आहे का? कामामधे, स्वतःच्या जगण्यामधे, "चाळणा" केली, अनॅलिसिस केलं तरच हे समजू शकेल न!
आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं - समर्थ म्हणतात, "पुढे जे होणार आहे, ते आत्ताच आणून सोड." इतकं परफेक्ट प्लॅनिंग असावं आणि त्या प्लॅनचं कामात रूपांतर व्हायला हवं.
मी आजवर अनेक यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती ऐकल्या आहेत. त्यात जर कधी असा प्रश्न विचारला गेला - "इतका मोठा गोल achieve करून आज काय वाटतंय तुम्हाला?" तर बरेचदा त्या यशस्वी लोकांचं एक विशिष्ट उत्तर असतं. एकदा एका ग्रेट क्रिकेटर ने उत्तर दिलं होतं - "मला फार काही वेगळं वाटत नाही, कारण मी हे रोज माझ्या कल्पना शक्तीने पाहत असतो. तुम्हाला वाटतं की मी इतके रन्स काढले, थकलो नाही कां? पण मी रोज इतके रन्स काढले ही कल्पना करूनच जगतो. त्यामुळे हे घडलं तेंव्हा, त्यात मला फार काही नवीन, वेगळं असं वाटलं नाही."
एक शब्द तुम्ही कदाचित ऐकला असेल - "मॅनिफेस्टेशन". तुम्ही जसा विचार करता तसं घडतं आणि माझा ह्या वर पूर्ण विश्वास आहे. कुठलीही गोष्ट ही दोनदा घडत असते - एकदा डोक्यात, म्हणजे कल्पनेमध्ये आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात. मी मॅनिफेस्टेशन विषयी वाचले आहे आणि शिकलो सुद्धा आहे. त्यामुळे असेल पण मला तर समर्थ मॅनिफेस्ट करून जे उद्या होणार आहे ते आजच आणून सोड हे सांगत आहेत असं वाटलं.
आहे की नाही हे PDCA च बेटर व्हर्जन? तुम्हीच सांगा.
त्या पुढे तर समर्थ आणखी छान सांगतात.
म्हणौन दीर्घसूचनेचे लोक । त्यांचा पाहावा विवेक ।
लोकांकरितां लोक । शाहाणे होती ।। १६ ।।
समर्थ उपदेश करत आहेत की असे लॉन्ग टर्म प्लॅनिंग करणाऱ्या लोकांकडे बघ. ते कसे विवेकाने, ठरवून, ठामपणे वागतात ते पहा . असे लोक पाहून, त्यांचं अनुकरण करून पुढचा पण शहाणा होतो.
आता प्रश्न हा आहे की आपण कधी शहाणे होणार? आपण कधी लॉन्ग टर्म प्लॅन करून, त्या प्रमाणे वागून, जे वागलो त्याचं अनॅलिसिस करून जे होणार आहे त्याला कसे आजच आणून सोडणार? हे सगळं आपल्याच हातात आहे.
असो. वर्षाचा एकच महिना शिल्लक आहे. मग परत आलाच जानेवारी महिना! साऱ्यांची "एक जानेवारी पासून नक्की करेन" असं म्हणायची वेळ आली आहे. पण पुढच्या वर्षीपासून एक गोष्ट लक्षात ठेऊन करूया - डिसेंबर मध्ये, १ जानेवारीला आपण जे ठरवलं होतं ते रोज करत आहोत कां, हे ही बघायला विसरू नका.
भेटूया पुढच्या पत्रात. तोपर्यंत — स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि स्वतःच्या Improvement साठी PDCA पद्धत वापरण्यात व्यस्त रहा!
धन्यवाद!
आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.
आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.


0 Comments