।। श्री ।।
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष,
रविवार आला आहे आणि मी पण ठरलेल्या वेळेला गप्पा मारायला आलो आहे. मागच्या पत्राचे सगळ्यांचे प्रतिसाद खूप छान होते. वेळ काढून पत्र वाचणे आणि त्यानंतर वेळ काढून मला रिप्लाय किंवा कॉल करणे ही छोटीशी गोष्ट आहे; पण यामुळे माझा उत्साह खूप वाढतो. प्रत्येकाला मनापासून धन्यवाद.
मागच्या रविवारी माझा एक अनुभव आणि त्याला सारख्या वाटणाऱ्या दासबोध ग्रंथातील काही ओव्या मी सांगितल्या. आज पण दासबोधातील काही ओव्या बघूया, ज्या नामस्मरणाचे महत्त्व सांगतात.
समर्थ काय म्हणतात बघूया!
स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें ।नामस्मरणें पावावें । समाधान ।। २ ।।
नित्य नेम प्रातःकाळीं । माध्यानकाळीं सायंकाळीं ।नामस्मरण सर्वकाळीं । करीत जावें ।। ३ ।।
चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां ।नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ।। ७ ।।
संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती ।नामस्मरणाची स्थिती । सांडूंच नये ।। ८ ।।
ह्या ओव्या दासबोध ग्रंथातील दशक ४, समास ३ — नामस्मरण भक्ती मधील आहेत. संपूर्ण समासच वाचण्यासारखा आहे; पण आज ३–४ ओव्या पुरेशा आहेत.
भगवंताचे स्मरण करावे, त्याचे नाम अखंड जपत राहावे. नामस्मरणानेच समाधान प्राप्त होते. नित्य नेमाने प्रातःकाळी, मध्याह्नकाळी, सायंकाळी एवढेच नव्हे तर सर्वकाळ नामस्मरण करीत राहावे. चालताना, बोलताना, उद्योगधंदा करताना, खाताना, जेवताना, सुखी असताना किंवा नाना उपभोग घेतानाही नाम कधी विसरू नये.
एखाद्या वेळी वैभव, सामर्थ्य, सत्ता आणि इतर प्रापंचिक गोष्टींची सुबत्ता झाली, तरी त्या भाग्याचा उपभोग घेत असतानाही नामस्मरण सोडू नये.
तुम्ही पण घेतला असेल हा अनुभव!
आपल्याला शिक्षणातून आणि जसजसे आपण मोठे होतो तसतसे, “आपलं काम म्हणजेच आपला देव” असे शिकवले जाते. ते चुकीचे नाही. काम प्रामाणिकपणे आणि मन लावूनच करावे. पण जे आपल्या कामाबाबत अतिशय प्रामाणिक असतात, त्यांना ह्या ओव्या सुरुवातीला थोड्या अवघड वाटतात.
नकळत मनात विचार येतो — “माझं काम तर खूप concentration ने करावं लागतं. कामाच्या वेळेत मी देवाचं नाव घेत बसलो आणि कामात गडबड झाली तर?” काम करताना नाम घ्यायचं म्हणजे नेमकं काय?
माझा एक अनुभव सांगतो. खरं तर हा माझाच नाही; ज्याने ज्याने प्रसादाचा शिरा खाल्ला असेल, त्या प्रत्येकाचा हा अनुभव असेल.
शिरा हा पदार्थ घरी अधूनमधून बनतो. हॉटेलमध्येही मिळतो. पण ज्या दिवशी घरी सत्यनारायण पूजा असते, त्या दिवशीचा प्रसादाचा शिरा काही वेगळाच लागतो, नाही का?
नामस्मरण करत शिरा केला असेलच असे नाही; पण डोक्यात सतत हे विचार चालू असतात — “आज घरी पूजा आहे… आज सत्यनारायण आहे… आज लोकं जेवायला येणार आहेत… गुरुजी येणार आहेत…” म्हणजेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मन भगवंताच्या विचारात असते. म्हणून ती चव बदलते.
