।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
आज मी लिहिलं आहे एक नवीन पत्र आणि हे पत्र तुमच्या पर्यंत कदाचित ई-मेल, ब्लॉगिंग वेबसाईट, व्हाट्सएप्प किंवा लिंकडीन ह्या पैकी एक पोस्टमन घेऊन आला असेल. आधीच्या काळात व्यक्ती घेऊन येतं होता पत्र पण आता इतकं सगळं डिजिटल झालं आहे की माहिती पोहचवणारा जो कोणी आहे त्याला पोस्टमन म्हणायला हरकत नाही.
हे पत्र मी आधी फक्त ई-मेल वापरून माझ्या काही ओळखीच्या लोकांना पाठवत होतो पण मागच्याच आठवड्यात मी विचार केला की ई-मेल सोबतच व्हाट्सएप्प करू. व्हाट्सएप्प वर वाचलं आहे असं म्हणायची आणि फॉरवर्ड करायची किंवा स्टेटस ला ठेवायची घाई आज प्रत्येकाला असते.
ह्या गडबडीत माझा मेसेज तुम्ही फॉरवर्ड नाही केला किंवा स्टेटस ला नाही ठेवला तरी चालेल. पण मी असं का म्हणतो आहे? मला कदाचित इच्छा नसावी खूप लोकांपर्यंत पोहचण्याची? नाही असं काही नाही.
मी हे पत्र पाठवण्याची सुरवात केली ती म्हणजे काही चांगल्या गोष्टी माझ्या जवळच्या लोकांना समजाव्या आणि कुठे तरी त्यांना त्या आयुष्यात वापरता याव्या म्हणून. हे इंटरनेट च जग इतक्या गोष्टींनी भरलेलं आहे आणि त्यात आपला मेंदू ज्याला नेगेटिव्ह, कोणा बद्दल चुकीचं बोललेलं, अर्थ नसलेलं असं काही तरी रात्री जागून जागून डोळे, मान, पाठ दुखवून बघत बघत वेळ घालवायला फार आवडतं. आता हे चुकीचं आहे. असं बघण्यात वेळ घालवू नका, हे मी भेटून भेटून सगळ्यांना सांगायचं आणि पटवून द्यायचं जरी ठरवलं तरी बदल घडणं काही शक्य नाही.
म्हणून मी कॉन्टेन्ट क्रिएशन च्या जगात उडी मारली आणि आपण काहीतरी कामाला येईल असं कॉन्टेन्ट बनवू हे ठरवलं. मग लिखाणाची सुरवात झाली मी गोष्टी, पुस्तकांचा सारांश, काही कमाल चित्रपट का बघावे, काही डॉक्युमेंट्रीज, माझे काही चांगले वाईट अनुभव त्या मधून मिळणारी शिकवण असं सगळं एका एका रविवारी पाठवण्याची सुरवात केली. मी मागच्या १-२ वर्षात जवळ जवळ १०० च्या वर लेख लिहिले प्रॅक्टिस साठी जे तुम्ही माझ्या ब्लॉगिंग वेबसाईट वर वाचू शकतात. पण आता इतकी प्रॅक्टिस झाल्यावर मी आलो आहे व्हाट्सएप्प वर.
तर हा माझा लेख ज्याला मी पत्र म्हणतो ते तुम्हाला रविवारी मिळालं आणि वाचून तुम्हाला आनंद वाटलं तर मला नक्की कळवा. ई-मेल वर तर आम्हाला रिप्लाय करणारे बरेच जण आहेत पण आता व्हाट्सएप्प वर पण आपण आपला या पत्राबद्दल काही विचार असेल तर तो मांडू शकतात. तुम्ही चांगला, वाईट, खराब, पुन्हा असलं लिहू नको असे काहीही रिप्लाय करू शकतात. मला चांगलं म्हणावं म्हणून मी हे लिहितं नाहीये लिहिण्याची फायदे खूप आहेत ते मी नंतर कधी तरी सांगेल पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी माझ्या खूप आवडीची गोष्ट आहे.
गोष्ट आहे एका राजाची!
