Your Bill Total: ZERO

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

            पुन्हा एका नवीन रविवारी तुमच्या प्रत्येकाला नमस्कार करतो आणि आजही काहीतरी मस्त गोष्ट सांगणार याची तुम्हाला खात्री देतो. मागच्या आठवड्यात आपण नामस्मरणाबद्दल दासबोध ग्रंथातील काही ओव्या पाहिल्या. आज वेगळा विषय घेऊया. 

        परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. पत्र वाचल्याबद्दल आभार, वाचून अभिप्राय दिल्याबद्दल आभार, अजून काही जणांना “हे वाचा” असं सांगितल्याबद्दल आभार आणि तुमचा वेळ मला दिल्याबद्दलही मनापासून आभार. आज बघूया आईची एक सुंदर गोष्ट. लेट्स गो!

प्रत्येक रविवारची संध्याकाळ

        रविवारी सुट्टी असते, त्यामुळे काही ना काही प्लॅन्स बनलेले असतात. पण मागच्या काही महिन्यांपासून माझा रविवारी रात्री ८ वाजताचा एकच प्लॅन असतो — लहान मुलांसोबत गप्पा.

मी Zoom Meeting द्वारे लहान मुलांसोबत गप्पा मारतो आणि आम्ही खूप धमाल करतो. धमाल म्हणजे गोष्टी, कविता, गेम्स, गाणी, चित्रपट, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी, हॅबिट ट्रॅकर… काय काय नाही करत आम्ही त्या ४० मिनिटांत!

तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की रविवारी रात्री ८ वाजता कॉलला या. कॉलमध्ये सहभागी होणे हीच त्या कॉलची एकमेव फी आहे. बाकी काही नाही.

तर, मागच्या आठवड्यात १० तारखेला रविवार आणि मातृदिन (Mother’s Day) एकाच दिवशी आले होते. म्हटलं, चला, आज मुलांना आईबद्दल माहिती असलेल्या सगळ्या गोष्टी सांगूया.

मी आठवडाभर गोष्टी शोधत होतो. “आई” हा विषयच असा आहे की या विषयावर गोष्टींची कमतरता नाही. पण “कुठली सांगावी?” या विचारात असताना मी एका गोष्टीवर येऊन थांबलो. ही खूपच सुंदर गोष्ट आहे. तुम्ही ऐकलीही असेल; पण पुन्हा एकदा डोक्यात जावी आणि कायमची लक्षात राहावी अशी ही गोष्ट आहे.

आज मी जी गोष्ट सांगणार आहे, त्या गोष्टीचं नाव आहे — “दिनूचे बिल”. ही गोष्ट सुप्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे यांनी लिहिलेली आहे. मराठीमधील काही खास लघुकथांपैकी ही एक आहे. मी असंही ऐकलं आहे की ही कथा पूर्वी पाठ्यपुस्तकात होती. तुम्ही वाचली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा.

दिनूचे बिल

            दिनूचे वडील डॉक्टर होते. दिनू कधी कधी त्यांच्या सोबत दवाखान्यात जात असे. तिथे पुष्कळ लोक यायचे — कोणी तपासणीसाठी, कोणी औषध घेण्यासाठी. कोणी म्हणायचं, “डॉक्टर, पोट दुखतंय, औषध द्या,” तर कोणी विचारायचं, “डॉक्टर, बिल किती झालं?”

हे सगळं दिनू एका छोट्या खुर्चीवर बसून ऐकत असे. दवाखान्यातल्या बऱ्याच गोष्टी त्याला समजू लागल्या होत्या; पण “बिल” म्हणजे काय हे त्याला समजलं नव्हतं.

एकदा दिनूने बाबांना विचारलं, “बाबा, बिल म्हणजे काय हो?”

डॉक्टरांनी टेबलवरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवत म्हणाले, “हे बघ, याला म्हणतात बिल. वाच.”

दिनू तो कागद वाचू लागला. त्यावर लिहिलं होतं —

रुग्णाला तपासल्याबद्दल — १० रुपये
दोनदा घरी येण्याबद्दल — २० रुपये
आठ वेळा औषध दिल्याबद्दल — ८ रुपये

एकूण — ३८ रुपये

दिनू ते बिल बराच वेळ वाचत होता. मधेच तो हसला. त्याच्या मनात काहीतरी विचार आला.

घरी गेल्यावर दिनूने एक कागद घेतला आणि आपल्या आईच्या नावावर एक बिल तयार केलं. त्यावर त्याने लिहिलं —

आज बागेतून फुले आणल्याबद्दल — ५० पैसे
बाळाला दोन तास सांभाळल्याबद्दल — २ रुपये
शेजारच्या काकूंना निरोप दिल्याबद्दल — १ रुपया
दुकानातून साखर आणल्याबद्दल — ५० पैसे

एकूण — ४ रुपये

हे बिल दिनूने आईच्या खोलीत नेऊन ठेवलं.

दुसऱ्या दिवशी दिनू सकाळी लवकर उठला. त्याच्या उशीजवळ ४ रुपये ठेवलेले होते. त्याने ते पैसे घेतले आणि त्याचबरोबर त्याला एक कागदही दिसला.

त्याने तो कागद उचलला आणि वाचायला सुरुवात केली. तो कागद म्हणजे आईने दिनूच्या नावावर तयार केलेलं बिल होतं.

आईने लिहिलं होतं —

लहानपणापासून आत्तापर्यंत वाढवल्याबद्दल — काही नाही
चारदा आजारपणात दिवसरात्र जागून काळजी घेतल्याबद्दल — काही नाही
गोष्टी सांगून करमणूक केल्याबद्दल — काही नाही
वाचायला शिकवल्याबद्दल — काही नाही

एकूण — काही नाही

दिनूच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्या हातातला कागद खाली पडला आणि ते पैसे घेऊन तो तसाच आईकडे रडत गेला.

काहीही न बोलता त्याने आईला पैसे परत केले आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागला.

आईने दिनूला कुरवाळलं, त्याचा मुका घेतला आणि ती म्हणाली,
“तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं, दिनू!”

गोष्टीत मन अडकणे

        कितीतरी वर्षांनी असं झालं की एखादी गोष्ट वाचता-वाचता आणि ऐकता-ऐकता मी इतका रमलो की डोळ्यातून कधी पाणी आलं ते समजलंच नाही. या गोष्टीसोबत तसंच झालं.

खरंच, आईने आपल्यासाठी केलेल्या गोष्टींचं गणित कोणीच लावू शकत नाही.

आईवरच्या मला माहिती असलेल्या सगळ्या गोष्टींपैकी ही गोष्ट मला सर्वात जास्त आवडलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा.

आपल्या ओळखीच्या सगळ्यांना ही गोष्ट सांगा आणि स्वतःही एकदा विचार करून बघा — खरंच आई-वडिलांनी आपल्या साठी केलेल्या गोष्टींचं बिल बनवलं, तर त्याची एकूण किती होईल? आणि त्याची परतफेड करण्याचा काही मार्ग तरी आहे का?

नसला माहिती मार्ग तरी हरकत नाही. त्यांच्या सोबत असणं सुद्धा पुरेसं आहे.

भेटूया पुढच्या रविवारी अजून एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आई-वडिलांच्या सहवासात राहून त्यांना खुश करण्यात व्यस्त रहा.

धन्यवाद.

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर —

👉 WhatsApp ग्रुप Join करा
👉 Email Newsletter Join करा

Post a Comment

0 Comments