भारतीय संस्कृती मधला एक उत्कृष्ट सिद्धांत!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष, 

        आज रविवार आणि राम नवमी. या वर्षातले रविवार अगदी मला लिहायला विषय देण्याच्या हिशोबाने येतं आहेत. मी मागच्याच आठवड्यात विचार करतं होतो की या रविवारी काय लिहावं आणि मला आठवलं की रविवारी राम नवमी आहे. आता कसला लागतो विषय? रामानेच तर सगळे विषय दिले, आपण प्रत्येक आठवड्यात लिहावं हे सुचवणारा तो, माझ्या कडून लिहून घेणारा तो, तुमच्या कडून वाचून घेणारा तो, वाचून जर त्या मधे काही चांगलं सापडलं तर ते स्वतःच्या आयुष्यात घडवून आणणारा तो, आजच्या दिवशी काय अजून वेगळा विषय पाहिजे? 

    स्वागत आहे आपलं एका नवीन पत्रात. मागच्या रवीवारचं पत्र वाचायचं राहिलं असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकतात.👉 एक असं भांडण जे आजही कोर्टात चालू आहे. 

लक्ष्मण रेषा हिंदू धर्मातला अति उत्कृष सिद्धांत  

    मी आज लक्ष्मण रेषा नावाचा जो एक भाग आहे रामायणामधला त्या बद्दल बोलणारं (बोलणारं म्हणजे तेच नेहमीचं मी लिहिणार आणि तुम्ही वाचून मला नंतर रिप्लाय करणार) आहे. आपल्या सगळ्यांना ही कथा माहिती की लक्ष्मणाने त्यांच्या बाणाने एक रेष काढली आणि सीता मातेला सांगितलं की ह्या रेषेच्या बाहेर येऊ नका. वगैरे वगैरे.  

     पण तो लक्ष्मण रेषेचा सिद्धांत आजही किती उपयोगात पडतो बघा ना. त्या गोष्टी नुसार लक्ष्मण सीता मातेला म्हणाले, "ही रेषा तुमचं रक्षण करेल. या रेषेच्या बाहेर तुम्ही येऊ नका. कोणीही तुम्हाला मधे येऊन त्रास देऊ शकणार नाही." पण मग रावण आला त्याने बडबड करून, भीती दाखवून सीता मातेला बाहेर बोलावलं आणि मग पुढची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती. हे लक्षात घ्या आजही लक्ष्मण रेषेच्या बाहेर रावण उभा असतो.

        मी सांगतो लक्ष्मण रेषा हा आपल्या हिंदू धर्मातला एक उत्कृष असा सिद्धांत आहे. आज इतक्या प्रकारच्या गोष्टी इतक्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात की आपलं मन अगदी गोंधळून जातं. हे बरोबर का ते बरोबर, हे करू का ते करू, असं करू का तसं करू. या सगळ्या गोंधळामधे एक लक्षात ठेवायचं कुठेही लक्ष्मण रेषा ओलांडली तर रावण बसलेलाच आहे हे पक्क करून ठेवायचं. आपलं काम आहे त्या रावणाच्या बोलण्यामधे न येता रेषेच्या आत राहायचं. 

    बॉडी बिल्डिंग करणारे असतात ना स्पोर्ट्स प्लेयर्स त्यांचे एक नाही, किती तरी उदाहरणं आहेत जिथे त्यांनी खूप जास्त व्यायाम आणि खूप जास्त प्रोटिन्स घेतले आणि एक दिवस असा काही आजार झाला की ज्यामुळे ते बरे झालेच नाहीत किंवा त्यांचं अस्तित्व संपलं. इथे लक्षात घ्या. निरोगी रहाणं, फिट रहाणं, ताकद वाढवण्याचे व्यायाम करणं हे सगळं बरोबर आहे. केलंच पाहिजे. पण ज्याने रावणाचं ऐकून आपण भरभर बॉडी बनवू, आपण काही तरी जास्त प्रोटिन्स घेऊन कुठली तरी स्पर्धा जिंकू हे करण्याचा प्रयत्न केला त्यांना वेगवेगळ्या आजाराने धरलं. 

