। । श्री । ।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
आला आहे पुन्हा एक रविवार आणि काय लिहावं हा मोठ्ठा प्रश्न माझ्या समोर आहेच. रविवारी एक लेख लिहिणारा म्हणून मी माझी ओळख बऱ्याच जणांना करून देतो आणि लिहिला नाही ना तर माझा शब्द खरा करून दाखवण्याची संधी मी गमावून बसेल. बाकी कोणा साठी असो किंवा नसो मी माझ्या मनाला हे समजावं की “हा अजिंक्य आहे ना तो ठरवलं की केल्याशिवाय गप्प बसतं नाही” ह्या साठी लिहितं असतो आणि लिहितं रहाणार.
आपलं विषेश स्वागत आहे आजच्या पत्रात कारण हे ते पत्र आहे जे लिहिण्याच्या आधी मला वाटलं की, “जाऊ द्या एका रविवारी सुट्टी मारू, चालत असं कधी कधी, अजून तर जास्त लोकं वाचतं पण नाहीये, घेऊ सुट्टी.”
हे असं तुम्हाला पण कधी ना कधी वाटलं असेल वेगवेगळ्या कामात. पण लक्षात ठेवा हा तोच क्षण आहे जिथे आपल्याला मुद्दामून ती क्रिया केली पाहिजे. असं का? तेच सगळं आपण बोलूया आजच्या पत्रात.
न उलगडलेलं कोडं!
आपलं मन म्हणजे हे एक न उलगडलेलं कोडं आहे. इतके जण इतक्या गोष्टी सांगतात. आज काल इंटरनेट वर कश्या वर विश्वास ठेवावा आणि कशावर नाही हे समजतच नाही. पण मोठे मोठे लोकं होऊन गेले त्यांनी मनावर इतकं काही काही लिहून ठेवलं आहे ना. अश्या वेळेस वाटतं की मनाची एखादी व्यायाम शाळा असावी आणि तिथे जरा ट्रेनिंग द्यावं मनाला. आणि मला सापडली, मी या पत्राच्या शेवटी सांगतो त्या व्यायाम शाळेबद्दल.
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्दीचे कारण. - संत तुकाराम महाराज.
एक नाही हजार लेख, पुस्तकं, श्लोक, ओव्या, ग्रंथ सापडतील ज्या मधे मनाला जिंकण्याचे मार्ग सांगितले आहेत. मला तर इतकेदा वाटायचं की, “हे न दिसणारं मन आहे. पण ह्याच्या वर किती जणांनी काय काय अभ्यास केला आहे!” थोडक्यात काय तर मन हा काही, “जाऊ द्या. अभ्यास नाही केला तरी चालतो.” असला विषय नाही. पण बरेचदा आपण मनाला ट्रैनिंग न देता जसं जमेल तसं शिकवतं जातो आणि ही चूक पुढे जाऊन महागात पडते.
आता ह्या बद्दल शिकावं जरी म्हणलं तरी मनाची जो पर्यंत इच्छा नाही, आपण शिकूच शकतं नाही बघा. कितीही चांगला शिक्षक समोर आला पण मन जर जागेवर नसेल तर तो चांगलं काय आणि वाईट काय. तो काय शिकवतो आहे ह्याचा काही संबंध लागत नाही.
तर आजच्या पत्रात मी एक छोटीशी आयडिया सांगणार आहे ज्याने मन आपल्या ताब्यात करण्याची सुरवात होऊ शकेल. ही आयडिया काही वर्षांपूर्वी मला माझ्या एका बिझनेस कोच ने सांगितली आणि शिकवली होती.
आज पासून मी मनाचं नाही मन माझं ऐकणार!
जाणीव होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे असं म्हणतात. जाणीवच नसेल तर बदल खूप दूर राहिला. तर मला एकदा जाणीव झाली की मी माझ्या मनाचं सगळं ऐकतो आहे आणि भरतीला मनाचं ऐकणं चांगलं आहे, हा विचारही करतो आहे.
उदाहरण सांगतो, मला रात्री मॅगी आणि चिप्स खात खात चित्रपट बघावा वाटला तर मी तसं केलं पाहिजे. ह्यालाच एन्जॉय करणे म्हणतात. मला जर खूप काम करून एखाद्या दिवशी कंटाळा आला तर काही कामं सोडून किंवा कोणाला तरी करायला सांगून सुट्टी घेतली पाहिजे कारण मी माझ्या मर्जी चा मालक आहे. एखादा मला माझ्या चुका बोलून दाखवतं आहे, ज्या खऱ्या आहेत पण माझ्या मनाला आवडलं नाही म्हणून मी त्याच्या सोबत बोलणं बंद केलं पाहिजे.
