।। श्री ।।
#9
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
चला तर मग आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. बोलणार म्हणजे मी लिहिणार आणि तुम्ही वाचणार आहात. काय टेकनॉलॉजि मस्त झाली आहे ना. मी वेळ मिळेल तेंव्हा लिहितो, तुम्ही वेळ मिळेल तेंव्हा वाचतात आणि तरी आपलं बोलणं होतं. खरंच नीट वापर जमला पाहिजे टेकनॉलॉजिचा.
आता मागच्या ५ आठवड्यात मी तुम्हाला "द सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माईंड" हे पुस्तक माझ्या सोप्या शब्दात समजावून सांगितलं. आता आज काय लिहणार? एक सांगू का, आठवड्यातल्या एका दिवशी लेख लिहिण्यासाठी "कुठल्या विषयावर लिहावं" हा विचार पूर्ण आठवडाभर डोक्यात फिरत असतो.
हे जे लेखक असतात ना सिरिअल्स किंवा चित्रपट लिहिणारे कसे काय काय विचार करत असतील ना. खरंच कमाल आहे डोक्याची. लिहिण्यावरून सांगतो मला ना शिव महिम्न मधला एक श्लोक फारच आवडतो. इथे खाली लिहिला आहे बघा.
असित-गिरि-समं स्यात् कज्जलं सिन्धु-पात्रे।
सुर-तरुवर-शाखा लेखनी पत्रमुर्वी।।
लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं।
तदपि तव गुणानामीश पारं न याति।। ३२।।
वरती लिहिलेल्या संस्कृत श्लोकाचा अर्थ - समुद्राच्या पाण्यात काळ्या पर्वतासारखे काजळ घालून त्याची शाई केली, कल्पवृक्षाच्या फांदीची लेखणी केली आणि लिहिण्यासाठी पान म्हणून पृथ्वी घेतली आणि लिहिण्यासाठी विद्येची देवता प्रत्यक्ष सरस्वती सतत लिहीत बसली तरी हे ईश्वरा तुझ्या गुणांचा पार लागणार नाही म्हणजेज शेवट होणार नाही. एवढे गुण तुझ्यात आहे.
काय कमाल लिहिलं आहे ना? इतकी विचार शक्ती प्रत्येक लेखकाच्या लिखाणात यावी म्हणून हे सांगतो आहे. सागराच्या पाण्याकडून शाई तुम्हाला मिळावी, कल्पवृक्षाच्या फांदीचा पेन मिळावा आणि पृथ्वी कागद म्हणून समोर यावी आणि संपणार नाही इतके छान विचार तुमच्या म्हणजे लिहिणाऱ्याच्या मनात यावेत आणि वाचकांमध्ये सकारात्मक बदल घडावा. हे मला तो श्लोक वाचून वाटतं.
पण मी आज का बरं एकदम चित्रपट आणि शिव महिम्न, अध्यात्म, देवांमध्ये असलेली शक्ती हे असे विषय कुठून काढले आहेत? सांगतो. मी काही दिवसांपूर्वी हनु-मॅन नावाचा चित्रपट पहिला. म्हणलं ह्या विषयावर तर माझा ब्लॉग आलाच पाहिजे. आधीच मी सगळ्या सुपर हिरोंचा लहानपणीपासून फॅन त्यात जर कोणी हनुमान म्हणजे साक्षात बुद्धिमत्ताम वरिष्ठम ह्यांच्या शक्तींवर एक चित्रपट बनवणार असेल तर प्रेक्षक म्हणून मी आधी हजर पाहिजे.
मी कोणासोबत पहिला माहिती का हा मुव्ही? माझ्या ८ आणि १० वर्षाच्या भाच्या-भाच्ची सोबत. आम्ही खूप एन्जॉय केला. तुम्हाला या ब्लॉग च्या शेवटी सांगतो का बरं मुलांनी हा चित्रपट पहिलाच पाहिजे असं मला वाटलं ते.
तर हनु-मॅन हा प्रशांत वर्मा नावाच्या व्यक्तीने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला एक टिपिकल सुपर हिरोचा चित्रपट आहे. सुपर हिरोचा टिपिकल मी का म्हणालो कारण सगळ्या सुपर हिरो चित्रपटात एक गोष्ट सारखी असते. एक मुलगा असतो. मग त्यांना एक दिवस कुठून तरी दैवी शक्ती प्राप्त होते ज्या मुळे ते उडू शकतात, किंवा उड्या मारू शकतात, तो छोटा होऊ शकतो, मोठा होऊ शकतो, फास्ट पळू शकतो वगरे वगरे अशी काही तरी शक्ती मिळते.
हे सगळे हिरो त्यांच्या शक्तीचा आनंद घेतात पण नाण्याच्या दोन बाजू असतात ज्या मध्ये त्यांना ह्या शक्तीने होणारे दुष्परिणाम दिसू लागतात. मग एक वक्ती सुपर हिरोला ही शक्ती शाप नाही तर वरदान आहे हे समजावून सांगते आणि मग ह्या चित्रपटाच्या शेवटी ते आपण सुपर हिरो आहोत हे मान्य करून आयुष्य जगतात.
अश्याच प्रकारे जवळपास सगळे सुपरहिरोचे चित्रपट असतात. मग तुम्ही म्हणालं सगळे जर सारखेच असतात तर का सगळे बघायचे? तीच तर खरी मजा आहे. त्या प्रत्येकाच्या पॉवर्स, त्यांचा वापर करून केलेल्या सगळ्या फाइट्स, त्या पॉवर्स मुळे येणारे प्रॉब्लेम्स, त्या प्रॉब्लेम वर काढलेलं सोल्युशन आणि त्या मधून मिळणारी शिकवण हे सगळं वेगळं आहे. ते बघण्यातच खरी मजा असते.
