। । श्री । ।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
आमच्या नवीन पत्रात आपले स्वागत आहे. हे पत्र म्हणजेच एक ई-मेल
Newsletter आहे आणि जर तुम्ही माझाव्यापार च्या ई-मेल लिस्ट मधे आहात तर असा एकही रविवार येणार नाही ज्या रविवारी सकाळी ०९.०० वाजता तुम्हाला हे पत्र म्हणजेच नव्या भाषेत ज्याला आपण ई-मेल म्हणतो तो येणार नाही. स्वतः तुम्ही आमच्या
वेबसाईट वर जाऊन कधीही हे सगळे पत्र वाचू शकतात पण प्रत्येक आठवड्यात होणाऱ्या काही खास घडामोडी आणि त्या वाचत वाचत प्रत्येक रविवारी स्वतः थोडं काहीतरी नवीन शिकणे हे जितकं छान आहे ना तितकी मजा "एक दिवशी बसून सगळं वाचून काढलं" ह्यात नाही.
माझा सप्रेम नमस्कार
तर माझाव्यापार च्या त्या सगळ्या "रविवार ते रविवार" वाचणाऱ्या वाचकांना माझ्या कडून खास प्रणाम. जे आज पहिल्यांदाच हे पत्र वाचत आहेत त्यांना विशेष नमस्कार आणि अधून मधून वाचणाऱ्याना तुम्ही माझ्या साठी खास आहात असं सांगून नमस्कार करतो आणि मग आजचं पत्र लिहितो.
आजच्या पत्रात माझा एक अनुभव तुम्हाला मी सांगणार आहे.
अनुभव आहे घाबरगुंडी उडाल्याचा
हा अनुभव आहे रक्त-दानाचा. मी दवाखाना, ऑपरेशन, औषध, सर्जरी ह्या सगळ्या शब्दांपासून आणि ह्या शब्दांच्या सोबतीची जितके शब्द आहेत त्या सगळ्यांपासून शक्य तितका दूर राहाणारा व्यक्ती आहे. भीती कधी बसली मला माहित नाही. मी त्या भीती वर काम करून आता बराच धीट झालो आहे. आधी इंजेकशन पाहिलंच की मी उडी मारून पळत होतो. तसा मी आता नाही, पण भीती आहेच.
एकदा माझ्या एका मित्राने (जो माझ्या पेक्षा लहान आहे) मला ब्लड डोनेट करण्यासाठी इन्स्पायर केलं. ही ५ वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. आम्ही सोबत बिझनेस करण्याच्या प्रयत्न करायचो तर तो मला मी मोठा असल्या मुळे सर म्हणायचा.
"सर काय घाबरता तुम्ही ब्लड डोनेट करायला हे बघा आत्ता करून आलो आहे मी. चला तुम्ही पुढच्या वेळेस माझ्या सोबत."
"जाऊ रे वेळ मिळाला की" असं म्हणण्यात कितीतरी वर्ष गेले. मग एकदा तो माझ्या मागेच लागला की आज ब्लड डोनेट केल्या शिवाय मी काही तुम्हाला घरी जाऊ देणार नाही.
कोण घाबरलं आहे? मी?
ह्या आधी शक्य तितके सगळे कारणं मी त्याला देऊन रक्त दानाला जायचं टाळलं होतं. सगळी कारणं संपली होती. आज उपवास आहे, उद्या ट्रॅव्हल करायचं आहे, काम खूप आहे रे सध्या थकवा येतो, संध्याकाळी एका फंक्शन ला जायचं आहे आता थकवा आला ब्लड डोनेट केल्या नंतर तर मग तिथे जाता येणार नाही. असे किती तरी कारण देऊन झाले होते. त्यालाही चांगलंच माहिती होतं की कारणं हे आहे की रक्त, सिरींज पाहिलं की आपल्या सरची घाबरगुंडी उडते.
आणि मग तो दिवस आला
पण एक दिवस असा आला जेंव्हा मी त्याला नाही म्हणू शकलो नाही. सगळेच कारण संपले होते. तो मला जबरदस्ती त्याच्या गाडीवर मागे बसवून घेऊन गेला. तो स्वतः रक्त दान करायला इतकाच उत्सुक होता जसा कुठल्या बागेत गेल्यावर एखादं लहान मुलं होतं. मला मात्र तिथे गेल्या गेल्या माझ्या अत्यंत आवडीचा आणि ज्या मुळे भीतीची सुरवात होते तो वास नाकात गेला स्पिरिट चा. तो गेला त्या बेड वर जाऊन झोपला आणि सुरूही झालं ब्लड काढणं. मी आता काय कारण सांगू, काय कारण सांगून पळू, हाच विचार करत होतो.
"तिथले डॉक्टर मला म्हणाले काय पहिल्यांदाच का रक्त दान?" मी हो तर म्हणालो नाही फक्त मान हलवली.
