।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
मागच्या ३-४ आठवड्यात आपण समर्थ रामदासांच्या गोष्टी आणि श्लोक ऐकले. (ऐकले म्हणजे मी लिहिले आणि तुम्ही वाचले.) समर्थ रामदास ह्यांचा प्रयत्न असायचा की प्रत्येकाने शिकावं निदान लिहिण्या वाचण्याइतकं तरी शिकावं. कारण त्या शिवाय कोणाला कुठलंही कामं कसं देणार? आजच्या काळात लहान मुलांना लिहिणं, वाचणं शिकवण्याचं काम कोण करतं? लहान मुलांच्या शाळा आणि शिक्षक.
जून सुरु झाला आहे आणि सगळे लहान मुलं तुम्हाला शाळेत जाताना दिसतील. तुमच्या घरी कोणी असेल तर ती रडापड किंवा शाळेत जाण्यासाठीचा आनंद दोन्हीही तुम्ही अनुभवलं असेल. पण भारतात एक नवीन ट्रेंड सुरु झाला आहे ज्याला म्हणतात "होम स्कुलिंग" मुलांना घरीच शिकवणे. ऐकूनच आवडलं नसेल बऱ्याच जणांना. आज आपण बोलूया "होम स्कुलिंग" बद्दल. लेट्स गो!
मागचे पत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करू शकता.
तो काळजी घेणारा, आपण काळजी करणारे!
डेल कार्निगी ह्यांनी मनाचे श्लोक वाचले असतील का?
ह्या मनाला ट्रेनिंग द्यावी तरी कशी?
होम-स्कुलिंग हा नेमका प्रकार काय?
होम स्कुलिंग म्हणजे आपल्या मुलाला घरीच राहून शिकवणे. शब्द वाचूनच वर वर चा अर्थ निघतो. पण या होम स्कुलिंग सोबत येतात हजार प्रश्न. असं कधी असतं का? मुलं सोशल कसे काय होणार? रोज वेळेवर उठून जाण्याची सवय कशी लागणार? शिस्त कशी लागणार? मित्र कसे बनणार? ह्या असल्या गोष्टी आपल्या कडे चालत नसतात! डिग्री तर पाहिजे! घरी शिकलेल्याला कोण नौकरी देणार? बस्स. थांबूया. कारण हे कमी प्रश्न झाले. संपणार नाही इतके प्रश्न आहेत.
शाळा, अभ्यास, मार्क्स, डिग्री, पोस्ट ग्रॅड, PHD हे आपल्या डोक्यात इतकं बसलेलं आहे की बऱ्याच जणांना ह्या कल्पनेने विचार करणं बंद होतं की "आपला मुलगा हे सोडून काही वेगळ्या पद्धतीने शिकू शकतो." शिकणे म्हणजे त्याच्या मधे शाळा, अभ्यास, मार्क्स, डिग्री, पोस्ट ग्रॅड, PHD हे सगळं आलंच पाहिजे. ही सगळी यादी नाही तर तो शिकू शकत नाही.
आता उलटा विचार करणारे बघू!
जसे काही जण आहेत ज्यांच्या साठी शाळा, कॉलेज, डिग्री हेच सर्वस्व आणि दुसरे असे आहेत ज्यांना काम करता करता हे लक्षात येतं आहे की त्या शालेय जीवना मधलं खरंच काय कामाचं होतं आणि काय करण्यात उगीचच वेळ गेला. त्या ऐवजी आपण थोडा अभ्यास कमी करून आपल्या छंदाला वेळ दिला पाहिजे होता. हे असे काही जण होम स्कुलिंग ही एक चांगली कन्सेप्ट आहे असं मानतात.
मला ह्यांचाही विचार बरोबर वाटतो. एखादा जण लहानपणी संगीत क्षेत्रात आवडीने शिकतं होता. पण जसा जसा मोठा होऊ लागला आजूबाजूच्या सगळ्यांनी दहावी, बारावी, डिग्री हे संगीत असो का अजून कुठला छंद असो त्याच्या पेक्षा मोठं आहे, हेच सांगितलं. अभ्यास करून वेळ उरला तर संगीताला दे असंच शिकवलं. आणि आज त्या लहानमुलाला मोठा झाल्यावर जॉब करताना मधेच लहानपणी आवडीने संगीताचं शिक्षण घेतलेल्या, प्रॅक्टिस केलेल्या, परीक्षा दिलेल्या आठवतात. पण आज तो जॉब, त्या जबाबदाऱ्या, घर ह्या सगळ्यांमधे असा काही अडकलेला आहे की त्याला संगीत प्रोफेशन दूर राहिलं, गाणे ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्याच्याकडे आता.