हनु-मॅन
तर ह्या चित्रपटात एका मुलाला म्हणजे हनुमंतला जी पॉवर मिळते ती साक्षात हनुमानांची. ती कशी? तर ह्या कथेमध्ये लेखक सांगतात की जेव्हा हनुमानांना इंद्राने फेकलेलं वज्र लागले तेव्हा एक रक्ताचा थेंब हा समुद्रात एका शिंपल्यात पडला. त्या शिंपल्यामधून एक मोती बाहेर आला आणि तो मोती ज्याला मिळाला त्याला ही शक्ती मिळते. तो मोती योग्य व्यक्ती पर्यंत पोहचतो पण व्हिलन मग तो मोती, ती शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि मग बरंच काय काय होत.
तेलगू चित्रपट निर्मात्यांची कल्पक विचार शक्ती:
माझ्या मते भारताचा सुपर हिरो नसतो आपण सगळे भारतीय सुपर हिरोच आहोत. आपण खूप सारे सुपर हिरो पहिले आहेत जे पूर्ण पणे भारतात बनलेले आहेत. शक्तिमान, क्रिश असे काही. पण आपल्या पुराणांमध्ये डोकावून बघितलं तर तुम्हाला सुपर पॉवर आणि सुपर हिरो इतकंच दिसेल. काय एक एक विद्या होत्या ना आपल्या पूर्वजांकडे. मंत्रविद्या, शस्त्रविद्या, लिखाण, काव्य, स्तोत्र हे कुठल्या सुपर पॉवर शिवाय कमी नाहीत.
तर पुराणातल्या त्याचं सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन चित्रपटाची गोष्ट पुढे सरकवली आहे म्हणून बघण्यात रस जास्त निर्माण होतो. हनुमानाला इंद्राने फेकलेले वज्र लागले ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तिथून पुढे खऱ्या कल्पना सुरु होतात. ते वज्र लागून एक रक्ताचा थेंब पृथ्वीवर पडला त्याची एक पॉवर आहे. ही सगळी घडवलेली कथा आहे. किती काय काय होऊ शकतं बघा ना कल्पना शक्ती वापरून.
ह्या चित्रपटातली हनुमान चालीसा एकदा ऐकाच. परत परत ऐकावी वाटते. मी इथे लिंक देतो आहे. एकदा ऐका. कारण एकदा ऐकली की परत परत तुम्हीच ऐकत रहाल.
कसे हे साऊथ इंडियन चित्रपट निर्माते आपली कल्पना शक्ती वापरतात ना ते मला तरी बघायला आवडतं. तुम्हाला पण अशीच आवड असेल तर हा चित्रपट सोडला नाही पाहिजे.
लहान मुलांनी हा चित्रपट बघावा असं मला का वाटलं?
हे घ्या माझ्याकडून एक फ्री गिफ्ट!
आता प्रत्येक ब्लॉग मध्ये मी एक फ्री गिफ्ट देत असतो. तर ह्या ब्लॉग मध्ये एक यूट्यूब चॅनेल सांगतो जे माझ्या खूप कामात आलं आपले ग्रंथ, पुराण, कथा, भागवत, संस्कृती समजून घेण्यासाठी. कीर्तन विश्व हे नाव यूट्यूब वर सर्च करा आणि त्या वरचे आफळे बुवांचे कीर्तन आवर्जून ऐका.
माझा मनात कीर्तन ह्या विषयाचा अर्थ काहीसा वेगळाच होता. मी समजत होतो कीर्तन म्हणजे फक्त देवाचं नाव घेणे आणि हे पण सगळे असे लोकं करतात जे आता आपल्या कामातून निवृत्त झालेले आहेत. पण अगदी १-२ कीर्तनामध्येच माझ्या लक्षात आलं की मानवी जीवनाला वळणं लावण्याचं विलक्षण सामर्थ्य कीर्तन कलेमध्ये आहे. आणि हे निवृत्त होणारच नाहीत तर प्रत्येकाने ऐकावं. तरुणांनी तर आधी ऐकावं हे मला जाणवलं.
तर आजच फ्री गिफ्ट हेच आहे. तुम्ही नाही का नेटफ्लिक्स वर वेब सिरीज बिंज वाॅच करतात. एकाच रात्रीतून सगळे एपिसोड्स बघतात. तर आज श्रीरामांची कथा बिंज वाॅच करून बघणार का? अरे काय नाही ह्या कथेमध्ये!! आणि एकदा आफळे बुवांना ऐकाच. कसलं व्हीएफक्स आणि कसलं काय! तबला, पेटी पुरेसं आहे आणि कसलं चित्र उभं करतात डोळ्या समोर...वा रे वा...हे कीर्तन ऐकणाराच सांगू शकतो. अयोध्याधीश नावाची १२ एपिसोड्सची कथा आहे ती आवर्जून ऐका.
ई-मेल लिस्ट मध्ये सहभागी होण्या साठी इथे क्लिक करा. ई-मेल द्वारे पत्र व्यवहार.
टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार टेलिग्राम चॅनल.
व्हॅट्सऍप चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार व्हाट्सऍप चॅनल.
मी लिहिलेल्या छोटे लेख तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवा. हा लेख जर आवडला नसेल तर मला कळवा आणि छोट्या छोट्या लेखातून प्रत्येक मनात जाण्याच्या आमच्या प्रयत्नाला बळ द्या.
बऱ्याच वर्षांनी मराठी लिहितो आहे. लिहिण्यामध्ये जर कुठे गडबड जाणवली तर भावनेकडे लक्ष द्या इतकीच विनंती.
कळावे लोभ असावा,
तुमचा मित्र,
0 Comments