असे स्वतः बद्दलचे खूप सारे उदाहरणं आहेत माझ्या कडे. असेच सगळे विचार सोबत घेऊन मी शिक्षण पूर्ण केलं, मग बिझनेस सुरु केला पण बिझनेस पाहिजे तसा होतं नव्हता म्हणून मी एकदा माझ्या बिझनेस कोच सोबत बोलतं बसलो होतो आणि त्यांना मी मला पाहिजे तसे रिझल्ट मिळतं नाहीये हे सांगितलं. त्यांनी शांत पणे ऐकून घेतलं आणि म्हणाले, “मी तूला रोज ५ नवीन कस्टमर्स सोबत बोलण्याचं काम दिलं होतं ते तू केलं का?”
आता या प्रश्नाचं उत्तर साधं आणि सरळ होतं, “नाही” पण बघा मनाची कशी मज्जा असते ते. मी म्हणालो, “सर तितके लोकं फोन उचलत नाहीये.”
माझे सर म्हणाले, “बर मग जास्त नंबर घेऊन बस ना फोन करायला.’ मी हो म्हणतं डोकं हलवलं आणि काही दिवसांनी पुन्हा सरांकडे गेलो, “सर माझ्या कडे रोजचे १० नंबर नाहीये.” ह्या वर पण सरांनी उत्तर दिलं आणि काही डिरेक्टरी दिल्या फोन करण्यासाठी. मी पुन्हा एकदा कामाला लागलो काही दिवसांनी पुन्हा मी सरांना तोच प्रश्न केला, “सर रिझल्ट मिळतं नाहीये. ह्या वेळेस लोकं फोन उचलत आहेत पण त बिझी असल्या मुळे माझं कोणी ऐकूनच घेत नाहीये.” सर म्हणाले, “मग अजून लोकांना बोल, त्यांना कुठल्या वेळेत कॉल करता येईल हे बघ.” असे प्रत्येक थोड्या दिवसांनी नवीन नवीन कारण घेऊन मी सरांना भेटतं होतो पण रोज ५ फोन काही होतं नव्हते.
मी पुन्हा एकदा सरांकडे गेलो आणि आज मात्र सर म्हणाले, “तूला खरंच करायचे आहेत ५ कॉल्स रोज, का कारणं द्यायची आहेत?” मी तर करायचे आहेत कॉल्स हेच उत्तर दिलं. सर पुन्हा म्हणाले, “अरे फोन न करण्याचे इतके कारणं घेऊन येतो आहे, एक तर कारण असेल ना ज्या मुळे रोजचे ५ कॉल्स होतील.” शेवटी त्यांनी कंटाळून मला कसं आपल्या मनाचं ऐकायचं नाही हे शिकवलं.
कोच, हा का कोच असतो माहिती का?
ते म्हणाले, “अजिंक्य ऐक, आपल्या मनात दोघे जण असतात. एक असतो जॉन एक असतो माईक. जॉन हा सगळ्या जगातला आळशी प्राणी आहे. त्याला एकही काम करावं वाटतं नाही. त्याला इतकंच वाटतं की तू झोपून रहावं, जेवावं आणि काहीही करू नये. निवांत रहावं.
पण माईक आहे ना हा प्रामाणिक आणि फार मेहनत करणारा आहे. त्याला वाटतं तू जितकी गरज तितकंच झोपावं, जितकी गरज तितकंच खावं, चांगलं सात्विक खावं, भरपूर काम करावं, आळशी पणा करण्यात वेळ घालवूच नये आणि आपल्या कामात कालच्या पेक्षा छान बनावं.
आता तू काम सुरु केलं की बघ तुझ्या मनातून २ आवाज येतात की नाही. एक आवाज सांगतो "कुठे हे काम करतो. काय होणार आहे हे करून. तुझ्या कडे हे नाही. तुझ्याकडे ते नाही. अजून अमुक काम राहील आहे. जेवणाची वेळ झाली आहे. जेवण झाल्यावर करू. काल झोप पूर्ण झालेली नाही. झोप महत्वाची. कामं काय होतं रहातात." वगैरे वगैरे.
आणि दुसरा आवाज सांगेल की, "अजिंक्य तू भाग्यवान आहेस की तूला हे काम मिळालं आहे. काहीतरी तुझ्यामधे आहे म्हणून तू इथे आहेस. तर आता फक्त एकच कर सगळा विचार करून हे काम चांगल्यात चांगलं होऊ शकतं हा विचार कर. स्वतः ला आनंद झाला पाहिजे काम झाल्यावर की काय छान काम केलं म्हणून. तू करू शकतो. बाकी सगळं विसर थोड्या वेळासाठी आणि चल हे काम शक्य तितकं छान पद्धतीने काम संपवू."
“असे आवाज आले की कोणाचं ऐकणार?” मी लगेच उत्तर दिलं “नक्कीच दुसऱ्याच, म्हणजे माईकच.” पण जेंव्हा तू हे कारणं घेऊन माझ्या कडे येतो आहेस सांग बरं हे तू बोलतो आहेस, का जॉन, का माईक?
इथे माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी म्हणालो, “सर आज नाही मी खूप वर्ष झाले फक्त जॉन च ऐकूनच जगतो आहे. हा जॉन आत्ता समोर आला माझ्या. इतके दिवस मला माहितीच नव्हता. आता मी काय करू?”