मागच्या काही वर्षात काम करत करत पुस्तकं वाचत वाचत मला खूप साऱ्या गोष्टी माहिती झाल्या आणि त्या सांगायची सवय माझ्या काही मित्रांमुळे, जे मला कुठे संधी असली की स्टेज वर ढकलून हा गोष्ट सांगणार आहे असं सांगून मोकळे होतात त्या मित्रांमुळेच लागली. मी भरपूर लोकांना भरपूर गोष्टी सांगितल्या आहेत पण तुला एक गोष्ट सांगू का? असं विचारल्यावर मला आज पर्यंत कोणीही नको असं उत्तर दिलं नाही. माझा २ वर्षाचा मुलगा सुद्धा हो म्हणतो ज्याला कळतही नाही, अजून ही पॉवर आहे गोष्टींची. आपण गोष्टींमधून खूप काही शिकतो.
तर आजची गोष्ट आहे एका राजाची. एक राजा होता जो खूप पराक्रमी होता. त्याच्या सगळ्या रयतेला तो खूप छान सांभाळत होता. त्यांना कमी जास्त लागलेलं तो सगळं उपलबद्ध करून देतं असे. तितकाच युद्धात ही तो निपुण होता. कितीतरी लढाया त्याने जिंकल्या होत्या आणि राज्याला विजय मिळवून दिला होता. प्रत्येकाच्या आवडीचा राजा असं तुम्ही समजू शकतात.
पण एका युद्धात त्याला दुखापत झाली होती आणि त्याचा डावा डोळा हा फुटला होता. नंतर युद्ध जिंकल्यावर वैद्यांनी उपचार करून त्याला खोटा डोळा पण बसवून दिला होता. पण तो खोटा असल्या मुळे तो ओळखू येतं होता आणि एक डोळा एकीकडे बघतो आहे दुसरा दुसरी कडे अश्या मुळे राजा चकणा दिसतं होता. बाकी सगळं सुंदर पण एक डोळा मात्र वाकडा. खूपदा लोकं राजाच्या पाठीमागे त्याच्या दिसण्यावरून हसायचे हे त्यालाही माहीत होतं पण त्याने नेहिमी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं होतं.
एकदा त्यांच्या राज्यात एक चित्रकार आला. हा चित्रकार स्वतःला, "मी खूप मोठा चित्रकार आहे आणि मी सगळ्या मोठ्या राजांची चित्र काढून त्यांच्याकडून मोठी मोठी बक्षिसे मिळवली आहेत" हे सांगत होता. त्याने राजांना त्यांचं चित्र काढू द्यावं आणि स्वतः ची कला सादर करण्याची एक संधी द्यावी म्हणून विनंती केली. राजा कितीही चांगला दिसतं असला तरी डोळा तर वाकडाच काढावा लागणारं हे तर नक्की होतं. वाकडा डोळा नीट काढला तर खोटं चित्र काढल्या सारखं होईल आणि खरं चित्र काढलं तर वाकड्या डोळ्याचा राजा बघून बघणाऱ्याला आधी हसू येणार हे नक्की होतं. राजाच्या मनात हा प्रश्न होता की हा चित्रकार माझा कमीपणा कसा काय झाकणार?
पण राजाचा जो प्रधान होता त्याला चित्रकाराची मजा घेऊ असं वाटलं. त्याने राजाला चित्रकाराला एक संधी द्यावी म्हणून पटवलं आणि चित्रकाराची फजिती व्हावी ह्या विचारने चित्रकाराला परवानगी दिली. चित्रकाराने राजाची एक शरीरयष्टी, तो कसा बसला आहे, राज्याचा झेंडा, त्याची तलवार, धनुष्य बाण, घोड्याचा रंग अश्या सगळ्या गोष्टी पाहून एक आकृती कागदावर बनवून घेतली आणि राजाला हे चित्र ५ दिवसात सभेमधे सगळ्यांसमोर दाखवण्याची परवानगी मागितली. प्रधानाला तर हेच पाहिजे होते की आपल्या राजावर सगळे जण हसतील. त्याने हे सगळं जुळवून आणून दिल.
आणि तो दिवस आला. एक मोठी आयताकृती चौकट आणि त्याच्यावर कपडा टाकलेला असं काहीतरी सभेमधे ठेवण्यात आलं. सगळे जण आज आतुरतेने वाट बघत होते की नेमकं हे चित्र कसं काढलं गेलं आहे? काही जणांना राजाची फजिती बघायची होती आणि हसायचं होतं तर काही जणांना मनापासून उत्सुकता होती की आमच्या राजांना असलेला कमीपणा जो जग जाहीर आहे तो ह्या चित्रकाराने कसा कागदावर काढला आहे? तो कपडा राजांची परवानगी घेऊन चित्रकाराने बाजूला केला आणि काही सेकंदांच्या शांततेनंतर संपूर्ण सभा ही जोर जोरात टाळ्या वाजवत होती.