    आता ह्याचं उलटं बघा. कुठे व्यायाम करायचा! आयुष्य हे एन्जॉय करण्यासाठी आहे. मस्त पाहिजे ते खायचं, पाहिजे तेंव्हा खायचं आणि एन्जॉय करायचा. इथे सुद्धा पोटाची एक मर्यादा आहे. त्याच्या वर खाऊ शकतं नाही आपण. पण ती लक्ष्मण रेषा न ओळखता जो वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खातंच रहातो त्यालाही वेगवेगळे आजार येऊन धरतात. 

अरे मग मी व्यायाम करावा का सोडून द्यावा?

    मनुष्य हा एकच गोष्ट खूप जास्त करण्यासाठी बनलेला नाही. मी आत्ता परवा भारतातल्या एका मोठ्या ऍक्टरचा पॉडकास्ट ऐकला होतो. त्यांना विचारलं, "तुम्ही इतके चित्रपट बनवले, इतके पैसे कमवले, तुमच्या मुळे आज एक कंपनी चालू आहे, हे सगळं करताना काय तुमच्या कडून राहून गेलं इतक्या वर्षात असं तुम्हाला वाटतं?" त्यांनी उत्तर दिलं की मी माझ्या मुलांसोबत वेळ घालवायला पाहिजे होता. जे आज मला समजतं माझं चुकलं.

    चित्रपट क्षेत्रातला इतका मोठा व्यक्ती, इतकं काय काय मिळवून सुद्धा आनंदी नव्हताच. मग अश्या परिस्थितीत काय करावं? मी ज्या मोठ्या ऍक्टर बद्दल बोलतो आहे त्यांचंच उदाहरण घ्यावं तर त्याने फक्त चित्रपट बनवावे आणि आपल्या कुटुंबाकडे लक्षच देऊ नये किंवा कुटुंबाकडे लक्ष द्यावं आणि चित्रपट बनवणं सोडून द्यावं? वर वर बघायला जावं तर हेच उत्तर मिळत जिथे आपल्याला काहीतरी एक निवडावं लागतं.

    पण ज्याने रामायणाचा अभ्यास केला आहे, ज्याने ते समजून घेतलं हे ना, तो हे बरोबर ओळखतो. काहीतरी एक निवडण्याची गरज नाही. लक्ष्मण रेषा आखण्याची गरज आहे. चित्रपट क्षेत्रातले काही ऍक्टर, ज्याने लक्ष्मण रेषा आखली तो बरोबर दोन्ही ही करताना आपल्याला दिसतो. त्याचे चित्रपट पण येत असतात आणि त्याचं त्याच्या मुलांना, बायकोला, आई-बाबानां वेळ देणं हे पण शक्य होतं असतं.  

लक्ष्मण रेषेशिवाय टाईम मॅनेजमेंट अशक्य


    आपल्या कडे चोवीसच तास आहेत. आता जर मोबाईल, टीव्ही किती वेळ बघायचा याला लक्ष्मण रेषा लावली नाही तर वेळ तिथेच वाया जाईल. एका आठवड्यात कितीदा बाहेर जेवायचं ह्याला लक्ष्मण रेषा लावली नाही तर रोज आपण बाहरेच खाऊ. आफिसला किती वेळ आणि घरी किती वेळ ही लक्ष्मण रेषा लावली नाही तर तुम्ही काम-काम, बिझी-बिझी म्हणतं अडकलेले रहाणारा किंवा मला काहीच काम नसतं, माझं काम ऑनलाईन असतं असं म्हणतं ऑफिसचं काम वेळेवर न संपवणारे बिनकामाचे एम्प्लॉई तरी बनणार. गाडी कितीच्या स्पीड ने चालवणार ह्याला लक्ष्मण रेषा लावली नाही की अपघात होतो मग आपलं कोर्ट निबंध लिहायला सांगणार. माझं वजन मी किती ठेवणारं ह्याला लक्ष्मण रेषा लावली नाही तर ओबेसिटी नावाचा आजार कदाचित आयुष्यात येईल. कुठेही जा लक्ष्मण रेषा ही हवी.

