उत्तम गुण अभ्यासितां येती - भाग २

 ।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष, 

        या रिल्स आणि शॉर्ट व्हिडिओंच्या काळात माझ्या पत्राचे बहुतेक वाचक संपूर्ण वाचणारे आहेत म्हणून सगळ्यांचेच मनापासून आभार. प्रत्येक आठवड्यात एक पत्र - आणि त्यावर मिळणारे तुमचे मस्त मस्त रिप्लाय! रविवार असा मस्त जातो ना माझा....काय सांगावं! मी नेहमीच कमीतकमी शब्दांत  एक विचार तुमच्या पर्यंत पोहोचवण्याच्या आणि तो कृतीत आणण्याची प्रेरणा तुमच्यामधे निर्माण  करण्याचा प्रयत्न करत राहीन. 

                    आजच्या पत्रात वाचूया - "नवीन स्किल्स शिकलो नाही, तर काय होईल?" हे समर्थ कसे सांगतात ते. लेट्स गो!




सदाकोपी 

            दासबोधामधे चातुर्य लक्षण समासामधील एक ओवी आहे.


प्रेत्न करीना सिकेना ⁠। शरीर तेंहि कष्टवीना ⁠। 

उत्तम गुण घेईना ⁠। सदाकोपी ⁠।⁠।⁠ ११ ⁠।⁠।


        या पत्राच्या पहिल्या भागात आपण वाचलं होतं की कसे समर्थ आपल्याला नवीन स्किल्स शिकून घे म्हणून सांगत आहेत ते. तुमचा पहिला भाग वाचायचा राहिला असेल तर तुम्ही इथे क्लिक करून तो वाचू शकता उत्तम गुण अभ्यासितां येती। - भाग १ 

       आता पुढच्या काही ओव्यांमधे जर आपण प्रयत्न करायचे सोडले, तर काय होईल ते समर्थ सांगतआहेत. जो माणूस नवीन काहीतरी शिकण्यासाठी कष्ट घेणं बंद करतो, प्रयत्न थांबवतो, ज्याला उत्तम गुण घेण्याची जी एक प्रोसेस आहे ती कंटाळवाणी वाटायला लागते - म्हणजे ज्याला चांगलं शिकण्यात काही इंटरेस्ट उरत नाही - असा व्यक्ती हळहळू  रागीट, चिडचिडा बनत जातो

         कष्ट करणं सोडणं, जितकं आहे त्यात खुश राहणं, आणि मग चिडचिड वाढणं —

ह्या साऱ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. म्हणूनच “कष्ट करायचं सोडणं ही झाली शेवटाची सुरुवात.


आजच्या बाजारी जगात मात्र प्रत्येक गोष्ट कंफर्ट मध्ये मोजली जाते. जी वस्तू जितकी जास्त कंफर्टेबल, तिची तितकी जास्त किंमत! पण असा कंफर्ट विकत घेऊन जर तुम्ही प्रयत्न सोडणार असाल, तर विचार करा — खरंच घ्यायची का ती गोष्ट?


मी uncomfortable राहायचं?


"अरे पण असं कसं म्हणतोस तू? पैसे कमवून मी uncomfortable राहायचं? मग मेहनत कशाला केली?”


Frankly सांगू कां? — होय!

Uncomfortable रहायचं!

तुम्हाला आवडणार नाही, पण आज नाही तर उद्या हे ऐकावं लागणारच आहे! मग आजच ऐका!


इथे माझा मतितार्थ पैसे कमवून सुद्धा अवघड परिस्थितीत रहा असा नाहीच आहे. प्रॉब्लेम अति घाई करण्याचा आहे.

समर्थ पुढे स्पष्टपणे काय सांगतात ते वाचा —


अंतर्कळा श्रुंगारावी । नानापरी उमजवावी ।

संपदा मेळवून भोगावी । सावकास ।। १० ।।


ते म्हणतात —

पहिले तुझं अंतःकरण विविध गुणांनी सुशोभित होऊ दे,

वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आत्मसात कर.

मग भरपूर संपत्ती कमवं,

पण तिचा उपभोग मात्र सावकाश घे —

अगदी हळू हळू, निवांत!


उत्तम गुणांचा अभ्यास नेहमीच कर. एक क्षणही वाया जाऊ देऊ नकोस. पण त्या अभ्यासातून, त्या कष्टातून मिळालेल्या संपत्तीचा आनंद — हळूहळू, समजून, सावकाश घे.



पण सहसा होतं उलटंच!

        आपण धडपड करून काहीतरी मिळवतो — आणि ते मिळालं की त्याच्यासोबत प्रसिद्धी येते, पैसा येतो, नवीन ओळखी होतात, नवीन सोयी मिळतात! पण या सगळ्याचा उपभोग सावकाश घ्यावा. आपलं पहिलं ध्येय नेहमीच नवनवीन गोष्टी शिकण्यावर, आणि उत्तमोत्तम गुण अभ्यासण्यावर असायला हवे.


        एक छोटं उदाहरण सांगू का? जॉब लागल्यानंतर जर हातात एक-दोन लाखांचा फोन घेण्याची ताकद आली,

आणि तो घेतला ही! तर त्या फोनचा उपयोग गेम्स खेळण्यात किंवा वेळ वाया घालवण्यात न करता नवीन काहीतरी शिकण्यासाठी केला पाहिजे.


कसं म्हणावं शहाणं तुम्हाला?


आळसें कार्येभाग नासतो ⁠। साक्षेप होत होत होतो ⁠।

दिसते गोष्टी कळेना, तो- ⁠। शाहाणा कैसा ⁠।⁠।⁠ २७ ⁠।⁠।


        हा समास पूर्ण करतांना समर्थ स्पष्ट सांगतात — आळस केला की काम होणार नाही, हे तर नक्कीच!