"मला जरा एक दोन गोष्टी चेक करू दे मग आपण करू रक्त दान. काय ब्लड ग्रुप काय तुमचा?"
मी म्हणालो "ओ"
"अरे वा! युनिवर्सल डोनर तुम्ही आणि तुम्हीच घाबरलं तर कसं जमेल?"
त्यांनी एक दोन टेस्ट केल्या आणि म्हणाले सर हिमोग्लोबिन कमी आहे तुमचं नाही देता येणार ब्लड. मी मनातल्या मनात म्हणालो हेच तर ऐकायचं होतं. माझा मित्र तिथे झोपेत ओरडला, "डॉक्टर अजून एकदा चेक करा. आज करायचंच आहे ब्लड डोनेट."
मी असाच ओरडलो असतो त्या दिवशी
जर सुई टोचली असती तर!
आपले वाईट रिपोर्ट बघून खुश होणार मी एकटाच व्यक्ती असेल. मी त्याला पुढचं बोलूच दिलं नाही आणि घरी वापस येताना हसत हसत छान घरी आलो. मेडिकल रिपोर्ट वाईट आले आहेत हे बघून खुश होणारा मी एकटा व्यक्ती असेल.
आता हा सगळा मजेचा भाग झाला. रक्त दानासारख्या छोट्या गोष्टीला इतकं घाबरणं काही बरं नाही हे मला ही समजतं होतं. पण मन काही पुन्हा तिथे जाऊन रक्त दान करण्यासाठी तयार नव्हतं. मी इग्नोर करून ह्या भीतीला जिंकण्याचा कधी प्रयत्न केलाच नाही.
परिस्थिती घडवते मनस्थिती
पण म्हणतात ना अनुभव माणसाला सगळं काही शिकवतो. मागच्या काही वर्षात दवाखाना मला खूप जवळून बघावा लागला. नातेवाईक म्हणा मित्र म्हणा, ह्या सगळ्यांसाठी मला ज्या गोष्टीची भीती होती ती गोष्ट माझ्या शिवाय कोणी करूच शकणार नाही अश्या वेळी माझ्या समोर पुन्हा पुन्हा आली. आणि मग कसली भीती आणि कसलं काय! मला ब्लड डोनेट करणे हे किती महत्वाचं आहे हे लक्षात आलं. त्यात मी "ओ पॉझिटिव्ह" आणि मीच घाबरून कसं जमेल?
आणि आत्ता परवा तो दिवस आला. आमच्या इंडस्ट्रियल भागात एक रक्त दान शिबीर आयोजित केलं होतं. कोणालाही न सांगता कोणालाही न सोबत घेता मी तिथे गेलो. सगळ्यांना आनंदाने हे सांगितलं की मी पहिल्यांदाच रक्त दान करतो आहे मला सगळं नीट समजावून सांगा. अगदी पहिल्या १५ मिनिटात काहीही आवाज न करता रक्त दान करून मी चहा, बिस्कीट, केळी खात निवांत गप्पा मारत बसलो होतो. हे आपलं पाहिलं रक्त दान आहे हे मी स्वतःला ही कळू दिलं नाही. हीच गम्मत असते मनाची.
असाच गेलो होतो मी तिथे!
Mind is a Great Defence Mechanism!
मी एका पुस्तकात वाचलेलं सांगतो. आपलं मन हे खूप छान असं डिफेन्स मेकॅनिझम आहे. पण ते ग्रोथ मेकॅनिझम नाही. म्हणजे आपण जर ठरवलं की मी एक जंगल आहे ते ओलांडून पुढे जाईल पण आपलं मन लगेच आपल्याला सांगत, "अरे मधे वाघ, सिहं किंवा कुठलेही प्राणी असतील. बघ बाबा. गरज नसेल तर नको जाऊ. बस निवांत घरी."
आपल्या मनाला असं निवांत रहाणं आवडतं बघा!
आपल्या मनाच एकच काम आहे की ते स्वतः आणि आपण कायम सुखरूप आणि निवांत असावं. मनाला कष्ट, त्रास सहनच होतं नाही. पण गणित बघा कसं आहे त्रास, कष्ट घेतल्या शिवाय काही मिळतही नाही.
कष्ट नको तर मस्त आयुष्य नाही,
मस्त आयुष्य पाहिजे तर खूप कष्ट घ्या.
