।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष
नमस्कार स्वागत आहे आपले माझाव्यापार च्या एका नवीन पत्रामध्ये. या आठवड्यात नेमकं कुठल्या विषयावर लिहावं ह्या साठी मला अर्धा सेकंद पण लागला नाही. कारण लिहिण्यासारखं काही पाहिलं, वाचलं, अनुभवलं तर लिहिण्यात मजा आहे ना. मी काही कन्टेन्ट क्रिएटर नाही ज्याला रोज काही ना काही कारण काढून लोकांनी बघावं असं काही तरी रिल्स, व्हिडिओ, फोटो काहीतरी टाकावंच लागत.
एक कन्टेन्ट क्रिएटर वाली गोष्ट करतो. आमचे लेख प्रत्येक आठवड्यात वाचायचे असतील तर खालील पैकी एक मार्ग तुम्ही निवडू शकतात.
ई-मेल लिस्ट मध्ये सहभागी होण्या साठी इथे क्लिक करा. ई-मेल द्वारे पत्र व्यवहार.
टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार टेलिग्राम चॅनल.
व्हॅट्सऍप चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार व्हाट्सऍप चॅनल.
बघायला गेलं तर मी आणि माझी टीम, आम्ही कॉन्टेन्टच बनवतो आहोत.आठवड्याला आम्ही मिळून लेख लिहिण्याचे काम करतो. पण ह्यावरच जगायचं आहे म्हणून आता काहीही बनवू, लोकं येतील, व्हिवझं मिळवू, पैसे कमवू असले विचार अजून तरी आमचे नाहीत. आम्ही आमच्या प्रोफशन मधे भरपूर बिझी असतो आणि वेळ काढून आम्हाला आवडलेल्या गोष्टी ब्लॉग्स, लेख ह्यांच्या द्वारे आमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत पोचवतो.
या आठवड्यात मी एक कमाल चित्रपट पहिला नेट्लफ्लिक्स वर. “महाराजा” चित्रपट प्रेमींनी नक्की वेळ काढून बघावा असा हा चित्रपट आहे. तर आजचा लेख हा ह्याच चित्रपटाबद्दल आहे. माझा हा २-३ मिनिटाचा छोटासा लेख तुम्हाला नक्कीच मदत करेल हे ठरवायला की हा चित्रपट खरंच बघावा का?
चित्रपटा बद्दल सांगण्याआधी मला एक गोष्ट सांगावी वाटते. गोष्ट म्हणजे एक कन्सेप्ट जो मला योग्य वयात कोणीतरी सांगितला, तो मला समजला आणि मी तो वापरला सुद्धा. आजकाल झालं काय आहे इन्फॉरमेशन आपल्याला चहू बाजूनी येऊन धडकते. ती कशी पचवावी, त्या वर काय प्रतिक्रिया द्यावी, त्यातून काय बोध घ्यावा हा विचार करायला वेळ उरलेलाच नाही. इतके तर सगळे बिझी झाले आहेत. नेमकं कश्यात बिझी आहेत? हा विचार करायला ही वेळ नाही. इतके बिझी आहेत सगळे.
हे जे मी आत्ता सांगितलं हे झालं मोठ्या लोकांचं. पण विचार करा जर कोणी लहान आहे आणि त्याच्या डोक्यावर अश्याच प्रकारे सतत काही ना काही माहिती येऊन पडती आहे. वेगवेगळ्या माध्यमातून ती येती आहे. मोठ्यांचं एक वेळ आपण समजून घेऊ शकतो की ते काय बरोबर, काय चूक, काय स्वतःसाठी चांगलं, काय स्वतःसाठी वाईट हा विचार करू शकतात. त्या प्रमाणे वागतातच का हा वेगळा विषय आहे. पण निदान समजू तरी शकतात. पण विचार करा त्या लहान मुलाचा, मुलीचा, त्यांच्या त्या डेव्हलप होणाऱ्या, Curiosityने, कुतूहलाने भरलेल्या मनाचं काय?
माझ्या घरात पण असेच लहान मुलं आहेत ज्यांचं डोकं कुतूहलाने पूर्णपणे भरलेलं आहे. हे नको बघू, ते नको बघू, हे छान नाही, हे वाईट आहे, हे मी कितीदा आणि कधी कधी सांगणार. लहानपणी ठीक आहे. पण जसे ते मोठे होणार मी त्यांच्या सोबत २४ तास असणे हे तर शक्य नाही. मग अश्याना कसं समजून सांगावं हा प्रश्न माझ्या डोक्यात होता. तेंव्हा मी त्यांना, खूप खूप वर्षा पूर्वी एक राजहंस होता आणि त्याची एक वेगळीच सुपर पॉवर होती ती तुम्हाला पण मिळू शकते अशी कल्पना करून एक गोष्ट सांगितली.
मी माझ्या भाच्या भाच्चीला सांगितलं की, “एक राजहंस होता त्याची सुपर पॉवर अशी होती की तो त्याला काहीपण आपण मिसळून दिलं खाण्याचं किंवा त्या पेक्षा अवघड पिण्याचं तो ते वेगळं करू शकतं होता.”