सर हसले आणि म्हणाले, “अरे चांगलं झालं की तूला सापडला जॉन ते, बऱ्याच जणांना तो आहे हे ही माहिती नाही आणि सापडल्यावर त्याला धरता येतं नाही. तू फक्त एक काम कर पुढच्या वेळेस लक्ष दे, मनात ही जाणीव राहू दे कोण तुला ऑर्डर देतं आहे ते.
तो ऑर्डर देणारा जॉन असला तर पटकन जोरात तू रागावतो आहेस अश्या आवाजात, “Shut Up, John” असं म्हणायचं. विचार कर जॉन हा कोणीतरी बाजूला उभा असलेला व्यक्ती आहे जो तूला आळशी बनायला सांगतो आहेस तर कसा ओरडशील त्याला तसंच ह्याला रागवायचं. आणि मग बघ हळू हळू जॉन तूला ऑर्डर देणं बंद करेल."
Shut Up, John!
मी आजही माझं मन मला आळशी बनायला सांगायला लागलं तर मी “Shut Up, John” असं म्हणतो. आणि खरं तर जो जॉन आधी मला ऑर्डर द्यायचा ना. चल झोप, सकाळी उठू नको, व्यायाम करू नको, असलं सांगायचं ना तो आता घाबरून कोपऱ्यात बसलेला असतो आणि कधी कधी हळूच येऊन “झोप रे थोड्या वेळ, घे रे ऐखाद्या दिवस सुट्टी, बघ थोडा आळशी बनून असं कधी कधी सांगायचा प्रयत्न करतो. पण “Shut Up, John” म्हणायचं दूर राहील माईकच त्याला फटके देऊन वापस पाठवतो.
थोडक्यात काय तर माईक आता स्ट्रॉंग झाला आहे जॉन पेक्षा. हे उदाहरण ऐकायला छान वाटतं आणि हळूच काहीतरी छान शिकवून जातं म्हणून हे उदाहरणं मला खूप आवडत. मी आजही ओळखीच्या सगळ्यांना हे पद्धत सांगत असतो. कोच हा का कोच असतो हे त्या दिवशी मला समजलं.
थोडं माईंड कंट्रोल करायची सुरवात करायला ही पद्धत खूप चांगली आहे. तुम्ही सुद्धा वापरून बघा. आपल्या मनाला आवडेल असं आपण नेहमीच करतो पण मुद्दामून ठरवून त्याच्या उलटं करून खुश राहून बघा. कारल्याची भाजी नाही आवडतं का, तरी घेऊन आनंदाने खा. रोज उजव्या हाताने ब्रश करतात का आज डाव्या हाताने प्रयत्न करा. रोज ठराविक वेळेला चहा मिळाला नाही तर चिडचिड होती का, मग तर ठरवून चहा घेऊ नका आणि खुश रहा.
शेवटी काय प्रसन्न मन तुम्हाला असं काही देऊ शकतं हे धडपड, नाराज, घाई, चिडचिड करणार मन कितीही मेहनत केली तरी नाही देऊ शकतं.
मनाची व्यायाम शाळा
आणि हो मी म्हणालो होतो ना मनासाठी एक जिम पाहिजे म्हणून अशीच एक व्यायाम शाळा घेऊन आले आहेत माझे एक मित्र अनंत भागवत. ह्या मनात लपलेल्या अनंत गोष्टी फक्त अनंत दादाच सांगू शकतो. कारण ह्या वर्गात तो आत्मशिस्त तंत्र आणि त्याच बरोबर योग निद्रा पण शिकवतो. मी जे सांगितलं ना माझ्या पत्रात ते खूप वर वर झालं. थोडसं मनाची तयारी व्हावी म्हणून. पण जर खरोखर वाटतं असेल की हे अनंत सिद्धींनी भरलेलं मन माझ्या ताब्यात पाहिजे तर अनंत भागवत ह्यांना नक्की फोन करा आणि ह्या वर्गात येऊन नक्की शिका.
अश्या प्रकारे मी माझ्या पत्रा द्वारे गोष्टी, पुस्तकं, चित्रपट, माझे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध असणाऱ्या भरपूर गोष्टी सांगत असतो ते पण फक्त रविवारी. हे पत्र व्हाट्सएप्प वर वाचायचे असेल तर माझं चॅनेल subscribe करा, ई-मेल मधे वाचायचं असेल तर ई-मेल साठी subscribe करा म्हणजे पोस्टमन वेळेवर पत्र आणून देईल.
भेटूया पुढच्या पत्रात. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आपल्या आपल्या कामात व्यस्थ रहा. धन्यवाद.
आमच्या सोबत जोडले राहण्यासाठी काही महत्वाच्या लिंक्स इथे खाली दिल्या आहेत.
ई-मेल Newsletter - Subscribe to our Weekly Newsletter
0 Comments