।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
पुन्हा एक रविवार आणि रविवार म्हणलं की आपली भेट नक्की. पुन्हा एकदा तुम्ही वेळात वेळ काढून माझे पत्र वाचतात म्हणून तुमचे खूप खूप आभार.
आज बोलूया नवीन शिकण्याबद्दल. आपण रोज काही ना काही तरी काम करत असतो जे करत करत आपण त्या मधे एक्स्पर्ट झालेलो असतो. तरीही बरेच जण त्या पेक्षाही नवीन काहीतरी शिकण्याची धडपड करत असतात. ती धडपड का करावी आणि खरंच करावी का? हे सगळं बोलूया आजच्या पत्रात. लेट्स गो!
रूप लावण्य अभ्यासितां न ये । सहजगुणास न चले उपाये ।
कांहीं तरी धरावी सोये । अगांतुक गुणाची ।। १ ।।
दशक १४ : समास ६ चातुर्येलक्षण
समर्थ सांगतात छान दिसणे हे आपल्याला जन्मतः मिळाले आहे. म्हणजे त्याचा फार काही वेगळा अभ्यास करावा लागत नाही. तुम्हाला कधी कुरूप बाळ दिसलं आहे का? कुठलंही बाळ बघा. खूप छान दिसतं असतं. मग कष्ट कुठे लागतात? इथून पुढे समर्थ छान समजावून सांगतात. ते म्हणतात अगांतुक गुणांची सोय धरा म्हणजे अजून स्वतःमधे कुठलीतरी स्किल वाढवा.
समर्थ सांगत आहेत की तुम्ही अगांतुक गुण अंगी वाढवा. कितीतरी स्किल्स आहेत जे रोज आपण अभ्यास केला तर आपल्या अंगी येतील. लिहिणे, गाणे म्हणणे, गोष्टी सांगणे, विनोद सांगणे, चित्र काढणे, व्यायाम करणे, योग विद्येचा अभ्यास करणे, खेळणे, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करणे असे एक नाही किती तरी गुण आहेत जे आपण एक एक करत अभ्यास करत त्याची सवय करून घेऊ शकतो.
हो मला पण शिकायचं आहे काही तरी नवीन!
हा उत्साह प्रत्येकाला असतो. नवीन नवीन सुरवात सगळे करतात नंतर गाडी ला धक्का मारावा लागतो. म्हणून पुढच्या काही ओव्यांमधे समर्थ सांगतात.
अवगुण सोडितां जाती । उत्तम गुण अभ्यासितां येती ।
कुविद्या सांडून सिकती । शाहाणे विद्या ।। ५ ।।
इथे समर्थ शहाणे हा शब्द वापरतात. प्रत्येकाकडे चोवीसच तास आहेत. ह्या वेळेच्या बाबतीत कोणीही श्रीमंत नाही कोणीही गरीब नाही. ज्याला हे समजलं की मला अमुक एक स्किल, अमुक एक गुण शिकायचा आहे पण मला जास्त झोपण्याची (कुविद्या) सवय आहे. तर मला जास्त झोपणे ही कुविद्या सांडावी लागणार आहे.
समर्थांचा सांडणे हा शब्द खूप छान आहे. खूप ठिकाणी तो वाचता येतो. आपण बोलताना खूपदा सोडणे असा शब्द वापरतो. सांडणे हा फक्त पाण्या सारखं काही असेल तर सहसा वापरला जातो. पण समर्थ खूप ठिकाणी सांडणे वापरतात. आपण जर एखादी गोष्ट सोडतो तर ती परत धरण्याची सोय असते. माझ्या हातात कुत्र्याचा पट्टा आहे आणि जर मी तो सोडला तर कुत्रा थोडा वेळ इकडे तिकडे पळेल. मी सोडलेला पट्टा पुन्हा धरू शकतो. पण माझ्या हातातला पाण्याचा ग्लास जर सांडला तर मला ते पाणी परत ग्लास मधे भरता येतं नाही.
म्हणून समर्थ कुविद्या सांडायला सांगत आहेत. एकदा सांडली की परत येऊ नका देऊ. माझ्या उदाहरणात मी झोपण्या बद्दल सांगितलं. एकदा का ती जास्त वेळ झोपण्याची कुविद्या मी सांडली की परत माझ्या कडे ती आली नाही पाहिजे. मग आता जो वेळ मिळतो आहे त्या मधे काय करायचं? उत्तम गुणांचा अभ्यास करायचा आणि त्याचं वेळात अवगुण सोडून देण्याचा विचार करायचा. अवगुणांना सोडून देऊन उत्तम गुंणाचा अभ्यास करायला लागलो की झाली सोय अगांतुक गुणांची.
४ गोष्टी या मधून तुम्ही आणि मी समजून घेऊ शकतो.
१. आपल्याला जन्मतः काही गोष्टी मिळालेल्या आहेत. त्या साठी काही वेगळी मेहनत घ्यावी लागत नाही.
२. पण आयुष्यात मोठं होण्यासाठी आपल्याला काही स्किल्स शिकाव्या लागणार आहेत तिथे मेहनत घ्या.
३. त्या शिकण्यासाठी बिनकामाच्या गोष्टींमधे जाणारा वेळ सोडून/सांडून द्या आणि स्किल्स शिकण्यात वेळ घालवा.
४. मिळणाऱ्या वेळेमधे उत्तम गुणांचा अभ्यास करा आणि अवगुण सोडा.
समर्थ अगदी सोप्प करून सांगतात. ह्याच्या पुढेही समर्थ फार छान सांगतात. जसे की जो कोणी वेगवेगळ्या स्किल्स स्वतः शिकतो त्याला काय मिळतं आणि जो शिकण्याची मेहनत घेत नाही त्यांच्या सोबत काय होतं, ते आपण पुढच्या पत्रात बघूया.
मी AI ला ग्रंथराज दासबोध ह्या मधल्या काही ओव्या समजावून सांगायला सांगितल्या. तर AI ने कशा समजावून सांगितल्या ते पण ऐका.
आपण भेटूया पुढच्या पत्रात. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि अगांतुक स्किल्स शिकण्यात व्यस्त रहा. धन्यवाद.
आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.
आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.
0 Comments