सिंगल यूज प्लास्टिक बॉटल!

।। श्री ।।


सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

    तर आज सोमवार आणि फक्त याच आठवड्यात रविवार ऐवजी सोमवारी पत्र मी पाठवतो आहे. आजचा विषय नक्की आवडेल. हा अत्यंत महत्वाचा पण कोणीही या विषयाकडे लक्ष देत नाही असा विषय आहे. ज्याला बरेचदा "सिंगल यूज प्लास्टिक" असं म्हणलं जातं.



    हा वरचा फोटो बघा. ही आहे २ लिटर ची पाण्याची बाटली. बाटली कसली जार म्हणलं तरी चालेल. काय वाटतं ह्या २  लिटरच्या पाण्याच्या जार कडे बघून? कोणी म्हणेल ही जिम ची वॉटर बॉटल आहे, कोणी म्हणेल अरे ही छान आहे पण इतकी मोठी! प्रत्येक वेळेस सांभाळणं किती अवघड आहे, कोणी म्हणेल मी इतकं पाणीच पीत नाही, असे वेगवेगळे उत्तर येतील. आता माझा पॉईंट सांगतो. मी ही बॉटल काही दिवसांपूर्वी विकत घेतली आणि मी प्रयत्न करतो की प्रवासात कुठेही १५, २० रुपयांची बॉटल विकत न घेता ही बॉटल रिफील करत करत प्रवास पूर्ण करायचा. 

    २०२५च्या अगदी पहिल्या दिवशी मला प्रवासाची संधी मिळाली. आम्ही दर वर्षी कुलदेवी, कुलदेव, सद्गुरू सगळ्यांच्या दर्शनाला जात असतो. हे सगळे देवस्थानं भेट देत देत आमचा प्रवास १२०० किलोमीटरचा नक्की होतो. प्रवास हा छत्रपती संभाजी नगर पासून सुरु होतं ४ दिवसात परत आम्ही घरी येतो. मी खाली इथे त्याचा मॅप दिला आहे. 



    मी या वर्षी ठरवलं की ह्या प्रवासात, या चार दिवसात एकही पाण्याची बॉटल विकत घ्यायची नाही. मोठी बॉटल रिफील करत करत प्रवास पूर्ण करू.

पण ती पाण्याची बॉटलच तर आहे? 

    तुम्हाला वाटेल की काय हा इतक्या छोट्या गोष्टीसाठी काहीतरी वेगळं डोकं लावतं बसला आहे. इतकं काय झालं प्रवासात पाणी विकत घेतलं तर. बाहेरचं पाणी पिऊन कोणी आजारी पडलं तर काय? गेले तर गेले २० रुपये पण स्वच्छ आणि शुद्ध पाणी तर मिळतं आहे ना. 

    हे सगळं खरं आहे. आपल्या सगळ्यांना पाणी लागतं. सगळ्या पाणी विकणाऱ्या कंपन्या म्हणजे ज्या खऱ्या आहेत त्या आणि त्यांच्या कॉपी, मी असं समजून चालतो आहे की सगळ्या स्वच्छ आणि शुद्ध पाणी आपल्याला देतात. 

ह्या पैकी खरा ब्रँड कुठला? 

        माझा प्रॉब्लेम आहे त्या नंतरचा. ती बॉटल एकदा वापरल्या नंतर तुम्ही त्याचं काय करतात? सहसा गाडीची काच खाली होते आणि त्या मधून पाण्याची बॉटल भिरकावली जाते. किंवा ती बॉटल गाडीमध्ये पुढच्या प्रवासाला जाई पर्यंत तशीच  पडलेली असते. जे दरवाज्याला बॉटल होल्डर असतात तिथे १ च्या जागी ३ बॉटल घुसवलेल्या असतात. आणि ह्याच्या ही पुढे हा सगळा कचरा जमा होऊन होऊन होऊन आपण पर्यावरण धोक्यात आणतो आहे. 

बीच वर गेल्यावर समजतं आपण (माणूस) किती निर्लज्ज आहोत ते!