“म्हणजे कसं?” हा प्रश्न लगेच आला जो मला अपेक्षित होता.
मी म्हणालो, “मी जर तुम्हाला एका ग्लासात पाणी आणि दूध हे दोन्ही मिक्स करून दिलं तर तुम्हाला ते वेगळं करून पिता येऊ शकतं का?”
दोघे मला नाही म्हणले. “पण हीच पॉवर आहे ह्या राजहंसा कडे. मी जर त्याला एका भांड्यात दूध आणि पाणी मिक्स करून दिलं तर तो त्याच मिक्स झालेल्या दूध आणि पाण्यात आपली चोच घालून फक्त दूध किंवा पाणी पाहिजे ते पिऊ शकतो. तुम्हाला अशी सुपर पॉवर मिळाली तर कसं वाटेल.”
दोघे उद्या मारायला लागले. आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे ओरडत नाचायला लागले.
आता इतकी मोठी पॉवर अशीच कशी देणार म्हणून मी त्यांना मांडी घालून बसवलं ४-५ वेळेला दीर्घ श्वास घ्या सोडा असं काही तरी करून घेतलं, ओम म्हणून घेतलं ४-५ वेळेस आणि त्यांना म्हणालो पॉवर आली आहे. या आता इकडे. दोघे आनंदाने आले.
मी प्रश्न विचारला, “ओजस तू मला म्हणाला होतास ना की तुमच्या क्लास मधे एक मुलगा आहे. तो खूप हुशार आहे. वर्गात पहिला येतो पण तो टीचर समोर नसताना खूप शिव्या देऊन बोलतो.” मग तू त्याच्या कडून नेमकं काय शिकणार.
ओजस नी अगदी एका सेकंदात उत्तर दिल, “मी त्याच्या सारखा अभ्यास करणं शिकेन आणि तो शिव्या देत बोलतो ना तसं नाही बोलणार.” मी लगेच म्हणालो, “ बघ जमलं ना कसं तू दूध आणि पाणी वेगळं केलं? बोलो होतो मी पॉवर आली आहे म्हणून.”
आजची ते मला वेगवेगळ्या गोष्टींमधून दूध आणि पाणी वेगळं करून सांगतात. मला हे शिकवणं का महत्वाचं वाटलं कारण चांगले वाईट गूण प्रत्येकातच आहेत की. कुठला गुण घ्यावा आणि कुठला टाकावा हे शिकणं जास्त महत्वाचं आहे.
आता हेच उदाहरण मोठ्यांना कसं लागू पडतं बघा. खूप वर्षांपासून आपल्या संपूर्ण भारतीयांवर चित्रपटांचा इम्पॅक्ट हा भरपूर आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. आपण चित्रपट, क्रिकेट ह्या विषयांमुळे एकत्र येतो. त्यात वाईट काही नाही. प्रत्येकाची आवड. पण मी कॉलेजला असताना मोठ्या स्क्रीन वर जॉनला सिगरेट घेताना पाहिलं आणि तेंव्हापासून ही सवय मला लागली, ह्याला निव्वळ मूर्ख पण म्हणतात.
कारण जॉन हा एक ऍक्टर आहे. तो ऍक्टिंग करायचं त्याचं काम चोख पणे पार पाडतो आहे. त्याचं कामाचं हे आहे की तो चांगला किंवा वाईट ज्या कुठल्या व्यक्ती ची भूमिका करतं असेल ते पाहणाऱ्याला खरं वाटावं. परत सांगतो आहे “खरं वाटावं” म्हणजे खरं नाही, पण ते वाटावं ह्याचा त्याने कित्तेक वर्ष अभ्यास आणि सराव केलेला आहे.
कदाचित तो खऱ्या आयुष्यात सिगरेट ला हातही लावत नसेल आणि खूप जास्त फिटनेस कडे लक्ष देणारा व्यक्ती असेल पण स्क्रीन वर हेच जी भूमिका लिहिली गेली आहे तसा किंवा हा तोच आहे असा तो वाटला पाहिजे. कदाचित खऱ्या आयुष्यात त्याने कधी कोणाला मारलं पण नसेल पण चित्रपटात जर तो १० जणांना धरून मारतो आहे असं दाखवलं तर ते खरं वाटावं हेच तर काम लेखक, डायरेक्टर, ऍक्टर, म्युसिक, लाईट, व्ही एफ एक्स हे सगळे मिळून करत असतात आणि ते त्यांचं काम चोख पार पाडतात. काही काही माझ्या आवडीच्या लेखक दिग्दर्शकांचे काम बघून मी खूप जास्त प्रभावित होतो.
तर हा भाग चित्रपट बघणाऱ्या प्रत्येकाला समजायला हवा. नाही समजला तर आपण कधी त्या मधला आनंद घेऊच शकणार नाही. ते म्हणतात ना डोळे सगळ्यांना आहेत पण दृष्टी फार कमी लोकांना असते. त्या मधला हा भाग. चांगल्या गोष्टी घेऊया बाकी सगळं जिथे आहे तिथेच राहू देऊ.