माझी खूप इच्छा आहे मी खूप जास्त फिट असावं. पण त्यासाठी घ्यावे लागतील कष्ट आणि त्रास. कोणते कष्ट आणि कोणते त्रास? उदाहरण सांगतो, सकाळी उठावं लागेल (झाले मनाला कष्ट), जे शरीराला चांगलं नाही ते खाणं बंद करावं लागेल (झाला त्रास), व्यायाम करावा लागेल (हे तर खूपच कष्ट झाले), वेळेवर झोपावं आणि उठावं लागेल (अरे देवा कितीरे त्रास)
हे सगळं करून त्रास देण्यापेक्षा मन म्हणतं, "सोड ना! काय फरक पडतो फिट नसेल तर. तसं पण चाळीशी नंतर काही ना काही त्रास सुरु होणारचं आहे. सध्या एन्जॉय करू. नंतरच नंतर बघू. कोण ते सकाळी उठणार. व्यायाम करणार. हे सगळं केलं तर किती रे कष्ट होतील. त्या पेक्षा झोप ९ पर्यंत. तू काम करून दमला आहेस."
खरं सांगा. बोलतं ना मन कधी कधी असं?
तर मी रक्त दान फक्त माझ्या मनाला उत्तर देण्यासाठी नाही, तर एक सणसणीत कानाखाली देण्यासाठी केलं. त्या रक्तामुळे ज्या कोणाला फायदा होणार असेल तो चांगलाच आहे पण मला इतकाच फायदा झाला आहे काय सांगू तुम्हाला. परवा पासून माझ्या मनाने मला शहाणपणा शिकवणं थोडं कमी केलं आहे. उगीच घबरावतं होतं रावं. इतकं काही अवघड नाही रक्त दान.
This is me with my mind when he tries to make me lazy!
तुम्ही सांगा. तुम्हाला जेंव्हा मन घाबरवतं, काही काम करण्यापेक्षा आळशी बन, झोपून रहा, आराम कर, निवांत रहा अश्या काही सूचना देतं तेंव्हा त्याचं ऐकावं वाटतं का मी दिली तशी एक सणसणीत कानाखाली मारावी वाटते? कधी लावली असेल आपल्या मनाच्या कानाखाली तर मला नक्की कळवा.
मन कायम आळशी बन हे सांगेल पण तुम्ही त्याच्या कानाखाली मारून स्वतः Discipline मधे रहा.
भेटूया पुढच्या पत्रात. माझं पुढचं पत्र येईपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या कामात व्यस्थ रहा.
धन्यवाद.
आणि हो रक्त दान नक्की करा. छान वाटतं.
आज एक कामाचं यू ट्यूब चॅनेल सांगतो!
रामायण अभ्यासाला घेतलं तर आयुष्य पुरत नाही असे म्हणतात. आपल्याला अभ्यास करायचा नसेल. फक्त वाल्मिकीजींनी लिहिलेले रामायण आपल्याला माहित असावं इतकीच आपली इच्छा असेल तर पुढे नक्की वाचा.
YouTube वर एक चॅनेल आहे ज्याचं नाव आहे 21Notes. ह्या चॅनेलच्या माहिती मधे ते लिहितात आम्ही ह्या चॅनेल वर वाल्मिकी रामायण सांगतो ते पण एकविसाव्या शतकातल्या लोकांसाठी. ह्या चॅनेल मधल्या व्हिडिओ मधे वाल्मिकी रामायणातले महत्वाचे श्लोक आपल्याला बोलून दाखवले जातात त्याच बरोबर मागे एक ऍनिमेशन द्वारे रामायणाची गोष्ट दाखवली जाते आणि मधे मधे काही प्रश्न पण विचारून त्यांचे उत्तरं दिले जातात. आणि कुठलाही व्हिडिओ हा १० मिनिटांच्या वर नाही त्यामुळे जर कोणाला सवय नसेल मोठे व्हिडिओ बघण्याची तर तो सुद्धा एक बघण्यात गुंग होतो. पुन्हा ह्या रामायणातले संस्कृत श्लोक आपल्याला स्क्रीन वर दिसतात आणि त्याचे अर्थ हे इंग्लिश आणि हिंदी अश्या दोन्ही भाषेमधे उपलबद्ध आहेत.
वाल्मिकी रामायणाची सोप्या भाषेत, नवीन पिढीला आवडेल अश्या पद्धतीने ओळख करून घ्यायची असेल तर हे चॅनेल नक्की बघा. छान प्लेलिस्ट आहेत प्रत्येक प्रसंगाच्या आणि सोप्या भाषेत समजून सांगितलं आहे.
तर 21Notes हे YouTube चॅनेल नक्की बघा. अश्याच प्रकारचे अजून चॅनेल तुम्हाला माहित असतील तर मला नक्की कळवा. तुमच्या मनामधे काही क्रिएटिव्ह पद्धतीने आपले ग्रंथ मांडण्याची इच्छा असेल तर तसेही मला कळवा. मी जे लिहिलं आहे त्या बद्दलचे आपले मत दिले तर मला खूप आवडेल. भेटूया पुढच्या पत्रात रविवारी ९.०० वाजता.
आमचे newsletter जॉईन करायचे असेल तर ही आहे लिंक : Join Mazavyapar's Newsletter
0 Comments