|| श्री||
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष
मागच्या काही आठवड्यांत आपल्या संवादात आपण एक विषय नेटाने लावून धरलाय - "उत्तम गुण"! आपण उत्तम गुण घ्यावेत, त्या गुणांची प्रॅक्टिस करावी म्हणजे ते गुण जीवनात टिकून राहतील, असं आपण २–३ पत्रांत बोललो.
पण खरं सांगू कां? कितीही उत्तम गुण शिका, जोपर्यंत डाउट — म्हणजे शंका — मनात घर करून आहे, तोपर्यंत पाहिजे तसा रिझल्ट मिळणं जरा अवघडच जातं.
आजच्या पत्रात मी एका व्यक्तीची कथा सांगणार आहे बरं कां. केवळ शंकेमुळे एका व्यक्तीसोबत काय घडलं ते ह्या कथेतून जाणून घेऊ या.
पण... I really doubt. तुम्ही हे पत्र खरंच पूर्ण वाचणार का? की नाहीच वाचणार? की उगाच overlook करून सोडून द्याल? छ्या, सोडा ते! हे डाऊटस् बाजूला ठेवू या, आणि गप्पा मारू या. लेट्स गो!
तुमचं वजन आहे ८० आणि...
तर ही कथा आहे मिस्टर अक्षय कुमार ह्यांची. अक्षय कुमारला खूप वर्षांनंतर ऑफिस मधनं सुट्ट्या सॅन्क्शन झाल्या होत्या. ऑफिस, वर्कलोड, टार्गेटस्, डेडलाईन्स - ह्या सगळ्यात स्वतःसाठी निवांत असा वेळ मिळालाच नव्हता त्याला. त्याने मस्त एक व्हॅकेशन प्लान केले होते खूप दिवसांचे !आणि ह्या एका ट्रिपची तो कधीपासून वाट बघत होता की काय सांगावं! आणि करता करता शेवटी त्या बहुप्रतिक्षित ट्रिपचा दिवस उजाडला.
ट्रेनची वेळ होती सकाळी ८ ची. पण आपला अक्षय भल्या पहाटे ५ वाजताच स्टेशनवर पोहोचला. प्लॅटफॉर्म वर जाऊन उभा राहिला. कां? तर ट्रेन सुटू नये म्हणून! आता इतक्या लवकर आला खरा, पण करणार काय होता पुढचे तीन तास? म्हणून मग तो स्टेशनवर इकडे तिकडे बघायला लागला. अन् झालं असं की इकडे तिकडे बघता बघता सहजच अक्षय कुमारच्या नजरेस पडला एक वजनकाटा! त्याने विचार केला — “चला वजन करीत थोडा वेळ घालवू या.”
वजनकाट्यावर उभा राहून त्याने एक कॉइन मशीन मध्ये टाकला. मशीन मधून एक चिठ्ठी बाहेर आली.
त्यावर लिहिलं होतं:
“तुमचं नाव अक्षय कुमार आहे, तुमचं वजन ८० आहे आणि ८ वाजता तुमची ट्रेन आहे.”
संदेश वाचून अक्षय अचंभितच झाला! त्याला शंका आली की — “अरे! या मशीनला माझं नाव आणि ट्रेनची वेळ कशी काय समजली बुवा? नक्की काहीतरी गडबड आहे."
एका शंकेमुळे सहज वजन करायला गेलेला अक्षय आता नको त्या गोष्टीत अडकायला लागला होता.
त्याने शक्य तेवढे दिसण्यात बदल केले आणि पुन्हा पुन्हा वजन केलं. पण दर वेळी मेसेज तंतोतंत तसाच येत राहिला. हा प्रकार जवळजवळ अर्धा तास चालला, तरी मेसेज काही बदलला नाही.
आता अक्षय सुद्धा इरेला पेटला होता. शंकासुराने त्याला पूर्ण ताब्यात घेतले होते.
शेवटी त्याने ठरवलं — “स्टेशनच्या बाहेर जाऊन असा काही अवतार करतो की माझा मी स्वतःलाच ओळखायला येणार नाही!”
तो ताबडतोब स्टेशन बाहेर पडला. त्याने तोंडाला काळं फासलं, कपडे बदलले आणि तो परत एकदा वजनकाट्याकडे आला.