अशा व्यक्ती ला जर वाटलं, की आपण आपल्या मुलांना शिकवू, पण शिकता शिकता आवडीच्या क्षेत्रात जाता येईल असं काही तरी करू. शालेय शिक्षण घरूनच जितकी गरज तितकं होईल. बाकी सगळं शिक्षण आवडीच्या विषयाचं करूया. ह्यात मला चूक वाटतं नाही.
एक विचार करून बघा!
एक विचार करून बघा. कोणाला लहान पणी जर हे लक्षात आलं की हो मला चित्र काढणे ह्या विषयात संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे. मला कितीही वेळ चित्र काढायला बसवलं तरी मी ते करू शकतो, तो व्यक्ती ठरवलं तर किती मोठा होऊ शकतो.
काय वाटतं तुम्हाला? शाळा, क्लास सगळं झाल्यावर थकून नंतरचा एक तास चित्रकलेचा क्लास करणारा आणि जो जितकी अभ्यासाची गरज तितकं शिकून उरलेला वेळ चित्रकलेचा अभ्यास करणारा ह्या दोघांमधे कोण मोठा होईल? उत्तराची गरजच नाही. तुम्हाला माहिती उत्तर.
लिहिणं सोप्प आहे!
समाजाच्या पूर्णपणे विरोधात जाऊन उलट्या दिशेने करण्यासारखी गोष्ट आहे ही! प्रत्येकाला जमेल हे काही शक्य नाही. पण वेगवेगळे व्हिडिओ बघून, पुस्तकं वाचून, शाळा बघून आणि होम स्कुलिंग करणाऱ्या काही जणांना भेटून मी या मतावर आलेलो आहे की होम स्कुलिंग असू द्या किंवा रोज जाण्याची शाळा असू द्यावी. एका तरी पालकाने स्वतः बसून लहान मुलांना समजेल असा आपल्या कुठल्याही ग्रंथाचा सिलॅबस बनवून तो शिकवणं सुरु करावं. तो ग्रंथ दासबोध असेल किंवा ज्ञानेश्वरी किंवा गीता किंवा मनाचे श्लोक पण हा एक अभ्यासक्रम सुरु राहिला पाहिजे. हिंदू संस्कृती स्वतःच इतकी मोठी आहे की आपल्या कडे कमीच नाही कविता, गाणे, वेगवेगळे चरित्र, शूर वीरांच्या गोष्टी, ग्रंथ गोष्टीच गोष्टी. या बाबतीत आपण भाग्यवान आहोत.
काय गरज आहे ते खोटं बोलायचं गाणं शिकवून "ओपन युअर माऊथ हा हा हा" वगरे.
काही जण म्हणतील इतक्या लहानपणी त्याला कशाला तत्वज्ञान शिकवून त्रास द्यायचा? मग तुम्ही सांगा काय शिकवायचं? "Flying kiss दे", "Say Hello", "बरोबर YouTube लावून घेतो आपलं आपलं", हे शिकवायचं का? तुम्ही विचार करा लहान ३ वर्षाच्या मुलाने YouTube लावलं तर कौतुक वाटतं आणि तो मोठा होऊन फोन सोडला नाही की राग येतो. असं का? आपणच सवय लावली लहानपणी मग तेच केलं मोठा झाल्यावर तर का राग येतो?
मी लहान मुलांच्या शाळेच्या संदर्भात छत्रपती संभाजी नगर ला रहाणारे रामेश्वर दुसाने ह्यांना भेटलो आणि मला लहानपणी पासून मुलांना शिकवण्या मागचं आणि कसं शिकवावं ह्याचं महत्व पटलं. तसा ही मी कोणी लहान सापडला की त्याला गोष्ट सांगितल्या शिवाय सोडतं नाही. काही जणांनी घेतला असेल अनुभव. आता तर मी अजून विचार करून शिकवेन. तुम्ही पण सुरु करा गोष्टी, कविता, श्लोक, सुभाषितं जे जमेल ते शिकवा आणि मुलांच्या डोक्यात शिक्षण हे फक्त शालेय जीवनापर्यंत नाही तर आयुष्यभर आनंदाने करायचं आहे हे डोक्यात पक्क करा.
मागचा आठवडा हा त्या आठवड्यांपैकी एक होता जिथे मला इतकं काही तरी छान वाचायला मिळतं किंवा असे कोणी तरी भेटतात की मी जमेल ते सगळे कामं पुढे ढकलून त्या व्यक्ती ला किंवा त्या पुस्तकाला वेळ देतो. हे पत्र पण पुढे ढकलणारं होतो पण वेळात वेळ काढून लिहिलं.
भेटूया पुढच्या पत्रात. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या घरातल्या मुलांना आणि त्यांच्यां मित्रांना शिकवण्यात व्यस्थ रहा. धन्यवाद.
आमचे पत्र नियमित मिळावे असं तुम्हाला वाटतं असेल तर इथे आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.
आमचे पत्र नियमित ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर इथे Subscribe करू शकता.
0 Comments