आणि रोज थोडं थोडं केलं, तर काम होतंच — हेही नक्की! ज्याला नेहमी अनुभवास येणारी इतकी साधी गोष्ट कळत नाही, त्याला मग “शहाणा” म्हणायचं तरी कसं?



       एक जानेवारीला मोटिवेट होऊन “आता मी व्यायाम करणार!” असं ठरवायची गरजच नाही मुळात. रोज फक्त १५ मिनिटं जरी व्यायाम केला तरी आपली प्रकृती उत्तम राहते.


        खूप जास्त डायटिंग, “हेच खायचं, तेच नको” अशा गोष्टींचीही गरज नाही — फक्त खाण्याच्या वेळा नियमित ठेवा, आणि पोटापेक्षा थोडं कमी खा, तरी तुम्ही टुणटुणीत राहू शकता.


    रोज एक ओवी समजून घेतो, असं ठरवलं, तरी सगळ्या ग्रंथांचा अभ्यास होऊ शकतो. पण म्हणतात ना — “ही गोष्ट साधी आहे, सोपी नाही.”


        ही ओवी वाचून आता आपल्यालाच ठरवायचं आहे — समर्थांच्या किंवा आपल्या सद्गुरूंच्या समोर

आपण शहाणे आहोत का वेडे?


चला —

आळस सोडूया, कष्ट वाढवूया,

आणि शहाणे होण्याचा प्रयत्न करूया.


आता आपली भेट पुढच्या पत्रात.

तोपर्यंत — स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि शहाणे होण्याच्या प्रयत्नात व्यस्त रहा.


धन्यवाद!

आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.


-------------------------------------------------------------------------------------------------------

मला इथून पुढे लिहिण्याची इच्छा नव्हती पण तरीही लिहितो आहे आणि तुम्हीही वाचा.

        मी माझे लिहिण्याचे प्रयत्न दोन ते तीन वर्षांपासून सुरु केले. प्रत्येक आठव्यात रविवारी एक, म्हणजे वर्षाचे ५२ असे जवळपास १५० पत्र माझे लिहून झाले आहेत. या लिखाणाच्या प्रवासात मला खूप सारे लोकं भेटतं गेले. काही माझे खूप चांगले मित्र झाले. काही जुने मित्र पत्र वाचून खुश होतात. काही ठिकाणी माझी लेखक म्हणून ओळख केली जाते. पण या सगळ्या ओळखींमधे काही ओळखी अशा आहेत ज्यांना मी फक्त कॉल वर किंवा पत्राला आलेला रिप्लाय इतकंच ओळखतो. माझी कधी त्यांच्या सोबत भेट झालीच नाही. भेटू-भेटू असं बोलणं खूपदा झालं पण नाहीच जमलं. 

        या माझ्या सगळ्या वाचकांपैकी एक भावना ताई म्हणून होत्या. हो होत्या लिहितो आहे. कारण दोन दिवसांपूर्वी मला माझ्या एका दादाचा फोन आला आणि तो म्हणाला की, "अरे अजिंक्य, एक अपघात झाला आणि भावना ताई आता आपल्या मधे नाहीत." 

        आपण जेंव्हा जेंव्हा काहीही नवीन करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा तेंव्हा आपल्या जवळचे नेहमीच कौतुक करतात. पण काहीही ओळख नसताना कौतुक करणाऱ्या भावना ताई या माझ्या आयुष्यात पहिल्याच होत्या.

        त्या नेहमी फक्त "छान लिहितो" असं नाही म्हणायच्या तर भरभरून कौतुक करायच्या जशी काही आमची लहानपणी पासून मैत्री आहे. तुम्ही जर माझ्या whatsappच्या ग्रुप मधे आहात तर त्यांचे मागचे सगळे मेसेज तुम्हाला आजही वाचता येतील. पहिला रिप्लाय कोणाचा असायचा तर भावना ताई. मी रविवारी ९ च्या ऐवजी ९ वाजून ५ मिनिटाला पत्र पाठवले तर पर्सनल नंबर वर त्यांचा मेसेज येतं होता मला, आजच पत्र का आलं नाही म्हणून! त्या माझ्या शहरात नाही रहायच्या. आमचं जितकं बोलणं झालं त्या मधून त्या शिक्षिका आहेत हे मला समजलं होतं. 

        मला माझ्या अनेक वाचकांपैकी जर कोणाला भेटायची इच्छा होती तर त्या भावना ताई होत्या, पण ही भेट आता कधीच होणार नाही. काय गणितं असतात देवाची त्यालाच माहिती. काही दिवसांपूर्वी एका रविवारी पत्र वाचून त्यांनी मला फोन केला. भरपूर गप्पा मारल्या आणि फोन ठेवताना मला म्हणे, "अजिंक्य तू लिहीण कधीही थांबवू नकोस. खूप छान लिहितोस. असाच लिहितं रहा." 



        भावना ताई तुम्हाला मी मनापासून नमस्कार करून सांगतो की मी नेहमी सोप्प्या शब्दात लिहिण्याचा माझा प्रयत्न सुरु ठेवेन. तुम्ही जिथे कुठे आहात तिथे खुश रहा आणि छान रहा ................... मला नाही माहिती काय लिहावं ह्याच्या पुढे!!

        भावना ताई, आपली कधी भेट झालीच नाही पण तुमच्या बोलण्यावरून, रिप्लाय वरून, whatsapp च्या फोटो वरून तुमचं जे काही एक चित्र माझ्या मनात आहे ते मी छान तसंच जपून ठेवेन. 


भेटूया एखाद्या पुढच्या पत्रात. धन्यवाद. 🙏🙏🙏


---------------------------------------------------------------------------------------------------------











Post a Comment

0 Comments