    हे असं का होतं असेल बरं? इतके शिकलेलो आहोत आपण. जर एक व्यक्ती शिक्षण घेतो, नौकरी करतो, बिझनेस करतो, मोठं घर बांधतो, मोठी गाडी घेतो, त्याच्या मुलांना छान शिक्षण देऊन मोठं करतो, त्याला आपण जिथे रहातो ते स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू हे कसं समजत नाही? आता मी मला जे समजलं ते सांगतो. 

    पुरातन काळापासूनच आपली संस्कृती अश्या पद्धतीने उभी राहिलेली आहे की ज्या मधे आपण सगळं काम करत करत निसर्गाला धोका होणार नाही ह्याची ही खात्री केलेली आहे. उदाहरण सांगतो. आपल्या कडे इतके सगळे देवी आणि देवता आहेत. प्रत्येकाचे आवडीची एक वेगळे फुल आहे, असं गोष्टीरूपातून आपल्याला सांगण्यात आलं आहे. आता गणपती बाप्पा म्हणलं की लाल फुल, म्हणजे एक जास्वदांचं झाडं आलं मंदिराच्या परिसरात, महादेवाला पांढर फुल म्हणजे आलं एक पांढऱ्या फुलाचं झाडं, बेलाच झाडं. कसं सगळं एक मेकांना अनुसरून केलेल आहे. 

Professionalism Vs Environment-Friendly

    मग आपल्या संस्कृतीत इतकं छान गणित लावून दिलेलं आहे तर गंमत अशी झाली आहे की जसे जसे मॉडर्न आपण होतं जातो आणि ह्या सगळ्या निसर्गाच्या साथ देणाऱ्या गोष्टी विसरून Professionalism वर आपला जोर वाढतं चालला आहे. बिझनेस मिटींग असेल तर जितके लोकं असतात त्यांच्या समोर तुम्हाला २०० ml च्या बॉटल बघायला मिळतील. सगळ्यांसमोर तांब्या आणि पेला पण ठेवता येऊ शकतो. ज्याला पाहिजे तितकं पाणी तो घेईल. पण इथे प्रश्न येतो convinanceचा.


    तुम्ही पोल्युशन होतं आहे म्हणा, का स्वस्त आहे म्हणा पॉईंट हा आहे की प्लास्टिकची सिंगल युज बॉटल वापरणं हे (convinant) सोयीचं आहे. कसं? आता एक कंपनी म्हणून विचार केला तर कंपनीला कमीत कमीत पैश्यात चांगलं दिसणाऱ्या गोष्टी पाहिजे असतात ज्याला मेंटेनन्स कमी आहे. 

    कॉन्फेरंस हॉल मधे तांब्या आणि पेला ठेवला तर तो प्रत्येक मीटिंग नंतर धुवावा लागेल, प्रत्येक मीटिंग नंतर उरलेलं पाणी फेकून नवीन मीटिंगला पुन्हा पाणी भरावं लागेल. हे सगळं करणारा व्यक्ती लागेल. पण सिंगल युज प्लास्टिक बॉटलचा एक बॉक्स आणला जशी मीटिंग आहे त्या नुसार बॉटल वापरायच्या. मीटिंग झाली की बॉटल कचऱ्यात फेकून द्यायच्या. नवीन मीटिंग ला पुन्हा नवीन बॉटल काढून टेबल वर ठेवसायच्या. आहे का नाही सोयीचं? Professionalism ला Professionalism अगदी जागेवर. 

    हेच सेम उत्तर आपण प्रवासात बॉटल विकत घेतो त्याचं पण आहे. एक महागाची (बिसलेरी पेक्षा) स्टील, ब्रास, मेटल, ग्लास, प्लास्टिक, अश्या कुठल्या पण प्रकाराने बनवलेली बॉटल जर आपण प्रवासात सोबत घेतली तर आपली बॅग, काही सामान हे सगळं सोबत असतंच पण आता भरतीला बॉटल ही सांभाळावी लागते. अश्याला कंटाळून काही जण २० रुपयांची बॉटल घेतात प्रवासात पाणी पितात आपल्या पुढच्या जागेवर पोहचण्याच्या आधी पाणी पिऊन बॉटल कचऱ्यात किंवा कुठे तरी फेकून, किंवा हरवून प्रवास संपवतात. आहे की नाही महागाची बॉटल सांभाळण्यापेक्षा सोयीचं?

