Hanuman Approach of Problem Solving!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

            परत एकदा धन्यवाद कारण तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हे पत्र वाचत आहात. रविवार म्हणजे रविवार आपली भेट होणार हे नक्की. किती जणं उत्साहाने वाचतात हे मला माहिती नाही पण मी उत्साहाने पत्र पाठवणार हे नक्की आणि त्या वर तुमचे रिप्लाय म्हणजे बोनस माझ्यासाठी. 

             आज आपण रामायणामधे डोकावून बघूया आणि समजून घेऊया की कसा विभीषण सापडला की काम पटकन होतं. लेट्स गो!

Movie Name : Ramayan The Legend of Price Ram

सुंदर कांड सगळ्यांच्या आवडीचा भाग.

        रामायणाची कथा प्रत्येकाला माहिती आहे. त्या मधला हनुमान लंकेला जाऊन, सीता मातेला भेटून, विभीषणाला भेटून, रावणाला भेटून अशी काही लंका पेटवून येतात हा प्रसंग तर परत परत अभ्यास करण्या सारखा आहे. मी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे ह्यांचं "कीर्तन विश्व" या यू ट्यूब चॅनेल वरचं कीर्तन ऐकत होतो तेंव्हा त्यांनी हा प्रसंग असा काही रंगवून सांगितला की मला वाटलं ह्या बद्दल जरा आपल्या सगळ्या मित्रांसोबत बोललंच पाहिजे. सुंदर कांडामधला हा प्रसंग भरपूर मोठा आहे. आपण त्या पैकी हनुमान विभीषणाला भेटले ह्या बद्दल बोलूया. 

        विचार करा संपूर्ण राक्षस जिथे रहातात तिथे हनुमान एकटे गेले. बरं एकटे जाऊन धुमाकूळ घातला तो वेगळा पण एक असा मित्र त्यांनी बनवला जो पुढे जाऊन आपल्या भावाच्या विरोधात तर गेलाच पण श्री रामांच्या बाजूने पण उभा राहिला. उगीच बुद्धिमत्ताम वरिष्ठम नाही म्हणत हनुमानांना. एक वेळ ५-५० जणांना मारून झोपवणं सोप्प आहे. पण अशा शत्रूच्या जागेवर जाऊन तिथल्या एका शत्रूला आपला खास मित्र बनवणं काय सोप्पी गोष्ट आहे का? हे सगळं हनुमानाला कसं जमलं? हीच तर खरी मजा आहे रामायण अभ्यास करण्याची. 

रिडींग बिटवीन दी लाईन्स 

        मला भरपूर कथा, कीर्तन, व्याख्यान, प्रवचन ऐकण्याची सवय अशात काही वर्षात लागली. एकच गोष्ट किंवा एकच प्रसंग मी ५-६ वेगवेगळ्या कीर्तनकार, प्रवचनकार किंवा व्याख्यान देणारे ह्यांच्या कडून ऐकला आहे. आत्ता पर्यंत तरी मला आफळे बुवांसारखे शब्दांच्या मागे लपलेले अर्थ समजावून सांगणारा कोणी भेटला नाही. हा प्रसंग समजावून सांगताना आफळे बुवा काय म्हणतात, "कुठल्याही लंकेत विभीषण असतोच फक्त त्याला शोधणारा हनुमंत बनावं लागतं."

            म्हणून मला कधी कधी आपण वाचत बसण्यापेक्षा ह्या सगळ्या मोठ्या लोकांचे प्रवचन, कीर्तन ऐकत बसावे वाटतात. किती मोठा अर्थ सांगितला आफळे बुवांनी एकदा विचार करा. मी मला आलेला अनुभव सांगतो. आयुष्यात कामं करता करता आपल्या खूपदा जिथे जाण्याची इच्छा नसते तिथे जावं लागतं. तिथेच नेमकं काहीतरी काम येतं आणि नाईलाजाने ते करावं लागतं. पण कुठेही कामं हे लोकंच करत असतात. इतक्या गोंधळात तो व्यक्ती शोधता आला पाहिजे. 

            अशा जागेवर जरी जावं लागलं तरी लक्षात ठेवण्याचा मुद्दा हा की हनुमान, आपण भरपूर मज्जा करू असा विचार करून गेले नव्हते लंकेला. त्यांना तर रस्ताही माहिती नव्हता. तो शोधत शोधत पोहोचले होते. तिथे नको नको ते बघावं लागलं, आता काहीच होणं शक्य नाही असे विचार येऊन गेले, वाईट वाटावं अशा अवस्थेत सीता मातेला पाहिलं, रावणाने शेपटीला आग लावली. पण इतक्या सगळ्या गडबडीत त्यांनी विभीषणसारखा मित्र बनवला. 

कामं शेवटी व्यक्तीचं करत असते

        बरेच जण हे विसरतात की काम हे कधीपण व्यक्ती करतं असते. एक उदाहरणं देऊन सांगतो. एक व्यक्ती एका कंपनीत गेला आणि तिथे तो प्रॉडक्ट विकून आला ही झाली त्या व्यक्तीची पद्धत ज्याने रामायणाचा अभ्यास केलेला नाही. रामायणाचा अभ्यास केलेला व्यक्ती प्रॉडक्ट तर विकून येईलच. सोबत त्या कंपनी मधल्या ज्या व्यक्तीच्या हातात हा प्रॉडक्ट विकत घेण्याची जबाबदारी दिलेली आहे त्याच्या सोबत गट्टी करून येईल. म्हणजे आजची ऑर्डर तर कन्फर्म झालीच आणि त्याचं बरोबर पुढच्या कितीतरी वर्षांची पण ऑर्डर कन्फर्म. ही झाली हनुमंताची पद्धत. विभीषण शोधणे म्हणजे नेहमी शत्रूंच्या तावडीत जाऊन मित्र शोधणे हा अर्धवट अर्थ झाला. 

        त्या त्या जागेवरच ते ते काम करणारा व्यक्ती स्वतःहून आपली मदत करायला येतो की सापडला समजायचा विभीषण. असे विभीषण प्रत्येकाने शोधावे. जमल्यास कुठल्यातरी हनुमंताचे आपण विभीषण व्हावे. पण हा छोटासा भाग रामायणातला किती मोठी शिकवण देऊन जातो बघा. 

        सांगायचं इतकंच की तुम्ही कोणाचे विभीषण आहात का? का तुम्हाला कोणी कुठल्या जागेवरच विभीषण सापडला आहे? सापडला असेल तर मला सांगू नका. मनातल्या मनात हसा आणि हा Hanuman Approach of Problem Solving ज्याला समजला नाही त्याला लवकरात लवकर समजावा अशी प्रार्थना करा. 

        भेटूया पुढच्या पत्रात. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त रहा. धन्यवाद.  

आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा









Post a Comment

0 Comments