गोष्टी वाचल्या की संकल्पना स्पष्ट होतात!
जिथे खूप एकाग्रता लागते अशा कामांमध्ये काय करावे, याचे उत्तर मला गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातील एका गोष्टीत सापडले.
प्रपंचातील विविध कामांमध्ये गढून गेलेल्या एक बाई महाराजांकडे आल्या. त्यांनी आपली व्यस्त दिनचर्या सांगितली आणि विचारले, “आता मी नाम केव्हा घेऊ ते सांगा?”
त्यावर महाराज शांतपणे म्हणाले, “बाई, तुम्ही उठताना आणि झोपताना अंथरुणात दोन-तीन मिनिटे वेळ काढू शकाल काय?”
त्या बाईंना “हो” म्हणण्याखेरीज पर्याय नव्हता.
महाराज म्हणाले, “सकाळी उठल्यावर प्रार्थना करा — ‘परमेश्वरा, तुझ्या कृपेने आजचा दिवस उगवला. तो तुझ्यासाठी अर्पण होऊ दे. आज दिवसभरात जी जी कर्मे घडतील ती तुला अर्पण करीन. जे काही घडेल ते तुझ्या इच्छेने आणि माझ्या कल्याणासाठीच घडेल.’
आणि रात्री झोपताना म्हणा — ‘परमेश्वरा, तुझ्या कृपेने आजचा दिवस संपला. आज दिवसभरात जी जी कर्मे घडली ती तुला अर्पण केली. जे काही घडले ते तुझ्या इच्छेने आणि माझ्या कल्याणासाठीच घडले.’
तुम्ही सकाळ-संध्याकाळ अशी प्रार्थना केलीत, तर मधली सारी कर्मे नामस्मरणच ठरतील.”
मात्र, ही प्रार्थना रोज श्रद्धेने करायला हवी.
भगवंताने गीतेमध्ये अर्जुनाला वारंवार सांगितले आहे — “तू प्रत्येक कर्म मला अर्पण कर.”
प्रत्यक्ष युद्धकर्म सुद्धा भगवंताच्या अनुसंधानात शक्य आहे, तर संसार का शक्य नाही?
नेहमीचं उदाहरण सांगतो
सध्याचंच उदाहरण घ्या. जर तुम्ही बँकेत नोकरी करत असाल, तर तिथे एकाग्रता खूप महत्त्वाची असते. नामस्मरणाच्या नादात नोटा मोजताना चूक झाली, तर पैसे स्वतःलाच भरावे लागतील.
मग जर माझं चार तासांचं काम असेल, ज्याला पूर्ण एकाग्रता लागते, तर त्या चार तासांत मी नामस्मरण कसं करू?
महाराज म्हणतात तसं — नोटा मोजायला सुरुवात करण्याआधी मनातल्या मनात भगवंताला प्रार्थना करा:
“परमेश्वरा, या क्षणापासून पुढचे चार तास मी जे काही काम करेन, तेच तुझं नामस्मरण समजेन. ही बँकही तुझी आहे आणि या नोटाही तुझ्याच आहेत.”
आता काम म्हणजेच नामस्मरण झालं की नाही?
नामसाधनेत कर्म अडथळा ठरू शकत नाही. कामाला भगवंतभावाची जोड दिली की कामाचा दर्जाच बदलतो.
त्यामुळे हे नामस्मरणाचं महत्त्व सांगणारं पत्र मी नामस्मरण करतच लिहिलं आहे आणि तुम्हीही पुढे नामस्मरण करत करत वाचाल, ही माझी खात्री आहे.
आजपासून सगळी कामे भगवंताच्या अनुसंधानात राहून करूया.
भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि नामस्मरण करण्यात व्यस्त रहा.
धन्यवाद.

0 Comments