नेमकं असं काय चित्र काढलं होतं विचार करतं आहात ना? त्या चित्रकाराने राजाचं असं चित्र काढलं होतं ज्या मधे राजा घोड्यावरून शिकार करत होता आणि शिकारीवर त्याने बाण मागे ओढून निशाणा लावला होता आणि त्याचं वेळेस त्याचा चकणा असलेला डोळा बंद होता. ही चित्रकाराची कल्पना पाहून राजाने त्याला बक्षीस तर दिलेच त्याचं सोबत ते चित्र दरबारात नेहमीसाठी लावलं गेलं.
चित्रकाराने डोकं कसं वापरलं ते तर समजलं पण हेच आपल्याला सगळ्यांना आयुष्यात करावं लागणार आहे. आज सोशल मीडिया मुळे आपण खूप जवळ आलो आहोत. एखाद्या व्यक्तीचे अगदी मिनिटा मिनिटांचे अपडेट्स आपल्याला मिळू शकतात. पण त्या प्रधानासारखी बुद्धी असेल जी फक्त कोणाची तरी मज्जा बघूया, ह्याची कशी गम्मत होते बघू अशी असावी का त्या चित्रकारासारखी जो समोरच्या व्यक्तीमधला कमीपणा डोक्याने आणि आपल्या कलेने झाकून त्या व्यक्तीला कसं छान दाखवता येईल हा विचार करतो.
उणिवा प्रत्येकात आहेत, चुका सगळे करतात, पण राजाचा वाईट दिसणारा डोळा जसा बंद करून टाकला तसे आपण जर आपल्या ओळखीच्या सगळ्यांच्या उणिवा झाकून घेतल्या तर नक्कीच आपण मनाने जास्त जवळ येऊ. तर तुम्ही ठरवा आपल्या कडे असलेल्या सोशल मीडिया वापरून एखाद्याची वाईट बाजू दाखवायची का त्याची चांगली बाजू दाखवायची ते.
उद्या जाऊन तुम्हाला टीम मधे काम करायची गरज नक्कीच पडणार आहे. बिझनेस असेल, जॉब असेल, घर असेल अगदी क्रिकेट खेळताना सुद्धा टीम लागते. मग अश्या तुमच्या टीम मधे वेगवेगळ्या कौशल्याची लोकं तुम्हाला भेटतील. त्या प्रत्येकाच्या उणिवा बघण्याची सवय लागली ना तुम्ही कधीही चांगले टीम लीड करणारे व्यक्ती बनू शकणार नाहीत. म्हणून त्या चित्रकारा सारखा विचार करता आला पाहिजे. राजाचा डोळा खराब आहे नको ह्याचं चित्र काढायला असं तो कधीही ठरवू शकला असता. पण त्याला एखाद्या व्यक्तीमधल्या फक्त चुकीच्या नाहीत तर चांगल्या गोष्टी बघण्याची सवय होती. आपण सुद्धा सगळे एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी बघण्याची सवय ठेऊ.
अश्या प्रकारे मी माझ्या पत्रा द्वारे गोष्टी, पुस्तकं, चित्रपट, माझे अनुभव आणि इंटरनेट वर फुकट उपलब्ध असणाऱ्या भरपूर गोष्टी सांगत असतो ते पण फक्त रविवारी. हे पत्र व्हाट्सएप्प वर वाचायचे असेल तर माझं चॅनेल subscribe करा, ई-मेल मधे वाचायचं असेल तर ई-मेल साठी subscribe करा म्हणजे पोस्टमन वेळेवर पत्र आणून देईल.
तुम्ही कधी पन जोक्स ऐकले किंवा वाचले आहेत का? पण जोक हा तो जोक असतो जिथे दोन अर्थ असलेल्या शब्दाचा किंवा समान उच्चार असणाऱ्या दोन भिन्न शब्दांचा गमतीने वापर केला जातो. मी असं पाहिलं की हे पन PUN जोक्स सगळ्यांना आवडतात. मी माझ्या मित्रांसोबत एक व्हाट्सएप्प चा ग्रुप बनवला आहे जिथे आम्ही असे पन जोक्स शेअर करणार आहोत. एक उदाहरण देतो.
भेटूया पुढच्या पत्रात. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आपल्या आपल्या कामात व्यस्थ रहा. धन्यवाद.
मी पत्रात सांगितलेल्या काही लिंक्स इथे खाली दिल्या आहेत.
ई-मेल Newsletter - Subscribe to our Weekly Newsletter
0 Comments