पण जितकं आज सोयीचं तितकं पुढे जाऊन अवघड!

    तुम्ही एका लहान मुलाला ज्याने आत्ता आत्ता बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करायला शिकला आहे. पहिल्या पहिल्यांदा प्रयेकाला बेरीज, वजाबाकी अवघड जाते. त्याला अवघड जातं आहे, सोयीचं जावं म्हणून त्याला calculator देऊन बघा आणि calculator वर सगळे बेरीज, वजाबाकी, गुणाकार असेल करायची सवय त्याला लावा मी खात्रीने सांगतो तो हाताने हे गणितं सोडवू शकणार नाही. जिकडे सोय तिथे गाडी वळेल त्याची. 

हे एकमेव कारण आहे प्लास्टिक च्या गोष्टी वापरण्याचं. 

    पण आता ह्या वर पण काही जण म्हणतील की ठीक आहे सोयीचं तर सोयीचं. आमच्या लहान पणी नव्हतं इतकं सोयीचं. घरी पाणी मिळतं नव्हत आमच्या लहानपणी. आम्ही इतकं इतकं चालत जाऊन विहिरीवरून आणायचो वगैरे वगैरे. आता सोय असेल आणि ती वापरली तर अडलं कुठे? अडलं इथे आहे की ह्या सोयीच्या मागे बिझनेस वाले बिझनेस करत आहेत. आम्ही ही सोय उपलबद्ध करून देण्यासाठी जो पैसा लागेल तो देऊ म्हणून लोकं तयार होतं आहेत. पण ह्या सगळ्यात आपल्या निसर्गाचा विचार करणारा कोणीतरी पाहिजे का नाही? सगळे जण मी आणि माझं बघून घेऊ ह्या विचाराचे झाले तर कसं चालेल? 

चल मी करतो निसर्गाचा विचार, काय करू बोल!

    माझी अशी इच्छा आहे की, माझं आजचं पत्र वाचून, "मी सिंगल युज प्लास्टिक बॉटल विकत न घेणारा व्यक्ती आहे म्हणून प्रत्येकाने अभिमानाने सगळ्यांना सांगावं आणि अजून अशी सवय लावणारे लोकं सोबत जोडावे." स्वतःची बॉटल सोबत ठेवा. ती वेगवेगळ्या घरून किंवा हॉटेल मधून भरून घेत जा पण सिंगल युज प्लास्टिक बॉटल नको. आता मला चुकीचं नका समजू. जिथे गरज आहे, सोबत लहान मुलं आहे तिथे नक्की स्वच्छ पाणी विकत घ्या. पण वापर झाला की ती बॉटल कुठे तरी कचऱ्यात जात नाहीये ना ह्याची खात्री करा. मला सुद्धा इतकं ठरवूनही दोनदा बॉटल घ्यावी लागली पण मी ती पुन्हा माझ्याच बॉटल मधे भरून रिकामी बॉटल तिथेच ठेवली. 

    बिसलेरीची बॉटल, बिस्किटाचे पुडे, चिप्स चे पाकीट, चॉकलेट चे कागद, वेट वाईप्स, लहान मुलांचे डायपर्स, हे शक्य तितक्या कमी प्रमाणात वापरा. Convinance च्या आधी निसर्गाचा विचार करा. 

असेच आमचे पत्र वाचत रहा. आमचे पत्र आवडले तर तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा. आपल्या जवळच्या एका व्यक्तीला सिंगल युज प्लास्टिक बॉटल पटकन विकत न घेण्याची साय लावा. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त रहा. धन्यवाद.

आमचे पत्र जर नियमित पणे ई-मेल वर मिळावे असं वाटतं असेल तर Subscribe करा आमच्या Newsletter ला इथे.

आणि हे पत्र जर नियमित व्हाट्सऍप वर मिळावे असं वाटतं असेल तर ही आहे आमची व्हाट्सऍप कम्युनिटी लिंक इथे.



Post a Comment

0 Comments