शेवट पाहून हात-पाय कापले असा माझ्या आयुष्यातला पहिला चित्रपट
आता “महाराजा” चित्रपटा बद्दल सांगतो म्हणून मी हे काय भलतंच सुरु केलं आहे असं वाटलं असेल तर वाटू द्या पण हे सांगणं फार महत्वाचं होता. कारण महाराजा ह्या चित्रपटात किळस येईल अशी मारा-मारी, स्मोकिंग, रेप, चोरी, बदला घेणे असे बरेच विषय आहेत. जे नक्कीच आपण चर्चा करणे टाळतो. ह्यात चांगलं आहेच काय की ज्या वर आपण बोलणार? आणि असे काही दृश्य आपण घरच्यांसोबत चित्रपट बघताना दिसले तर नक्कीच आपण चॅनेल बदलतो.
पण दुसरी बाजू अशी की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार पण झाला पाहिजे. म्हणजे उदाहरण जर चित्रपटात अतिप्रसंग दाखवला, तर नक्कीच ते बघायला छान वाटतं नाही. पण त्याच्या पुढे ज्या व्यक्ती वर हा प्रसंग झाला तिचं काय? ज्याने केला त्याचं काय? हे विषय मांडले जात नाहीत. फार तर फार काय फाशी झाली म्हणून दाखवतील. पण जे काही ह्या चित्रपटात दाखवलं आहे ते पाहिल्यावर पाया खालची जमीन सरकणार हे नक्की.
आपण म्हणतो ना “कमजोर दिल वालो के लिये नही हें” त्या मधला हा प्रकार आहे. चोरी करणे नक्कीच चुकीचं आहे, रेप करणे नक्कीच चुकीचं आहे, खोटं बोलणे, नक्कीच चुकीचं आहे, पोलीस स्टेशन मधे काम करून चोरांना मदत करणे नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. त्यात भरतीला मला कोण काय करणार आहे. माझा सपोर्ट चांगला आहे असा विचार केल्या मुळे पुढे काय काय होऊ शकतं ह्याची एक झलक हा चित्रपट दाखवतो.
तुम्ही प्रत्येकाने कर्मा बद्दल ऐकलं असेल, What goes around Comes around, जे पेराल तेच उगवेल. ही म्हण समजून घ्यायची असेल तर हा चित्रपट नक्की बघा.
ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत नीथीलंन स्वामीनाथन. मी ह्यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट पहिला. खरं सांगोत चित्रपटाचा शेवट पाहिल्यावर माझे पाय कापत होते. असं काही तरी मी आत्ता पर्यंत कधीच पाहिलं किंवा अनुभवलं नव्हतं.
हा चित्रपट म्हणजे महाराजा म्हणजे विजय सेथुपती आणि त्याची लहान मुलगी ज्योती आणि त्यांच्या घरात असलेल्या डस्टबिन ज्याला ते दोघे लक्ष्मी म्हणतं असतात ह्या तिघांची गोष्ट आहे. ह्या तिघांचं एक मेकांवर किती प्रेम असतं आणि त्या प्रेमासाठी ते किती धडपड करतात हे बघण्यात खरोखर आनंद मिळतो आणि शेवटी मिळणाऱ्या मसेज मुळे नक्कीच अंगावर काटा येतो.
गोष्ट खूप साधी आहे पण ती ज्या पद्धतीने मांडली आहे ना ती खरोखर बघण्या सारखी आहे. आजकाल बदला, Revange, सूड घेणे, मनामध्ये एखाद्या बद्दल कपट धरून ह्याला आज नाही तर उद्या दाखवूनच देईल अशी भावना असणे हे व्यक्ती व्यक्तींच्या मनामधे वाढतंच आहे. तसंच वागत राहिलो तर एक दिवस काय होऊ शकतं ह्याचं उत्तर ह्या चित्रपटात नक्की मिळेल.
चित्रपट प्रेमींनी वेळ काढून, मोबाईल सायलंट करून हा चित्रपट बघावा असा हा चित्रपट आहे. पुन्हा एकदा सांगतो कमकुवत हृदयाच्या लोकांसाठी हा चित्रपट नाही. वडील आणि मुलीचं प्रेम कसं असावं, का कोणाबद्दल मनात द्वेष धरून ठेऊ नये, का बरं चोरी करून मिळवू नये, कर्मा जेंव्हा आपल्याला उत्तर देतो तेंव्हा नेमकं काय होतं हे सगळ्याचे उत्तरं एका चित्रपटात मिळतील. मन लावून बघितला तर.
बाकी तुम्हाला मी राजहंसाची गोष्ट तर सांगितलीच आहे. तुम्ही नक्कीच काय चांगलं घ्यावं आणि काय आपण करू नये म्हणून दाखवलं आहे हे नक्कीच समजू शकतात. नेटफ्लिक्स वर हा चित्रपट नक्की बघा आणि बघितला किंवा तुमची काही प्रतिक्रिया असेल तर नक्की कळवा.
भेटूया लवकरच
इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो.
आता तुम्ही हा लेख वाचून मला रिप्लाय केला तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना.
माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही.
तुमचा मित्र,
अजिंक्य कवठेकर
0 Comments