अक्षय काट्यावर उभा राहिला. त्याने कॉइन टाकले. परत एक नवीन चिठ्ठी बाहेर आली.
या वेळेस मात्र त्या चिठ्ठीवर थोडा वेगळा संदेश लिहिला होता:
“तुमचं नाव अक्षय कुमार आहे, तुमचं वजन ८० आहे आणि ८ वाजताची तुमची ट्रेन सुटून गेली आहे."
एका शंकेवर दुसरी शंका करता करता वेळ हातून कधी निघून गेला हे त्याला कळलेही नाही. शंका करता करता त्याला वेळेचेही भान राहिले नव्हते.
आता तुम्हीच सांगा — खरंच गरज होती कां वजन करून नको तिथे डोकं लावण्याची?
गाडीच्या अर्धा तास आधी जरी पोहोचलात तरी सगळं काही वेळेवर झालं असतं की. पण पहिली शंका — “गाडी लवकर आली तर?”
दुसरी — “मला उशीर झाला तर?”
तिसरी — “वजनकाट्याला माझं नाव कसं समजलं?”
असं करता करता जे सहज होणारं होतं ते होऊ शकलं नाही, आणि जे नको होतं तेच नेमकं घडलं.
प्रयत्न हे १००%च करावे लागतात
काहीही मिळवायची इच्छा असेल,
तर त्यासाठीचा आत्मविश्वास, धडपड, मेहनत, अभ्यास, सातत्य — सगळं १००% लागतं.
“मी प्रयत्न शंभर टक्के करतो, बघू झालं तर झालं,”
किंवा“मी १००% प्रयत्न केले, पण होईल का नाही शंका आहे” —
असं म्हणणं म्हणजेच प्रयत्न पूर्ण झालेले नाहीत, आणि हे सबकौंशीयसली तुम्हालाही माहिती आहे.
१००% प्रयत्न करूनही मनात शंका असणं —
हे देखील पूर्ण प्रयत्न न करण्याचंच लक्षण आहे.
आता समर्थ कसे समजावून सांगतात बघूया
हाच कॉन्सेप्ट समर्थ आपल्याला कसा समजावून सांगतात बघा!
ते एका ओवीत म्हणतात -
अचुक येत्न करवेना । म्हणौन केलें तें सजेना ।
आपला अवगुण जाणवेना । कांहीं केल्यां ।। ६ ।।
समर्थ म्हणतात — "जो प्रयत्न अचूक होत नाही, त्याचं काम सुद्धा साजरं होत नाही;
आणि जेव्हा आपला अवगुण कळत नाही, तेव्हा कितीही काहीही केलं तरी ते पूर्णत्वाला जात नाही."
निसर्गाचा एक नियम आहे —
जे आपण देतो तेच आपल्याला परत मिळतं.
Every action has an equal and opposite reaction.
“प्रत्येक क्रियेला सम आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते.”
मग तुम्हीच सांगा —
“बघू, प्रयत्न केले आहेत, काय माहित होईल का नाही ते!”
असा विचार मनात ठेवून केलेल्या कामाचा रिझल्ट काय असणारे?
समर्थ मनाच्या श्लोकात सुद्धा म्हणतात —
कळेना कळेना कळेना, ढळेना ।
ढळे, न ढळे, संशयो ही ढळेना ॥
गळेना गळेना अहंता गळेना ।
बळें आकळेना, मिळेना मिळेना ॥ १४२ ॥
ते म्हणतात — या मना मधून संशय का जात नाही, हेच कळत नाही.
अहंकार का गळत नाही, तेही समजत नाही.
असो, आपण एकच करू शकतो, आपल्या पेक्षा मोठी जी शक्ती आहे तिच्यावर विश्वास ठेऊन शंका सोडून देऊन आपलं आपलं काम उत्तम करू शकतो.
मग आज पासून आपण सगळे प्रयत्न करूया. ती मोठी शक्ती आहे ना, तिच्या वर विश्वास ठेऊन शंका सोडून देऊन जगूया. भेटूया पुढच्या पत्रात. तोपर्यंत — स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि शंका सोडून जगण्यात व्यस्त रहा.
धन्यवाद!
आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.
आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.

1 Comments
आजची पोस्ट उत्तम आहे.कथेतून समर्थ विचार छान समजावून सांगितला आहे
ReplyDelete