    आजच्या रामनवमीच्या इतक्या छान आणि पवित्र दिवशी कुठल्या तरी आपल्या आयुष्यातला कामाला लक्ष्मण रेषा कशी लावता येईल हा विचार नक्की करा. कारण लक्ष्मण रेषेच्या बाहेर रावण तुमची वाट बघतं उभा आहेच. 

मला रामायणातलं काय आवडतं सांगू? 

         मला राम कथेमधलं जर काही सगळ्यात जास्त आवडतं तर ते आहेत वाल्मिकी ऋषी. लेखक बनायचं स्वप्न असणाऱ्या प्रत्येकाने असं काही लिहावं जे लोकं वाचतील आणि पुढच्या पिढीला देतील. हे शिकायचं असेल तर ज्याने कोणी करून दाखवलं त्या व्यक्ती ला बघावं, शिकावं लागेल का नाही? म्हणून मला बाकी सगळ्यांपेक्षा वाल्मिकी जास्त आवडतात. मी पण हळू हळू लेखक होण्याचा प्रयत्न करतो आहे ना. मग जर लेखक म्हणून कोणाचा आदर्श ठेवायचा तर तो म्हणजे वाल्मिकींचा. 

        कारण त्यांनी लिहिलेली कथा ही बेस्ट सेलर्सच्याही वर गेली आहे. बेस्ट सेलर पुस्तकं, किंवा हिट चित्रपट किती वर्ष वाचतो किंवा बघतो आपण? फार फार तर १ वर्ष. पण राम कथा ही एक अशी कथा आहे जी पिढ्यान पिढ्या चालत आली आहे. 

         त्या वाल्मिकी ऋषींना आणि त्यांच्या सारखं लिहिण्याच्या प्रयत्न करणाऱ्यां प्रत्येकाला नमस्कार. श्री रामानां नमस्कार आणि त्यांचे गुण स्वतःमधे ठेऊन मोठा होणाऱ्या प्रत्येकाला नमस्कार. लक्ष्मण रेषेसारखा सिद्धांत देणाऱ्या आणि लक्ष्मणा सारखा भाऊ बनायचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला नमस्कार. 

        मी आज जे काही लिहिलं आहे, ते मी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे ह्यांच्या प्रवचनात ऐकलं होतं. काही गोष्टी त्यांच्या आणि काही गोष्टी माझ्या आहेत. पण सुचलं त्यांना ऐकून म्हणून त्यांचं नाव इथे लिहिणं महत्वाचं आहे. भेटूया पुढच्या पत्रात. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या लक्ष्मण रेषेच्या आत सगळी काम करण्यात व्यस्त रहा. धन्यवाद. 

आमचे पत्र जर नियमित पणे ई-मेल वर मिळावे असं वाटतं असेल तर Subscribe करा आमच्या Newsletter ला इथे.


आणि हे पत्र जर नियमित व्हाट्सऍप वर मिळावे असं वाटतं असेल तर ही आहे आमची व्हाट्सऍप कम्युनिटी लिंक इथे.

आणि हो, एक सांगायचं राहील. तुम्हाला जर तुमच्या कुठल्या खास मित्राने हे पत्र पाठवलं आणि हे पत्र वाचून तुम्हाला वाटलं की, "किती सोप्या शब्दात कमीत कमी वेळ घेऊन कसल्या खास गोष्टी समजल्या रे!" माझाव्यापार चे आधीचे पत्र वाचायला मिळतील का? तर ही आहे लिंक इथे तुम्ही जुने पत्र (लेख, आर्टिकल, Newsletter, ब्लॉग) वाचू शकतात.

आणि असे खास लेख कधीही वाचायचे राहू नये म्हणून आमच्या पत्राला Subscribe करा.









Post a Comment

0 Comments